सारिका कुलकर्णी

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ ही फक्त परिस्थितीनं अगतिक होऊन कायदा हाती घ्यावा लागलेल्या आईची कथा नाही. केवळ एका स्त्रीवरचा अन्याय समजून घेऊन स्वत:चं कुटुंब आणि न्यायालय अशा दोन स्तरांवर लढा देणाऱ्या वकील बाईचीही ही कथा नाही.. स्त्री प्रगत, आत्मनिर्भर झाली, तरी तिला किती पातळय़ांवर झगडा करत पुढे जावं लागतं, याचा पटच हा चित्रपट उभा करतो. समाजाच्या स्त्रीबद्दलच्या धारणा आणि स्त्रीच्याही तिच्याबद्दलच्या ठाकूनठोकून तयार करण्यात आलेल्या धारणा, अधोरेखित करत संघर्षांतूनच पुढची वाट दिसेल, हे सूचित करणारा हा चित्रपट आजच्या काळातही तितकाच समर्पक आहे. म्हणून तो पाहायला हवा.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

स्त्रीला एकदा माता, देवी अशी रूपं दिली, की मग तिला सर्वोच्च सन्मान मिळाला आहे आणि तिनं त्यात धन्यता मानायला हवी, ही मानसिकता जुनीच. एवढंच नव्हे तर स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तू आहे, मूल नावाचं खेळणं तिच्या हातात पडलं की ती त्यात गुंतून जाते आणि पुरुष मनमानी करायला मोकळा होतो, असं वाटणंही नवीन नाही. समाज कितीही आधुनिक झाला, तरी या समजुती जणू आपल्या जनुकांमध्येच भिनल्या आहेत अशी शंका येते. अनेकदा पुरुष वरवर कितीही सर्वसमावेशक वागत राहिला तरी अंतर्मनात ‘मी पुरुष आणि ही स्त्री’ अशी तरतमभावना असते, असं जाणवतं. उपभोग्य वस्तू ते स्वतंत्र अस्तित्व असलेली व्यक्ती हा टप्पा स्त्रीला बहुतेक वेळा स्वत:च लढा देऊन पार करावा लागतो. स्त्रीच्या अशाच वेगवेगळय़ा स्तरांवरील झगडय़ाची कथा सांगणारा ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ हा चित्रपट त्यामुळेच अगदी कुठल्याही काळात समर्पकच वाटतो.

कारखानीस या व्यक्तीच्या खुनानं चित्रपट सुरू होतो. वेडसर दिसणारी विद्या राऊत कशाच्या तरी शोधार्थ फिरते आहे. तिला कारखानीस समुद्रकिनारी दिसतो आणि ती त्याच्यावर चाकूनं सपासप वार करते. खुनानंतर पोलीस चौकीत जाऊन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करते. तिला कुणीही वकील नको आहे. तिचं एकच म्हणणं आहे, ‘मी खून केलाय. मला जास्तीत जास्त शिक्षा द्या.’ स्वत:हून शिक्षा मागणारी विद्या या वळणापर्यंत कशी आली त्याची ही गोष्ट.

पतीच्या मृत्यूनंतर नोकरी करत मुलीला सांभाळणारी विद्या राऊत ही एक साधीसुधी स्त्री. एकल पालकत्व तिला अवघड जातंय. एकीकडे विधवा झाल्याचंही दु:ख आहे. तिची तेरा-चौदा वर्षांची मुलगी स्नेहा अजूनही वडिलांच्या आठवणीतून बाहेर पडत नाहीए. दोघींचंही आपापल्या पातळीवर परिस्थितीला सामोरं जाणं सुरू आहे. अशातच विद्याचा बॉस रघुवीर कारखानीस (रवींद्र मंकणी) प्रथम चांगला मित्र बनून तिच्या आयुष्यात येतो. दोघांची हळूहळू पुढे जाणारी समंजस मैत्री स्नेहाला मान्य नाहीये, पण या मैत्रीचा विद्याला आधार वाटतोय. बऱ्याचदा ती बॉसजवळ आपलं मन मोकळं करते. एकदा कोर्टाच्या कामाकरिता विद्याला पुण्याला जावं लागतं आणि ती पुण्याहून परत येते तेव्हा मुळापासून हादरवून टाकणारी गोष्ट पुढय़ात मांडून ठेवलेली असते. विद्या इमारतीत शिरताना तिला कारखानीसची गाडी तिथून जाताना दिसते आणि घरात जाऊन पाहिल्यावर स्नेहावर बलात्कार झाल्याचं लक्षात येतं. कारखानीसवर तिनं खटला भरल्यानंतर त्याचे वकील दंडवते ही केस विद्यावर उलटवतात. विद्या चांगल्या चारित्र्याची नसून तिनं बॉसची फसवणूक केल्याचे खोटे पुरावे सादर केले जातात. विद्याला तीन वर्षांची शिक्षा होते. तुरुंगात तीन वर्ष तळमळणारी विद्या जेव्हा बाहेर येते, तेव्हा बाहेर तिच्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. या सर्व धक्क्यातून सावरू न शकलेली स्नेहा अबोल कोशात गेलेली असते. विद्याला जगण्याचा आता एकच उद्देश दिसतो. ज्यानं आपल्या संसाराची ही अवस्था केली त्याला उद्ध्वस्त करणं. आणि ते ती करतेच.

खून केल्यानंतर विद्याचं वकीलपत्र दंडवते यांच्याकडे आलं आहे. तेच दंडवते, ज्यांनी विद्याला आधीच्या केसमध्ये चारित्र्यहीन सिद्ध केलं होतं! अर्थातच त्यांना या केसमध्ये स्वारस्य नाही, पण त्यांचा भाऊ आदित्य दंडवतेची पत्नी स्वाती हिला विद्याची केस हाताळावीशी वाटते. स्वातीला तिच्या घरात विशेष स्थान नाही. ती पेशाने वकीलच आहे, पण घरची वकिलीची मोठी परंपरा असूनही तिला त्यात फारसं काही करू देण्यास नवऱ्याचा विरोध आहे. बायकांनी फक्त घर सांभाळावं, नवऱ्याच्या पैशांवर मजा करावी, नवऱ्याला खूश ठेवावं, ही त्याची अपेक्षा! आदित्यचे मोठे भाऊ दादा दंडवते निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. खोटे पुरावे देऊन, साक्षीदार फितवून प्रकरणं आपल्या बाजूनं वळवण्यात माहीर आहेत. दादा दंडवत्यांना मूलबाळ नाही, त्यामुळे पत्नीला ते सारखे घालूनपाडून बोलतात.

स्वाती हट्ट करून विद्याची केस हातात घेते. विद्या आणि स्वाती या दोघींभोवती चित्रपट फिरतो. स्वाती विद्याला न्याय मिळवून देऊ शकते का, दोघींचं भवितव्य काय, या प्रश्नांची उत्तरं चित्रपट देतोच, पण त्याच्याही पलीकडे त्यात अनेक गोष्टी आहेत. एका ठरलेल्या वाटेनं जाणारे आपण. विशेष करून भारतीय स्त्रिया! आपण आणि आपलं घर एवढीच आपली दुनिया, असं समजणाऱ्या अनेकजणी. या समजुतीला धक्का लागतो तेव्हा काय होतं, याची ही गोष्ट फक्त चुणूक आहे.

‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ ही एकाच वेळी अनेक स्त्रियांच्या संघर्षांची कथा आहे. विद्याचं आयुष्य नाटय़मयरीत्या बदलतं म्हणून ती नायिका असली, तरी या चित्रपटाला अनेक नायिका आहेत. मुलीवर झालेल्या बलात्कारासाठी न्याय मागणाऱ्या आणि न्याय न मिळाल्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या विद्याबरोबरच घरात आपलं स्थान पोतेऱ्यासारखं आहे हे जाणवल्यावर संघर्ष करणारी स्वाती, आपल्याला मूल नाही म्हणून घरात आपल्याला हीन लेखतात या जाणिवेनं पिचलेली असली, तरी दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीला न्याय मिळावा म्हणून स्वातीला मदत करणारी तिची जाऊ, वडिलांचं छत्र हरपल्यावर समजुतीने वाट काढत पुढे जाऊ पाहणारी छोटी स्नेहा, या सर्व स्त्रिया त्यांच्या त्यांच्या गोष्टींच्या नायिकाच आहेत.

गजेंद्र अहिरे हे सामाजिक भान असणारे दिग्दर्शक. ‘सायलेन्स’, ‘सरीवर सरी’, ‘गुलमोहर’, ‘शेवरी’, ‘सावर रे’ हे त्यांचे चित्रपट स्त्रीला वेगळय़ा भूमिकेत दाखवणारे. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’देखील नेटक्या दिग्दर्शनातून पुढे जाते. विनाकारण कुठे रेंगाळत नाही. जे जे चित्रपटात दाखवलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. काही सूचक प्रसंग तर खूप छान जमले आहेत. ‘खूप म्यांव म्यांव करणारी मांजर आणि स्त्री हे सारखेच असतात. आणि वेळीच त्यांचा गळा घोटला पाहिजे,’ हे दादा दंडवते यांचं मत दाखवणारा प्रसंग किंवा ‘नवरा गेल्यावर कुठल्या तरी प्रकारे स्त्रीला शरीराची, भावनेची गरज भासतेच,’ हे सांगणारा कारखानीसबरोबरचा विद्याचा संवाद.. ‘केसचे दरवाजे उघडतील,’ हे स्वातीला सूचित करताना गरुड वकिलांचं घराची खिडकी उघडणं.. हे प्रसंग अहिरे यांच्या दिग्दर्शनातला नेमकेपणा दाखवतात.

विद्याच्या मनाची घालमेल तर संवादांमधून फार अचूक पकडली आहे. विचित्र द्वंद्वात सापडलेली विद्या अभिनेत्री आदिती देशपांडे यांनी उत्तम उभी केलेली आहे. तिच्याकडे बघताना तिचं हतबल होणं आपल्यालाही भिडतं. आपणही तिच्याबरोबर रागानं पेटून उठतो. तिच्याबरोबर जे घडतंय ते अनुभवत जातो. विद्याचं प्रकरण हाती घेतल्यावर तिची अवस्था समजून घेणारी, कुटुंब आणि न्यायालय या दोन्ही पातळय़ांवर धीरानं लढणारी स्वाती मधुरा वेलणकर यांनी उभी केली आहे. केसचं समन्स जेव्हा ती नवऱ्याला पाठवते आणि त्याबद्दल घरी गेल्यावर त्याच्या हातून मार खाते तेव्हा ‘ही परिस्थिती आता मी बदलणार आहे’ हा तिच्या चेहऱ्यावरचा निर्धार आपल्या आतपर्यंत पोहोचतो. पत्नीची किंमत न करणारा आदित्य दंडवते तुषार दळवी यांनीही थेट पोहोचवला आहे. स्वत:च्या आयुष्यात एका वेगळय़ा संघर्षांतून वर आलेले आणि विद्याची तडफड अचूक जाणणारे गरुड वकील (मिलिंद शिंदे) मनाला स्पर्श करतात.

‘स्त्रियांना एकदा हातात मूल हे खेळणं दिलं की त्या रमतात’ असं धाकटय़ा भावाला सांगणारे धूर्त वकील दादा दंडवते मोहन जोशी यांनी साकारले आहेत.स्त्रीला नमवायचं असल्यास तिच्या अब्रूला हात घाला, म्हणजे ती शांत बसेल, हा विचार जुना झालेलाच नाही. स्त्री कितीही प्रगत झाली, शिकली तरी स्त्री असण्याचं ओझं घेऊन तिला कुठल्या तरी स्तरावर लढा द्यावाच लागतो. कधी कधी हा लढा स्वत:शीच असतो. घर घडवण्याची, माणसं जोडून ठेवण्याची सगळी जबाबदारी आपलीच आहे, ही तिचीही समजूत पक्की आहे. शिक्षित असूनही असाहाय्य असणारी स्त्रीही या चित्रपटात आहे. कुठल्याही प्रसंगात नवऱ्याच्या बाजूनं उभं राहायचं असतं, हेही स्त्रीच्या डोक्यात बसलेलं आहे. म्हणूनच नवरा चुकलेला असतानाही कारखानीसची बायको त्याच्या बाजूनं उभी राहते. ‘आपला नवरा चुकूच शकत नाही,’ ही तिची भूमिका. या विचारातून बाहेर पडून आहे त्या गोष्टीकडे सापेक्ष नजरेनं स्त्रिया कधी बघतील?.. स्त्रीकडे बघण्याची नजर कधी बदलणार?.. एकटी स्त्री कशाचीही भीती न वाटता निर्धोकपणे कधी जगू शकेल?.. स्त्रीला केवळ पैसे नव्हे, त्याच्या पलीकडेही अजून काही हवं असतं हे कधी कळणार? असे किती तरी प्रश्न हा चित्रपट उभे करतो.

न्यायव्यवस्था निकाल देताना पुरावे बघते. कोणत्या भयंकर तगमगीतून विद्याला खून करण्यापर्यंत यावं लागलं, हे सत्य कायद्याच्या ठाशीव चौकटीत बसेलच असं नाही. छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून मोठय़ा गोष्टी अधोरेखित करण्याची हातोटी दिग्दर्शक म्हणून अहिरे यांच्याकडे आहेच; ती या चित्रपटातही त्यांनी लीलया वापरली आहे.

स्त्री आता खूप मुक्त, आत्मनिर्भर झाली आहे असं आपण म्हणतो. ती आत्मनिर्भर असेलही, पण अनेक अदृश्य साखळदंड किती तरी वेगवेगळय़ा रूपांत तिच्या आजूबाजूला आहेत. ते साखळदंड दाखवणारा चित्रपट म्हणूनच एकटय़ा विद्या राऊतचा, एकटय़ा स्वाती दंडवतेचा राहात नाही. तो आत्मसन्मानासाठी लढा देणाऱ्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणारा आहे.

sarika@exponentialearning.in

Story img Loader