‘अल्झायमर्स डिसीज इंटरनॅशनल’ च्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ४० हजार लोकांपैकी ८० टक्के लोकांना वाटतं की, त्यांना जाणवणारी लक्षणं ही वयानुसार येणारी आहेत, डिमेंशियामुळे नाही. साहजिकच वेळेत उपचार न झाल्यास या आजाराची तीव्रता वाढत जाते. डिमेंशियामध्ये फक्त स्मरणशक्ती कमी होणे इतपतच ते मर्यादित नाही तर डिमेंशिया हा मेंदूच्या संपूर्ण कार्यक्षमतेवरच परिणाम करतो. म्हणूनच मेंदू सक्षम असण्यासाठी काय करायला हवे, हे सांगणारा लेख. सप्टेंबर महिना जगभर डिमेंशिया आजार जागृती महिना म्हणून पाळला जातो त्यानिमित्ताने…

दरवर्षी आरोग्यविषयक प्रश्नांची जागृती करण्यासाठी आरोग्य दिन साजरे होतात. स्मृतिभ्रंश वा विस्मरण किंवा डिमेंशिया या आजाराचे स्वरूप बघता संपूर्ण सप्टेंबर महिना जगभर जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. या वर्षी डिमेंशियाबाबत काम करण्याची हीच वेळ आहे, उशीर करून चालण्यासारखे नाही, हा संदेश पोहोचवण्यासाठी जागृती होत आहे. अर्थातच आजाराबद्दल लोकांना माहिती व्हावी हे त्यामध्ये ओघाने आलेच, परंतु लोकांची या आजाराकडे बघण्याची दृष्टी बदलावी, आजाराने ग्रस्त व्यक्तीकडे सामंजस्याने बघितले जावे याचबरोबरीने डिमेंशियाचे निदान झाल्यावर कुटुंबीयांना त्याच्या उपचाराची योग्य ती दिशा दिसावी हे अभिप्रेत आहे. कारण डिमेंशियामध्ये फक्त स्मरणशक्ती कमी होणे वा पूर्णत: जाणे इतपतच ते मर्यादित नाही तर डिमेंशिया हा मेंदूच्या पूर्ण कार्यक्षमतेवरच परिणाम करतो.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

या वर्षीचा जागतिक अल्झायमर्स अहवाल या महिन्याच्या २० तारखेला (२१ सप्टेंबर हा अल्झायमर डे म्हणून जगभर पाळला जातो.) ‘अल्झायमर्स डिसीज इंटरनॅशनल’ या संस्थेने प्रकाशित केला. ११६ देशांमधील चाळीस हजार लोकांचे यानिमित्ताने सर्वेक्षण करण्यात आले. यातली गंभीर बाब ही की, आपल्याला होणारे विस्मरण वा तत्सम दिसणारी लक्षणे ही वय वाढत चालल्यामुळे आहेत, डिमेंशियामुळे नव्हे, असं त्यातील ८० टक्के लोकांना वाटतं. साहजिकच या समजामुळे आजाराचे निदान आणि उपचार वेळेवर होत नाहीत. आणि या आजाराची तीव्रता वाढत जाते. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयातील न्युरॉलॉजी विभागप्रमुख डॉ. राहुल कुलकर्णी यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘‘या आजाराची मोठी लाट येण्याची शक्यता आहे आणि ती परिस्थिती आपण आपल्यावर ओढवून घेतली आहे. मेंदूचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पाहिजे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.’’

सध्याचे बदलते कौटुंबिक स्वरूप आणि सामाजिक बदल अस्वस्थ करणारे आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जणच त्या वावटळीत फसले आहेत. डिमेंशियाबाबत उशीर करून परवडणारे नाही हे माझ्या हृदयात खोलवर रुजले आहे. त्यासाठी पुणे येथील ‘अल्झायमर्स सपोर्ट ग्रुप’तर्फे डिमेंशिया तसेच मेंदूच्या आरोग्याबाबत जागृती, मेमरी टेस्टिंग असे कार्यक्रम आम्ही सातत्याने करतो.

‘मेंदू’ हे एक गुंतागुंतीचा कारभार कार्यक्षमतेने हाताळणारे अगम्य असे शक्तिस्थान आहे. तरीही मेंदूची साधी-सोपी व्याख्या करायची झाली तर त्याने व्यक्तीच्या बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गरजा सांभाळाव्यात तसेच तिच्या जीवनाचे उद्दिष्ट साधायला मदत करावी असे म्हणता येईल.

आपल्या मेंदूचे काम सुरळीत चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण स्वत:लाच काही प्रश्न विचारायला हवेत. ते म्हणजे – आपले कामामध्ये लक्ष लागते का? जीवनातील रोजच्या समस्या, आव्हाने सहजपणाने पेलता का? तात्पुरत्या आणि लांब पल्ल्याच्या स्मरणशक्तीची जोड मिळते का? निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फार न रेंगाळता निर्णय घेतले जातात का? त्याच त्याच विचारात न अडकता, भावनांच्या गुंत्यातून स्वत:ला बाहेर काढता येते का? अशा निरीक्षणांतून आपल्याला आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेची कल्पना येते.

जेव्हा आपल्या मनाचा समतोल राखला जातो तेव्हा आपल्याला आपल्या क्षमता अजमावता येतात, समाधान मिळेल असे काम घडत जाते. आपले कुटुंबीय आपल्यावर प्रेम करताना दिसतात, आपल्या आजूबाजूचा समाज आपला मान राखतो, आपण करत असलेल्या कामाची दखल घेतो तेव्हा आपल्याला जगण्याची ऊर्मी मिळते. समाधान मिळेल असे काम घडत जाते. रोजचे ताण हे कुंपण बनून आपल्याला अडवत नाहीत. कठीण परिस्थिती आली, मन डळमळीत झाले तरी त्यातून कसा मार्ग काढावा याकडे लक्ष केंद्रित केले जाते. डोंगराएवढ्या दु:खामधूनही मनाचे अडकलेले चाक हळूहळू बाहेर पडते. शारीरिक आरोग्याच्या चाचणीमध्ये उंची आणि वजनाचा समतोल, भूक लागणे, पोट नियमित साफ होणे, पुरेशी झोप होऊन सकाळी उठल्यावर तरतरी वाटणे, रक्तदाब, नाडी, कोलेस्टेरॉल योग्य पातळीत असणे अशा महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश असतो.

मेंदूचे आरोग्य टिकवण्याचे प्रिस्क्रिप्शन देणे शक्य नसले, तरी मेंदूला कशाचा त्रास होतो, कशाचा फायदा होतो हे शेकडो संशोधनातून आपल्याला कळले आहे. मेंदूच्या कार्यक्षमतेची किल्ली निरोगी, समतोल आयुष्य जगण्यामध्ये आहे. ज्यात मेंदू, मन आणि शारीरिक आरोग्याचा विचार केला गेलेला आहे. मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या धोकादायक गोष्टींमध्ये वाढते वय, आनुवंशिकता, प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. याबद्दल आपल्या हातात काही नसले, तरीही आपल्या हातातील गोष्टींविषयी पावले उचलून आपण डिमेंशियाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करू शकतो.

मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी सुरुवात व्यायामातूनच करायला हवी. व्यायामाने मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो. मेंदूतील पेशींना ऑक्सिजन आणि योग्य खाद्या मिळते. मनावरचा ताण कमी होतो आणि मन:स्थिती सुधारते. मेंदूवर परिणाम करणाऱ्या कोलेस्टेरॉल, मधुमेहामुळे वाढलेले साखरेचे प्रमाण, वाढता रक्तदाब या तिन्ही गोष्टी आटोक्यात ठेवणे शक्य होते. व्यायामाचा फायदा मिळण्यासाठी नियमितता मात्र गरजेची.

हृदयाच्या कार्यामुळे रक्तातून आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. क्षणभर रक्तपुरवठा थांबला तरी मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. हृदय आणि मेंदू ही जोडी व्यवस्थित काम करत असेल तरच शरीराचा कारभार सुव्यवस्थित चालू शकतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य जपणे आपले प्रथम कर्तव्य आहे.

समतोल आहाराचे महत्त्व सगळे ओळखतात. शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळाल्यामुळे मेंदूचे कार्यही सुधारते. बौद्धिक क्षमता सांभाळता येतात. शांत झोपेशिवाय मेंदू कार्यप्रवीण राहू शकत नाही. आपली बौद्धिक क्षमता वाढावी असे वाटत असेल, मेंदूला रोज नव्याने रिचार्ज करायचा असेल तर झोपेचा चार्जर मध्यरात्री नाही तर वेळीच चार्जिंगला लावायला हवा.

सामाजिक आयुष्य आपल्या जीवनाला एक वेगळा परिमाण देते, एकाकीपणाच्या भावनेचा स्पर्श होऊ देत नाही. मित्रमंडळींमध्ये मिसळणे ही निराशेवरची मात्राच समजली जाते. आपल्या माणसांसाठी काही करणे, सामाजिक कामांमध्ये मदतीचा हात देणे, छंद वाढवणे त्यासाठी त्याच्या क्लासला जाणे, नवीन ओळखी वाढवणे, या सगळ्यांमुळे सामाजिक आयुष्य सुधारू शकते. तणावाशी सामना रोजच्या जीवनाचा भाग आहे, पण त्यासाठी ठोस उपाय योजायला हवेत. मन नियंत्रित करणे जमण्यासाठी ध्यानधारणा, संगीत, कला, नृत्य इत्यादींमध्ये मन रमवायला हवे.

मेंदूला चालना देण्यासाठी त्याला व्यायामाची जोड देणे आवश्यक आहे. नवीन भाषा शिकणे, कोडी सोडवणे, वाचन-लेखन, छंद, चित्रकला इत्यादींतून मेंदूला आव्हान मिळतेच आणि वेळही सार्थकी लागतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे जसे आपण घराचा कानाकोपरा स्वच्छ करतो तसेच शरीराच्या सगळ्या अवयवांची निगराणी करायला हवी. आपले शरीर, मन लयीमध्ये कार्य करते आहे की नाही हे आपल्याला समजते. अशी लय साधता आली तर मेंदूसहित शरीराचा कारभार शिस्तीत सांभाळता येऊ शकतो.

सामाजिक क्षेत्रात विशेषत: ज्येष्ठांबरोबर अनेक वर्षे काम करत असल्याने आयुष्याचे गणित बदलणारे घटक सातत्याने माझ्या लक्षात येतात. कुटुंबाचा आकार लहान होण्याची प्रक्रिया अनेक वर्षे चालू आहे. पण त्याची सदस्य संख्या एकावर येईल असे आपल्या मनात आले नव्हते. मुलांबरोबरच्या/ भावंडांबरोबरच्या संबंधांमधला दुरावा, दरी इतकी असू शकेल अशी कल्पना आपण केली नव्हती. नातवंडांशी बोलण्याची आस निराशेचे कारण असू शकते असे कोणाला वाटले होते? एके काळी बघितला नसेल इतका पैसा असूनही समाधान, शांती रुसून बसले आहेत. प्रत्येक घरची स्थिती अशी आहे असे मला म्हणायचे नाही; परंतु लक्षात यावे इतके अशा प्रश्नांचे प्रमाण वाढले आहे हे खरे. अत्यंत व्यस्त, तणावपूर्ण असे व्यावसायिक जीवन सध्याच्या पिढीच्या वाटेला आले आहे. त्यातून परदेशाच्या प्रभावामुळे पिढ्यानपिढ्या असलेले ‘आपले ते सगळे’ परके झाले आहे. सावरून घेणारी माणसे कमी झाली आहेत. असणाऱ्यांची ओढ कमी झाली आहे. सोशल मीडिया जीवनाला आकार देण्याचे एक प्रभावी साधन ठरले आहे. मोबाइलचा विळखा अजगराच्या विळख्यापेक्षा घट्ट झाला आहे. रात्री बारा वाजता झोपायला जाणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. रात्री-बेरात्री खाणे, पिणे यात काही वावगे वाटेनासे झाले आहे. घरपोच खाद्यापदार्थ पोहोचवणाऱ्या कंपन्यांकडे ग्राहकांची संख्या वाढते आहे. आणखी किती लिहावे… या सगळ्याचा दुष्परिणाम शरीरावर, मेंदूच्या कार्यपद्धतीवर दिसतो आहे.

आज माझा मेंदू ठीक आहे. याऐवजी उद्या माझा मेंदू सक्षम असण्यासाठी मी काय करायला हवे, हा विचार महत्त्वाचा आहे. माझे आरोग्य सांभाळणे हे मला करायलाच हवे, या भावनेतून प्राधान्याने मेंदूकडे बघण्याची दृष्टी आपण सर्वांनी बाळगायला हवी. मेंदूचा व्यापार अगम्य, अगाध असला तरीही त्याच्या कुठल्याही कोपऱ्यात चालू असलेली खळबळ आपल्याला कळायला हवी. त्यावरील उपाय आपल्या रोजच्या जीवनाचा भाग व्हावेत. असे झाले तरच डिमेंशियाचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी होऊ.

mangal.joglekar@gmail.com