‘वैद्याकीय इच्छापत्र’ करण्याचं ठरल्यानंतर तो निर्णय अमलात आणायला माणूस टाळाटाळ करतो. याचं कारण म्हणजे मृत्यूबद्दल असलेलं भय. हा अवघड वाटणारा निर्णय सोपा करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वात पाच तत्त्वांचा समावेश करून संतुलित आयुष्य जगता आलं पाहिजे. कोणती आहेत ही तत्त्वे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मृ त्यूचं भान ठेवून आनंदानं आणि समाधानानं जगा’ हे सांगणं सोपं आहे, पण आचरणात आणणं खूप कठीण. सर्वसामान्यांची बात तर सोडाच, पण भल्याभल्यांना ते जमत नाही. आपला मृत्यू कधी आणि कसा येईल याबद्दल विचार करायलादेखील भीती वाटते, किंबहुना या विषयावर चर्चा करणं अशुभ मानलं जातं. वास्तविक पाहता यात शुभ-अशुभ असं काही नसतं, किंवा त्याची भीती बाळगण्याचीही गरज नाही. उलट, ‘लिव्हिंग विल’ म्हणजे ‘वैद्याकीय इच्छापत्र’ तयार करून तृप्त भावनेनं आणि प्रसन्न मनानं अंतिम प्रवासाची तयारी करण्यातच शहाणपण आहे.

आजकाल डॉक्टर लोकांना ‘वैद्याकीय इच्छापत्र’ तयार करण्याचा सल्ला देतात. यामुळे कसं जगायचं हे ठरवता येतं. हा एक असा दस्तऐवज आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती भविष्यात गंभीर आजार झाल्यास त्याला कोणत्या प्रकारचे उपचार घ्यायचे आहेत हे सांगितलं जातं. उपचारादरम्यान शरीरात वेगवेगळ्या नळ्या टाकू नका, मला व्हेंटिलेटर लावू नका, वगैरे मृत्यूच्या कितीतरी वर्षं अगोदर, चांगलं धडधाकट असताना, कुठलाही आजार झालेला नसताना, या अर्थाचा दस्तऐवज तयार करून उर्वरित आयुष्य आनंदानं जगण्याचा निर्णय खंबीरपणे घेता येण्याची सोय अलीकडच्या काही वर्षांत ‘वैद्याकीय इच्छापत्र’ (लिव्हिंग विल)च्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. आपला जन्म कुणाच्या पोटी व्हावा हे आपल्या हातात नसतं. असं असलं तरी वैद्याकीय इच्छापत्रामुळे आयुष्याचा शेवट कसा व्हावा (किंवा किमान तो कसा होऊ नये) हे ठरवणं शक्य झालं आहे. या निर्णयाचं महत्त्व पटतंय, तरी अशी वेळ येऊ नये यासाठी काय करता येईल याचा विचार झाला पाहिजे.

‘वैद्याकीय इच्छापत्र’ करण्याचं ठरल्यानंतरदेखील, तो निर्णय अमलात आणायला माणूस टाळाटाळ करतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मृत्यूबद्दल असलेलं भय. हा अवघड वाटणारा निर्णय सोपा करता येऊ शकतो. त्यासाठी आपल्याला संतुलित आयुष्य जगण्याची सवय लावून घ्यावी लागते. संतुलित आयुष्य ( balanced life) म्हणजे नेमकं काय, हे आपण बघू.

संतुलित आयुष्य जगताना आपल्या व्यक्तिमत्त्वात पाच गोष्टींचा समावेश करणं अपेक्षित आहे. आरोग्य, नातेसंबंध, ज्ञान, पैसा आणि इतरांसाठी जगणं ही पाच तत्त्वं आहेत. संतुलित आयुष्य जगण्यासाठी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य म्हणजे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मन शांत ठेवण्यासाठी मनाचे व्यायाम. वाचन, संगीत, बागकाम वगैरेंची आवड जोपासल्यास मन शांत राहण्यास मदत होते. शरीर निरोगी ठेवायचं झाल्यास अगोदर मन स्थिर असणं गरजेचं आहे. मनाने दृढ संकल्प केल्याशिवाय व्यायामात सातत्य राहू शकत नाही, तसंच आहारावर नियंत्रण ठेवता येणार नाही. आपल्यापैकी बरेच जण जेवताना गरजेपेक्षा जास्त खातात, त्यामुळे शारीरिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात याचं भान राहत नाही. समाजात लोकांमध्ये लठ्ठपणाचा विकार या कारणानेच वाढत आहे.

आजकाल मोठ्या शहरातच नव्हे तर लहान शहरातदेखील आरोग्याला धोका असणारे, शरीराला पोषक नसणारे, अनेक खाद्यापदार्थ (unhealthy food) उपलब्ध आहेत. ते पदार्थ लोक आवडीनं खातात. असे पदार्थ खाणं योग्य नाही हे लोकांना समजतं, पण ते त्यांना विशेषत: तरुण मुला-मुलींना खाण्याचा मोह होतोच. फळं, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये खाण्याचं महत्त्व लोकांना माहीत आहे, ते खातातदेखील, पण त्यात सातत्य नसतं. व्यायामाचं महत्त्व लोकांना माहिती आहे, पण तो रोज आणि जन्मभर करायचा असतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. व्यायामात सातत्य न राहिल्यामुळे अपेक्षित परिणाम दिसत नाही. संगणक क्षेत्रात काम करणारी मंडळी इतकी व्यस्त आहे की, त्यांना व्यायाम करायला वेळचं मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांची झोपदेखील नीट होत नाही. त्यामुळे आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. अलीकडच्या काही वर्षांत आपला आहार कसा असावा यासाठी आहारतज्ज्ञाऐवजी ‘न्यूट्रिजेनोमिक्स’ (जीन, पोषण आणि आरोग्याचा अभ्यास) या विषयाचा अभ्यास करून सल्ला देणारे तज्ज्ञ उपलब्ध होत आहेत. ‘न्यूट्रिजेनोमिक्स’च्या माध्यमातून आहार आणि आरोग्याच्या सुधारणेसाठी आनुवंशिक माहितीचा वापर केला जातो. यामुळे वैयक्तिक आहार सल्ला दिला जातो.

दुसऱ्या क्रमांकावर नातेसंबंध टिकवणं. कोणत्याही नातेसंबंधांची गुणवत्ता टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आपुलकीची भावना असणं गरजेचं आहे. एकमेकांना आदरानं वागवलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे, तरच ते नातं टिकतं अन्यथा नाही. तिसरं म्हणजे ज्ञान. ‘ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसेची’ असे संत ज्ञानेश्वर सांगतात. ज्ञानासारखे जगात दुसरे काही नाही. ज्ञान मिळवणे, ज्ञानाची जोपासना करणे हा संतुलित आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात पैशाला अर्थातच महत्त्व आहे, पण या यादीत पैसा चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्याला पुरेल आणि थोडासा उरेल इतका पैसा मिळवण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे.

पाचवं आणि शेवटचं तत्त्व म्हणजे इतरांसाठी जगणं. आपण समाजाचं काही देणं लागतो ही बाब मनात ठेवून यथाशक्ती योगदान देणंदेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, क्षार आणि जीवनसत्त्वे हे संतुलित आहाराचे पाच घटक आहेत. त्याचप्रमाणे संतुलित आयुष्याची ही पाच तत्त्वं आहेत. या पाच गोष्टींचा योग्य तो ‘बॅलन्स’ सांभाळता आला की, आयुष्य खऱ्या अर्थानं सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं. अतृप्त भावना मनातून वजा होते. मृत्यूचे भय वाटत नाही. वैद्याकीय इच्छापत्र तयार करून त्यावर स्वाक्षरी करण्याची क्षमता निर्माण होते. काही जणांना, ‘कधी न कधी मरण तर येणारच आहे, तर खाऊन-पिऊन मजा करायला काय हरकत आहे.’ असं वाटत असतं. या मनोवृत्तीनं शरीराची हेळसांड होते. या प्रकारच्या बेछूट पद्धतीनं वागण्यानं जीवघेणे आजार होतात. त्याच्या यातना त्या व्यक्तीला तर होतातच, पण संपूर्ण कुटुंबाचं भावनिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे.

‘वैद्याकीय इच्छापत्र’ केल्यानं मृत्यू जवळ येईल की काय असं लोकांना उगाचंच वाटत असतं. प्रत्येकाचा मृत्यूचा दिवस आणि वेळ ठरलेली असते हे विसरून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रानुसार, ‘वैद्याकीय इच्छापत्रा’ची जरी सोय झालेली असली, तरी जगताना आहार-विहाराच्या बाबतीतील शिस्त तर पाळली गेली तर आयुष्याच्या शेवटच्या काळात आयसीयूमध्ये उपचार घेत असताना, निर्णय घेणं, डॉक्टरांना आणि जवळच्या नातेवाईकांना सोपं जाईल.

आपल्याला जी काही शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती लाभली आहे, त्यात समाधान मानून आनंदी राहण्याची सवय मनाला लावावी लागते. वास्तविक पाहता चित्त प्रसन्न असणं किंवा ठेवणं ही निरोगी आयुष्याची मूलभूत गरज आहे. मृत्यूचं भान ठेवून जगण्यातच आनंदी जीवनाचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे.

‘मरणाचे स्मरण असावे’ असंदेखील म्हटलं जातं. पण मग जगत असताना सतत मरणाचं स्मरण केलं तर जगण्यातला आनंद शिल्लक न राहण्याची भीती आहे. मृत्यू अटळ आहे. प्रत्येकाच्या जीवनातील ते अंतिम सत्य आहे. जे अटळ आहे, अंतिम सत्य आहे त्याला सामोरं जाताना, वर नमूद केलेल्या पाच तत्त्वांचा व्यक्तिमत्त्वात समावेश करून संतुलित आयुष्य जगता आलं पाहिजे.

atnurkarkishore@gmail.com