कोणतीही चांगली शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना स्वत:ला शोधण्याची संधी देते. ‘राष्ट्रीय नाटय विद्यालया’नं ते रत्ना यांच्या बाबतीत केलं. या संस्थेतले १९७८ ते १९८१ दरम्यानचे त्यांचे हे शोधच या क्षेत्रातील त्यांच्या समजुतीचा पाया बनले. ‘काय करायचं नाही,’ हे त्यातलं सर्वात मोठं शिकणं होतं. विश्लेषण करणं, शिकणं, ते विसरणं, पुन्हा शिकणं आणि त्याचा सराव करणं.  या सगळय़ा त्या वेळी सुरू झालेल्या प्रक्रियांमुळे परिपक्व होत जेव्हा रत्ना पाठक मुंबईत परत आल्या, तेव्हा वास्तव जग आणि सत्यदेव दुबे यांच्याशी सामना करण्यासाठी त्या सज्ज झाल्या होत्या.

एक वर्ग, ३३ स्त्रीपुरुषांचा. सगळय़ांनी काळय़ा रंगाच्या टाइट्स आणि टॉप्स घातलेत.. आणि एकाग्रतेनं सगळे आपापल्या नितंबाचा फक्त उजवा भाग हलवण्याचा प्रयत्न करतायत, बाकीचं शरीर स्थिर ठेवून! काही तासांनी सगळे उडय़ा मारायला सुरुवात करतात. प्रत्येक जण कोणता तरी प्राणी झालाय.. आता तलवारबाजी सुरू झाली.. पुढच्या तासाला ते कथकलीतल्या मुद्रा करणारेत. मग गाण्याची शिकवणी.. आणि उद्या उत्स्फूर्त अभिनयाचा वर्ग होईल.. ज्याचं रूपांतर नंतर भांडणात झालेलं असेल!

‘राष्ट्रीय नाटय विद्यालया’तले (एन.एस.डी.) आमचे अभिनयाचे वर्ग हे असे असायचे! एव्हाना मला वास्तव जगात रंगभूमीवरच्या अभिनेत्यांना कशाकशाला सामोरं जावं लागतं याचा थोडासा अनुभव होता. आणि पुढे आम्हाला ज्या काही भूमिका मिळतील, त्यासाठी हे तुकडय़ा-तुकडय़ांचं प्रशिक्षण कसं काय उपयोगी पडणार आहे, असं मला वाटत असे. त्या वर्गाना विशिष्ट अशी काही रचनाच नव्हती. आम्ही नेमकी कशाची तालीम करतोय, याचीही काही कल्पना नव्हती. कुणीही रंगकर्मी दिल्लीत आला, की त्याला लगोलग विद्यार्थ्यांबरोबर सत्र घेण्यासाठी ‘एन.एस.डी.’त बोलावलं जात असे. ते जे सांगत, ते पुष्कळदा एकमेकांच्या अगदी विरुद्ध असे. काही वेळा आम्हाला रंगभूमीवर माहीत असायला हव्यात अशा युक्त्या त्यांच्याकडून कळत. या अर्धवट प्रशिक्षणानंतरही ‘एन.एस.डी.’मुळे एक नवं जग माझ्यापुढे खुलं झालं. मी १९७८ ते १९८१ अशी तीन र्वष तिथे होते. अभिनेते- दिग्दर्शक बी. व्ही. कारंथ आमचे संचालक! त्या काळात संस्थेत एक नवंच वारं शिरलं होतं. एक पर्व संपावं आणि अनेक गोष्टींची नव्यानं सुरुवात करावी तसं. आमच्या अभ्यासक्रमात ‘स्पेशलायझेशन’ नव्हतं. सर्व विषय सर्वाना शिकवले जायचे. माझ्यासाठी ते एक वरदानच ठरलं, कारण मुंबईत राहून जे मिळालं नसतं, असं रंगभूमीच्या विविध अंगांचं ज्ञान मला मिळालं. दरवर्षी चार नाटय-कलाकृती आम्ही करत असू. म्हणजे तीन वर्षांत बारा नाटकं. ते सगळय़ांत उत्तम प्रशिक्षण होतं, कारण आम्ही सर्व विभागांत काम करत असू आणि जगभरातून येणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळे.

मी तेव्हा २१ वर्षांची होते. डोळय़ांसमोर असंख्य नवीन कल्पना होत्या आणि जे जे मिळेल ते शिकायची भूक होती. देशभरातून आणि जगभरातूनही दिल्लीत येणाऱ्या नाटकांचे प्रयोग आम्ही पाहायचो. कारंथ यांच्याआधी संस्थेचे संचालक असलेले नाटयदिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांनी संस्थेत उभारलेलं ग्रंथालय वापरण्याची आम्हाला मुभा होती. नाटकाचं नेपथ्य, त्यातली कलात्मकता कशी असावी, याबद्दल युरोप, अमेरिका आणि आशियातले रंगकर्मी काय म्हणताहेत, त्याचा अभ्यास करत मी तिथे तासंतास घालवायचे. टिपकागदासारखी ज्या कल्पना, जी कौशल्यं दिसतील, ती शोषून घ्यायचे. अभिनयाच्या वर्गामध्ये अजून बरंच काही होऊ शकलं असतं असं वाटायचं, पण बऱ्याच नाटकांमध्ये काम करायला मिळाल्यानं ती कमतरता भरून निघाली. माझ्या वर्गात पाचच मुली होत्या. त्यामुळे मॅग्झिम गोर्कीच्या अतिवास्तववादी ‘लोअर डेप्थ्स्’पासून बेन जॉन्सनलिखित ‘वॉल्पोनी’च्या अतिदिमाखदार ‘भवाई’ रूपापर्यंत विविध भूमिका मला करायला मिळाल्या.

आमचं पहिलंच नाटक होतं- भारतेंदु हरिश्चंद्र यांचं ‘अंधेर नगरी चौपट राजा’. कारंथ यांनीच ते दिग्दर्शित केलं होतं. प्रथम त्यांनी संहिता बाजूला ठेवून दिली आणि आम्हाला आपापल्या भाषेत नाटकातले प्रसंग साकारायला सांगितले. कन्नड भाषक म्हणून हिंदूी प्रदेशात येणाऱ्या अडचणी कारंथ यांनी स्वत: अनुभवल्या होत्या. हिंदूी ज्यांची मातृभाषा नाहीये, अशांना तिथे फार अवघडल्यासारखं होत असे. त्यामुळे सांस्कृतिक वेगळेपणाला थारा मिळेल, नव्हे प्रोत्साहनच दिलं जाईल, असं कारंथ यांना सांगायचं होतं. केरळ, आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, बांगलादेश.. जिथून कुठून वेगवेगळय़ा संस्कृतींतून आम्ही आलो होतो, ते मोकळेपणानं, आत्मविश्वासानं हिंदूी नाटक करत होतो.

नंतर मात्र जवळपास दीड वर्ष असंतसंच गेलं आणि मग ‘ब्रेख्त ऑन ट्रायल’ समोर आलं. बेरटॉल्ट ब्रेख्तची नाटकं ज्यांनी जगभर केली होती अशा फ्रिझ्ट बेनेविट्झ यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी आमच्या नाटकाच्या दिग्दर्शनात एक वेगळीच वैचारिक भूमिका घेतली होती, की अभिनयाची किंवा निर्मितीची ‘ब्रेख्तियन’ शैली वगैरे नसते, तर सामाजिक बदलासाठी रंगभूमीचा कसा उपयोग होईल, याकडे पाहण्याची ब्रेख्तची स्वतंत्र दृष्टी आहे. त्यामुळे त्यांनी ब्रेख्तच्या उत्तम नाटकांमधून सहा प्रसंग निवडले आणि ते सहा वेगळय़ा माध्यमांत बसवले. ‘आर्तुरो उइ’ हे सर्कसच्या रूपात बसवलं, ‘थ्री पेनी ओपेरा’ बॉलीवूडच्या ‘मारधाड’पटांवर आधारलं, ‘द गुड पर्सन ऑफ शेझवान’ वास्तववादी नाटयरूपात बसवलं. यातला प्रत्येक नाटयप्रवेश संस्थेच्या आवारातल्या वेगळय़ा भागात साकारणार होता. अर्थातच प्रेक्षकांनाही त्याप्रमाणे जागा बदलावी लागणार होती. ती फक्त नाटयनिर्मिती नव्हती, तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शिक्षण देणारा प्रयोग होता. 

दुर्दैवानं त्याच सुमारास माझ्या वडिलांचं अकाली आणि अनपेक्षित निधन झालं आणि मला महिनाभर सुट्टी घ्यावी लागली. मी जेव्हा परत आले, तेव्हा नाटयप्रवेश आकारास येऊ लागले होते. मग मी त्याच्याशीच संबंधित प्रदर्शन आणि बाकीचे कार्यक्रम मार्गी लावण्याच्या कामी लागले. त्यासाठी ब्रेख्तच्या कामाचा सर्वच अंगांनी, खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार होता. नेपथ्य, संगीत, अभिनेते, त्यांचं भूमिकेसाठीचं प्रशिक्षण आणि ब्रेख्तचं वेगवेगळय़ा विषयांवरचं लिखाण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कलेद्वारेच जगाचा अर्थ लावता येत असल्यामुळे कला आणखी समृद्ध हवी, हा त्यांचा असलेला आग्रह. मला त्या नाटयप्रवेशांत अभिनय करायला मिळाला नाही याची खंत आहे, पण या अनुभवातून मला जे शिकायला मिळालं त्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं.

शेवटच्या वर्षांला असताना विजय तेंडुलकरांच्या मुळ नाटक, ‘शांतता.. कोर्ट चालू आहे’ च्या ‘खामोश.. अदालत  जारी हैं!’मध्ये ‘मिस बेणारे’ची भूमिका माझ्या वाटय़ाला आली आणि आजवर शिकलेलं बरंचसं विसरून परत नव्यानं शिकावं लागेल, हे जाणवलं. मधल्या काळात अभिनय करताना वापरण्याच्या अनेक लकबी आणि युक्त्या मी उचलल्या होत्या. पण सहजतेनं, प्रामाणिकपणे भूमिका कशी साकारावी हे मला माहीतच नव्हतं, हे लक्षात आलं. माझी जितपत तयारी झाली होती त्यापेक्षा ‘बेणारे’ची अपेक्षा फार जास्त होती. तिला माझ्यात जिवंत करणं हा आव्हानात्मक, पण तितकाच आनंददायी अनुभव होता.

मुंबईत परत आल्यावरही नवीन काही शोधायचा प्रवास सुरूच राहिला, पण आणखी ‘अनलर्निग’ करायला हवं, हे उमगलं. दुबेंना अजूनही माझ्याबरोबर काम करावंसं वाटत होतं हे माझं भाग्यच! त्यांच्या ‘शत्रू’च्या (इब्राहिम अल्काझींच्या!) इलाख्यात राहून आले होते ना मी! दुबेंबरोबर मी अनेक नाटकं केली. पण माझ्या विकासाच्या दृष्टीनं मोठा टप्पा आला तो त्यांनी १९८४ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘डॉन युआन इन हेल’ या नाटकाच्या रूपानं.

 जॉर्ज बर्नार्ड शॉ यांची ही जरा वेगळी कलाकृती आहे. डॉन युआन हा समस्त स्त्रियांना भुरळ घालणारा नायक, अॅ ना- त्याला न भुललेली एकमेव स्त्री, तिचे वडील- ज्यांचा डॉन युआनच्या हस्ते द्वंद्वात मृत्यू झालाय आणि ‘डेव्हिल’- सैतान, या चार व्यक्तिरेखा. त्यांच्यात नरकात घडणारा हा संवाद आहे. स्वर्ग आणि नरकाचे आपापले फायदे आणि माणसाच्या जीवनाचा उद्देश काय, याविषयी त्यांचं विनोदी अंगानं, अतिशय लक्षवेधी संभाषण चाललंय. शॉ यांनी उत्तम प्रकारे रचलेल्या संवादांमधून हा वादविवाद रंगत जात असे.

मला मात्र तिथे फार उपरं वाटत होतं. आतापर्यंत माझा असा समज होता की माझं इंग्लिश चांगलं आहे! पण ते बर्नार्ड शॉ समजून घेण्याइतकं चांगलं नाहीये याचा साक्षात्कार मला झाला. दुबे आणि नसीर माझे उच्चार सुधारण्याचा आणि माझ्या संवादांतली लय, प्रवाहीपणा कायम राहावा म्हणून सतत प्रयत्न करत होते. पण ते जे काही सांगत होते ते माझ्या डोक्यात फारसं शिरत नव्हतं. ‘ ह’ आणि ‘ श’च्या उच्चारणात काहीसा फरक आहे, हे मला समजत नव्हतं. मी ‘Where’चा उच्चार ‘Vhere’सारखा करत असे आणि ‘Victory’च्या जागी ‘Wictory’सारखा उच्चार तोंडून येत असे!

रंगमंचावर अभिनेत्यानं फक्त आपली पाळी कधी, याची वाट बघत थांबायचं नसतं. स्टेजवर जे घडतंय ते सगळं ऐकायचं असतं. हे किती अवघड आहे, ते मला त्यापूर्वी जाणवलं नव्हतं. मला इतरांचे संवाद ऐकणं अजिबात जमत नव्हतं. एकदा कुणीतरी ‘डॉन युआन’चा एक प्रयोग रेकॉर्ड केला. त्याची कॅसेट मी ऐकली, तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. दुबे इतके महिने कानीकपाळी जे सांगत होते, ते आपल्याला आता स्पष्ट झालंय असं वाटलं. थोडक्यात नवीन शिकणं, जुनं शिकलेलं विसरणं, पुन्हा नव्यानं शिकणं असं सगळं सुरू झाल्यानंतर माझ्या डोळय़ांपुढचं धुकं हळूहळू दूर झालं. पुढचा रस्ता लख्ख दिसायला लागला.

खऱ्या अर्थानं अभिनय शिकायला मात्र मला पुढची बरीच र्वष लागली.. पण या टप्प्यापासून मागे वळून बघायचं नव्हतं.

नाटक ‘डॉन युआन इन हेल’

chaturang@expressindia.com

Story img Loader