इंदुमती जोंधळे

प्रत्येकाच्या मनात एखाद्या प्रसंगाची, घटनेची भीती कायमची वस्ती करून राहिलेली असते. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी आई आणि अण्णांच्या कडाक्याच्या भांडणाचं पर्यवसान आईचा निश्चल देह रक्ताच्या थारोळ्यात पडण्यात झालं. आजही आई मला तशीच, त्याच रूपात दिसते आणि मी भयाने थरथरू लागते. ते लालभडक रक्त आणि आईचा मृत्यू याची इतकी घट्ट सांगड घातली गेलीय की कुठेही दिसलेलं लालभडक रक्त मला भयाची जाणीव करून देतं आणि माझ्या नकळत दु:खाने आणि भीतीने डोळे झरझरू लागतात.

त्यानंतरचं आयुष्य तर परीक्षा बघणारंच होतं. आईच्या या अशा जाण्यानंतर घनगर्द अंधारात जाऊन काढलेलं शेळीचं वाटीभर दूध लहानग्या बहिणीला वाचवू शकलं नाही. आपण कमी पडलो, या जखमेची वेदना खपली बनून आजही आतल्या आत ठसठसत राहते. तेव्हापासून रक्ताची, अंधाराची भयानकता कायम पाठलाग करते आहे. पुढे शिक्षणासाठी कोल्हापूरच्या छात्रालयातील सुरक्षित वातावरणात वाढत असतानाही भीती कायम पाठीशी होती. कधी अंधाराची, कधी रेक्टर बाईंची तर कधी भांडखोर मुलींची. भीती वेगवेगळी रूपं घेऊन यायची.

मग काळ सुरू झाला वयात येण्याचा. एकटेपणामुळे असेल मनाला एक अनाकलनीय भीती कायम वेढून राहिली होती. एकदा आम्ही चार-पाच मैत्रिणी बाजारातून सामान घेऊन येत असताना, आमच्यापैकी एका वयाने थोड्या मोठ्या मैत्रिणीची छाती समोरून येणाऱ्या एका पुरुषाने इतक्या जोरात दाबली की तिचं कळवळून ओरडणं माझ्या मनात कायमचं भीती बनून घट्ट रुतलं. वयाबरोबर आपले वाढणारे उरोज कोणालाही दिसता कामा नयेत या विचाराने मी फ्रॉकच्या आत आणि नंतर परकर झंपरच्या काळात छाती आतून गच्च बांधण्याबाबत कायम दक्ष राहिले. पण काही प्रसंग टळले नाहीच.

एकदा एस.टी.ने कोल्हापूर ते औरंगाबाद प्रवास करायचा म्हणून काका स्टँडवर सोडायला आले. ‘रात्रीचा प्रवास आहे जपून जा. पोहोचलीस की पत्र टाक,’ म्हणाले. तेव्हा फोन वगैरे काही नव्हते. मी आत जाऊन खिडकीजवळच्या माझ्या रिझर्व्ह सीटवर जाऊन बसले. काका एका धट्ट्याकट्ट्या माणसाशी बोलत होते. ‘‘कोणी जात आहे का औरंगाबादला?’’ त्याने विचारलं.

‘‘हो, आमची मुलगी. ती खिडकीतून दिसतेय ना ती.’’ त्याने काकांना नमस्कार केला आणि सरळ स्वत:ची सीट बदलून माझ्या बाजूच्या सीटवर येऊन दणकन बसला. खिडकीबाहेर हात काढून काकांना बाय बाय केलं आणि बस निघाली. थोडा वेळ गेल्यावर त्या माणसाने चौकशी करायला सुरुवात केली. ‘काय शिकतेस? कोणत्या शाळेत जातेस? कसली आवड आहे?’ वगैरे. मी त्रोटक उत्तरे दिली, खरं तर बोलायचंच नव्हतं, पण सारी रात्र तो आपला शेजारी आहे म्हणून बोलले. त्याच्या बोटांत चमचमणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात दोरखंडी सोन्याची चेन, श्रीमंती थाट. बहुतेक व्यापारी असावा, असा माझाच अंदाज. त्यानं लावलेल्या कसल्याशा अत्तराच्या वासानं माझं डोकं भिनभनायला लागलं. पन्नाशीच्या पुढचाच असावा तो आणि मी ९ ची परीक्षा देऊन सुट्टीसाठी मावशीकडे चालले होते.

गाडीने कोल्हापूर सोडून हाय-वेवर वेग घेतला. चोहोबाजूंनी हळूहळू अंधाराची चादर पसरली व तासाभराने गाडीतलेही लाइट बंद झाले. मी अस्वस्थ. शेजाऱ्याच्या आडदांड देहानं अर्धीअधिक सीट व्यापलेली. मी अंग चोरून खिडकीला धरून बसलेले. हळूहळू तो अधिक सैलावत गेला. दोन्ही हात सीटच्या मागच्या बाजूवर पसरून. उजवा हात माझ्या डोक्यामागून खिडकीत. मग हळूच माझ्या उजव्या खांद्यावर आपला हात आणि डोके डाव्या खांद्यावर ठेवून झोपेचे सोंग घेऊन घोरतोय असं दाखवायला लागला. मी आणखीनच आक्रसून गेले. भीतीने रडू की ओरडू? कळत नव्हतं. शेवटी न राहून म्हणालेच,‘‘साहेब नीट बसता का? मला जागाच नाहीए.’’ मग तो थोडं सावरून बसला. गाडी पळत होती आणि माझं मन भीतीने, रागाने, विचाराने दहापट अधिक धावत होतं. काय करावं? मागे-पुढे कुठे रिकामी जागा मिळेल का? एखादं स्टेशन आलं की उठू या का? विचारच करत होते तो त्याचा उजवा हात माझ्या मानेवरून पाठीवर, पाठीवरून पोटावर आला आणि मी जोरात ओरडले, ‘‘तुम्ही हे काय करताय? जाऊ द्या मला पुढे.’’ म्हणत उठले तसं त्याने जबरदस्तीने मला खाली बसवलं. पण तो आणखी काही करायच्या आत सर्व शक्तीनिशी त्याचा हात झुगारून मी कशीबशी तिथून बाहेर पडले आणि त्याच तिरीमिरीत कंडक्टरजवळ गेले. सगळे प्रवासी गाढ झोपलेले होते. रात्रीचे ११/१२ वाजले असतील. मी रागाने, भीतीने थरथरत कंडक्टरला म्हणाले, ‘‘मामा मला जागा देता का?’’ माझा भेदरलेला आवाज ऐकून त्याने आधी गाडीतले लाइट लावले. रडून डोळे व चेहराही लाल झालेला होता. ‘‘क्या हुआ बेटा? इतनी क्यू घबरायी हो? ये लो पहले पानी पी लो।’’ त्याच्या शब्दांनी मला जरा बरं वाटलं. मी उभ्याउभ्याच ढसढसा केवढं तरी पाणी प्याले. कंडक्टरला झाला प्रकार काहीसा लक्षात आला असावा. आजूबाजूचे चार-सहा प्रवासीही जागे झाले, पण कोणी काहीही बोललं नाही. कंडक्टर ड्रायव्हरजवळ जाऊन बसला आणि त्याने त्याची सीट मला दिली. पण नंतर ना मला झोप आली ना स्वस्थता लाभली. त्याचा किळसवाणा, केसाळ हातांचा स्पर्श! घृणा, संताप येत होता. एक मन सांगत होतं, ओरडून सांग सर्वांना त्याच्या अश्लील चाळ्यांबद्दल. बापाच्या वयाचा, वरून सभ्य दिसणारा, पण विकृत माणूस लोकांना कळायलाच हवा. पण दुसरं मन म्हणे, कोण विश्वास ठेवणार तुझ्या सांगण्यावर? उलट ‘गप्प बैस’ म्हणतील. एस टी.त चारआठच बायका, बाकी सारे पुरुष! त्यांच्यापैकी एका पुरुषाने म्हणजे कंडक्टरने मला माणुसकीने वागवलं होतं. पुरुष चांगलेही असतात हेही त्या वेळी मनात घट्ट बसलं.

मी मोठी होतच होते. आजूबाजूच्या पुरुषांच्या नजरा शरीराला आरपार चिरत होत्या.‘बाई असणं’ म्हणजे असंच असतं का? गर्दीत, रेल्वेत, बसमध्ये रेटारेटीत नको नको ते, नको तिथे किळसवाणे स्पर्श. अंगाचा तिळपापड होई. माझ्यासारखा अनुभव इतरांनाही येतच असणार ना? पण कोणीच काही बोलताना दिसत नव्हतं. कोणा कोणाला ‘तिने’ भ्यायचं? शेजाऱ्याला? गुरुजींना की शिपायाला? एकतर लहानपणापासून अभ्यासाचं भय, गणिताची भीती, सरांची भीती, संस्कृत येत नाही, बाईंची भीती. बोर्डिंगमध्ये काही चुकलं की माराची भीती. पण त्यातही सकारात्मक म्हणजे या भीतीपायीच तर झटून अभ्यास केला, म्हणून तर एकेक वर्ग पुढे जात राहिले. चांगलं यश मिळालं ते त्या भीतीपोटीच ना! भीतीच्या अशा काही सकारात्मक रूपामुळेच मिळालेल्या तुटपुंज्या संधीचा फायदा घेत यशाचा मार्ग गाठता आला. पदवीधर झाले. बी. एड. केलं ते पायावर उभं राहण्यासाठीच. पण इथेही दुर्देैवं हात धुऊन मागे लागलेले.

शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज दिला की, मुलाखतीला बोलवत. एकदा शाळेच्या अधिकारींनी मुलाखतीस बोलवले. फाइल पाहिली. ‘‘पहिलीच नोकरी का?’’

‘‘हो साहेब.’’

‘‘ हरकत नाही मी देतो नोकरी, पण खेड्यावर जावे लागेल.’’

‘‘ हो जाईन की!’’

मग ते अधिकारी जागेवरून उठले. माझ्या बाजूने येऊन खुर्ची जवळ ओढत. ‘‘चहा घेणार की, खायला काही मागवू ?’’

‘‘नको काहीच. मी जेवून आलेय.’’

‘‘असं कसं? चहा तरी घ्यावाच लागेल, असं म्हणून माझे हात धरतच ते उठले. आणि मला काही कळायच्या आत जवळ खेचलं. त्या क्षणी होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून त्यांना ढकलून दाराकडे पळत सुटले तर धावत माझ्या मागे पळत येऊन माझ्या साडीचा पदर ओढला, तो तसाच गच्च धरुन मी सोबत आलेल्या भावाला हाक दिली. ‘‘भाऊ, भाऊ’’ बाहेर थांबलेला भाऊ पळत आत आला. खरं तर तो माझ्यापेक्षा लहान, पण त्या क्षणाला वडिलांसारखा भरभक्कम आधार झाला. त्याच्या कुशीत शिरून धाय धाय रडले. ‘‘चल इथून. मला इथे नोकरीच नको.’’ म्हटलं. शिपायाकडून कागदपत्रांची फाइल घेतली व घरी आलो. घडलेला सारा प्रकार त्याला सांगितल्यावर त्याचंही मस्तक फिरलं. म्हणाला, ‘उद्या जातोच वरिष्ठांकडे आणि विचारतो अशी माणसं ठेवलीत ज्ञानाच्या पवित्र क्षेत्रात?’ त्याला शांत केलं. कुठे आणि कुणा कुणाकडे न्याय मागायचा? सगळा माहोलच बरबटलेला! एकटी स्त्री, मुलगी पाहून यांच्यातला ‘पुरुष’ जागा होतो का? अशा वेळी आता बाईनेच ‘स्वरक्षित’ बनायला हवे हेच खरे. मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार, नाटककार जयवंत दळवी यांनी ‘पुरुष’ नाटकाचा हाच सारांशआहे. अनेकदा वाटतं, कायद्याने न्याय मिळत नसेल तर पीडित, अत्याचारग्रस्त स्त्री त्या नराधमाला आयुष्यभर तडफडत राहील अशी जबरस्त शिक्षा देणं योग्य ठरेल का?

अर्थात आयुष्य वेगाने सरकतच असतं. चांगली माणसं ही भेटतातच. नोकरी मिळते, स्थिर होते, लग्नाची बोलणी सुरू होतात, होणारा नवरा कसा असेल? आपलं पटेल का? त्याच्या घरच्यांशी जमेल का? जात वेगळी, धर्म वेगळा. स्थल,काल, घर माणसं सगळंच वेगळं. मनात एक अनामिक भीती. पण भिडले. न घाबरता येईल त्या परिस्थितीशी तोंड द्यायला शिकले. परिस्थितीच तुम्हाला नव्या नव्या अनुभवातून पुढे जायला शिकवते.

नवं काही साध्य करायचं असेल तर खाचखळगे ओलांडून पुढे जावेच लागते. नोकरीत, संसारात एकेक आव्हान स्वीकारत, नव्या ढीगभर नात्यांना सांभाळण्यासाठी सतत तारेवरची कसरत राहिले, ती तुटू नयेत म्हणून जीवाचा आटापिटा, मलाच हवे होते ना आप्तस्वकीय सारे पण, समज गैरसमजाने तुटत राहिले व शेवटी ते भय खरे ठरून दु:खच पदरी आले. कधीही न संपणारे. कायम अनामिक भीतीच्या सावटाखालीच बाईने जगायचे का? खरं तर बाईच का निसर्गातील प्रत्येक सजीवाला जगण्याची तग धरून राहण्याची भीती असतेच. पृथ्वीचा एकही कोपरा उत्क्रांतीवादापासून सुटलेला नाहीच, पण बदलत्या जीवनाला सर्वांनीच जवळ केलेले आहे.

‘देव’ नावाच्या अदृश्य शक्तीला उत्सुकतेपोटी त्याचे अस्तित्व मान्य करून सुरक्षिततेसाठी, बहुतेकांनी भयापोटी त्याची पूजाअर्चा करण्यास सुरुवात केली. वैयक्तिक व सामाजिक बदल याच प्रक्रियेतून घडत जातात. काही माणसं भयापोटी का होईना कुकर्म, पाप करण्यापासून दूर राहतात, त्यांची क्रूरता कमी व्हायला लागते. समाजातील संवेदनशील, सत्प्रवृत्त माणसांमुळेही सामाजिक सुरक्षितता प्राप्त होण्यास मदत होते. देव, कायदा व समाजाने निर्माण केलेल्या रीतीभाती माणसाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.

आता आयुष्याचा दीर्घ पल्ला गाठताना आलेले कटू अनुभव, सोसलेल्या चटक्यांवर मायेची फुंकर घालणारे, कोंडलेले श्वास, व दबलेले अश्रू पुसणारे किती तरी नि:ष्कलंक हात आजही नव्या उमेदीने जगण्याचं बळ देतात.

indumati. jondhale@gmail.com