२०२२ हे वर्ष रत्ना यांच्यासाठी खास होतं. याची सुरुवात कच्छ, गुजरात येथील मिठाच्या खाणींमध्ये चित्रित झालेल्या एका गुजराती चित्रपटाने झाली आणि त्यानंतर लगेचच एक मोठं आव्हान सामोरं आलं. पंजाबी बोलणाऱ्या एका बाइकस्वाराची भूमिका साकारायची होती, जिला ३५० सीसी रॉयल एनफील्ड बुलेटवर बसून लडाखपर्यंत प्रवास करायचा होता. हा प्रवास जितका भौगोलिक अंतराचा होता, तितकाच तो रत्ना यांनी एक अभिनेत्री म्हणून केलेल्या प्रगतीचाही होता. ६५ व्या वर्षी अशा प्रकारचे साहस करणे. त्यातील सुखद अनुभव आणि अडचणी हे सारेच रत्ना यांच्या ‘संदूक’मधले रंजक किस्से.
मार्च २०२२ मध्ये ३५० सीसीची ‘रॉयल एनफील्ड’ माझ्या आयुष्यात आली… तिच्या १९५ किलो वजनासकट! त्यापूर्वी मी सायकल सोडून कोणतीही दुचाकी चालवली नव्हती. पण वयाच्या ६५व्या वर्षी ही राक्षसी मोटारसायकल मला चालवावी लागणार होती. ती भूमिकाच तशी होती. भीतीदायक आणि त्याच वेळी उत्सुकता जागवणारी!
चार सर्वसामान्य स्त्रिया मोटारसायकल चालवत खारदुंगलापर्यंत (लडाख) जातात, अशी कथा असलेला चित्रपट (‘धक धक’) माझ्याकडे आला होता आणि मला ती भूमिका स्वीकारण्याचा जेवढा मोह होत होता, तेवढीच भीती वाटत होती. खरं तर मी अगदी ‘नाही’ सांगायचं ठरवलंसुद्धा होतं. त्याच वेळी अर्शद वारसीबरोबर भेट झाली. ‘हो’ म्हणण्यासाठी मला कुणीतरी पुढे ढकलायला हवं होतं, ते घडून आलं. अर्शदच्या मते, मला ती भूमिका करणं शक्य होतं आणि त्यात धोका काही नव्हता. त्याबाबतीत माझ्या ज्या काही मर्यादा आहेत, त्यासह काम करता येईल, याचा निर्मात्यालाही आत्मविश्वास होता. त्यानं मला असा विश्वास दिला, की या भूमिकेदरम्यान मला काही रुग्णालयात दाखल वगैरे करावं लागणार नाही किंवा त्याहून वाईट, नाही ते करण्याच्या प्रयत्नात मी बावळट दिसणार नाही!
काहीही शारीरिक आव्हानं पेलायच्या बाबतीत मी ‘भित्री भागूबाई’ आहे. लहानपणीच माझ्या शिक्षकांनी किंवा वडिलांनी मला जबरदस्तीनं मैदानी खेळ खेळायला भाग पाडलं असतं, तर बरं झालं असतं. आईनं जसं भरतनाट्यम् शिकायला भाग पाडलं होतं तसं. पण अर्थात ही फक्त एक पळवाट आहे! कदाचित मी एक चांगली खेळाडू होऊ शकले असते. पण मुलींनी ‘मुलींसारखं’ वागायला हवं, असा एक समज होता आणि खेळायला जायला प्रोत्साहन मिळेल अशी कुणी आदर्श व्यक्ती समोर नव्हती. माझी आई सांगायची, की ती स्वत: टेनिस खेळायची, घोडेस्वारी करायची, पोहायची आणि ‘टॉमबॉय’ म्हणूनच तिची प्रतिमा होती. पण मग तिच्या मुलीनं असं काहीच न केलेलं तिनं कसं खपवून घेतलं?… आता हे सांगायला लाज वाटते, पण लहान असताना मी कधी बागेत खेळायचे नाही. कपडे घाण होतील म्हणून!
पालकांनी ‘मुलगा की मुलगी’ यावरून त्यांना काय काय करता ‘आलंच पाहिजे’, हे ठरवणं, ही मोठी चूक आहे. मला वाटतं, की काही कौशल्यं ‘अत्यावश्यक’ प्रकारातली असतात आणि ती सगळ्यांना जमली पाहिजेत. लिहिणं-वाचणं, (बाहेर जाऊन) खेळणं, स्वयंपाक, गाडी चालवणं, नाचणं, गाणं, प्राथमिक अर्थसाक्षरता, घरातली लहानमोठी दुरुस्ती, प्रथमोपचार, वगैरे. पाश्चिमात्यांची भाषा, खाणंपिणं, पेहराव, राहणीमान, यांचा प्रभाव आपण आवडीनं अंगवळणी पाडून घेतलाय. पण त्यांच्याकडून आपण जे शिकायला हवं होतं, ते म्हणजे तर्कशुद्ध विचार, कामाला प्रतिष्ठा आणि स्वावलंबीपणा. तेच नेमकं आपण दृष्टिआड केलं. ते असो; पण सांगायचा मुद्दा हा, की मी तशी आळशी आहे आणि शारीरिकदृष्ट्या मी कधी स्वत:ला विशेष आव्हानात्मक परिस्थितीत ढकललं नाही. आता मात्र त्या बाबतीत या चित्रपटानिमित्तानं मला खूपच प्रयत्न करावे लागणार होते आणि तेही सगळ्यांच्या समोर!
माझी ‘बाइक इन्स्ट्रक्टर’ रितिका संयम असलेली आणि स्पष्ट सूचना देणाऱ्यांतली होती. मोटारसायकलवर बसणं आणि थांबल्या थांबल्या कलंडून न पडणं तिनं मला करायला लावलं. सरावाच्या काही महिन्यांत मी पुष्कळदा धडपडले; पण तिनं दिलेल्याआत्मविश्वासामुळे प्रत्येक वेळी पुन्हा प्रयत्न करू शकले. बाइक सुरू केल्यावर मी बरी असायचे, पण मोटारसायकलचं चालतं धूड थांबवणं हा वेगळाच प्रकार असे! चित्रीकरण सुरू झालं, तोपर्यंत मी बऱ्यापैकी मोटारसायकल चालवू लागले; किंबहुना माझ्या अंगात स्वतंत्र झाल्याची एक भावना आली, त्यानं मजा वाटायला लागली. ‘मी आधीच हा प्रयत्न करून पाहिला असता तर?’ असं वाटून गेलं. माझा अगदी आग्रह आहे, की ज्या स्त्रियांना मोटारसायकल चालवण्याची संधी आहे, त्यांनी ती जरूर चालवायला शिकावी. सभोवतालाबरोबर एकरूप होणं आणि त्याच वेळी एका खास समाजाचा एक भाग असणं, अशी एक वेगळीच भावना ‘बाइकिंग’मध्ये आहे. ती खूप विशेषआहे.अर्थात इथे मी फक्त आनंदासाठी मोटारसायकल चालवण्याबद्दल बोलतेय! खाण्याच्या ऑर्डर पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा ‘बाइकिंग’बद्दलचा दृष्टिकोन निश्चितच वेगळा असू शकेल.
‘धक धक’ या चित्रपटानं मला दिलेली दुसरी खास संधी म्हणजे एका पंजाबी स्त्रीची भूमिका साकारणं. बोलण्यातला अस्सल पंजाबी हेल वगैरेंसह. माझ्या वडिलांचं कुटुंब पंजाबी आहे. पण ते गुजराती शिकले होते, त्यामुळे मला माझी ‘पितृभाषा’ कधी आली नाही. असं असलं तरी लहानपणी मी पंजाबी बोललेलं ऐकत आले आहे आणि ती मला बऱ्यापैकी चांगली समजते. त्यामुळे जशी ही संधी चालून आली, तशी मी त्यावर झडपच घातली आणि एका पंजाबी अभिनेत्रीबरोबर भाषेचं शिक्षण सुरू केलं. दिल्लीत राहणाऱ्या माझ्या काकू, ‘कमला चाचीजी’ यांची आठवण केली आणि त्या आठवणींनी मला माझी व्यक्तिरेखा ‘माही’ हिच्या आयुष्यात, तिच्या अनुभवांत डोकावायला मदत केली.
या कथेत माही बाइकवरून खारदुंगला का जाईल, यावर आम्ही चर्चा करत होतो. एक मत असं होतं, की तिच्याजवळ हे करण्यासाठी काहीतरी भक्कम भावनिक कारण हवं. उदा. तिचा मृत नवरा आधी बाइकर असणं आणि त्याच्या आठवणींत तिनं हा प्रवास करणं. ही सफर तिनं फक्त स्वत:साठी करणं फारसं प्रभावी वाटत नव्हतं. पण आमचे दिग्दर्शक तरुण दुदेजा आपल्या मतावर ठाम राहिले, की स्वातंत्र्य अनुभवायची इच्छा, हीच प्रेरणा पुरेशी आहे. विशेषत: माहीसारख्या वयस्कर स्त्रीला आपल्या भविष्यात फारसं काही विशेष घडताना दिसत नाहीये. तिच्या दृष्टीनं ही प्रेरणा महत्त्वाची आहे. हा चित्रपट दोन तरुणांनी लिहिला होता आणि स्त्रियांच्या मनात आणि हृदयात पाहण्याची त्यांना गवसलेली कला मी यापूर्वी क्वचितच पाहिली होती.
हे चित्रीकरण अवघड होतं. आम्ही नॉइडामध्ये मेच्या उन्हाळ्यात सुरुवात केली आणि काहीच आठवड्यांत लडाखमध्ये त्या वेळी ‘जगातील सर्वांत उंचावरचा वाहतूक मार्ग’ ठरलेल्या रस्त्यावर कुडकुडत होतो. आमचं युनिट २०० लोकांचं होतं. अगदी अभिनेत्री, त्यांच्या केशरचनाकार, रंगभूषाकार, व्यवस्थापक, बाळांना सांभाळणाऱ्या मावशी, वगैरे टीम्स धरून! आम्ही खूप वेगवेगळे धोकादायक प्रसंग चित्रित केले. धुकं, खचलेली जमीन, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, हे सगळं त्यात होतं. चित्रीकरणाची सगळी स्थळं अतिशय सुंदर. पण गाण्यात हिरॉइनचे कपडे जितक्या वेळा बदलतात, त्यापेक्षा वेगानं पर्वतांमध्ये हवामान बदलतं. अशा स्थितीत इतक्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं अवघड असतं. चित्रीकरणाच्या ठिकाणी मिळणारं जेवण चित्रीकरण चांगलं व्हायला मदत करतं किंवा बिघडवायला कारणीभूत ठरू शकतं. १४ हजार फुटांच्या उंचीवर गरम जेवण मिळणं, हेच एक वेगळी उंची गाठल्यासारखं आहे. आम्हाला कोणताही अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला नाही, पण रोज एक डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका चित्रीकरणाच्या ठिकाणी असे. हा डॉक्टर म्हणजे एक प्रचंड बडबड्या आणि ‘निऑन’ रंगांच्या मॅचिंग बुटांपर्यंत रंगीबेरंगी पेहराव करणारा इसम होता. तो अशा प्रकारे डझनावारी चित्रपटांच्या चित्रीकरणस्थळी उपस्थित राहिला होता आणि दिल्लीत त्याचे अनेक फ्लॅट्स होते! नॉइडा ते लेह या प्रवासात कुणीही कोणतंही औषध मागितलं की त्यानं ते हातात ठेवलंच!
माझ्या मते, मात्र सगळ्यांत चांगली कल्पना होती, ती म्हणजे चित्रीकरणाच्या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट असणं. डॉ. प्राची शाह-अरोरा स्वत: खेळाडू होती. माझ्या शरीराकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन तिनं बदलून टाकला. आत्मस्तुतीचा धोका पत्करून सांगते, की मी त्या गटात वयानं सर्वांत मोठी असूनही श्वास घ्यायला त्रास होण्याचे प्रसंग माझ्या बाबतीत अगदी कमी वेळा घडले. विशीतल्या काही मंडळींना मात्र रुग्णालयात दाखल करावं लागण्यापर्यंत वेळ आली होती! चांगली जनुकं आणि अनेक वर्षांच्या योगसरावाचा परिणाम!
पण हे सगळं असलं, तरी भीतीनं अजून माझा पिच्छा सोडला नव्हता. मोटारसायकलवर बसल्यावर एकदम भीती दाटून येत असे. मी धडपडणार याची खात्रीच वाटत असे. नॉइडामध्ये मला जे चांगलं जमू लागलं होतं, ते इथे चित्रीकरणात साध्य करण्यासाठी मात्र अनेक ‘लकी टेक्स’ लागले. असं का झालं ते मलाही कळलं नाही… तिथे उंची खूप जास्त असल्यामुळे, की त्या सगळ्या वातावरणात माझी, आपण मर्त्य मानव असल्याची जाणीव प्रखर झाल्यामुळे! पण त्या रांगड्या निसर्गामध्ये भव्यदिव्यता होती, प्रचंड शक्ती होती. पर्वतांनी मनातल्या सर्व प्रकारच्या भावना घुसळून काढल्या आणि मला जगातल्या माझ्या स्थानाची जाणीव करून दिली. निसर्गाचं नग्न सौंदर्य आणि अतिकठीण परिस्थिती शांतपणे स्वीकारत टिकून राहणारे लोक खूप काही शिकवतात… मात्र त्या वातावरणाला शरण जायची तयारी हवी. जाणीवपूर्वक स्वत:च्या क्षमतांचा कस लागेल अशी परिस्थिती स्वीकारणाऱ्या आणि ज्यांना हे करून बघायचंय त्यांना मदत करणाऱ्या ‘बाइकिंग कम्युनिटी’शी ही माझी प्रथम ओळख होती. त्यात भारताच्या प्रत्येक भागातून आलेले लोक होते. (सर्वांत मोठे गट दक्षिण भारतातले होते.) इतर ठिकाणी गवसणार नाही असं स्वातंत्र्य आणि भव्यता अनुभवायला ते आले होते. अधूनमधून एकमेकांना मदत करायला थांबत होते. ढाब्यांवर, कॅफे मध्ये बसून गप्पा मारत होते, वादविवादसुद्धा करत होते. वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भारताचं ते खरं चित्र वाटलं मला. पण मला मजा आली, ती प्रामुख्यानं बाकीच्या तीन अभिनेत्रींबरोबर काम करताना. फातिमा सना शेख, दिया मिर्झा आणि संजना संघी… आणि अर्थातच दिग्दर्शक तरुण दुदेजा. चित्रपटातला नशा करण्याचा प्रसंग, भांडणाचा आणि दोस्ती तुटण्याचा प्रसंग अवघड होता. (उदारमतवादी/ आधुनिक स्त्रियांविषयीच्या प्रत्येक चित्रपटात त्यांना दारू पिताना, सिगारेट ओढताना, शिव्या देताना किंवा ‘किस’ करताना दाखवलेलं असतं. या बाबतीत आपण कधी मोठे होणार हा प्रश्नच आहे!) अशा प्रसंगांमध्ये पात्रांनी संवाद म्हणायला सुरुवात करताच त्यात काय नाटकी किंवा अनावश्यक वाटतंय हे स्पष्ट दिसतं. सुदैवानं दोन्ही लेखक तिथे उपस्थित होते आणि खडतर स्थितीत, पाऊस, रात्र, गर्दी काहीही असताना ते संवादांमध्ये प्रयोग करायला तयार होते.
‘मनाली मार्केट’मधलं चित्रीकरण मात्र भयंकर होतं. हा बाजार म्हणजे आठवडी सुट्ट्यांच्या दिवशी करोल बाग किंवा दादर मार्केट असावं तसा! कपडे, खोटे दागिने विकणारी दुकानं, खाण्यावर तुटून पडलेले लोक, लहान मुलं, मागे लागणारे विक्रेते, भिकारी… सगळे आपलं लक्ष वेधून घेणारे. अशा ठिकाणी ‘गोरिला’ चित्रीकरण करावं असा आमचा विचार होता. (म्हणजे सर्वसामान्य माणसांमध्ये अभिनेते मिसळून जातात आणि खऱ्याखुऱ्या ‘लोकेशन’वर गुपचूप चित्रीकरण उरकलं जातं. पण भारतात ते जवळपास अशक्य असतं.) तिथल्या इतक्या सगळ्या गोंधळातही लोकांनी आम्हाला कसं ओळखलं माहीत नाही, पण त्यांनी आमचा चित्रीकरण होत असलेला ‘सीन’ खराब करून टाकला. आपण काय प्रकारचे लोक आहोत?… सुट्टीच्या दिवशी आपणा भारतीयांच्या अंगात काय संचारतं?… आनंद उपभोगण्याच्या नादात आपण पर्वत आणि थंड हवेच्या ठिकाणांची जी काही अवस्था केलीय, त्याबद्दल पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. वारशात मिळालेल्या या सुंदर देशाला प्रदूषित करण्यासाठी ते आपल्यालाच जबाबदार धरतील.