स्वाती लोंढे
भीतीचा साधा विचार जरी मनात आला तरी तिच्या निरनिराळ्या छटा असलेल्या आयुष्यातल्या किती तरी प्रसंगांची मालिका डोळ्यांसमोर उभी राहते आणि त्या वेळी जाणवलेली कमीअधिक भीतीची तीव्रता पुन्हा एकदा आपण अनुभवतो. भवतालात उमटणारे ‘भीतिध्वनी’ कानात घुमत राहतात. काही अनुभव इतके खोल असतात की त्यामुळे टोकाचे निर्णय घेतले जातात, तर काही वेळा मात्र त्या भीतीवर मात करत साहसी अनुभवही घेतले जातात.
‘भीती’… फक्त दोन अक्षरी शब्द. ‘भी’ या संस्कृत धातूपासून ‘भीति’ हा तयार झालेला संस्कृत शब्द आणि त्यापासून तयार झालेलं ‘भीती’ हे मराठीतलं भाववाचक नाम, पण त्या शब्दाची ‘व्याप्ती’ मात्र संपूर्ण आयुष्याला वेढून टाकणारी! तिचे अंगावर येणारे भवतालात उमटणारे ‘भीतिध्वनी’ कानात घुमत राहतात, अगदी आयुष्यभर… कधी कधी तर या प्रसंगांचा चलच्चित्रपट आपण वर्तमानात असूनसुद्धा आपल्याला भूत आणि भविष्यात सर्रकन फिरवून आणतो. अलीकडची एक घटना आठवतेय…
वयाच्या सत्तरीनंतर भूतान-सिक्कीमच्या पर्यटनामध्ये खाली खोल विस्तीर्ण दरी असलेल्या दोन डोंगरांच्या मधून एकाच वेळी एकाच माणसाला घेऊन जाणाऱ्या ‘झिप लाइन’वरून एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्याचा पाच मिनिटांचा का होईना एक विलक्षण अनुभव क्षणाचाही विलंब न लावता, मृत्यूच्या भीतीचा लवलेशही मनात न आणता मी घेतला होता. ती ‘राइड’ बरोबर मध्यावर आल्यावर कडा धरलेले दोन्ही हात सोडून ते आडवे सरळ करून खाली उभ्या असलेल्या माझ्या सहप्रवाशांकडे पाहून आनंदाने हलवलेही होते. काय होती ती भावना? तेव्हा ‘थ्रिल’ अनुभवायचंच या साहसी विचारानं माझ्या भयाच्या भावनेवर मात केली होती का? का नाही मला तेव्हा मृत्यूचं भय वाटलं? की जसं जसं वय वाढत जातं तशी मृत्यूची भीती कमी होते का? विचार करता करता माझा हा भीतीच्या चलच्चित्रपटाचा कॅमेरा क्रोनोलॉजिकल फिरत नसल्यानं तो ३१ वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेवर स्थिरावला.
वर्ष १९९३. दुपारचे दोन-अडीच वाजलेले. स्थळ- शिवाजी पार्क. आम्ही दोघी मैत्रिणी ‘लंचटाइम’मध्ये लवकर डबा संपवून ऑफिसजवळ राहणाऱ्या मैत्रिणीच्या सासूबाईंना बरं नाही म्हणून बघायला गेलो होतो. दहा-पंधरा मिनिटं त्यांच्याशी बोलून ऑफिसकडे यायला निघालो. आम्ही रस्ता क्रॉस करणार इतक्यात कानठळ्या बसवणारा आणि हादरून टाकणारा भयंकर आवाज झाला. क्षणार्धात लोकांचा आरडाओरडा, पळापळ सुरू झाली. भीतीनं आम्ही भर उन्हातसुद्धा गारठलो आणि कसा तरी ऑफिसला पोहोचायला परतीचा रस्ता धरला. अर्ध्या रस्त्यात आल्यावर कळलं की शिवाजी पार्कच्या पेट्रोल पंपानजीक बॉम्बस्फोट झाला होता. आम्ही फक्त पाच मिनिटं उशिरा मैत्रिणीच्या घरून निघालो असतो तर?… तर काय झालं असतं या विचारानंच भीतीनं सारं शरीर शहारलं. पाय क्षणार्धात मणभर जड झाले. कशाबशा आम्ही ऑफिसच्या गेटशी आलो. आणि मला एकदम आठवलं की, ऑफिसच्या मागच्या बिल्डिंगमध्ये माझ्या मुलीची तीन वाजता भरतनाट्यमची रिहर्सल होती. परत एकदा मनावर भीतीनं झडप घातली. हातपाय लटपटायला लागले. मैत्रिणीला ते जाणवलं. ती म्हणाली, ‘‘अगं, आता कशाला घाबरत्येस? पोहोचलो की आपण आपल्या ऑफिसच्या दारात.’’
मी तिला रडत रडत म्हटलं, ‘‘अगं, ऋचाची ‘डान्स प्रॅक्टिस’ आहे आपल्या ऑफिसच्या मागच्या बिल्डिंगमध्ये. तू हो पुढं. मी बघते ऋचा आली आहे का प्रॅक्टिसला ते.’ आणि मी सुसाट वेगानं धावत सुटले आणि त्या इमारतीत शिरले. वॉचमननं सांगितलं, ‘फोर्टमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे डान्सची रिहर्सल रद्द केली आहे.’ माझा जीव भांड्यात पडला. अशांत मन थोडं निवांत झालं, पण तो निवांतपणा इतका क्षणिक होता की पुढल्या क्षणी मनात आलं, ‘पण ती घरातून निघायच्या आधी तिला प्रॅक्टिस रद्द झाल्याचं कळलं असेल का? की ती घरातून निघाली असेल आणि रस्त्यात असेल? की बसमध्ये असेल? पेट्रोल पंपाच्या इथून येणारी बस तर तिनं पकडली नसेल ना? प्रचंड भीतीनं एकापाठोपाठ एक अशा नको त्या विचारांनी मन घट्ट आवळलं जात होतं. आणि मी ऑफिसच्या गेटमधून आत शिरत्ये ना शिरत्ये तोच ऑफिसपासून दोन मिनिटांवर असलेल्या ‘प्लाझा थिएटर’जवळ बॉम्बस्फोट झाला. तस्साच कर्णकर्कश आवाज… धुळीचे लोट उठले. माणसांची जिवाच्या आकांताने पळापळ सुरू झाली. प्रत्येकाची जीव वाचवायची धडपड सुरू झाली. फोन कनेक्शन्स बंद झाली. कार्यालये, दुकानं, फटाफट बंद झाली. म्हणजे आज मी दोनदा मृत्यूला चुकवलं की त्याने मला हुलकावणी दिली? या भयानक विचारानं घशाला कोरड पडली. लवकरात लवकर घरी सुखरूप पोहोचणं ही एकच प्रबळ इच्छा असली तरी घरी जाणार कसं? बस, टॅक्सी मिळणं केवळ अशक्य. कसं माहीत नाही, पण एरवी समोरच्या माणसाबद्दल, त्याच्या वर्तनाबद्दल संशय घेणाऱ्या माझ्या स्वभावावर त्या वेळच्या गर्भगळीत भयानं दुर्लक्ष करायला लावलं. आणि मी चक्क एका बाइकवाल्या अनोळखी व्यक्तीला ‘मला प्रभादेवीला, सिद्धिविनायक देवळापर्यंत सोडाल का?’ म्हणून विनवणी केली. आणि त्याला माहीमला म्हणजे विरुद्ध दिशेनं जायचं असूनसुद्धा त्यानं मला देवळापर्यंत सोडलं. मी त्याच्यातल्या करुणेला मनोमन नमस्कार केला आणि झपाझप घराकडे वळले. मुलगी भीतीनं रडत बाल्कनीत बसून माझी वाट बघत होती. बघता क्षणी आम्ही एकमेकींना मिठी मारली. आमच्यात कोणाची भीती अधिक गडद होती हे सांगणं शक्यच नाही. दोघींची भीती आणि डोळ्यातले अश्रू आम्ही मारलेल्या मिठीत विरघळत होते. रडतच मुलीनं विचारलं, ‘‘आई, बाबा?’’
‘‘बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत. आपल्या बिल्डिंगमधले खूप जण आहेत तेथे. ऑफिस करेल काही तरी व्यवस्था,’’ मी तिची समजूत घालत म्हटलं.
नंतरचे पुढले दोन दिवस, मी अनुभवलेल्या त्या भीतीबद्दल आलेल्या-गेलेल्यांना, फोनवरून सगळ्यांना माझ्या भीतीचं वर्णन ऐकवायला लागले तेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या माझ्या मुलीनं मला हटकलं. ती म्हणाली, ‘‘आई, जितके दिवस तू हे वर्णन इतरांना ऐकवशील तितके दिवस तुझ्या मनाची आणि भीतीची बांधली गेलेली गाठ अधिकाधिक निरगाठ होत जाई. विसरून जा सगळं. निदान तसा प्रयत्न तरी कर. नाही तर तुलाच त्याचा त्रास होईल. तू जेव्हा जेव्हा ते वर्णन करतेस ना तेव्हा प्रत्येक वेळी तुझं मन ते घडलेला प्रसंगही परत परत अनुभवत असतं. आणि मग ही अशी मनाची आणि भीतीची गाठ सोडवणं भविष्यात तुलाच कठीण जाईल.
त्यानंतर भीतीनं गाळण उडालेली अशीच एक मन:स्थिती माझ्या समोरच्या चलच्चित्रपटाच्या पडद्यावर झळकली. ही १९८५ मधली गोष्ट. स्कूटरला राम राम ठोकून आम्ही हौसेने चारचाकी घेतली होती. ‘अहों’चं चालक प्रशिक्षण पूर्ण होऊन ते छान गाडी चालवायला लागले होते. आम्ही गाडी एन्जॉय करायला लागलो होतो. पण पुढल्या दोन-तीन वर्षांत प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी ह्यांना (लक्ष्मण लोंढे) गाडी चालवायला मनाई केली. घरातले आम्ही सगळेच नाराज झालो. मुलगाही लहान होता. गाडी विकायची की थोडे दिवस वाट बघायची? यावर विचार चालला होता. आणि साक्षात्कार झाल्यासारखी मी आत्मविश्वासानं म्हणाले, ‘‘अहो, मी शिकते ना ड्रायव्हिंग. समीर मोठा होईपर्यंत मी चालवीन ना गाडी.’’
‘‘अरे व्वा! मस्तच! खूपच छान!’’ हे आनंदानं म्हणाले.
आणि पुढल्या सगळ्या सोपस्कारांनंतर मी सारथ्याच्या जागेवर बसले. प्रशिक्षण झालं, आर.टी.ओ.चा रीतसर परवाना मिळाला, रस्त्यावर गाडी चालवणं, रात्री गाडी चालवणं, गल्ली-बोळातून गाडी चालवणं यासाठीचं पुरेसं प्रशिक्षण घेऊन अस्मादिक ‘ऑर्थराइज्ड ड्रॉयव्हरीण’ झाल्या. पुढल्या दोन महिन्यांत दादरहून बोरिवली, ठाण्यापर्यंत मजल गाठण्याइतकी प्रगतीही झाली. आणि…
एक दिवस तो अवसानघातकी दिवस उगवला. बहीण आणि तिच्या नवऱ्याला दादर स्टेशनला सोडण्यासाठी मी गाडी बाहेर काढली. गल्लीतून बाहेर पडून ‘सिद्धिविनायक देवळा’च्या सिग्नलला लाल सिग्नल लागला म्हणून ब्रेक दाबून गाडी थांबवायला गेले, पण… ब्रेक आपलं काम विसरला होता आणि गाडी पुढच्या टॅक्सीवर आदळली. बा SS प रे! डोळ्यांपुढे काजवे चमकले. भीतीची वीज अशी कडाडली की हातपाय थरथरायला लागले. सुदैवानं नवरा बरोबर होता. त्यांनी मला शब्दांनी आधार दिला. ट्रॅफिक हवालदार आला आणि त्यांनी ब्रेक चेक केला आणि तो नादुरुस्त असल्याचं सांगितल्यावर मला ‘म्हणजे माझी चूक नाहीय्ये’ हे सांगण्याइतका धीर आला. गाडीत नेहमीप्रमाणे गाडीचे डुप्लिकेट पेपर होते ते हवालदार साहेबांनी बघितले आणि मूळ कागदपत्रांची मागणी केली. पुढली टॅक्सी चालवण्याच्या स्थितीत असल्यानं टॅक्सी ड्रायव्हरनं ती पोलीस स्टेशनला नेली. मी घरी येऊन गाडीची कागदपत्रं घेतली आणि पोलीस हवालदाराला दिली. ह्यांनी गाडी ‘टो’ करणाऱ्या काँट्रॅक्टरला बोलावून गाडी हलवली आणि आमची वरात पोलीस ठाण्यावर पोहोचली. सगळे सोपस्कार करून घरी येईपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते. जीव थकून गेला होता. पडल्या पडल्या झोप लागायला हवी होती, पण ‘टॅक्सीऐवजी तिथे रस्ता क्रॉस करणारा माणूस असता तर? मला मनुष्यवधाच्या आरोपाखाली तुरुंगात धाडलं गेलं असतं.’ हे वाक्य वीज चमकावी तसं चमकलं आणि मन पुन्हा एकदा भीतीनं व्यापून गेलं. अस्वस्थ झाले, दरदरून घाम फुटला. आपल्याला हृदयविकाराचा झटका येतोय, असं वाटून त्या भयापोटी मी मोठ्या आवाजात पाणी मागितलं. घटाघटा पाणी प्यायले. आणि घळाघळा रडायला लागले.
‘‘अगं, काय झालं?’’ नवऱ्यानं आश्वासक स्पर्शानं विचारलं. आणि मी मनातली भीती व्यक्त केली. आणि निर्वाणीच्या स्वरात, पण हट्टानं म्हटलं, ‘‘मी कोणत्याही परिस्थितीत आता कधीही गाडी चालवणार ना sssही.’’
‘‘हो, ते बघू नंतर. पण एक लक्षात घे, अगं, मगाशी झाला तो अपघात होता. असे अपघात नेहमी थोडेच होतात. म्हणून तर त्यांना अपघात म्हणतात ना. असा टोकाचा विचार केला तर लोकांना गाडी चालवायलाच नको. काही झालेलं नाही. आधी शांत हो आणि झोप बघू.’’
पुढला किती तरी काळ त्या भीतीनं मी इतकी ग्रासलेले होते की, सतत डोळ्यासमोर सिग्नल, रस्ता ओलांडणारा माणूस, ट्रॅफिक हवालदार, पोलीस चौकी, यांच्या स्वप्नांनी रात्री झोपेतून दचकून उठत असे. या भीतीचा पोत वेगळाच होता. माझ्या हातून झालेल्या अपघातात माझ्या मृत्यूपेक्षा रस्ता ओलांडणाऱ्या माणसाचा मृत्यू मला त्रास देत होता. आज इतक्या वर्षांनंतरही रस्त्यावर गर्दी, अपघात झालेला दिसला की पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा हा प्रसंग डोळ्यासमोर तरळतो आणि अजूनही मनाला अस्वस्थ करतो.
आत्तासुद्धा भीतीच्या निरनिराळ्या छटा असलेल्या आयुष्यातल्या किती तरी प्रसंगांचा चलच्चित्रपट झर्रकन डोळ्यासमोरून पुढं पुढं सरकतोय…
swatilondhe12 @gmail.com