‘अजून पाच वर्षांनी/ दहा वर्षांनी तुला स्वत:ला कुठे पाहायला आवडेल?’ असा प्रश्न शाळाकॉलेजच्या वयात, अगदी नोकरीच्या मुलाखतींमध्येही अनेकांना विचारला जातो. त्या वेळी आपण उत्साहानं कदाचित आपल्याला कधीच पेलवणार नाही असं उत्तर दिलेलं आठवत असेल तुम्हाला! आपण ठरवल्याप्रमाणे किती प्रत्यक्षात घडलं?… समजा, आता तुम्ही मध्यमवयीन किंवा प्रौढ असाल आणि तुम्हाला हाच खेळ उलट दिशेनं खेळायला सांगितलं, तर?..
कल्पना करा, की तुम्हाला दहा, वीस किंवा अगदी तीस वर्षांनी लहान असलेल्या तुम्हालाच भेटण्याची संधी मिळालीय! इतर कोणतीही विवंचना नसताना शांतपणे संवाद साधण्यासाठी काही तास… अशा वेळी ‘त्या’ तुमच्याशी तुम्ही काय बोलाल?…
या लेखमालेत आपण ‘सजगपणे जगणे’ या संकल्पनेविषयी बोलतो. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करून पाहा. केवळ आपण भूतकाळात जाऊन घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही, असं कारण सांगून उत्तर द्यायचं टाळू नका. असं समजा, की जणू या प्रश्नावर आपलं सबंध आयुष्य आधारित आहे. आता तुमच्या त्या ‘स्व’ला काय सांगाल तुम्ही? कशी मदत कराल त्याला? कोणता सल्ला द्याल? धाडस करणं, अंगी लवचीकता बाणवणं, आलेल्या चांगल्या संधीचा फायदा करून घेणं, याबद्दल काय सांगाल? मनात करुणा बाळगणं, प्रसंगी स्वत:बद्दलही सहानुभूतीपूर्वक विचार करणं, याचं महत्त्व कसं सांगाल तुम्ही स्वत:ला? आपल्या अस्तित्वाचा अर्थ कसा शोधायचा, ते कसं सांगाल?
ही गोष्ट मी स्वत:च्या बाबतीत करून पाहिली. विशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्या ‘स्व’ला पत्र लिहायचं ठरवलं. गेल्या वीस वर्षांत मी गिरवलेले धडे, गाठीशी बांधलेले अनुभव, चोखाळलेल्या वाटा, प्रसंगी पत्करलेले धोके… सारं काही! हे ते पत्र-
प्रिय, विशीतला मी,
तुला ‘आजच्या मी’कडून खूप खूप प्रेम! मला खात्री आहे, की तू बरा असशील. स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांनी ओतप्रोत अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर तू उभा आहेस, तेव्हा काही विचार, काही सल्ले द्यावेसे वाटले तुला! साहजिकच मागची अनेक वर्षं मी घेतलेले अनुभव, अनेकदा केलेलं गहन चिंतन, केलेलं धाडस, या सगळ्याचा तो परिपाक आहे. तुला मार्गदर्शन करणं, प्रेरणा देणं आणि जगाकडे, जगातल्या तुझ्या अस्तित्वाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचं आव्हान देणं, हाच यामागचा उद्देश.
अनुभव ‘निर्माण करावे’ लागतात! सरधोपटपणे आयुष्य जगू नकोस. उठल्यापासून झोपेपर्यंत तीच ती कामं करत राहणं म्हणजे आयुष्य नव्हे. खरं तर ज्वलंत अनुभवांनी, साहसांनी भरलेलं असायला हवं आयुष्य. चाकोरीबद्धतेतून, सुखासीनतेतून बाहेर पड आणि झोकून दे स्वत:ला सभोवतालच्या जगात. मग चांगला असो, की वाईट, प्रत्येक अनुभव हा एक रंजक कथा म्हणून तुला सांगावासा वाटेल! नेहमी लक्षात ठेव, की प्रत्येकाची आपली एक कथा असते. तुझी कथाही फक्त तुझी म्हणून अद्वितीय आहे. जगत असलेल्या प्रत्येक क्षणाशी तन्मय हो आणि त्या प्रत्येक क्षणातून तुझं संपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला येऊ दे.
उत्सुक रहा, मन खुलं ठेव!
जे मर्यादित आणि संकुचित दृष्टिकोन अंगी बाणवत तू मोठा झालास, त्यापेक्षा हे जग फार मोठं, अपार वैविध्यानं भरलेलं आहे. कुटुंबानं किंवा समाजानं आखून दिलेल्या पारंपरिक वाटेवरूनच तू चालायला हवंस असं मुळीच नाही. नवनव्या संकल्पनांचा आणि विचारपद्धतींचा खुल्या मनानं स्वीकार कर. डीन ग्राझीओसी नामक उद्याोजक म्हणतो त्याप्रमाणे ‘जॅकेट अप्रोच’ स्वीकारायचा प्रयत्न करून बघ- म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन बघ आणि त्यातलं तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते पहा. सवयीच्या, अंगवळणी पडलेल्या गोष्टींतून बाहेर पडायला अजिबात कचरू नकोस. दोन वर्षांनी जेव्हा तू अमेरिकेत जाशील, तेव्हा तू कधी कल्पनाही केली नसशील इतकी क्षेत्रं, त्यांतल्या उदंड संधी तुला दिसतील. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती तुला भेटतील. त्या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा इतक्या वेगळ्या असतील, की असं काही अस्तित्वात आहे, हे तुझ्या कदाचित गावीही नसेल. त्यामुळे तुझं कुतूहल नेहमी जागं ठेव. अपरिचित वाटांवरूनदेखील प्रवास आत्मविश्वासानं चालू ठेवण्याची प्रेरणा त्यातून तुला मिळत राहील.
निष्कारण घाई नको आयुष्यात निष्कारण घाई-घाई करू नकोस. स्वत:च्या चालीनं चाल. तुझ्या कुटुंबातल्या माणसांची आणि समाजाचीही नेहमी अशी अपेक्षा असेल, की तू यशाच्या मार्गावर भरधाव वेगानं पुढे पुढे जावंस. पण आयुष्य ही काही स्पर्धा नाही! काही लोक तुझ्या पुढे गेलेले दिसतील, तर काही तुझ्या मागे असतील, पण तुझा प्रवास हा तुझ्या एकट्याचा आहे. त्यामुळे तुला हवी ती गती पकड. प्रवासाची मजा घे. वर्तमानाचा आनंद घे. आयुष्यातल्या निरनिराळ्या पैलूंचा शोध घे, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घे, तोही स्वत:च्या अटींवर! मुक्त श्वास घेण्यासाठी, घडणाऱ्या गोष्टींचा सखोल विचार करण्यासाठी आणि रोज सामोऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आवर्जून वेळ काढ.
आयुष्यभर शिकत राहण्याचं महत्त्व ओळख!
औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण केवळ त्यावरूनच व्यक्तीची किंमत ठरते असं मुळीच नाही. शिकायला, आधी शिकलेलं विसरून पुन्हा नव्यानं शिकायला नेहमी तयार राहा. पदव्यांवरून स्वत:ची व्याख्या करू नकोस आणि त्यानं स्वत:च्या अहंकाराला खतपाणीही घालू नकोस. उलट नवनव्या संधी निर्माण कर, त्याद्वारे जगात काही भरीव योगदान देण्यावर लक्ष केंद्रित कर. तुला येणाऱ्या अनुभवांमधून आणि पार केलेल्या आव्हानांमधून तू जे शिकशील, ते खरं! आयुष्यभराचा विद्यार्थी हो. नव्या ज्ञानाचा आणि नव्या दृष्टिकोनाचा खुल्या मनानं स्वीकार कर.
ध्येयांच्या बाबतीत लवचीक राहा प्रसंगानुसार तुझी ध्येयं बदलू शकतात आणि ती बदलतीलही. आणि हे अगदीच साहजिक आहे. कदाचित तू आता जे स्वप्न उराशी बाळगतोयस, त्यातून भविष्यात तुला काही समाधान मिळणार नाही. मी असं ध्येय ठरवलं होतं, की आपण एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करायची! त्या स्वप्नानं मी पुरी बावीस वर्षं झपाटलो होतो. पण भविष्यात माझ्या असं लक्षात आलं, की मी खरा कशात रमतो, तर सुमार दर्जात समाधान मानण्याच्या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढण्यात… त्यांना चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करण्यात! स्वप्नं आणि ध्येयं तुमच्याबरोबर प्रगल्भ होत जातात. तेव्हा जीवनाबद्दलची दूरदृष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न कर. सुरुवातीला ही दृष्टी खूप विस्तारित, ढोबळ स्वरूपाची असेल. पण हळूहळू ती नेमकी होत जाईल. मग कोणत्याही चाकोरीत न अडकता तू नवनव्या गोष्टी आत्मसात करत जाशील, तुझा परीघ विस्तारेल.
योग्य मार्गदर्शक शोध! सुरुवातीपासूनच तू तुला मार्गदर्शन करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, तुझ्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहा. त्यांना जगातलं सर्व काही माहीत असलं पाहिजे असं मुळीच नाही, पण जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या बाबतीत त्यांनी तुझ्यापेक्षा अधिक प्रगती केलेली असावी. वेगवेगळ्या विचारसरणीचे मार्गदर्शक हवेत. त्यामुळे तुझ्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, नव्या शक्यताही निर्माण होतील. जसजसा तू मोठा होशील, तसे तुझे मार्गदर्शकही बदलतील. तुझा पुढे पुढे प्रवास सुरू आहे, याचंच हे द्याोतक आहे.
नात्यांची बाग फुलव आयुष्य काही एकट्यानं जगण्यासाठी नाहीये. अर्थपूर्ण नाती निर्माण कर आणि ती जप. नात्यात व्यवहार नसतो. निखळ आनंदाचा आणि सुदृढ आयुष्याचा पाया म्हणजे नातं. लहानशा रोपट्याचं सावली देणाऱ्या घनदाट वृक्षात रूपांतर होण्यासाठी तू जशी मेहनत घेशील, तशीच मेहनत नात्यांची जोपासना करण्यावर घे. तत्काळ हवं ते देणाऱ्या गोष्टींचा मोह टाळून नेहमी प्रदीर्घ काळासाठीच्या नात्यांना प्राधान्य दे. तुझ्या जवळची माणसं तुला आधार देतील, आनंद आणि मार्गदर्शन देतील. ती तुझं जीवन अधिक संपन्न आणि अर्थपूर्ण व्हायला मदत करतील.
हाती आलेली संधी घ्यायला शीक! अपयशाचा किंवा अन्य कशाचा शिक्का आपल्यावर बसेल या भीतीनं कधी मागे हटू नकोस. अनेकदा अपरिचित गोष्टी करून पाहण्याचं धाडस दाखवल्यानं आपल्याला भरघोस काहीतरी मिळून जातं. मग ते स्वप्नांचा पाठपुरावा करणं असो, पूर्वी आपण जिथे गेलो नाही अशा परदेशात प्रवास करणं असो किंवा संपूर्णपणे नवीन काही तरी करणं… अनुभव नेहमी तुला समृद्ध करतील, तुझा आत्मविश्वास वाढवतील. अनिश्चिततेचा स्वीकार करत जागरूकतेनं, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जोखीम पत्करण्याची तयारी ठेव. तुला असं आढळेल, की ज्या क्षणी आपल्याला सर्वांत जास्त असुरक्षित वाटत असतं, अशा क्षणातूनच आपण खूप शिकत असतो, विकसितही होत असतो.
बदलांचा स्वीकार कर!
आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण बदल हाच जीवनाचा स्थायिभाव! त्यामुळे बदलाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार कर, त्याची मजा घे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या संधी, नवी आव्हानं उभी असतात. बदलाचा सहर्ष स्वीकार केल्यानं पूर्वी आलेल्या अपयशातून विकासाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. अपेक्षित किंवा अनपेक्षित, कोणत्याही बदलामध्ये नव्या शक्यतांचं बीज दडलेलं असतं हे लक्षात ठेव.
आत्मचिंतनाला प्राधान्य दे!
तुला आलेल्या अनुभवांचा बारकाईनं, सखोल विचार कर. त्यातून शीक आणि भविष्यासाठी नवी ध्येयं ठरव. स्वत:चा विकास हा एक निरंतर प्रवास आहे. त्यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं, दिवसागणिक आपलं व्यक्तिमत्त्व आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं! तुझी बलस्थानं, उणिवा आणि महत्त्वाकांक्षा नीट समजून घे. स्वत:बद्दलची जागरूकता हा तुझ्या निरंतर होणाऱ्या विकासाचा पाया असेल.
पुढच्या प्रवासाला तू खुल्या मनानं, साहसी वृत्तीनं सुरुवात करावीस यासाठी तुला उद्याुक्त करणं हेच इथे माझं काम होतं! जगात असंख्य शक्यता, असंख्य संधी आहेत. तसंच तुझं जीवनही त्यातल्या अनपेक्षित कंगोऱ्यांसह अद्वितीय सुंदर असो! जे समोर येईल त्या साऱ्याचा स्वीकार कर. तुला वाटतं त्यापेक्षा तू खूप जास्त खंबीर, जास्त सक्षम आहेस!
तुझ्यातल्या ‘लढवय्या’साठी…
तुझ्या भविष्यातला ‘मी’!
हे तर झालं मी मला लिहिलेलं पत्र! आता तुमची पाळी. सांगा… तुम्हाला तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या ‘स्व’ला पत्र लिहायची संधी मिळाली, तर काय लिहाल?…
sanket@sanketpai.com