संकेत पै

प्रत्येक व्यक्तीने मोठेपणी आपल्याला काय व्हायचंय, याविषयी काही स्वप्नं जपलेली असतात. पण कधी कधी काही जबाबदाऱ्यांमध्ये आणि इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच आयुष्य जात राहतं. यावर मात करण्यासाठी आपल्या स्वप्नांचा श्वास कोंडून ठेवणाऱ्या नकारात्मक विचारांना दूर सारलं, तर ध्येयाने प्रेरित जगण्याचा आनंद आपल्यालाही घेता येईल. त्यासाठी स्वत:ला प्रोत्साहित करणाऱ्या विचारांची सदाबहार फुलबाग मनात कशी फुलवाल?

मीरा ही केरळमधल्या एका लहानशा गावात राहणारी स्त्री. तिचा दररोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. घरातल्यांसाठी स्वयंपाक करायचा, घरातली कामं करायची, मुलांची काळजी घ्यायची, वगैरे वगैरे… वरवर पाहता तिचं आयुष्य अगदी आदर्श आहे असंच वाटायचं, पण मीराला मात्र खोलवर कुठेतरी एक पोकळी जाणवायची. जणू काही ती म्हणजे अपेक्षांच्या पिंजऱ्यात अडकून पडलेला एक केविलवाणा पक्षीच होती.

लहानपणी लेखिका होण्याचं स्वप्न मीराने पाहिलं होतं. तिच्या गावचा रम्य हिरवागार निसर्ग पाहून तिच्या मनाला मोठी उभारी यायची आणि त्यातूनच प्रेरित होऊन ती काही जादूच्या तर काही साहसी कथा लिहायची. पण जसजशी वर्षांमागून वर्षं सरत गेली तसतसं तिचं हे स्वप्न बाजूला पडलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा वरचढ ठरल्या. तिच्यातलं नवनिर्मितीचं स्फुल्लिंग विझून गेलं आणि एक चांगली बायको, कर्तव्यदक्ष आई बनण्याच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात ती गुंतून गेली.

एका संध्याकाळी दिवसभराची सगळी कामं आटोपल्यानंतर मीरा बाहेरचा पाऊस बघत खिडकीजवळ बसली होती. बाहेरच्या पावसाच्या लयीशी तिच्या मनातल्या विचारांची जणू काही स्पर्धा चालली होती. स्वत:ची स्वप्नं बाजूला सारल्याबद्दल वाटणारं दु:ख, स्वत:च्या पात्रतेवरच शंका आणि आयुष्यात तिला खरोखरच काही मिळवायचं होतं तरी की नाही, याबद्दलही तिचं मन तिच्यावरच शंका घेत होतं. तितक्यात तिच्या आत दडलेली टीकाकार जागी झाली आणि पावसाच्या आवाजापेक्षाही वरचढ आवाजात अत्यंत कठोरतेने स्वत:लाच सांगू लागली, ‘‘लेखिका होण्याची तुझ्यात पात्रताच नाहीये, तू काही चांगलं निर्माण करू शकतेस असा विचारच कसा आला तुझ्या मनात?’’ तिच्या आतला हा संशयी आवाज तिला अनेक वर्षांपासून सोबत करत होता. अवतीभवती घोंगावणाऱ्या त्रासदायक डासांप्रमाणे… तिच्या भीतीत भरच पडत होती. जेव्हा जेव्हा तिने काही वेगळा विचार करण्याचं धाडस केलं, तेव्हा तेव्हा तिच्या आतली टीकाकार मध्येच डोकावायची, तिला दररोजच्या रहाटगाडग्याच्या सुरक्षित कोशात पुन्हा बंद करून टाकायची. या कोशातून बाहेर पडणं हे जवळपास अशक्यच होऊन बसलं होतं.

मीराचा हा संघर्ष इतरांपेक्षा वेगळा नक्कीच नव्हता. जेव्हा आपला मेंदू पूर्ण क्षमतेने कार्यरत असतो तेव्हा तो सर्वप्रथम टिकून कसं राहावं याचाच विचार करतो. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार करता सुरक्षितता आणि सभोवतालच्या परिस्थितीचा नेमकेपणानं अंदाज घेता येणं हे जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतं. पण मनुष्याची ही मूलभूत प्रेरणा त्याला कसलेही धोके पत्करू न देता मर्यादित क्षेत्रातच कार्यरत ठेवते आणि यामुळे आपल्या मनातली भीती आणि काही चुकीच्या धारणा आपला पाय मागे खेचत राहतात. मात्र टिकून राहण्याच्या या विचारप्रणालीमुळे आपल्यातली प्रेरणा आणि आत्मविश्वास उणावतो, विशेषत: तेव्हा, जेव्हा आपण आपल्या सुरक्षित कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. नव्या सवयी आत्मसात न केल्याबद्दल, नवी उद्दिष्टं न ठेवल्याबद्दल आपण स्वत:च स्वत:वर अत्यंत कठोर टीका करत असतो, यामुळे आपल्या मनात अपराधी भावना, दु:ख आणि स्वत:बद्दलच शंका निर्माण होते. कालांतराने या नकारात्मक स्वसंवादाचं ‘माझ्यात काही करून दाखवायची क्षमताच नाही!’, अशी स्वत:ला दूषणं देण्यात रूपांतर होतं. यामुळे स्वत:च्या आत्मसन्मानाचं पूर्ण खच्चीकरण होतं.

आकलनशास्त्र (Cognitive Science) असं सांगतं की, आपण स्वत:च स्वत:चे प्रचंड मोठे शत्रू असतो. आपल्या सर्वांगीण आकलनाच्या प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलं की, आपल्या दररोजच्या एकूण विचारांपैकी ८० टक्के विचार नकारात्मक असतात आणि त्या ८० टक्क्यांपैकी ९५ टक्के विचार पुन्हा पुन्हा येत राहतात. आपल्या मनात नाना तऱ्हेच्या चिंता घर करतात, यामुळे आपण ठरवलेल्या गोष्टींमध्ये अडथळे येतात, आपल्या सर्जनशीलतेची वाढ खुंटते आणि आपल्या स्वप्नांचा श्वास गुदमरतो.

दररोज चाललेल्या या संघर्षाला कंटाळून एके दिवशी मीराने तिच्या आजीशी बोलायचं ठरवलं. तिची आजी पोक्त आणि अनुभवी स्त्री होती. ती नेहमी म्हणी आणि कोड्यांचा वापर करत बोलायची. एकदा दुपारी चहा घेत असताना मीराने आपल्या आजीजवळ तिचं मन मोकळं केलं. स्वत:च्याच विचारांमध्ये ती कशी अडकून पडली होती याबद्दल ती अगदी मनमोकळेपणानं बोलली.

आजीने तिचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि तिला म्हणाली, ‘‘मीरा, तुझं मन हे भरपूर पाऊस पडून गेल्यानंतरच्या शेतासारखं आहे. तिथे तू जे पेरशील तेच उगवून येणार. जर तू काटे पेरलेस तर तुला काट्यांवर चालावं लागेल, पण जर तू फुलझाडांची लागवड केलीस, तर एके दिवशी त्यांची सुंदर फुलबाग तयार होईल. मनाला चिंता करायला आवडतंच, कारण ते तुमचं रक्षण करत असतं, परंतु कुठे थांबायचं हे तुम्हाला त्याला सांगता यायला हवं.’’ आजीचे हे अनुभवाचे बोल म्हणजे जणू काही ओसाड जमिनीवर अवचित पडलेले पावसाचे थेंबच! मीराला आतून खाडकन जागे करणारे! इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या मनात आशेचा किरण उजळला होता. ज्याप्रमाणे तिच्या मनाने तिच्या मार्गात शंका आणि भीतीचे काटे पेरले त्याचप्रमाणे ‘सर्जनशीलता’ आणि ‘धाडस’ यांची फुलबागही तिला फुलवता आली असती, हे तिच्या लक्षात आलं.

‘आपण फुलझाडं लावली पाहिजेत’, ती स्वत:शीच पुटपुटली… आजीच्या अनुभवी सल्ल्यातून प्रेरणा घेऊन तिने स्वत:च्या आतल्या टीकाकाराला आणि तिच्यावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या नकारात्मक विचारांना आव्हान द्यायचं ठरवलं. अर्थात तेव्हाही एखाद्या अनाहूत पाहुण्यासारखी तिच्या आतली टीकाकार तिच्या भोवती पिंगा घालत होतीच… पण तरीही, लहानपणी पाहिलेलं लेखिका होण्याचं स्वप्न तिने पूर्ण करायचं ठरवलं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी ती कागद आणि पेन घेऊन बसली. तिचे हात थरथरू लागले, मनात शंकांचं काहूर माजलं होतं. आतली टीकाकार अजूनही जागी होतीच, हळूच म्हणत होती, ‘तुला हे कधीच नाही जमणार, उगाच कष्ट घेऊ नकोस!’ स्वत:ला पुन्हा सिद्ध करण्याचा हा प्रवास अर्थातच सोपा नव्हता, तो संयमाची परीक्षा पाहणारा आणि बऱ्याचदा उद्वेग आणणारा होता. आतली टीकाकार अजूनही सावलीसारखी घुटमळत होतीच, तिला काहीच न जमण्याची हजार कारणे देत होती, पण मीरा थांबली नाही. तिनं स्वत:ला आठवण करून दिली, की शेतात लावलेला भात उगवून यायला जसा वेळ लागतो, तसाच आपल्याही वाढीला वेळ लागतोच. ती जसजसा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून विचार करू लागली, तसतसा बदल घडू लागला. अनेक शंकाकुशंकांनी व्यापलेल्या तिच्या मनात आता नवनव्या शक्यता उमलून येऊ लागल्या. कदाचित आपलं लेखिका होण्याचं स्वप्न कधीतरी सत्यात येऊ शकेल असा विश्वास तिला वाटू लागला.

लवकरच तिने ‘मंतरलेल्या बनांच्या कथा’ आणि ‘शूरवीरांच्या गाथा’ लिहिण्यास सुरुवात केली, स्वत:ला पुन्हा एकदा स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं… प्रत्येक शब्दाबरोबर तिच्या मनावरचा स्वत:बद्दलच्या शंकेचा भार उतरत गेला आणि त्याची जागा ध्येयाने प्रेरित होऊन जगण्याच्या आनंदाने घेतली. लिखाणाला जास्तीत जास्त वेळ देण्याबरोबरच तिने आपल्या मनातल्या नकारात्मक विचारांचे काटे बाजूला सारले आणि स्वत:ला प्रोत्साहित करणाऱ्या विचारांची फुलबाग फुलवली. तिचा आतला आवाज तिला बाहेरच्या जगातल्या आव्हानांपासून सुरक्षित तर ठेवत होता, पण त्यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व मात्र संकुचितच राहिलं, हे तिच्या लक्षात येऊ लागलं. ‘मी एक लेखिका आहे!’ तिने स्वत:ला बजावलं. तिच्या आत्मविश्वासानं भरलेल्या प्रत्येक निश्चयी वाक्यासोबत ज्या नकारात्मकतेच्या बेड्यांनी तिला वर्षानुवर्षे जखडून ठेवलं होतं, त्या बेड्या तुटू लागल्या.

तिच्या कुटुंबीयांनाही तिच्यातला हा बदल प्रकर्षाने जाणवू लागला व ते तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. आता ती केवळ एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि आई नव्हती, तर स्वप्नं आणि ध्येयं असलेली एक स्त्री होती. तिच्या हसण्यानं सगळं घर प्रसन्न झालं होतं, आणि तिच्या गोष्टींनी तर तिच्या मुलांच्या भावविश्वाला पूर्ण व्यापून टाकलं होतं. दिवसांमागून दिवस गेले, मीराने तिच्या विचारांची सुंदर फुलबाग फुलवली. ज्यांनी स्वत:भोवतीच्या पिंजऱ्यातून मुक्त व्हायचं धाडस दाखवलं होतं अशा माणसांच्या जीवनगाथा तिने वाचल्या. तरीसुद्धा, असेही काही दिवस होतेच, ज्यात तिच्या आतली टीकाकार तिच्या मनात भीती आणि संशयाची पुन्हा पेरणी करण्यासाठी अधूनमधून डोकावत होतीच! ‘जर तू लिहिलेलं कोणाला वाचावंसं वाटलंच नाही, तर?’ असे टोमणेही मारत होती. पण इतक्या दिवसांत मीराला एक गोष्ट कळून चुकली होती की हे केवळ पळणारे ढग आहेत, हे संपूर्ण आकाशाला व्यापू शकत नाहीत.

दररोज मीराला हे नव्यानं उमजत होतं की हा प्रवास केवळ लेखिका होण्यापुरता मर्यादित नसून स्वत:ची खरी ओळख पुन्हा निर्माण करण्याचा आणि स्वत:च्या मनाचं अचाट सामर्थ्य ओळखण्याचासुद्धा होता. स्वत:च्या सर्जनशीलतेला ती जितकी जपत गेली, तितका तिच्या आतल्या टीकाकाराचा आवाज बंद होत गेला, आणि त्याचं रूपांतर एका कठोर न्यायाधीशातून आधार देणाऱ्या मार्गदर्शकात झालं होतं.

प्रगतीच्या इच्छेचा सुरक्षिततेशी ताळमेळ जमवत आयुष्याची लय साधणं यासाठी प्रचंड संयम आणि स्वत:बद्दल सहानुभूती हवी. दररोज आपल्याला स्वत:ला आणि आपल्या क्षमतांना ओळखण्याची नव्याने संधी मिळते. आपल्या निवांत सुरक्षित कोशातून जरा बाहेर येऊन पाहा, प्रगती तुमची वाट पाहत उभीच असते. गरज असते ती फक्त विश्वासाने झेप घेण्याची. जर आपल्या बुद्धीचं खरं सामर्थ्य जाणून घ्यायचं असेल तर येणाऱ्या अडथळ्यांना पार करत आणि दृढनिश्चयाने आपली प्रगती साधत हा प्रवास आनंदाने करण्याची तयारी हवी. आपल्या बुद्धीने तिचा आविष्कार कसा दाखवावा हे पूर्वीपासून ठरलेलं नसलं, तरी ते ठरवण्याची आपल्यात क्षमता आहे. खूप काही आत्मसात करत, प्रगती करत आणि स्वत:चा कायापालट घडवून आणत आपण हे साध्य करू शकतो.

आतल्या टीकाकाराला बाजूला सारत आपण जेव्हा भीतीचं आणि स्वत:बद्दलच्या शंकांचं कुंपण ओलांडतो, तेव्हा आपल्या प्रगतीचा प्रवास सुरू होतो हे मीराच्या कथेवरून लक्षात येतं. जाणीवपूर्वक प्रयत्न करत हा प्रवास करताना प्रत्येक पावलागणिक एकेक सुंदर फूल फुलवू या! अशा प्रकारे आपण आपल्या स्वप्नातल्या आयुष्याची फुलबाग प्रत्यक्षात नक्कीच फुलवू शकतो!

sanket@sanketpai.com