हेमलता ठाकूर
तेजस आणि त्याचा गोल्डी दोघांची घट्ट मैत्री. जे काही करायचं ते एकत्रच. तेजससाठी तो कुत्रा नव्हता खूप जवळचा मित्र होता. एका संध्याकाळी ते दोघं खेळायला बाहेर पडले आणि…
सकाळपासून तेजस आणि त्याचा लाडका गोल्डी बाल्कनीतच होते. ‘‘आई, हे कधी उगवणार?’’ कुंडीत पेरलेल्या बियांना पाणी घालत तेजस विचारत होता आणि गोल्डी भू भू करत तेजसभोवती घुटमळत होता. ‘‘साधारण १०-१२ दिवस लागतील रे, पण रोज पाणी घालावं लागेल.’’
‘‘गोल्डी, लक्षात ठेव हं पाणी घालायचं,’’ म्हणत तेजस मिश्कीलपणे हसला आणि सायकल घेऊन गोल्डीसोबत बाहेर पडला. ‘‘गार्डनमध्येच खेळा, रस्त्यावर जाऊ नका,’’ स्मिताच्या सूचना त्याने ऐकल्याही नसाव्यात. ‘‘दर रविवारी तू हेच सांगतेस, अगं, सुट्टीच्या दिवशी इतकी वर्दळ नसते रस्त्यावर!’’ विवेकनं चहाचा घोट घेत स्मिताला दिलासा दिला.
तेजस सायकल चालवत रस्त्यावर आला होता आणि गोल्डी त्याचा पाठलाग करत होता, दोघांची ही शर्यत विवेक बाल्कनीतून पाहत होता. इतक्यात कर्णकर्कश ब्रेक दाबल्याचा आवाज झाला. तेजसची आरोळी, गोल्डीचं भुंकणं आणि लोकांचा गलका या सगळ्याचा अर्थ धास्तावलेल्या विवेकला खाली उतरून उमगला. एका भरधाव बाइकने गोल्डीला धडक दिली होती. त्याचं ते निपचित पडलेलं लाल तांबूस शरीर तेजसच्या हाती होतं. त्याचा आक्रोश काळजाला घरं पाडत होता.
गोल्डीला रीतसर ‘निरोप’ दिल्यानंतर तेजसला सांभाळणं स्मिता आणि विवेकसाठी जिकरीचं झालं होतं. दोन दिवस शाळेत न गेलेल्या तेजसची समजूत काढत त्याला अखेर तिसऱ्या दिवशी दोघांनी शाळेत पाठवलं. दुपारच्या सुमारास विवेकला शाळेतून फोन आला. तापाने फणफणलेल्या तेजसला त्यानं तिथून थेट दवाखान्यात नेलं होतं. विवेकने तेजसला तपासणाऱ्या डॉक्टरांना रविवारच्या अपघाताची कल्पना दिली. तोवर स्मिताही तिथे पोचली. ‘‘लहान मुलं असे प्रसंग मनाला लावून घेतात. मी औषधं देतो. मात्र सध्या त्याच्यासोबत तुमचं असणं फार महत्त्वाचं आहे.’’ डॉक्टरांचा सल्ला लक्षात घेत आळीपाळीने त्या दोघांनी घरी राहायचं ठरवलं. तेजसचं जग जणू थांबलं होतं. एकटक गोल्डीच्या बेल्टकडे पाहत बसलेल्या तेजसला पाहून स्मिताच्या पोटात ढवळलं. त्याची समजूत काढत ते दोघं गार्डनमध्ये जायला निघाले. तळमजल्यावर वर्देकाका भेटले.
‘‘अरे, तेजस, किती दिवसांनी पाहतोय तुला. त्या कुत्र्याचं एवढं काय मनाला लावून घेतोस. तुझ्या बाबांना सांग दुसरा कुत्रा आणायला, आपोआप त्याला विसरशील.’’ वर्दे काकांचे शब्द तेजसच्या कानी पडले आणि त्याचा नूरच पालटला. त्यांच्या दारातल्या कुंडीला लाथ मारून तेजस सुसाट पळाला.
‘‘स्मिता, आवर त्याला, या वयात असा राग बरा नाही…’’ त्यांची पुढली वाक्य ऐकायला ती थांबली नाही. गमावलेपणाच्या दु:खाने आता रागाचं रूप घेतलं होतं. स्मिता गार्डनमध्ये पोचली. बाकावर बसून हुंदके देणाऱ्या तेजसला तिनं पोटाशी धरलं. आई, मी तुझं ऐकलं असतं तर गोल्डी वाचला असता म्हणत तेजस तिला बिलगून बराच वेळ रडत होता.
विवेकला घरी आल्या आल्या ही हकिकत समजली. जवळ जात त्याने तेजसच्या केसांवरून हात फिरवला. ‘‘बाबा, वर्दे काका वाईट आहेत. मला म्हणाले, दुसरा कुत्रा आण आणि विसरून जा गोल्डीला, आपण काय गाडीच्या चाकासारखे आहोत का, पंक्चर झालो की दुसरं चाक बसवायला,’’ तेजसनं हुंदका दिला.
‘‘मुळीच नाही, माणसं अशी रिप्लेस नाही करता येत.’’ स्मिताने तेजसच्या मनातला सल टिपला.
‘‘ मी कधीच विसरू शकणार नाही त्याला.’’ तेजस बोलत होता. ‘‘तुझं म्हणणं अगदी खरं आहे, बाळा, आपण गोल्डीला नाही विसरू शकत. आपण त्याला सतत लक्षात ठेवलं पाहिजे. पण गोल्डीला लक्षात ठेवताना आपण फक्त त्याचं जाणंच लक्षात ठेवतोय. गोल्डी आपल्याकडे गेली तीन वर्षं होता. तुम्ही दोघं किती गोष्टी एकत्र करायचात. त्या करायच्या विसरलो तर आपण त्यालाच विसरल्यासारखं होईल ना?’’ असं म्हणत विवेकनं टेबलाजवळचा बॉल स्मिताकडे भिरकावला. सावधपणे स्मिताने तो झेलला. आणि पुन्हा त्याच्या दिशेने भिरकावला. तेजसचं रडणं थांबलं होतं. त्याने विवेकच्या हातातला बॉल घेत स्वत:च्या गालावर घासला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून झाडांना पाणी घालून तेजसने दिवसाची सुरुवात केली. पुढल्या तीन-चार दिवसांत तो पूर्वपदावर येताना दिसला. मात्र शाळा, अभ्यास, खेळ या गोष्टी करता करता तो मधूनच गोल्डीच्या बेल्टपाशी घुटमळायचा.
‘‘बाबा, गोल्डीचे काही फोटो प्रिंट करून आणाल?’’ तेजसची मागणी ऑफिसमधून येताना विवेकने पूर्ण केली. संध्याकाळी त्या तिघांनी ते फोटो पाहत बराच वेळ गप्पा मारल्या.
दुसऱ्या दिवशी शनिवार असल्याने तेजस दुपारीच शाळेतून घरी आला होता. स्मिता आणि विवेक ऑफिसमधून घरी आले तेव्हा तो त्याच्या खोलीत कागदांचा पसारा मांडून काहीतरी करत असल्याचं त्यांना दिसलं. थोडा वेळ गेल्यानंतर त्यानेच दोघांना आत बोलावलं. गोल्डीच्या फोटोंचं मस्त कोलाज बनवून त्याने भिंतींवर लावलं होतं.
‘‘वा, सुंदर, इस बात पे पार्टी हो जाये,’’ स्मिताने जेवल्यानंतर आईस्क्रीम खायला जाण्याचं सुचवलं. १०-१२ दिवसांनी ते तिघे बाहेर पडले होते. ‘‘बाबा, मला गोल्डी कधीच दिसणार नाही ना?’’ तेजसनं उसासा सोडला. ‘‘तू नीट पाहायचं ठरवलंस तर नक्की दिसेल.’’ विवेकनं आभाळभर पसरलेल्या चांदण्याकडे तेजसचं लक्ष वेधलं. त्या अवकाशात तेजस गोल्डीला शोधू लागला. दुसऱ्या दिवशी तेजसच्या हाकांनी विवेक आणि स्मिताला जाग आली. दोघेही तेजस उभा असलेल्या बाल्कनीत गेले. अपघाताच्या दिवशी तेजसने गोल्डीसोबत त्या कुंडीत लावलेल्या बिया अंकुरल्या होत्या. दोन इवली पानं त्या तांबूस मातीतून वर डोकावली होती. तेजस भान हरपून त्याकडे पाहत होता. तेजसच्या काळ्याभोर डोळ्यात विवेक आणि स्मिताला गोल्डी दिसत होता…