आश्लेषा महाजन
वयानुसार भयाच्या संकल्पना बदलत जातात. भुताखेतात, घुबडाटिटवीत अडकलेले भय नंतर मोकळे होते. कालपरत्वे भयाचेही विश्लेषण करता येऊ लागते. त्यासाठी मनाचे त्रयस्थपणे उत्खनन करावे लागते. प्रसंगी स्वत:लाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून खटला चालवावा लागतो. अशा विघटनामुळे बागुलबुवा थोडा का होईना, सौम्य होतो!
माडावरती पिशाच्च, करी झावळीचा झोका
घुमे बीभत्स हडळ, चुके काळजाचा ठोका
टिवटिवते टिटवी, तिचा टिपेचा कल्लोळ
भयदाटल्या डोळ्यांत पापशंकांचे कुसळ…
गूढ विक्राळ सावल्या, भास-आभासांचे वार
लागे जन्माला चकवा, स्थल-काल अधांतर
चळे तमाचा घुमट, जणू विलयाचा काळ
जाता अंधाराचा तोल, पंचक्रोशीला भोवळ…
भय तर बालपणाला लगडूनच आलेले आहे. त्या बालपणीच्या भयाचेच हे प्रौढ वयात सुचलेले काव्य.
नारायणगावमध्ये, मीना नदीअलीकडे, गाववस्तीपासून दूर, विस्तीर्ण शेतजमिनीवरल्या झाडाझुडपांनी व्यापलेल्या निर्जन पठारावर आम्ही राहत होतो. ‘गुरुवर्य सबनीस विद्यामंदिरा’च्या प्रचंड आवारातल्या शिक्षक वसाहतीत आमची मोजकी शिक्षक-कुटुंबे राहत होती. पंचक्रोशीतल्या जंगलात बिबट्यांचा वावर. चाळीतले आमचे घर अगदी कोपऱ्यात. घर कडेला असल्याने रात्री मला नेहमी चोर-दरोडेखोरांची भीती वाटायची. साधे विटांचे घर. वरती पत्रे. चोरांनी फोडले तर? आपल्यावर तलवार-कोयत्याने वार केले तर? त्या वेळी रात्री दिव्यांचा झगमगाट नव्हता. दूरदूरवर एखादाच मिणमिणता विजेचा खांब. आजूबाजूच्या घनदाट झाडीत- ‘हा खेळ सावल्यांचा…’ चाले. आसपास वारेमाप शेती. नारळाच्या झाडांजवळ भलीमोठी विहीर. त्या विहिरीत एक हडळ राहत असल्याचे मंत्र-तंत्रवाल्या जटाधारी म्हातारबुवाचे म्हणणे होते. जवळच असलेल्या ओढ्यात उडी मारून एका विवाहितेने आत्महत्या केली होती. तिचे डोळे तिरके, नाकात घुसल्यासारखे, भयानक भेदक होते. ती त्यापूर्वी भाजी विकायला बसायची. आईबरोबर बाजारात मी तिला अनेकदा पाहिले होते. ती स्वप्नात येऊन माझा गळा आवळत असे. भयानक स्वप्न. बहुधा तिचीच हडळ विहिरीत राहत असावी! वर्गातल्या एका मुलीचे वडील इलेक्ट्रिशियन होते. विजेच्या खांबावर काम करताना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा मनभर भयाची लहर पसरली होती. वीज म्हणजे राक्षसीणच, असे वाटू लागले.
कर्णकर्कश किरकिरणारे रातकिडे, वटवाघळे, घुबडांचे घूत्कार, टिटव्यांचे रडणे, हेच माझ्या बालपणींच्या रात्रींचे पार्श्वसंगीत. भयाची बीजे बालपणात असतात, असे म्हणतात. मनकुहरात बालपणी वाटलेल्या अनेक भीतींनी घर केलेले. जगणे थोडे जून, निबर झाल्यावर बालसुलभ भयाचे स्मरणरंजन होते. आपल्या भित्यापोटी असणाऱ्या ब्रह्मराक्षसाचे नंतर हसूही येते. कारण पक्व वयात या भयाची प्रतवारी बदलते. विचारांती ध्यानात येते की, भय या आदिम प्रेरणेचे स्वरूप जितके लौकिक आहे, तितकेच लौकिकापल्याडचेही आहे. अद्भुत दुनियेतले आहे. मनोव्यापाराचे नि ‘फँटसी’चे आहे. खूपदा भयाचे, भयात जगण्याचे माणसाला सुप्त आकर्षणही असते. ‘डरना अच्छा हैं’, कारण घाबरणाऱ्यांना सहानुभूती, आधार मिळतो.
भयाचे आणि स्वप्नांचेही नाते गहिरे आहे. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’! मी परीक्षेला निघालेय आणि कंपासबॉक्स सापडतच नाहीये… मी घरभर वेड्यासारखी शोधतेय, ओरडतेय. हे ‘भय-स्वप्न’ मला आजही पडते! मी कुठलेसे प्रदर्शन पाहायला गेले आहे आणि काही केल्या माझे डोळेच उघडेनासे झालेत… मी हातांनी पापण्या बाजूला करतेय, पण व्यर्थ! हे स्वप्न वारंवार पडते. अशी भय-स्वप्ने रात्र नासवतात. निद्रानाश जडवतात.
बाह्य समाजातल्या भयापेक्षा ‘आतली भीती’ मन जास्त पोखरते. माणसे, कुटुंब, संस्था, समाज, देश, जग, ब्रह्मांड… अशा पायऱ्यांनी भयाची उंची वाढत जाते. जागतिकीकरणात वेगवान जीवनाची आणि बदलत्या, तकलादू मूल्यांची भीती वाटते. महानगरी जीवनातील गुंतागुंतीने थरकाप उडतो. विज्ञानाच्या अफाट प्रगतीची आणि मानवाला तंत्रव्यसनी रोबो करणाऱ्या मोहजालाची भीती वाटते. अगदी ‘पासवर्ड’ विसरण्याचीही भीती असतेच!
एक मात्र बरे आहे, की आताशा भय समजते, उमजते. भय शहाणे करते. वयानुसार भयाची व्याप्तीही वाढते. माझे भुताखेतात, घुबडा-टिटवीत अडकलेले भय नंतर मोकळे झाले. माणसांनी जगणे वेढले. मग काही माणसांचेच भय व्यापू लागले. माणसे आयुष्यातून हरवण्याचे, माणसे नकोनकोशी होण्याचे भय, माणसाच्या अनाकलनीय वागण्याचे भय फोफावते. जवळच्या म्हणवल्या गेलेल्या व्यक्तीत आणि आपल्यात दरी सतत रुंदावत जाण्याचे भय हतबल करते. अशी भीती आयुष्य झिजवते. वेडसर, विमनस्क होण्याचे भय आसपास वावरते.
भयाविषयी जागरूकता आली की त्याची कुणकुण खूपदा आधीच लागते. त्यावर मात करण्याचा गंभीरपणे प्रयत्न होतो. मग भयाचे विश्लेषण करण्याची मानसिक तयारी होते. मीही कालपरत्वे भयाची विश्लेषक झाले. शांत डोक्याने भयाचे व्यवस्थापनही करू लागले. या कामी भयाचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे. त्यासाठी मनाचे त्रयस्थपणे उत्खनन करावे लागते. ‘स्व’ला अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे करून कठोर न्यायनिवाडा होतो. भय-पट विस्कटून त्याचे धागे सोडवावे लागतात. आपल्याला नक्की कशाचे भय वाटते? अपमानाचे? उपरोधाचे? उपेक्षेचे? अपेक्षाभंगाचे? विपरिताचे? विसंगतीचे? अशाश्वतीचे? नक्की कशाचे? विश्लेषणातून भयाची तीव्रता थोडी कमी होते. विघटनामुळे बागुलबुवा सौम्य होतो. समोरचा माणूस योग्य प्रकारे वागणार नाही, पण आपण त्याला कळकळीने काही सांगितले, आपल्या परीने प्रयत्न केला, हे समाधान मी मिळवते. (योग्य-अयोग्य हे व्यक्तिसापेक्ष असते, हा मुद्दा बाजूला ठेवू या.) जे आपल्या हातात नाही ते व्यापक व्यवस्थेच्या हातीच असणार. ‘जे जे होईल ते ते पाहावे,’ या स्वीकारशील वृत्तीला अशा वेळी पर्याय नसतो.
इतर जीवनानुभवांप्रमाणे भयाच्या व्यवस्थापनात कवी-लेखक असण्याचा मोठा लाभ होतो. भय बऱ्याचदा लेखणीचा कच्चा माल होतो. माणसावर संस्कारांचा ‘रिमोट कंट्रोल’ असतो. संस्कार-चौकटी मोडण्याचे त्याला भय असते. मध्यमवर्गीय पापभीरू संस्कारांचा, नीतिमत्तेचाही धाक असतो. संयमित आणि सभ्य वागण्याची सक्ती असते. परंपरांचा दरारा असतो. त्यात लायकी असतानाही विशिष्ट साच्यात अडकल्याने आपली रेघ मोठी करता न आल्याचे शल्य असते. ते शल्य, विसंगती यांचा शब्दरूपातून निचरा होतो. ‘कॅथार्सिस’ होते. कधी तिखट शब्दांत, कधी मऊ शब्दांत.
घराचाच पिंजरा किंवा अंधारगुहा झाल्याची भीती प्रातिनिधिक आहे. घराची चौकट जाचक झाली की भयाण भासते. विवाह संस्थेची चौकटही जेव्हा शोषणावर उभी राहते, तेव्हा त्या पवित्र-बिवित्र संस्कारांतली निरर्थकता भीषण असते. जिथे माया आणि विसावा मिळायला हवा, त्या घरातल्या भिंतीच जेव्हा भीतीदायक ठरतात, तेव्हा हा अंतर्विरोध अस्वस्थ करतो.
उंबऱ्याच्या चौकटीची सैल केली बिजागरी
फटीफटीतून आत आली तिरीप सोनेरी…
अशा आशावादी पंक्तीही लेखणीतून झरतात. त्यात कधी माझी सत्यकथा असते, कधी दुसऱ्याची. कधी ती कुणासाठी प्रेरणा ठरते, तर कधी भाबडा ‘युटोपिया’! भीतीला मनात, सभोवताली अनुभवताना ती अस्तित्वाचा ताबा घेते. पण त्या अनुभवाकडे मागे वळून बघताना आणि त्या अनुभवाला कवितेत किंवा अन्य आकृतिबंधात उतरवताना त्या भीतीमधले सौंदर्य (!) मोहितही करते. रुद्र-सुंदरतेचे मनावर गारुड चढते. कलाकृतीत भीतीही सजूनधजून येते.
भयभावनेच्या मागे अशाश्वती हे महत्त्वाचे कारण आहे. पुढच्या क्षणी काय होईल, हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे मरेपर्यंत जगतच राहण्याखेरीज गत्यंतर नसते. ही निरर्थकता मन व्यापते. मग आजारपणाचे, हॉस्पिटलमधल्या वास्तव्याचे, संभाव्य अपंगत्वाचे, परावलंबित्वाचे, तसेच मृत्यूचेही भय मनाला घेरते.
लेह-लडाखमधले भयंकर सुंदर डोंगर पाहिले आणि भव्यतेची, स्थूलतेची भीती वाटली. करोनाकाळातील कोलाहलात अतिसूक्ष्म विषाणूचे थैमान पाहून अमूर्त सूक्ष्मतेची भीती वाटली. विराट निसर्गाच्या सान्निध्यात उंच कड्यावरून धो धो कोसळणारा धबधबा बघताना आपल्या क्षुद्र जीविताचा साक्षात्कार होतो. प्रपातातून खोल दरीत झोकून आत्मार्पण करावेसे वाटते. पण दुसऱ्या क्षणी आपल्या मनात असा आत्मघातकी विचार आलाच कसा, या विचाराने भीतीची लहर पसरते. एका बेभान तंद्रीत विवेक हरवतो. अशा वेळी ‘जीवंतिके’चे व्रत घेऊन एकदा तरी बाळसेदार निर्भयता जन्मावी लागते. जसं-
मी पुन:पुन्हा जन्म देते- भयाला!
भय- अशाश्वताचं, निरर्थाचं,
विसंगतीचं…
भय- अपेक्षाभंगाचं, उपेक्षेचं, एकाकी
वैफल्याचं…
मी कुरवाळते त्या भयाचं नवजात अंग
हुंगते त्याचं भुरभुरतं काळोखं जावळ
पुसत राहते त्याचा कोवळा घाम ममत्वाने
अन् करते त्याचा प्रतिपाळ अनिमिष नेत्रांनी
शिवाय मिरवतेही माझं पराभूत मातृत्व!
भय- निर्मितीपूर्वीचं, निर्मितीच्या वेळचं
आणि- निर्मितीनंतरचं…
आदिम प्रेरणेसारखं ते लुचत राहतं
माझ्यातला रस आटवतं
माझं रक्त, घाम… माझं सर्वस्व!
आणि फोफावतं अवघ्या जन्मावर सर्व
बाजूंनी-अविश्रांत…
ओली बाळंतीण असतानाच-
भयाच्या पाठीवर, त्याच्याच भावंडांचा-
न्यूनगंडाचा, अगतिकतेचा, नैराश्याचा जन्म होतो…
मग पुन्हा निर्मितीपूर्वीच्या, निर्मितीच्यावेळच्या
आणि निर्मितीनंतरच्या जीवघेण्या कळा
पुन्हा ती काळोखी, ओली मगरमिठी…
त्या सुदृढ अंधाराला लेकुरवाळी मी-
जीवंतिकेप्रमाणे वात्सल्यानं जोजवत राहते…
त्या घनघोर अंधारपोकळीतून एकदा तरी
छोटीशी, बाळसेदार निर्भयता जन्मावी,
म्हणून मी सटवाईची पूजा बांधते!
(कविता ‘रक्तचंदन’ या कवितासंग्रहातून)
ashlesha27mahajan@gmail.com