डॉ. नंदू मुलमुले
जगायचं कसं हे सांगतं ते तंत्रज्ञान, मात्र जगायचं कशासाठी हे सांगतं तत्त्वज्ञान. काय तत्त्व आहे माणसाच्या आयुष्याचं? अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकंच आवश्यक असतं जगण्याचं उद्दिष्ट. कशासाठी जगायचं? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी, वयाच्या भिन्न टप्प्यांसाठी वेगवेगळं असलं तरी त्यातील तत्त्व एकच, जगण्यासाठी काही तरी उद्दिष्ट हवं. प्रयोजन हवं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विद्यार्थिदशेत यशासाठी, तरुण वयात अर्थार्जनासाठी, तर प्रौढत्वी आनंदासाठी. आनंद हा उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासातलं ‘बायप्रॉडक्ट’. कारण उघड आहे; आनंद ही भावना आहे. आणि कुठल्याही भावनेची निर्मिती करणं हे उद्दिष्ट ठेवता येत नाही. उद्दिष्ट म्हणजे एक गंतव्य स्थान, एखादी वस्तू, एखादा आकडा. मी स्पर्धेत यशस्वी व्हावं, मला अधिकाराचं पद मिळावं, माझी उलाढाल कोटी कोटी रुपयांची व्हावी, एक ना दोन. यातून पद मिळेल, पैसा मिळेल, पण आनंद मिळेल की नाही याची हमी नाही.
रसायनशास्त्राच्या भाषेत आनंद हा दोन रसायनांच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा घटक. उद्दिष्टपूर्तीच्या प्रवासातच माणसाला तो गवसतो. उद्दिष्ट हरवलेलं म्हातारपण दिशाहीन होत जातं, माणसाला अधिक म्हातारं करून टाकतं. हीच गोष्ट शशिकांत संगमकर यांच्या आयुष्यात घडत होती. ‘‘डॉक्टर, मला हल्ली उदास, भकास वाटत राहतं. काही करावंसं वाटत नाही. तबियतीची एकाच वेळी काळजी वाटत राहते, त्याच वेळी तिला किती जपत बसायचं असा विचारही येतो. वैफल्याची जाणीव निर्माण होत राहते. काय केलं आपण आयुष्याचं? काय कमावलं? असे प्रश्न येत राहातात.’’ सकाळी सकाळी शशिकांत डॉक्टर महाशब्देंकडे पोहोचले आणि त्यांना आपलं वैफल्य सांगून टाकलं.
हेही वाचा : ‘भय’भूती : भीतीचा आकाश पाळणा
डॉक्टर महाशब्दे तसे त्यांचे परिचित, त्याच परिसरात त्यांचा दवाखाना. नेहमी भेटीगाठी व्हायच्या. शिवाय शशिकांत सर्वपरिचित असण्याचं एक कारण म्हणजे ते लोकप्रिय लेखक होते. ‘‘तुमच्या बोलण्यात-लिखाणात बरेच उर्दू, फारसी शब्द येतात शशिकांत!’’ डॉक्टरांचं वाचन इतर समव्यवसायी बंधूंपेक्षा बरंच चांगलं होतं.
‘‘हो डॉक्टर, मी हैदराबाद राज्यात बरीच सरकारी सेवा केली ना. अधीक्षक पदावर होतो मी महसूल खात्यात! त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ लिखाण करू लागलो. ते दिवस खूप उत्साहानं भारलेले होते. सारी मिळकत एकत्र करून बचतीत गुंतवली आणि नोकरीला राम राम ठोकला,’’ शशिकांत आठवणीत हरवून गेले.
‘‘बरीच हिम्मत केली म्हणायची. मी बरीच वर्षं वैद्याकीय अधिकारीपद सोडू शकलो नाही. व्यवसायात जम बसल्यावरच घेतली निवृत्ती. तुम्हाला कठीण झालं असणार. अर्धा पगार, हाताला काम नाही, तुमच्यासारखा व्यग्र माणूस…’’ डॉक्टरांना मध्येच थांबवत शशिकांत म्हणाले, ‘‘हाताला काम? अहो, लिखाणातून हाताला फुरसत नाही म्हणा. खूप संकल्प होते मनात, प्रकाशकही मागे लागले होते. मग पुस्तके प्रकाशित व्हायला लागली. तुम्ही म्हणता तो आर्थिक प्रश्न होता, पण त्यावेळी बायकोनं साथ दिली. माझा ध्यास पाहून तिनं हिम्मत बांधली,’’ शशिकांतच्या डोळ्यांत कृतज्ञ भाव होते.
‘‘वाह! म्हणजे, तुमची बायको तुमच्या लिखाणाची पहिली वाचक असणार. तिला तुमच्या लिखाणाचं कौतुक असणार!’’
‘‘खुळे की काय हेगिष्टे!’’ शशिकांतना पटकन पु. ल. देशपांडे आठवले. ‘‘सॉरी डॉक्टर, ‘अंतू बर्वा’ची आठवण झाली. अहो, माझं लिहिलेलं एक अक्षरदेखील ती वाचत नाही. लोकं म्हणतात, मी बरा लिहितो. ते हिच्या कानी जातं एवढंच! पण मी जे करतो त्यात माझं सुख आहे, हे ती ओळखते आणि साथ देते. हीच माझ्या दृष्टीनं कौतुकाची बाब. उगाच वाचण्याच्या भरात टीकाबिका केली असती तर काय करा?’’ शशिकांत हसत म्हणाले.
‘‘मग हे वैफल्य वगैरे केव्हा सुरू झालं?’’ डॉक्टरांना समजेना.
‘‘या वर्षाच्या प्रारंभापासूनच. मागल्या वर्षी ठीक होतं. खरं तर थोड्या हृदयाच्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या, पण असं उदास वगैरे वाटत नव्हतं,’’ शशिकांत स्वत:शी विचार करीत डॉक्टरांसमोर कैफियत मांडू लागले.
हेही वाचा : इतिश्री : उंच भरारी घेण्यासाठी…
‘‘वयोमानानुसार उत्साह कमी होतो बघा. कधी कधी कारणाशिवाय नैराश्य येऊ शकतं. मेंदूतील रसायनांचा खेळ आहे तो. काही काळजी करू नका. मी गोळ्या लिहून देतो. सौम्य समस्या आहे. कमी होईल.’’ बोलता बोलता डॉक्टरांनी टेबलाच्या खणातून शशिकांत यांचं नवं पुस्तक काढलं. ‘‘आत्ताच वाचायला घेतलंय, तुमची सही द्या यावर. मजरूहवरचा लेख फार छान!’’ डॉक्टरांच्या स्तुतीने शशिकांतना क्षणभर बरं वाटलं, पण क्षणभरच. वाचकांच्या उत्साही प्रतिक्रियांनी अंगावर रोमांच उभे राहण्याचे दिवस कधीच संपले होते, पण गेल्या सहा महिन्यांत जे काही एखाद दिवस छान वाटायचं तेही वाटेनासं झालं होतं. डॉक्टरांच्या ‘वयोमानानुसार’ या शब्दानं शशिकांतच्या निरुत्साहात अधिकच भर पडली. वयोमानानुसार? काय झालंय तरी काय वयाला? मी काय टेनिसपटू थोडाच आहे, वयानं फरक पडायला. लेखन करतो. ना कुठले शारीर श्रमाचे काम करत, शक्ती ओसरायला!
शशिकांतना डॉक्टरांकडे येताना वाटत होते त्यापेक्षा अधिक पोकळ, रिकामं वाटू लागलं. लेखक शशिकांत घरी पोचले तेव्हा बायको नातवाला शाळेत सोडायला निघाली होती. ‘‘पंधरा मिनिटांत येते, तोवर दूधवाला येईलच. ते घेऊन फ्रिजमध्ये ठेवा. आज साऱ्यांनीच उशीर केलाय. याची बसदेखील वेळेवर आली नाहीए.’’, आजी-नातू दोघंही रिक्षाने गेले.
शशिकांत पाहत राहिले. हिला कशाचंच काही नाही. माझ्या लेखनाचं काही नाही तर लेखन थांबल्याचं कुठून असणार? हिचं सारं लक्ष घरकामात! दुधाचा रतीब, भाजीचा भाव, सुनेची घाई अन् नातवाची धावाधाव. शशिकांतनी दार उघडून खुर्चीत बसकण मारली. मान मागे टाकून ते शांतपणे पडून राहिले. अजून वृत्तपत्र नाही वाचलं आजचं. काय वाचायचं तेच ते? असं आता प्रत्येक बाबतीत व्हायचं. काय करायचं जेवून? काय करायचं टीव्ही लावून? अंघोळ करून? कशाला वॉक घ्यायचा रोज? एवढं पथ्य पाळूनही मागल्या वर्षी अँजिओप्लास्टी करावी लागली. ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून…’ शशिकांतना आरती प्रभूंची कविता आठवली अन् ते दचकले. मृत्यूचे विचार? आजवर ते मनात कधी असे ठळकपणे उमटले नव्हते. तब्येतीच्या तक्रारी, लेखनप्रक्रियेतले अडथळे, क्वचित टीका-टिप्पणी, लोकप्रियतेतील चढ-उतार हे सगळं चालत असलं तरी मरणाचा कधी विचार आला नव्हता. मग आत्ता हे काय? डॉक्टर महाशब्दे म्हणतात तसं हे नैराश्य असेल का? घ्याव्या का गोळ्या? आपल्या नैराश्याच्या तळा-मुळाशी जायला हवं, नुसत्या गोळ्यांचा काय उपयोग म्हणून त्यांनी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तसंच खिशात ठेवून दिलं. शेवटी डॉक्टर महाशब्दे जनरल फिजिशियन, ते काय मानसरोगतज्ज्ञ थोडेच आहेत?
औषधं न घेता विचारात गुंग असलेले शशिकांत तसेच बसून राहिले. ‘‘कसला विचार करताय?’’ बायकोच्या आवाजानं ते एकदम भानावर आले. ‘‘तुम्ही सुस्त दिसताहात हल्ली. लिहिताना दिसत नाही, वाचतानाही दिसत नाही. बाहेर जाऊन लोकांमध्ये मिसळत नव्हतातच, पण आता टीव्हीदेखील बघत नाहीत. कसला विचार करताहात?’’
लक्ष नाही असं वाटूनही बायकोचं आपल्याकडे लक्ष असतं या गोष्टीनं शशिकांतना बरं वाटलं. नवरा काय लिहितो हे ती वाचत नसेल, पण तो लिहिण्याचं काम करतो आहे याची तिला जाणीव आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक म्लान हसू उमटलं. हिला काय सांगावं नैराश्याबद्दल? पण तेही सांगण्याची त्यांना गरज पडली नाही. तिने परस्पर आपलं मत मांडलं. ‘‘सांगू का, तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीपासूनच असे रिकामे रिकामे होत चालला आहात असं वाटतंय. माझ्या आता लक्षात येतंय. मागल्या वर्षापर्यंत किती उत्साहात होतात. तुमच्या दोन पुस्तकांचं डिसेंबरमध्ये प्रकाशन झालं. ते कुलकर्णी का कोण आले होते मुंबईहून, छान बोलले तुमच्या पुस्तकांबद्दल. मग जानेवारीपासून तुम्ही ठरवलंत, आता नाही फंदात पडायचं कुठल्याच कराराच्या. कुणाला शब्द द्यायचा नाही, वचन द्यायचं नाही, अमक्या तारखेपर्यंत काही लिहिण्याची ‘कमिटमेंट’ तर मुळीच घ्यायची नाही. ते कोण प्रकाशक किती मागे लागले तुमच्या, एक पुस्तक लिहून द्या सिनेमावर. तुम्ही म्हणालात, आता १ तारखेपासून मी मुक्त. काहीही ठरवणार नाही, कशाच्याही मागे धावणार नाही, खऱ्या अर्थाने निवृत्त होणार सगळ्यातून. तेव्हापासून तुम्ही मुक्त नाही झालात, रिकामे होऊन बसलात,’’ आपण नवऱ्याला फार बोललो या विचाराचं भान आल्यासारखं ती चपापली. बोलायचं थांबली.
हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व : स्त्रीद्वेष्ट्यांना पुरून उरणाऱ्या नेत्या
शशिकांत स्तंभित झाले. त्यांना बायकोकडून इतक्या परखड पण चिंतनशील विचारांची अपेक्षा नव्हती. तरी ते म्हणाले, ‘‘तू तर कायम मुक्त आहेस. तुझा कधी नोकरीचा करार नव्हता, बांधिलकी नव्हती, कुणाला वचनबिचन दिलं नव्हतं कुठल्याच बाबतीत. तू नाही रिकामी, उदास दिसत?’’
‘‘आम्हा बायकांची बांधिलकी, तुमच्या भाषेत ‘कमिटमेंट’ बाईपणाशी. आम्ही नोकरीत असलो, धंद्यात असलो, अगदी एखाद्या कार्पोरेट कंपनीत उच्च पदावर असलो तरी बाई ती बाईच. खुर्चीतून उठून, मोटारीतून घरी आली तरी, उंबरठ्यावरून पाय टाकून घरात आली की ती बाई. हे चांगलं की वाईट, माहीत नाही. मी साधी गृहिणी. समानता वगैरे मला काही समजत नाही, पण कुटुंबाची काळजी घेणं हा बाईपणाचा, आईपणाचा भाग. सासू-सासऱ्याचं सूनपण, नवऱ्याचं बायकोपण, मग पोरांचं आईपण, लग्न झाल्यावर पोरीचं माहेरपण. मग नातवाचं आजीपण, म्हाताऱ्या नवऱ्याचं पुन्हा आईपण! नवरा, पोरगा, सासरा, नातवंड या साऱ्यांची बांधिलकी ती आमची बांधिलकी. संध्याकाळी नातू शाळेतून आला की त्याला रोज नवीन खायला करायचं आणि दुसऱ्या दिवशी कामवाल्या बाईकडून कोठीघर साफ करून घ्यायची आठवण ठेवत झोपायचं ही माझ्यासारख्या बायांची बांधिलकी! आला दिवस व्यग्रतेत गेला की आम्हाला पुरतं. तुमच्या पुस्तकांसारखं. सासूच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच आमची कथा, ५० वर्षं नवऱ्याचं बोटं चाटूनपुसून कोशिंबीर खाणं हीच आमची कादंबरी, नातीचं आज्जी करीत बिलगणं हीच आमची कविता!’’
लेखक शशिकांत आपल्या बायकोकडे पाहत राहिले. ती आता साधीसुधी गृहिणी नव्हती, समंजस स्त्री वाटली त्यांना. सगळ्या कुटुंबाला जोडून ठेवणारी! जगायचं हे निसर्गज्ञान, कसं जगायचं हे तंत्रज्ञान. कशासाठी जगायचं हे तत्त्वज्ञान तिनं शिकवलं होतं.
nmmulmule@gmail.com