‘मिस युनिव्हर्स’ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत एक स्पर्धक म्हणून एका ‘पारलिंगी’ व्यक्तीने प्रवेश मिळवला आणि समाजाने कुतूहलयुक्त नजरेने आपल्या फक्त भुवया उंचावल्या. समाज सर्वसमावेशक होत चालल्याची ती खूण असावी का?

‘पारलिंगी’ या विशेषणाने हा समाज वेगळा म्हणून ओळखला जात असला तरी त्यात अनेक उपविभाग आहेत आणि फार मोठा इतिहासही त्यामागे आहे. गुरू आणि चेला या नात्यातून आणि समुदायात एकत्र राहण्यातून त्यांची काळजी घेणारी सामाजिक, आर्थिक बळ देणारी व्यवस्था तयार होत असली, तरी एक माणूस म्हणून जेव्हा त्यांची भावनिक गरज तीव्र होते, तेव्हा नकळतपणे त्यांची नजरही जोडीदाराचा शोध घेऊ लागते. भिन्नलिंगी जोडीदार असण्याची तीव्र इच्छा, कुणावर तरी असुसून प्रेम करावं ही तीव्र भावना वाढीस लागते. संधी मिळताच सहवासातून प्रेमसंबंध निर्माण होतात. त्याची परिणती विवाहसंबंधात होते. अशी कुटुंबं आता दिसू लागली आहेत.

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

गेली पंधरा वर्षं समाजाचा कडवा विरोध सोसून पारलिंगींच्या भक्कमपणे पाठीशी उभे असलेले प्लास्टिक सर्जन डॉ. आनंद जोशी सांगतात, ‘‘३७७ कलम रद्द केल्याने पारलिंगी वा समलैंगिकांचे विवाहसंबंध वैध मानले जातात. ज्यांना विवाह करून आयुष्यात स्थिर व्हायचं आहे ते लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी येतातच. पारलिंगी सामान्य माणसाप्रमाणे भिन्नलिंगी व्यक्तीच्या प्रेमात पडतात आणि सर्वसामान्य स्त्री अथवा पुरुष पारलिंगींच्या प्रेमात पडतात ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे. पण प्रेम करणं, आयुष्यात स्थिर होणं ही माणसाची मूलभूत भावना आहेच. मात्र एखाद्या पुरुषाने लिंगबदल शस्त्रक्रिया केली. तो पुरुष बाई झाला म्हणजे तो आता गर्भधारणा करू शकेल असं होत नाही. त्यामुळे मुलांची नैसर्गिक ओढ शमवण्यासाठी मुलांचं पालकत्व घेणं हाच पर्याय बहुतांशी त्यांच्यापुढे असतो. हे विवाह बरेचदा टिकतात असंही आढळून येतं. अशाच काही पारलिंगींच्या वैवाहिक जीवनावर त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद, १३ ते १९ नोव्हेंबर हा आठवडा जगात काही ठिकाणी ‘पारलिंगी’ अथवा ‘ट्रान्स व्यक्ती’ जागरूकता आठवडा मानला जातो. त्यानिमित्ताने…

हेही वाचा : इतिश्री : उंच भरारी घेण्यासाठी…

प्रिती – सांगते, माझं आयुष्य कादंबरीसारखं आहे. खुली किताब! मी मूळची गोरखपूरची! मुलगा असूनही मी मुलीसारखं वागते म्हणून कुटुंबीयांनी मला घरातून हाकलून दिल़ं मी मुंबईला आले. माझी एका पारलिंगी व्यक्तीशी भेट झाली. ती मला तिच्या घरी घेऊन गेली. त्यानंतरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नरकयातना देणारा होता. मी जवळच्याच हाजी अली दर्ग्यासमोर जाऊन रोज रडायची. बाबाने एक दिवस माझी प्रार्थना ऐकली म्हणायचं. मी मालाड येथील एका दुकानात पैसे मागायला जायची. तिथं एका वयस्क माणसाचं कोथिंबीर-मिरचीचं दुकान होतं. मी दिसायला सुंदर होते. ते माझ्या प्रेमात पडले. आम्ही एकत्र राहायला लागलो. पण ते खूप दारू प्यायचे आणि जुगार खेळायचे. शेवटी कंटाळून मी त्यांना सोडून निघून गेले तर ते कीटकनाशक प्यायले, पण वाचले. मी त्यांना भेटायला गेले. तर रडत म्हणाले, ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’ मी म्हटलं, ‘तुम्ही सुधारला तरच या माझ्याकडे!’ आणि त्यांनी खरंच दारू सोडली. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, ‘मला सन्मानाचं जगणं हवंय’ त्यांनी स्वखर्चाने माझी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. त्यानंतर न्यायालयात जाऊन आम्ही कायदेशीर लग्न केलं. त्याला १७ आता वर्षं झाली. नंतर आम्हाला दोघांना मूल असावंसं वाटायला लागलं. मग माझ्या पतीने वस्तीतल्या एका गरीब माणसाची दोन मुलं पालक म्हणून सांभाळायला घेतली. रीतसर कागदपत्रं केली. मोठा मुलगा सोळा वर्षांचा आहे, धाकटा मुलगा आठ वर्षांचा आहे. माझी ही दोन्ही मुलं शाळेत जातात. शाळेच्या पालक सभेला माझे पती जातात. मी जाऊ शकत नाही. कारण इतर मुलं त्यांना चिडवतील अशी मला भीती वाटते. अलीकडे माझ्या पतीची तब्येत ठीक नसते. ते घरात राहून मुलांची देखभाल करतात आणि मी आजही घरोघरी जाऊन गाणी-बजावणी करते. पैसे कमवते. त्यावर आता आमचं घर चालतं. माझ्या वाईट काळात त्यांनी मला साथ दिली म्हणूनच आज आमचा संसार सुखाचा आहे.

मला माझ्या आई-वडिलांसारख्या पालकांना एकच प्रश्न विचारायचा आहे. ‘तुम्ही दिव्यांग- अंध, शारीरिक व्यंग असणाऱ्या तुमच्या मुलांना सांभाळता, मग आमच्यासारख्या मुलांशी इतक्या निष्ठुरपणे का वागता? घरातूनच, तुमच्या आयुष्यातूनच आम्हाला बेदखल का करता? मला चांगला पती आणि गुणी मुलं मिळाली. म्हणून मी माणसांत तरी आले. बाकीच्यांचं काय?

सुमन – मी तीस वर्षांची आहे. मी बारावी उत्तीर्ण झाले आहे. घरचं सगळं चांगलं होतं, पण मी पुरुष म्हणून जन्म घेतला असला तरी माझ्या जाणिवा मुलीसारख्या आहेत, हे मला लवकरच जाणवायला लागलं. त्यापायी मी घरच्यांचा आणि गाववाल्यांचा खूप छळ सोसला. मग विचार केला की, असं दोन नावांमध्ये पाय ठेवून डळमळीत आयुष्य जगण्यापेक्षा स्त्री म्हणून उजळ माथ्याने जगावं. मग मी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान, आमच्या गावातला एक मुलगा माझ्या प्रेमात पडला. वर्षभर आम्ही एकत्र राहिलो. नंतर आम्ही मुंबईच्या न्यायालयात येऊन रजिस्टर लग्न केलं. चार वर्षं झाली आम्ही नवरा-बायको म्हणून चांगला संसार करतोय. माझा नवरा फॅशन डिझायनर आहे. तो कपड्यांच्या फॅक्टरीत कामाला आहे. आम्ही सुट्टीच्या दिवशी चौपाटीला फिरायला जातो. सिनेमाला जातो. लोक म्हणतात, ‘तुमची जोडी किती छान आहे’ हां. कधी तरी घरातल्या कामांवरून आम्ही दोघं भांडतोसुद्धा! पण नंतर एकमेकांची माफी मागतो. पण कितीही मोठं भांडण झालं तरी तो कधीही मला सोडून जाण्याची भाषा करत नाही. आम्हाला मूल हवंय, पण मिळत नाही. सर्वांत वाईट म्हणजे, लोकांना वाटतं यांना मूल दिलं तर त्याला आम्ही ‘आमच्यासारखं’ बनवणार! अहो, असा विचारसुद्धा आम्ही करत नाही. पण हे लोकांना कसं पटवणार? मला नेहमी एकच भीती वाटते. माझा जोडीदार तरुण आहे. मी त्याला लैंगिक सुख द्यायला असमर्थ आहे. त्याच्या गरजेपोटी तो कदाचित मला सोडून जाईल का, पण उद्याचा आणि तोही नको तो विचार करून, त्याचं आणि माझं आजचं आयुष्य वाया का घालवू? मी विचार करणं थांबवलं आहे.

अमर – मी पूर्वीची माया. मी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतलीय. पण त्यामुळे माझ्या आयुष्यातले प्रश्न सुटलेले नाहीत. कुटुंबाने आणि समाजाने मला अजूनही त्यांच्यात सामावून घेतलेलं नाही. मी नुकताच आमच्या वस्तीतल्या मुलीशी प्रेमविवाह केलाय. तिच्या घरून खूप विरोध होता, पण ती माझ्या प्रेमावर विश्वास ठेवून घरातून पळून आलीय. मी पदवीधर असूनही मला नोकरी मिळत नाही. भाड्याने राहातो, पण माझी खरी ओळख कळली की घरमालक मला जागा सोडायला लावतात. इतर माणसांप्रमाणे आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचा हक्क नाही का? पूर्वी तर आमच्यावर उपचार करायलासुद्धा डॉक्टर तयार नसत. आता परिस्थिती थोडीशी सुधारत चाललीय. तरीही मी सतत धास्तावलेला असतो. आज मधू माझ्याबरोबर राहते. आमचा संसार सुखाचा आहे. पण उद्या घरच्यांच्या दबावाला बळी पडून किंवा आईपणाची आस लागल्याने ती मला सोडून गेली तर मी कसा जगू? हा विचार मला अस्वस्थ करतो. मी आमच्या समाजात फारसा रमत नाही. कुटुंबाने तर मला वाळीतच टाकलंय. सध्या तरी मधू हेच माझं कुटुंब आहे, आयुष्य आहे.

हेही वाचा : ‘भय’भूती : भीतीचा आकाश पाळणा

सलोनी – मी पॉलिटिकल सायन्सची पदवीधर आहे. आसामच्या एका खेड्यातून मी मुंबईत आले. माझं स्वप्न होतं नोकरी करायची. संसार थाटायचा. मला मार्केटिंगचा जॉबही तिथे मिळाला होता. त्याच वेळी माझी गावातल्या एका मुलाशी मैत्री झाली. मी त्याच्यासोबत राहू लागले. दोन-तीन वर्षं मजेत गेली. पण नंतर नंतर माझ्या लक्षात येऊ लागलं की, तो फक्त पैशांसाठी माझा वापर करतोय. शेवटी त्याने मला धोका दिलाच. मग मी ठरवलं, मुंबईला जाऊन आपली ओळख बनवायची! मी मुंबईला आले. पण शिकलेली असूनही मला मुंबईत नोकरी नाही मिळाली. मला इतरांसारखं भीक मागायचं नाहीए. पण खाणार काय? मग मी नाइलाजाने आमच्या इतर साथीदारांसह लग्न समारंभात नाच-गाणी करून पैसा कमावते. पैसे जमवून आता मी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली आहे. करोना साथीच्या टाळेबंदीच्या काळात माझी एका पुरुषाशी ओळख झाली. ओळखीतून प्रेम जमलं आणि आम्ही लग्न केलं. आमच्या लग्नाला आता चार वर्षं झालीत. आज जिंदगी सुखात चाललीय. पण मी समजदार आहे. मी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतलीय, तरी मी त्याला जोडीदाराचं सुख देऊ शकत नाही. त्यामुळे तो कदाचित आयुष्यभर माझ्यासोबत राहणार नाही. म्हणून मला खरं तर सन्मानाची नोकरी करायचीय, पण आमच्यासारख्या सगळ्यांना ती मिळतेच असं नाही. खरं तर मला आई व्हायचंय. एका मुलाचं पालकत्व घ्यायचं आणि उरलेलं आयुष्य सुखात जगायचंय.

ममता – मी कोलकातामध्ये जन्माला आले. कॉलेजमध्ये शिकतही होते. अकाऊंट ऑफिसर बनण्याचं माझं स्वप्न होतं. पण वयात आल्यावर मुलगा असूनही मी मुलीसारखी नटते-मुरडते हे पाहून घरातल्या लोकांनी आधी समजावलं. मग धमकावलं आणि नंतर घरातून हाकलून दिलं. मी रस्त्यावर राहत होते. दर्दनाक आयुष्य! मला कॉलेजही सोडावं लागलं. इतका संघर्ष केला त्या काळात की, मी आत्महत्येचा विचार पक्का केला होता. त्या वेळी गुरूंनी माझा हात पकडला म्हणून मी जिवंत राहिले. आजवर इतकं दु:ख, दारिद्र्य, अपमान सहन केले की आता हृदय दगडाचं झालं आहे. ट्रेनमध्ये मी भीक मागत असे. सुदैवाने आमच्या जवळच्याच एका कॉस्मेटिक्सच्या दुकानदाराने मला लग्नासाठी विचारलं. या माझ्या जोडीदाराने मला खूप आधार दिला. तो म्हणाला, ‘‘मला तू खरंच आवडतेस. जशी आहेस तशी! सगळे पुरुष एकसारखे नसतात. मी नेहमी तुझ्यासोबत असेन. सुखात, दु:खात! विश्वास ठेव.’’ सुरुवातीला आम्ही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होतो. नंतर आमच्यात चांगलं बाँडिंग निर्माण झालं. आमच्या लग्नाला आता दीड वर्ष झालंय. आता एखाद्या मुलाचं पालक व्हायचा विचार करतोय. मग आमचं कुटुंब पूर्ण होईल. पण त्यापूर्वी मला चांगली नोकरी करायची आहे. कोणावर ओझं बनून नाही जगायचं. माझा नवरा नेहमी म्हणतो, देवाची कृपा राहिली तर आपला जोडा कायम असाच आनंदी राहील. आपण प्रार्थना करू.

रेश्मा – मी कोलकात्याजवळच्या एका खेड्यात राहत होते. मी वयात आले आणि एका मुलाच्या प्रेमात पडले. मग मी त्याच्यासोबत त्याच्या घरीच राहू लागले. पण त्याने एका मुलीशी लग्न केलं. मला दगा दिला. रागाने मी मुंबईत आले. इथं माझी एका ‘पारलिंगी’ व्यक्तीशी ओळख झाली. मी याच समुदायात गेली तेरा वर्षं राहते. मुंबईत आल्यावर आमच्या वस्तीतल्या एका दुकानदाराशी माझी ओळख झाली. आम्ही लग्न केलं. त्या वेळी त्याच्या नातलगांनी खूप विरोध केला. पण त्याने स्पष्टपणे सांगतिलं, ‘‘ती पारलिंगी असली म्हणून काय झालं? माणूसच आहे ना? मला ती आवडते.’’ मग त्याच्या घरच्यांनी मला स्वीकारलं. आजही त्याचे नातलग माझ्या घरी येतात. मला लग्न समारंभात सन्मानाने बोलावतात. कधी कधी मी त्याला म्हणते, ‘‘तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू सामान्य बाईशी लग्न कर. मी तुला अडवणार नाही. तुझ्या घरात किंवा मालमत्तेत हिस्सा मागणार नाही. तू माझ्यावर प्रेम करतोस हेच मला खूप आहे.’’ लग्नानंतर मला मुलाची खूप ओढ लागली. दरम्यान, वस्तीतली एक गरीब बाई गरोदर होती. तिची आर्थिक परिस्थिती फारच वाईट होती, ती बाळाला कसं पोसणार याची तिलाही काळजी लागून राहिली होती. तिला मी माझी इच्छा सांगितल्यावर तिने स्वेच्छेने तिची मुलगी माझ्या हातात दिली. मी तिला घट्ट छातीशी कवटाळलं, ती माझी झाली. थोडी मोठी झाल्यावर मी तिला माझ्या आईकडे पाठवून दिलं. या वस्तीत ती सुरक्षित नाही, हे मला माहीत आहे. थोडी मोठी झाल्यावर शिक्षणासाठी मी तिला हॉस्टेलवर ठेवणार आहे. माझी इच्छा आहे तिने डॉक्टर, इंजिनीयर व्हावं. मी माझ्या पतीला नेहमी एकच सांगते, तू मला सोडून गेलास तरी माझी एकच इच्छा आहे. माझ्या मुलीच्या लग्नात तिचा बाप म्हणून आणि माझा नवरा म्हणून तू हजर राहावंस. बस.’’ तो हसतो. म्हणतो, ‘‘मी तुला सोडून जाणार नाही? मी तुझ्याबरोबर सुखी आहे. जिंदगीभर तू मला साथ दे. बस्स.

तर अशा या पारलिंगींच्या विवाहाच्या कहाण्या! काळजावर ओरखडे उमटवणाऱ्या! या समाजावर खूप अन्याय होतो. उदाहरणार्थ, आनंदी. ती दिसायला सुंदर! एका एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून तिची निवड झाली. मुलाखतीमध्ये तिने आपली खरी ओळख सांगितल्यावर तिला नोकरी नाकारण्यात आली. अर्थातच तिचं ठरलेलं लग्नही मोडलं. निसर्गाने अन्याय केलाय! आपण तरी सन्मानाने वागवून त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद द्यायला हवा!

(लेखातील पारलिंगी व्यक्तींची नावे बदलली आहेत.)

Madhuri.m.tamhane@gmail.com

Story img Loader