डिअर लायर’ हे नाटक म्हणजे सत्यदेव दुबे यांनी रत्ना यांना दिलेली सर्वांत मोलाची भेट होती, कारण त्यामुळे त्या रंगभूमीवर वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडल्या. आता त्या लेखनाचा आशय आणि शैली अधिक कौशल्याने आणि आत्मविश्वासाने लोकांपर्यंत पोहचवू शकत होत्या. ते नाटकही आता त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू लागलं आणि त्याही थोड्या गुंतागुंतीच्या मार्गाने जात, खूप वेळ घेत, आपल्या भूमिकेपर्यंत पोहोचल्या. हे नाटक काहीसं असाधारण होतं, कारण त्याने त्यांना महत्त्वाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक धडे दिले…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सत्यदेव दुबेंनी १९९३-९४ मध्ये आम्हाला-मला आणि नसीरला (नसीरुद्दीन शाह) ‘डिअर लायर’ हे नाटक भेट दिलं. नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि ब्रिटिश रंगभूमीवरची यशस्वी अभिनेत्री स्टेला पॅट्रिक कॅम्पबेल यांच्या चाळीस वर्षांच्या सहवासावर, त्यांच्यातल्या आगळ्या ‘रोमान्स’वरचं हे नाटक, जेरोम किल्टी यांनी लिहिलेलं. दुबे म्हणाले की, त्यांना बऱ्याच काळापासून हे नाटक करायचं होतं. कदाचित यावेळी आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं त्यांना वाटलं असावं.

ते एक आव्हानात्मक नाटक होतं, शब्दबंबाळ! त्यात उल्लेख असलेली माणसं आणि घटना पूर्णत: परदेशी होत्या, त्यामुळे चटकन त्याच्याशी समरस होणं कठीण! शिवाय नाटकात दोघा कलाकारांना रंगभूषा, देहबोलीतून ४० वर्षांचा काळ दाखवायचा होता. दुबेंनी नेहमीप्रमाणे त्या संहितेचं उत्कृष्ट संपादन केलं होतं आणि अतिशय साधं, अर्थवाही नेपथ्य ठरवलं होतं. दोन मोठ्या खिडक्या, दरवाजे, थोडंच फर्निचर, शॉ आणि कॅम्पबेल यांच्या छायाचित्रांच्या दोन मोठ्या फ्रेम्स. याच सगळ्यातून घर, हॉटेल, हॉस्पिटल, रिहर्सल रूम, नाट्यगृह, अशी वेगवेगळी ठिकाणं आम्ही दाखवायचो.

नाटकाच्या सुरुवातीला आम्ही स्वत:ची ओळख करून द्यायचो, की ‘आम्ही शॉ आणि कॅम्पबेल नाहीयोत! आम्ही केवळ दोन अभिनेते आहोत, जे आता शॉ आणि कॅम्पबेल यांची व्यक्तिमत्त्वं, त्यांचं जग, त्यांचं नातं, प्रेक्षकांसमोर साकारणार आहेत!’ या नाटकाची तालीम महिनोन् महिने चालली. भरपूर वेळ घेऊन नाटकाची तयारी करणं, सतत त्या नाटकाबरोबर, नाटकामध्येच राहणं हे आमच्या आवडीचं.(या व्यवसायातला तो सगळ्यात आनंददायी भाग आहे.) शिवाय त्या वेळी नसीर जवळपास दररोज चित्रीकरणात असे. माझीही ‘तारा’ ही मालिका तेव्हा दूरचित्रवाणीवर सुरू होती. त्यामुळे दोघांचं ‘पॅकअप’ झाल्यानंतरच आम्ही या तालमी करायचो. अर्थातच रात्री उशिरापर्यंत त्या चालायच्या. यात काही वेगळं नव्हतं म्हणा; कारण नाटकातल्या मंडळींना मिळकतीसाठी दिवसा कोणती ना कोणती नोकरी करावीच लागायची.

दुबेंसाठी ते सर्व अगदी सहज होतं. प्रत्येक प्रसंग रंगमंचावर कसा जिवंत होईल हे जणू त्यांना आधीपासूनच माहीत होतं. त्यात अभिनेत्यांच्या हालचाली काय असाव्यात, याबाबत त्यांचा आमच्यावर विश्वास होता. दुबेंचा भर होता, तो संवादांवर. संवाद म्हणताना त्या गप्पा कशा वाटतील आणि त्याबरोबरच भाषेचं सौंदर्य, शब्दांमधला आग्रहीपणा कसा अबाधित राहील, यावर. माझ्यासाठी नाटकातला भाषेचा वापर, त्यातल्या शक्यता, यांचा तो परिपाठ होता. संवादांचा अर्थ समजून, त्यात भावना ओतून संवाद कसे म्हणायचे, हे शिकण्याचीही एक संधी होती ती.

माझ्या वयापेक्षा मोठं दिसणं हे मात्र अवघड होतं. ते करताना माझ्या आईच्याच (अभिनेत्री दीना पाठक) अभिनयशैलीची नक्कल करण्याचा मोह होणं साहजिक होतं. पण स्टेला कॅम्पबेल हे वेगळंच रसायन होतं. तिचा हजरजबाबीपणा आणि अहंकार, दोन्ही ‘शॉ’च्या तोडीस तोड होतं. तिच्यात असणारा संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव आणि त्याच्याशी विसंगत असे, तिच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतरचं दु:ख, शेवटी तिला होणारी जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीव, हे सगळं मी तोपर्यंत केलेल्या कामापेक्षा वेगळं, अधिक आव्हानात्मक होतं. अर्थात ते मी उत्तमरीतीनं निभावतेय असं मला वाटत होतं. पण नंतर मात्र माझ्या मुलानं माझे डोळे उघडले…

पहिल्या प्रयोगाला प्रेक्षक कमी होते, पण कौतुक प्रचंड झालं. ‘पृथ्वी थिएटर’ किंवा ‘एनसीपीए’ यापैकी कुठेच प्रयोग करायचा नाही, असं दुबेंनी ठरवलं होतं. त्या तुलनेत फारशा प्रसिद्ध नसलेल्या ‘कर्नाटक संघा’च्या सभागृहात प्रयोग ठेवला होता. त्यानंतरचे अधिकतर प्रयोग आम्ही मुंबईबाहेर केले. पण काहीच वर्षांत ते नाटक बंद पडलं. आमच्या मनात मात्र ते पुन्हा करावं, ही इच्छा कायम होती. २००० वर्षाच्या सुरुवातीला ती संधी मिळाली आणि तेव्हा मला एक साक्षात्कार झाला. खट्कन बल्ब पेटल्यासारखं झालं…

आमचा मुलगा इमाद तेव्हा ‘टीनएजर’ होता. आम्ही ते नाटक पुन्हा सुरू करणार आहोत, ही कल्पना त्याला मुळीच पसंत नव्हती. त्याला विचारल्यावर तो म्हणाला की, त्याला ते नाटकच आवडलेलं नाही. ‘‘तुम्ही दोघं त्यात एकमेकांच्या प्रेमात असणं अपेक्षित आहे. पण तुम्ही तर सारखे वाद घालताना, भांडतानाच दिसता!’’ त्याचं ते निरीक्षण ऐकून आम्ही अवाक झालो… आणि नंतर आम्हाला उमगलं की, तो म्हणतोय ते खरं आहे. त्या नाटकाकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलला. असं लक्षात आलं की, प्रथम प्रयत्नात आम्ही बऱ्याच ठिकाणी मूळ मुद्द्यापासून भरकटलोय. मला तर माझी ‘मिसेस कॅम्पबेल’ वरवरची, संदिग्ध वाटायला लागली. एका ‘स्टार’ अभिनेत्रीकडे अमर्याद आत्मविश्वास असतो, ती मानसिकता पुरती समजून न घेताच मी एका ‘दीवा’ची भूमिका उभी करत होते. इथे पुन्हा इमादनं नोंदवलेली निरीक्षणं कामी आली. तो म्हणाला, ‘‘नाटकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कॅम्पबेल ही मोठी अभिनेत्री आहे आणि शॉ होतकरू लेखक आहे. मग तू ‘स्टार’सारखी का वागत नाहीस?’’ मला एकदम काही तरी जाणवलं… म्हणजे नसीर आणि रत्ना यांच्यात वैयक्तिक पातळीवर जे समीकरण आहे, तेच मी कॅम्पबेल साकारताना कायम ठेवलेलं होतं तर!

रंगमंचावरच्या भूमिकेत वैयक्तिक भूमिका कशी शिरते, हे तिथे मला दिसलं. पुढेही हा धडा माझ्याबरोबर कायम राहिला आणि आमचं संपूर्ण कुटुंबच कलाकारांचं असल्यामुळे त्याचा मला फार उपयोग झाला. आतापावेतो मिसेस कॅम्पबेलचा स्वत:बद्दलचा विश्वास, उघडउघडपणे इतरांशी स्पर्धा करण्याची वृत्ती, आपण कालबाह्य झालोय, हे पचवण्यातला हटवादीपणा आणि अंतिमत: आपल्या वयाचा, मावळतीला लागलेल्या अस्तित्वाचा स्वीकार, हे मला नीट कळलेलं होतं. या वेळी माझंही वय वाढलेलं होतं. माझेच अनेक अनुभव गाठीशी जमा झाले होते. कॅम्पबेल मला आता आणखी चांगल्या प्रकारे कळत होती. याशिवाय आणखी एक गोष्ट म्हणजे आता ‘इंग्लिश’ ही मला माझी भाषा वाटू लागली होती. भावना व्यक्त करायला ती मी वापरू शकत होते. त्यात अधिक सफाई आली होती आणि भाषेचा आनंदही घेता यायला लागला होता.

बऱ्याच वर्षांपूर्वी दुबेंनी आम्हाला घेऊन ‘व्हिलेज वुइंग’ या दुसऱ्या एका नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. त्या वेळी माझ्या इंग्लिशच्या ज्ञानात चांगली भर पडली होती. पण तरी मी हिंदी किंवा गुजराती जसं बोलू शकत असे, तितक्या सफाईनं काही इंग्लिश बोलू शकत नव्हते. या नाटकात मात्र मला संवाद म्हणताना त्यांना स्वत:चा रंग देणं जमायला लागलं. एखादी व्यक्तिरेखा उभी करताना तिच्यासाठीचा वाचिक अभिनय हा माझा आरंभबिंदू असतो. लोक कसे बोलतात, कसे व्यक्त होतात, हे बघणं फार विस्मयकारक आहे. त्या व्यक्त होण्यात अशा काही गोष्टी प्रकाशात येत असतात, ज्या खरं तर व्यक्तीला जाणीवपूर्वक दाखवायच्या नसतात. अभिनेत्री म्हणून त्या ऐकणं-बघणं मला पूर्वी जमत नसे. पण तिथपासून मी पुढे बराच प्रवास केला. रंगमंचावर असताना वाचिक अभिनयाची मजा घेण्यापर्यंत!

हे सगळं असं असल्यामुळे शॉ आणि दुबे हे माझ्या मनात शेजारी-शेजारीच उभे राहतात. नंतरच्या टप्प्यात मुंबईत ‘डिअर लायर’चा प्रयोग ‘एनसीपीए’ला करू देण्यासाठी आम्ही दुबेंना मनवलं खरं, पण त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव वापरायचं नाही, अशी अट घातली! मग नाटकाच्या जाहिरातीत आम्ही ‘दिग्दर्शक’ म्हणून ‘ PSD aka GBS’ असं लिहायचो. ‘पंडित सत्यदेव दुबे ऊर्फ जॉर्ज बर्नार्ड शॉ’! आमच्या लहरी दिग्दर्शकावर केलेला तो लहानसा विनोद होता. रंगमंचावरचं आणि इतरही वेळचं भाषिक सौंदर्य हा या दोघांतला समान धागा होता. दोघांनाही आपल्याला हवंय ते पोहोचवण्यासाठी नाटकाची ताकद नेमकी कळली होती. आणखी खोल खोल जाऊन विचार करायला दोघं उद्याुक्त करायचे… आणि अभिनेत्री म्हणून माझा विकास होण्यात दोघांचा मूलभूत वाटा आहे.

आम्ही ‘डिअर लायर’ पुन्हा सुरू करण्यापूर्वी आणखी एक मैलाचा दगड पार झाला, ‘मोटली’ या आमच्या नाटक कंपनीचं पहिलं हिंदुस्थानी नाटक- ‘इस्मत आपा के नाम’ (वर्ष २०००). उर्दू लघुकथा लेखिका इस्मत चुगताई यांच्या तीन कथांचं ते सादरीकरण होतं. तोपर्यंत आमच्या कंपनीनं फक्त इंग्लिश नाटकं केली होती. पण आपल्या भाषेत काही करावं म्हणून आम्ही शोधात होतोच.

हे नाटकसुद्धा अनेक दृष्टींनी माझा कायापालट करणारं ठरलं. त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे माझं एका नव्या भाषेवर बसलेलं प्रेम! उर्दू! पण त्याविषयी पुढच्या (१५ फेब्रुवारी) लेखात…

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturang dear liar drama satyadev dubey theater george bernard shaw actress stella patrick campbell amy