लग्न करायचं की नाही, हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत लग्नाचं वय वाढत आहे, विशेषत: तरुणींमध्ये. काही जणी तर लग्नच नको, या विचारापर्यंत आल्या आहेत. यामागे सामाजिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक अशी अनेक कारणे आहेतच, पण इतकी वर्षं लादलं गेलेलं दुय्यमपणही कारणीभूत आहे का? कोणती कारणे आहेत तरुणींच्या या मानसिकतेमागची? त्याविषयी समुपदेशक हेमा होनवाड यांचा लेख. स्वप्ना आणि मी कॉफीसाठी ‘किमया’मध्ये आज जवळजवळ सात वर्षांनी पुन्हा भेटलो असू. तिला तेव्हाही खूप बोलायचं होतं आणि आजही, फक्त कशी सुरुवात करायची ते कळत नव्हतं. पण नंतर बोलायला लागली तसा तो धबधबा थांबेचना. कोणतेही अर्थ न लावता तिचं बोलणं मी तटस्थपणे ऐकून घेईन याची तिला खात्री होती. आम्ही पूर्वी भेटलो तेव्हा तिला परदेशातल्या विद्यापीठात जाऊन पीएच.डी. करायचं होतं. तिचं तेव्हाचं वय होतं, २३च्या आसपास. एक जवळचा मित्रही होता तिचा. प्रेमात वगैरे नव्हते दोघं, पण भेटायचे मधून मधून. त्याच्या खांद्यावर किंवा छातीवर डोकं ठेवून बसणं तिला मनापासून आवडत असे. घरचे हिच्या लग्नासाठी उत्सुक होते, पण हिला परदेशाचे वेधलागले होते. ‘जाण्याच्या आधी निदान त्या मित्राबरोबर साखरपुडा तरी करून जा’, असं घरचे म्हणत होते. पण ती इतकी ठाम होती तिच्या मतावर की, त्यांना कधी रागावून, कधी रुसून-रडून कधी प्रेमाने पटवण्यात ती यशस्वी झाली. आणि परदेशी जाऊन जिद्दीनं डॉक्टरेटही मिळवली आणि आता तिथल्याच विद्यापीठात शिकवते आणि संशोधनही करते.
आजही तीच भडाभडा बोलत होती आयुष्याबद्दल. संशोधन आणि शिकवणं यात इतकी रमली आहे की, लग्नाचा विचारच नाही तिच्या मनात. छान मित्र आहे एक. वीकएंडला कधी तो हिच्याकडे येतो किंवा ही त्याच्याकडे जाते. या वर्षी ती तिशीची होईल. कदाचित पुढे-मागे ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’चा विचार करेन, असं म्हणाली. तिला संशोधनावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अशा वेळी जोडीदाराला वेळ देता आला नाही किंवा त्याच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत तर जी कटुता निर्माण होईल ती आयुष्याच्या या टप्प्यावर तिला नको आहे. तिनं तिची काकू आणि आई यांना कायमच तारेवरची कसरत करत जगताना जवळून पाहिलं होतं! तसं नक्कीच जगायचं नव्हतं तिला. कामावरचे ताण सांभाळून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता आईची दमछाक तर व्हायचीच, पण तिच्या कामात खोड्या काढायला आजी टपलेलीच असायची. बाबांनी थोडी जरी मदत केली तरी, ‘‘नोकरीवर जाते ना! त्याच्यावर खूपच काम पडतं. पण करणार काय?’’ असे टोमणे ऐकत आई निवृत्त झाली मागच्या वर्षी.
‘‘पण एकटेपणाचं काय करतेस?’’ या प्रश्नावर ‘‘एकटेपणाबद्दल विचार करायला फारसा वेळच नसतो,’’ असं प्रामाणिक उत्तर तिनं दिलं. कधी कधी निराशेचे, एकटेपणाचे काळे ढग दाटून येतात मनात, पण त्यावर तिनेच आपले उपाय शोधले आहेत. तिकडे गेल्यावर ती पेंटिंग शिकली. संगीत तर आहेच लहानपणापासून. आपल्या इथल्या ‘समाजकेंद्री’ जीवनापेक्षा तिकडचं ‘व्यक्तिकेंद्री’ जीवन तिला छान मानवलं. शारीरिक गरजेबद्दल विचारलं, तर स्पष्टपणे म्हणाली की, ती गरज इतकी मोठी वाटत नाही की त्यापायी लग्नाच्या बेडीत अडकावं! मित्र मधून मधून भेटतो तेवढं तिला पुरेसं आहे.
प्रसन्न हसून एक गळामिठी मारून ती आणि मी विरुद्ध दिशांना चालू लागलो. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा निर्धार स्वप्नासारख्या मुलींमध्ये आहे आणि तो त्या समर्थपणे निभावून नेतात. ही संधीच मागच्या पिढ्यांतील अनेक स्त्रियांना क्षमता असूनही उपलब्ध नव्हती. जन्म झाल्याबरोबर ‘परक्याचं धन’ही उपाधी लावली जायची. आणि त्यांच्या जीवनाचं ध्येयच मुळी फक्त लग्न होतं. इतरांची मनं राखत,राख होईपर्यंत जगायचं! मनातील स्वप्नं दडपून टाकायची! त्यासाठी तयार नाहीत आजच्या या मुली.
रूपा मागच्याच आठवड्यात भेटली. एकुलती एक. ३४ वर्षांची. उच्च शिक्षण घेऊन आता ती नामवंत संस्थेत संशोधक म्हणून काम करते आहे. तिला लग्न करण्याची इच्छा नाही. कारण लग्न म्हणजे तिला मोठी जबाबदारी, बंधन वाटतं. एकुलती एक असल्यानं आई-वडिलांची जबाबदारी आहे तेवढीच पुरेशी वाटते तिला. स्वत:चं मूल वाढवण्यातही जोखीम वाटते तिला, तेवढा आत्मविश्वास नाही तिच्यात. ती नेहमी तिच्या समुपदेशकाच्या संपर्कात असते. त्यांच्याशी बोलून ती मनाचं संतुलन कायम ठेवते आणि स्वत:चे निर्णय स्वत: घेते. एकटं राहण्याच्या तिच्या निर्णयाची आई-वडिलांना खूप चिंता वाटते. आपल्यानंतर हिला कोण? या काळजीत लग्नाचा आग्रह करतात ते मधून मधून, पण ती ठाम आहे. लग्न केल्यावर जो साथीदार मिळेल तो खऱ्या अर्थाने ‘आपला’ असला तर ठीक! नाही तर भावनिक आणि आर्थिक स्तरावर फसवणूक झाल्याचे अनुभव तिच्या मैत्रिणींना आणि माझ्या इतरही काही विद्यार्थिनींना आले आहेत. त्यावेळची मानसिक अवस्था फारच भयानक असते. कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी. काहींना मात्र त्यातूनही तज्ज्ञ व्यक्ती, आई-वडील आणि मैत्रिणींची मदत घेऊन फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेताना मी पाहिलं आहे. परंतु लगभन निभेल ना ही साशंकता कुठेतरी मनाच्या तळाशी असतेच अलीकडे.
अनेकदा ‘तुझं हित आम्हाला कळतं,’ या हट्टापायी मुलांचे निर्णय मोठ्यांनी घेतले तर त्या मुलांना आणि सगळ्याच कुटुंबाला जीवनभर दु:खद परिणाम भोगावे लागतात अशीही उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो आहोत. मागच्या महिन्यात सकाळी सकाळीच अवनीचा फोन येऊन गेला. उत्तम रीतीनं उत्तीर्ण होऊन हवी तशी नोकरी मिळाल्याची बातमी तिला मला सांगायची होती. अवनीला वडील नव्हते. आई नोकरी करून तिला शिकवत होती. ती १०वीत असतानाच एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यानंही प्रतिसाद दिला. या वयातलं प्रेम म्हणजे नैसर्गिक आकर्षण असतं. ती शरीराची हाक असते. अवनीची आई शहाणी होती. विरोध करून उपयोग नाही हे तिला माहीत होतं म्हणून तिनं ते नातं स्वीकारलं, पण जेव्हा हे संबंध मुलाच्या आईच्या लक्षात आले तेव्हा त्या श्रद्धाळू आणि नैतिकतेचा अभिमान असणाऱ्या आईनं आणि घरातील सगळ्यांनी प्रचंड विरोध केला. ‘माझा’ मुलगा इतक्या लहान वयात ‘असले’ उद्याोग करूच कसा शकतो? याच विचाराभोवती तिचं सगळं आयुष्य फिरू लागलं. घरात सुबत्ता असल्यानं त्यानं परदेशी शिकायला जाण्याचा मानस व्यक्त केला तेव्हा आई-वडील खूश झाले. पण अवनीचे आणि त्याचे बेत वेगळेच होते. अगदी ठरवून तो गेल्याच्या पुढच्या वर्षी अवनीसुद्धा परदेशी गेली. अवनीनं आणि त्यानं लग्नाचा कधी विचारही केला नाही, कारण त्यांच्या लग्नाला त्याच्या घरून परवानगी मिळणार नाही याची त्यांना खात्री आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये ते गेली पाच वर्षं मज्जेत राहात आहेत. तिथं घरातल्या मोठ्यांची कटकट नाही. मानसिक स्थैर्यासाठी गरज वाटेल तेव्हा ते आजही समुपदेशकाकडे जातात. मात्र इथं त्याचे आई-वडील दु:खी आहेत. त्यांच्यात संवाद नाहीच. अवनीची आईच आता दोघांचीही आई आणि मैत्रीण झाली आहे. आपला हट्ट तपासून पाहिला असता तर लाडका गुणी मुलगा गमावण्याची वेळ आली नसती! इथे बरोबर की चूक आणि स्वत:च्या अहंकारापेक्षा मुलांच्या प्रेमाला जास्त महत्त्व दिलं असतं तर?
ग्रामीण भागातही माझ्या तरुण मैत्रिणी आहेतच. वडील अचानक गेल्यामुळे धक्का बसलेली सांची ताण हलका करण्यासाठी मला मधून मधून भेटायला येते. एका लहान गावातल्या छोट्याशा घरात ती जन्मली. सुदैवानं एका खासगी, ध्येयवादी विचारांच्या शाळेत तिचा प्रवेश झाला. त्या विचारांनी भारावून गेली आणि मनापासून अभ्यास करू लागली. स्त्री सबलीकरण आणि त्यासाठी शिक्षण अशी त्या संस्थेची वैचारिक बैठक असल्याने तिला त्यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. संस्थेतच तिला कामही मिळालं. आता २५ वय आहे तिचं. वडील आजारी पडले आणि त्यातच वारले. ही थोरली लेक आईच्या आणि भावंडांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. तिला ‘स्थळं’ येऊ लागली. आईला योग्य वेळी या लाडक्या लेकीचं लग्न करून देण्याची इच्छा होती. पण ‘आत्ताच लग्नाचा विचार करायचा नाही,’ या विचारावर ती ठाम आहे. ‘और भी गम है जमाने में मोहब्बत के सिवा’ असं गुणगुणत ‘एकला चालो रे’च्या पथावर ती सध्या चालते आहे.
तर याच्या उलट काही पालकांच्या कधी कधी लक्षातच येत नाही की, ते आपल्या तरुण मुलीला गृहीत धरत आहेत. वरुणाची गोष्ट तशीच आहे. आज ३५ वय आहे तिचं. खूप वर्षांनी एक मनासारखा जोडीदार भेटला. तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे. पण आई-बाबांना तो पसंत नाही. त्यांच्या मनासारखं त्याचं स्टेटस नाही म्हणे. शेवटी तिनं अबोलाच धरला तेव्हा मोठ्या मुश्किलीनं कबूल झालेत. पण आजही छोट्या छोट्या गोष्टीत आई खोड्या काढत असते. त्यामागचं खरं कारण म्हणजे, लग्नानंतर ती आपल्यापासून दूर, परगावी जाणार, आपल्याला कोण सांभाळणार याचा खूप ताण आला आहे त्यांना. ते एकटे पडतील याची त्यांना भीती वाटते. ‘‘मोठी म्हणून मीच घराची सगळी जबाबदारी उचलली होती ना इतके दिवस? आता धाकट्या लग्न झालेल्या बहिणीच्या मदतीनं त्यांची काळजी घेण्यासाठी माणसं नेमून देऊन मी माझं आयुष्य जगणार आहे,’’ असा ठाम निर्धार करत मला लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण देऊन वरुणा गेली.
यापेक्षाही आणखी एक वेगळंच चित्र काही घरांमध्ये पाहायला मिळतं. विशेषत: सुस्थितीतल्या आणि एकुलत्या एक असणाऱ्या मुली. आपल्या आई-वडिलांबरोबर लहानपणापासूनच लाडाकोडात वाढल्यानं आरामात राहायची सवय झालेली असते, त्यांना लग्न आणि त्यासोबत ओघानं येणाऱ्या जबाबदाऱ्या नको असतात. आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडावासा वाटत नाही. कारण काहीही कष्ट न करता अनेक गोष्टी हातात मिळण्याची सोय झालेली असते. तेच बरं वाटायला लागतं. अशा अनेक वेगवेगळ्या कारणांनी आजच्या मुलींचं लग्नाचं वय लांबत चाललेलं दिसतंय. मात्र हेही मान्य करायला हवं की, समाजाचा हा अत्यंत छोटा वर्ग आहे, पण ही सुरुवात असू शकते…
माझ्या ३०-३५ वयाच्या अनेक विद्यार्थिनी आज देशात-परदेशात मजेत एकट्या राहतात. आपलं करिअर केंद्रस्थानी ठेवून जीवनाचा आनंद लुटतात. त्यांना आयुष्याचा जोडीदार नको आहे का? तर हवा आहे, पण ती त्यांची ‘गरज’ राहिलेली नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली आजची तरुणी फार तडजोडी करायला तयार नाही. आधीच्या पिढी सारखं अष्टावधानी वा ‘superwoman’ होण्याची इच्छा तिला नाही.
ग्रामीण भागात मात्र याविरुद्ध चित्र दिसतं. बहुसंख्य ग्रामीण घरातून आजही ९वीत नापास किंवा १०वी पास झालेल्या मुलीचं त्याच मे महिन्याच्या सुट्टीत लग्न लावलं जातं, म्हणजे एक खाणारं तोंड कमी आणि विखारी नजरांपासून तिला जपण्याच्या जबाबदारीतून मुक्ती, हे विदारक आणि कटू सत्य आजही स्वीकारावंच लागतं. हेच नियम शहरातील निम्न आर्थिक स्तरातील तरुणींनाही लागू पडतात. त्यांना स्वप्न पाहण्याची मुभाच दिली जात नाही. केव्हा एकदा लग्न होऊन मुलगी ‘दिल्या घरी’ रमते आणि आम्हाला नातवाचं तोंड पाहायला मिळतंय याची घाई झालेले बहुसंख्य पालक असतात, मुलीची मतं समजावून घेऊन संवाद साधण्याची प्रगल्भता असणारे काही मोजकेच पालक आढळतात तसेच आपल्या आईवडिलांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांच्याशी शांतपणे संवाद साधणारी तरुण पिढीतील मुलं-मुलीही अपवादानं सापडतात!
पण या अशाच मोजक्या लोकांमुळे सामाजिक बदल घडून येतात. नवी पायवाट तयार होताना विरोध, साशंकता, अनिश्चिततेला तोंड देणं अपरिहार्य ठरतं. केवळ या तरुणाईलाच नव्हे तर सगळ्या कुटुंबालाच आज तज्ज्ञांच्या सल्ल्याची, सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे. बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे. ज्या झपाट्यानं सगळं जग बदलतं आहे ते पचनी पडताना मागच्या पिढ्यांची दमछाक होताना दिसते आहे. आणि तरुण पिढ्यांवर अनेक ताण आहेत.
सध्या तरी, लग्न करायचं की नाही या निवडीचं स्वातंत्र्य मोजक्या उच्चशिक्षित, उच्च आर्थिक, सामाजिक स्तरातील तरुणीला मिळतंय असं चित्र दिसतंय. तिला साथ देणारा, परंपरांचं ओझं न लादता तिला समजावून घेणारा, जोडीदार ती शोधते आहे, पण हवा तसा मिळेपर्यंत वयाचं बंधन न मानता थांबण्याची तिची तयारी आहे. चित्र बदलतं आहे अन् आपण त्याचे साक्षीदार आहोत हे नक्की!
hemahonwad@gmail.com