पाकिस्तान सरकार आणि लष्कर करत असलेल्या बलुचिस्तानातील लोकांचे अपहरण आणि हत्या यांच्याविरोधात गेली अनेक वर्षे सातत्याने शांततापूर्ण मार्गाने प्रतिकार करणाऱ्या डॉ. माहरंग आणि सामी. डॉ. माहरंग यांचा तर ‘टाइम मॅगेझिन’ आणि ‘बीबीसी’ने गेल्या वर्षी जगभरातील १०० प्रभावी स्त्रियांच्या यादीत समावेश केला होता. पाकिस्तान सरकार, लष्करासमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या डॉ. माहरंग बलोच आणि सामी बलोच यांच्याविषयी…
डॉ. माहरंग बलोच आणि सामी बलोच… या बलुचिस्तानातील दोन स्त्रिया. शांततापूर्ण आंदोलनावर त्यांचा विश्वास असला, तरी पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कराला या दोन तरुण स्त्रियांची प्रचंड भीती वाटते. शांततापूर्ण आंदोलनाची ही ताकद आहे. नुकतीच, २२ मार्चच्या पहाटे पोलिसांनी डॉ. माहरंग आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना ‘दहशतवाद विरोधी कायदा’ आणि ‘पाकिस्तान पीनल कोड’च्या वेगवेगळ्या कलमांखाली क्वेटाहून अटक केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण बलुचिस्तानातील लोकांनी या अटकेच्या विरोधात आंदोलने, निदर्शने करून आपला निषेध नोंदवला.
कुठल्याही राजकीय पक्षाची मदत नसताना त्यांना मिळणारा हा पाठिंबा अभूतपूर्व आहे. डॉ. माहरंग आणि सामी यांच्यासाठी तुरुंगात जाणे अजिबात नवीन नाही. बलुचिस्तानातील लोकांच्या अधिकारासाठी त्या दोघी अनेकदा तुरुंगात गेल्या आहेत. लोकांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली आणि क्वेटा येथील सरकारी रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल डॉ. माहरंग आणि ‘बलोच यकजेहती (एकता) कमिटी’च्या नेत्यांची धरपकड करण्यात आली असल्याचे बलुचिस्तान सरकारचे म्हणणे आहे.
‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने ११ मार्चला क्वेटाहून खैबर-पख्तुनख्वाची राजधानी पेशावरला जाणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेस’वर केलेल्या हल्ल्यानंतरची ही घटना आहे. बलुचिस्तानात सर्व महाविद्यालये, शाळा बंद आहेत. इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. गायब करण्यात येणाऱ्या तरुण मुलांना सोडण्याची मागणी डॉ. माहरंग, सामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून धरली आहे.
हेही वाचा
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. माहरंग (वय वर्षे ३२) आणि सामी (वय वर्षे २६) यांना परिस्थितीने आंदोलनकर्त्या बनवले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्याही कुटुंबातल्या लोकांचे अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तानात हे नेहमीच घडत आले आहे. तेथील तरुणांचे अपहरण करण्यात येते आणि बहुतांशी काही महिन्यानंतर किंवा काही वर्षांनंतर त्यांचे मृतदेह कुठे तरी सापडतात. ही अपहरणे सहसा पाकिस्तानच्या लष्कराकडून किंवा गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’कडून केली जातात जे कुठल्याही आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु डॉ. माहरंग, सामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आंदोलन शांततापूर्ण असल्यामुळे ते चिरडून टाकणे सोपे नाही. त्यांच्या आंदोलनात महात्मा गांधीजींचा विचार कुठे तरी दिसतो.
क्षेत्रफळाचा विचार केल्यास बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. डोंगराळ प्रदेश असल्याने वस्ती सर्वात कमी आहे. मरी, बुग्टी, बिझेन्जोसारख्या जमाती इथे राहतात. बलुचिस्तानच्या काही भागांत पश्तुन (पठाण) देखील मोठ्या संख्येने आहेत. या प्रांतात शिक्षणाचे प्रमाण तुलनेने खूप कमी आहे. वेगवेगळ्या जमातींचे आणि त्यांच्या सरदारांचे आपापल्या भागात वर्चस्व, प्रभाव असतानादेखील येथील बलुच पुरुषांनी स्त्रियांचे नेतृत्व मान्य केले आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
बलुचिस्तानचा प्रश्न राजकीय आहे. डॉ. माहरंग आणि सामी यांनी बलुच लोकांच्या अधिकारांचे आणि अस्मितेचे मुद्दे मांडून पाकिस्तान सरकार, लष्करासमोर एक मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यांना भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बलुच स्त्री-पुरुष जमतात. सरकारने सभेला परवानगी दिली नसली, तरी लोक त्यातून मार्ग काढून तिथे पोहोचतात. ही त्यांची ताकद आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी डॉ. माहरंग, सामी कोण आहेत आणि दोघींनी त्यांच्या आयुष्यात काय काय सहन केले आहे ते समजून घेतले पाहिजे.
डॉ. माहरंग बलोच या डॉक्टर आहेत. बलुचिस्तानातील बोलान वैद्याकीय महाविद्यालयातून त्यांनी एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली आहे. बलुच लोकांवर होणारे अन्याय त्यांनी लहानपणापासून पाहिले होते. २००६मध्ये १३ वर्षांच्या असताना त्यांना पहिल्यांदा तुरुंगवासाचा अनुभव आला. त्यांच्या वडिलांचे अपहरण करण्यात आले होते. वडील अब्दुल गफूर लांगो यांच्या अपहरणाच्या विरोधात त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना पकडले होते. दुसरी घटना म्हणजे ‘बोलान मेडिकल कॉलेज’मध्ये बलुचिस्तानच्या दूरच्या भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राखीव जागा सरकारने २०२०मध्ये रद्द करण्याचे ठरवले होते. डॉ. माहरंग यांनी त्या निर्णयाच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली होती. त्यात मिळालेल्या यशामुळे लोक माहरंग यांच्याकडे आदराने पाहू लागले होते. ती त्यांच्यातल्या नेतृत्वगुणाची चाहूल होती.
१२ सप्टेंबर २००९ला पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांचे कराचीच्या एका रुग्णालयाबाहेरून अपहरण करण्यात आले. त्यापूर्वी दोनदा त्यांचे अपहरण करण्यात आले होते. गफूर स्वत: बलुच लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बोलत. त्यांच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. ‘बलुचिस्तान नॅशनल पार्टी’शी त्यांचा संबंध होता. पुढे २०११मध्ये त्यांचा मृतदेह बलुचिस्तानच्या लासबेला येथे सापडला. त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचे त्यांच्या मृतदेहावरून दिसत होते. २०१७च्या १५ डिसेंबरला त्यांच्या भावाचे, नासिर अहमद यांचे अपहरण करण्यात आले. डॉ. माहरंग यांच्या प्रयत्नामुळे त्यांना ३-४ महिन्यांनंतर सोडण्यात आले. केवळ आपल्या जवळच्या लोकांवरच हा अन्याय होत नसून हजारो बलुच कुटुंबांना अशा स्वरूपाचा अत्याचार सहन करावा लागतो, हे लक्षात आल्यावर पूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरायचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर मात्र डॉ. माहरंग यांनी मागे वळून पाहिले नाही.
२५ जानेवारी २०१४ला टूटाक येथे तीन कबरस्थाने सापडली होती. त्यात एकूण १६९ मृतदेह होते जे गायब करण्यात आलेल्या तरुणांचे होते. त्यातले बहुतेक मृतदेह ओळखण्यापलीकडे गेले होते. त्यांच्याच स्मरणार्थ गेल्या काही वर्षांपासून २५ जानेवारीला ‘बलुच नरसंहार स्मरणदिन’असतो. यंदाही प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि भीतीचे वातावरण असूनही दलबंदिन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्मरणदिन सभेसाठी हजारो लोक उपस्थित होते. लोकांनी तेथे पोहोचू नये यासाठी पोलिसांनी रस्ते अडवलेले होते. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यावेळी डॉ. माहरंग, सामी आदींची भाषणे झाली. ‘‘ही तर आंदोलनाची सुरुवात आहे,’’ असं डॉ. माहरंग यावेळी म्हणाल्या. अनेक उदाहरणे देऊन बलुच लोकांच्या मानवाधिकाराचे कशा पद्धतीने उल्लंघन केले जाते, त्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘‘इथल्या खनिज संपत्तीवर स्थानिक लोकांचा अधिकार असायला पाहिजे,’’ असेही त्यांनी निक्षून सांगितले.
गेल्या वर्षी २८ जुलैला ग्वादर येथे ‘बलुच राजी मुची’ (बलुच लोकांचं राष्ट्रीय अधिवेशन) आयोजित करण्यात आले होते. लोकांनी ग्वादर येथे पोहोचू नये यासाठी सरकारने कसून प्रयत्न केले होते. ग्वादर बंदरात चीनची प्रचंड गुंतवणूक आहे. चीनने ६८ अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक करून ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’ बनवला आहे. ग्वादर ते चीनच्या अशांत क्षिन जियांग प्रांताच्या कासगरला तो जोडतो. चिनी कर्मचारीही तिथे मोठ्या संख्येने काम करत आहेत. चीनला नाराज करणे पाकिस्तानला परवडणार नाही. ग्वादरच्या बाहेरून येणारे कार्यक्रमस्थळी पोहचू नये याकरिता ग्वादर-क्वेटा, ग्वादर-तुरबाट रस्ते बंद करण्यात आले होते. लोकांना पांगवण्यासाठी गोळीबारही करण्यात आला होता. तरीही हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. डॉ. महारंग यांनी यावेळी म्हटले, ‘‘शेवटी विजय आपलाच आहे.’’
प्रतिष्ठित ‘टाइम मॅगेझिन’ने जगभरातल्या १०० उगवत्या प्रभावी नेत्यांच्या यादीत गेल्या वर्षी डॉ. माहरंग बलोच यांचा समावेश केला. ‘टाइम’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्कला जाण्याकरिता निघालेल्या डॉ. माहरंग यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कराची विमानतळावर अडविण्यात आले. सरकारला भीती होती की, पाकिस्तान बलुच लोकांवर कसा अन्याय, अत्याचार करते त्याविषयी माहिती त्या अमेरिकेत जाऊन देतील. आंतरराष्ट्रीय समुदायात डॉ. माहरंग यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि कौतुक आहे त्यामुळे अनेक माध्यमांचे प्रतिनिधी डॉ. माहरंग यांना भेटतील आणि त्यांची मुलाखत घेतील याचीही पाकिस्तानला भीती होती.
‘बीबीसी’ने प्रसिद्ध केलेल्या १०० प्रभावी स्त्रियांच्या यादीतही गेल्या वर्षी डॉ. माहरंग यांचा समावेश करण्यात आला होता. पाकिस्तानच्या बलुचिस्तानात तरुणांच्या करण्यात येणाऱ्या अपहरणाच्या विरोधात सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाचे डॉ. माहरंग प्रतीक असल्याचे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.
२०२३च्या शेवटी स्त्रियांच्या एका मोठ्या मोर्चाचे नेतृत्व डॉ. माहरंग यांनी केले होते. १६०० किलोमीटर एवढा प्रवास करून इस्लामाबादला जाऊन त्या स्त्रियांनी, ‘आमच्या कुटुंबाचे लोक कुठे आहेत?’ सारखे प्रश्न सरकारला विचारले होते. या मोर्चादरम्यान दोन वेळा डॉ. माहरंग यांना अटक करण्यात आली होती. पण त्या अशा अटकेला घाबरणाऱ्या नाहीत. त्यांचा लढा सुरू आहे, आपल्या बलुच लोकांच्या सुरक्षिततेसाठी.
बलुचिस्तानात सर्वत्र हिंसा दिसत असताना आपल्या लोकांसाठीचे डॉ. माहरंग, सामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शांततापूर्ण पद्धतीने चाललेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे.
‘‘आंदोलन चालूच राहणार’’
सामी बलोच यादेखील बलुचिस्तानातील प्रभावी नेत्या आहेत. डॉ. माहरंग यांच्याप्रमाणे सामी यांनीदेखील खूप त्रास, छळ सहन केला आहे. या सोमवारी (२४ मार्च) डॉ. माहरंग आणि इतर सहकाऱ्यांना मुक्त करण्याच्या मागणीसाठी ‘कराची प्रेस क्लब’ येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या सामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही पाकिस्तान पोलिसांनी अटक केली आहे.
सामी यांचे वडील दिन मोहम्मद हे व्यवसायाने डॉक्टर, २००९च्या जून महिन्यात त्यांचे खुझदर येथील सरकारी रुग्णालयातून अपहरण करण्यात आले होते. सामी तेव्हा १० वर्षांच्या होत्या. आपल्या वडिलांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले. तेव्हापासून त्या आंदोलने, निदर्शने करत आहेत. अनेकदा त्या क्वेटा, इस्लामाबाद येथे जाऊन पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना भेटल्या, मात्र अद्याप त्यांच्या वडिलांचा पत्ता लागलेला नाही. आपल्या वडिलांचा शोध घेता घेता त्या कधी आंदोलनकर्त्या झाल्या ते त्यांनादेखील कळले नाही.
वडिलांच्या अपहरणानंतर सामी यांचे कुटुंब कराची येथे राहायला आले. वडिलांसह गायब करण्यात आलेल्या इतर बलुच लोकांच्या सुटकेसाठी काढण्यात आलेल्या एका निदर्शनात त्या सहभागी झाल्या तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना, सामी यांनाही गायब करण्यात येईल, असे धमकावण्यात आले. पण सामी यांच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. शाळेत असताना अनेक दिवस शिक्षक शाळेत येत नसल्याच्या विरोधात इतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सामी यांनी आंदोलन केले होते, त्यामागे हाच कणखरपणा असावा.
२०१४मध्ये वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते मामा कादिर यांच्या नेतृत्वाखाली क्वेटा येथून वेगवेगळ्या मार्गाने इस्लामाबादला पोहोचलेल्या मोर्चात सामी सहभागी झाल्या होत्या. सलग ११७ दिवस चालून जवळपास २००० किमी.चे अंतर त्यांनी गाठले तेव्हा १५ वर्षांच्या मुलीचे सुजलेले पाय पाहून तरी सत्ताधारी आपल्या वडिलांना व इतरांना सोडतील असे त्यांना वाटले होते. ‘आमचे वडील व इतर नातेवाईक जिवंत आहेत की नाही, हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे,’ असे सामी यांनी यावेळी म्हटले होते.
हा ‘लाँग मार्च’ जेव्हा इस्लामाबादला पोहोचला तेव्हा दोन भारतीय पत्रकार इस्लामाबादमध्ये राहात होते आणि तिथून ते पाकिस्तानच्या बातम्या भारतात पाठवत असत. त्यात ‘द हिंदू’साठी काम करणाऱ्या मुंबईच्या मीना मेनन होत्या. मामा कादिर यांची मुलाखत घेतल्याबद्दल त्यांच्या व्हिसाचे नूतनीकरण करण्यात आले नाही आणि त्यांची पाकिस्तानने हकालपट्टी केली. हे सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, शांततापूर्ण आंदोलनाचा बलुचिस्तानात मोठा इतिहास आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सामी यांना ओमान येथे जायचे होते. त्यांना कराची विमानतळावरच अडविण्यात आले. त्याबद्दल त्यांनी ‘x’वर ८ सप्टेंबर २०२४ला लिहिले होते, ‘आज मला कराची एअरपोर्टवर इमिग्रेशन काउंटरवर अडवण्यात आले. मी मस्कत, ओमानला निघाले होते. एफआयएच्या (फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सी) अधिकाऱ्याने मला सांगितले की, ‘‘बलुचिस्तान सरकारने माझे नाव ‘एक्झिट कंट्रोल’ यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि तसे पत्र गृह विभागाकडून देण्यात आले आहे. माझा पासपोर्ट परत दिला जात नाही आणि कोणत्या निष्कर्षाच्या आधारे मला प्रवास करू दिला जात नाही, याची कागदपत्रेही दाखवली जात नाहीयेत.’’
अर्थात सामी अशा अडवणुकींनी घाबरणाऱ्या नाहीतच, हे त्यांनी नुकत्याच त्यांना झालेल्या अटकेनंतर दाखवून दिलं आहे.
jatindesai123@gmail.com