डॉ. वैशाली बिनीवाले
मुलगी जन्माला येते… मोठी होत जाते… वयात येते आणि तिच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. ‘ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती’चा हा काळ तिच्यासाठी फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक, भावनिक बदलांचा असतो. त्या वेळी तिला मिळणारं मार्गदर्शन, आधार तिच्या आयुष्याची दिशा ठरवत असतो. तिचं खाणं-पिणं, तिची जीवनशैली याच्याबरोबरीनं तिचं पालकांशी, मित्रमैत्रिणींशी असलेलं नातं उद्याची ‘ती’ घडवत असतं. त्यासाठीचं हे सदर. मुलीला मासिक पाळी येण्याआधीपासून पुढच्या प्रत्येक टप्प्यांवरच्या तिला घडवण्यासाठीचं.
डॉ. वैशाली बिनीवाले ( एमडी, डीजीओ, एफआयसीओजी.) स्त्रीआरोग्य प्रसूतिशास्त्रज्ञ म्हणून पुण्यात गेली ३० वर्षे कार्यरत आहेत. ‘ज्ञानप्रबोधिनी’ तसेच ‘पाटणकर मेडिकल फाउंडेशन’तर्फे वेल्हे तालुक्यात स्त्री आरोग्याचे त्या २६ वर्षे काम करीत असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ‘राजहंस प्रकाशना’तर्फे ‘बाळंतपण अथपासून इतिपर्यंत’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून अनेक नियतकालिके, वृत्तपत्रांतून लेखनही केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालये व संस्थांमध्ये त्या स्त्री आरोग्यविषयक शास्त्रीय व्याख्याने देत असतात.
प्रसूतिकक्षातील हा दररोजचा प्रसंग… धीरगंभीर वातावरणात डॉक्टर्स, परिचारिका स्वत:चे काम करत असतात… ‘ठक-ठक-ठक’ मॉनिटरवर बाळाच्या हृदयाचे ठोके सतत ऐकू येत असतात… प्रसूत होणाऱ्या स्त्रीच्या वेदनाभरल्या किंकाळ्या मधून मधून ऐकू लागतात आणि तिने नीट कळा द्याव्यात यासाठी उच्चारलेले प्रोत्साहनपर शब्दही… सगळीकडे अत्यंत तणावपूर्ण वातावरण असतं…
अचानक प्रसूतिकक्षात गडबड होते… एका इवल्याशा नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज सगळीकडे घुमतो आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. हे दृश्य कोणत्याही चित्रपटातील नाही. आम्ही स्त्री आरोग्यतज्ज्ञ हे दररोजच अनुभवत असतो. गेले नऊ महिने मातेच्या पोटातल्या ज्या बाळाची काळजी घेतली त्या नवजात बालकाला डॉक्टर हातात घेतात आणि त्याच क्षणाला त्यांचे ऋणानुबंध जुळतात. यावेळी डॉक्टरांच्या मनात कृतकृत्यतेची जी भावना असते त्याचे वर्णन करणे अशक्य.
‘अभिनंदन! मुलगी झाली आहे.’ हे शब्द नवमातेला कृतकृत्य करत असतात. ही लहानगी डॉक्टरांचे बोट आपल्या मुठीत घट्ट धरून, इवलेसे डोळे किलकिले करून नवीन जग अजमावत असते. तिच्या आयुष्याच्या प्रवासात ती जीवनाच्या अनेक टप्प्यांतून जाणार असते. या प्रत्येक वेळेस अनेक शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांना तिला सामोरे जायचे असते. जीवनाच्या या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती आम्हा डॉक्टरांना भेटते आणि आमचं नातं आणखीनच घट्ट होत जातं. आपल्या या लेखमालिकेत ‘ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती’पर्यंत अनेक टप्प्यांवर आपण तिला भेटणार आहोत, तिच्याशी संवाद साधणार आहोत, तिला समजून घेणार आहोत. चला तर मग आता या प्रवासाची आपण नव्याने सुरुवात करूयात.
आज खूप दिवसांनी स्नेहल माझ्याकडे आली होती. बरोबर तिची मुलगी उर्वीही होती. ‘‘डॉक्टर, आज प्रथमच मी उर्वीला तुमच्याकडे घेऊन आले आहे. उर्वी आता १० वर्षांची झालीय. गेल्या महिन्यात तिच्या शाळेत एका डॉक्टरांचे पौगंडावस्थेबद्दल व्याख्यान झाले. तेव्हापासून उर्वीला खूप सारे प्रश्न पडले आहेत. खरं तर तिच्या प्रश्नांची उत्तरं मलासुद्धा नीटशी माहिती नाहीत. आमच्या वेळी या विषयाची फारशी माहितीच नव्हती आणि प्रश्न पडलेच तर ते विचारायचं धाडसही नव्हतं. म्हणून मी मुद्दाम उर्वीला घेऊन आले आहे. तुम्ही शास्त्रीय पद्धतीनं तिचं शंकानिसरन करू शकाल.’’
स्नेहलसारखे अनेक जागरूक पालक या वयात होणाऱ्या बदलांची व समस्यांची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी मुलींना घेऊन वैद्याकीय तज्ज्ञांकडे येतात. ‘पौगंडावस्था’ (प्युबर्टी) हा मुलीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा कालावधी. बालपण आणि तारुण्य यामधील एक नाजूक काळ. वयात येताना या मुलींच्या मेंदूतून काही संप्रेरके (हार्मोन्स) निर्माण होऊ लागतात. या संप्रेरकांची रक्तातील पातळी वाढल्यामुळे बीजांडकोशाची (ओव्हरी) वाढ होऊन ती सक्रिय होतात. बीजांडकोशातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉनसारखी संप्रेरके निर्माण होऊ लागतात. या संप्रेरकांमुळे मुलीच्यात अनेक शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होऊ लागतात.
पौगंडावस्थेचे साधारण वय आहे ८ ते १६ वर्षे. सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती, भोवतालचे वातावरण, आहार, व्यायाम व आनुवंशिकता अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असते. पौगंडावस्थेचं हे सर्वसाधारण वय हल्ली कमी होताना दिसतंय. बदलती जीवनशैली यासाठी कारणीभूत आहे. आहारात मिसळली गेलेली रसायने, मांसाहार व दुग्धजन्य पदार्थातून जाणारी संप्रेरके, आहारातील वाढलेले मांसाहाराचे प्रमाण, डबाबंद पदार्थ आणि जंक फूड यांचे अतिप्रमाणात सेवन, व्यायामाचा अभाव, लहान वयातच येणारा स्थूलपणा, समाज माध्यमांमुळे मिळणारी अतिमाहिती यामुळे पौगंडावस्था लवकर सुरू होते. या वयात संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे लैंगिक अवयवांची व बाह्य जननसंस्थेची वाढ सुरू होते. मुलींच्यात दुय्यम लैंगिक चिन्हे (Secondary Sexual Charecters) दिसू लागतात.
पौगंडावस्थेचे ५ टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात फारसे शारीरिक बदल दिसून येत नाहीत. या काळात मेंदूतून बीजांडकोशात संप्रेरकांमार्फत संदेश दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात स्तनांची वाढ सुरू होते. मुली अनेकदा स्तनांमध्ये दुखत असल्याची तक्रार करतात. स्तनांमध्ये छोटी गाठ जाणवू लागते. बाह्य जननेंद्रियांभोवती केस दिसू लागतात. पौगंडावस्थेच्या तिसऱ्या अवस्थेत मुलींची उंची झपाट्याने वाढते. स्तनांची अधिक वाढ होते. योनीमार्गाचा आकार किंचित वाढून त्यातून पांढरा स्राव जाऊ लागतो. चौथ्या टप्प्यात मासिक पाळी सुरू होते. स्तनांची वाढ सुरू झाल्यानंतर साधारणत: २ वर्षांनी मासिक पाळी सुरू होेते. मासिक पाळी सुरू होण्याचे नैसर्गिक वय आहे १० ते १६ वर्षं. या वयात बीजनिर्मिती अनियमितपणे होत असल्याने मासिक पाळी अनियमित असू शकते. पौगंडावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात मुलींची वाढ पूर्ण होते. साधारणत: १५ ते १६व्या वर्षी हा टप्पा पूर्ण होतो. बीजांडकोश परिपक्व झाल्यामुळे बीजनिर्मिती नियमितपणे सुरू होते व मासिक पाळी नियमित होते.
पूर्वीपेक्षा हल्लीच्या बहुतेक शहरी मुलींना या शारीरिक बदलांविषयी माहिती असते. पालकांशी असलेला मोकळा संवाद, मित्रमैत्रिणींबरोबर होणारे अनुभव कथन, समाजमाध्यमांमधून मिळणारी माहिती यामुळे मुली बदलांना जास्त सहजपणे सामोऱ्या जातात. किंबहुना या बदलांची वाट बघत असतात.
१३ वर्षांच्या अनन्याला घेऊन तिची आई आली होती. अनन्याच्या ग्रुपमधील सर्व मुलींची मासिक पाळी सुरू झाली होती. मात्र अनन्याची सुरू झाली नव्हती. त्यामुळे तिच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या. यामुळे ती खट्टू झाली होती. मासिक पाळी सुरू झाल्यावर मित्रमैत्रिणींना मोठी पार्टी देण्याचं तिनं ठरवलं होतं. पण तोपर्यंत आपल्यात काही कमी नाही ना या भीतीनं तिला ग्रासलं होतं. तिला या विषयाची शास्त्रीय माहिती दिल्यावर मात्र तिची भीती कमी झाली.
वयात येत असताना शारीरिक बदलां- बरोबरच अनेक मानसिक, भावनिक व सामाजिक बदलांना या मुलींना सामोरं जावं लागतं याविषयीची जागरूकता मात्र दुर्दैवाने फारच कमी मुली व त्यांच्या पालकांना असते. या वयात मुलींना स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. स्वत:च्या भावनांबद्दल, विचारांबद्दल त्या जागरूक होऊ लागतात. इतरांच्या भावनांचाही विचार करू लागतात. अनेकदा पालकांशी मतभेद होऊ लागतात. मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटू लागतात. मित्रमैत्रिणींमध्ये सामावून घेतले जाण्याचे खूप जास्त महत्त्व त्यांना वाटते. समवयस्कांच्या दबावाला त्या पटकन बळी पडू शकतात. या वयातील मुलींना स्वत:च्या बदलणाऱ्या शरीराबद्दल जाणीव निर्माण होते. आकर्षक दिसावं, मित्रमैत्रिणींना आवडावं यासाठी त्या प्रयत्न करू लागतात. या वयातील मुलामुलींमध्ये लैंगिक भावना निर्माण होऊ लागतात. लैंगिक आकर्षण वाटू लागतं. इतकंच नाही तर त्यांचा लैंगिक कलही ठरतो. या वयातील मुलं-मुली जास्त प्रयोगशील असतात. नवनवीन गोष्टी अनुभवण्यात त्यांना स्वारस्य असतं. योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास धूम्रपान, दारू व ड्रग्जसारख्या धोकादायक व्यसनांचे प्रयोग केले जातात.
वयात येणाऱ्या या मुलामुलींना आरोग्य व लैंगिक शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. हल्ली बहुतेक शाळा व महाविद्यालयांमध्ये याविषयी कार्यशाळा घेतली जाते. या मुलांना लैंगिक शिक्षण हे वयानुरूप द्यायला हवं. यात जननसंस्था, तिची कार्यपद्धती, पौगंडावस्था, मासिक पाळी याविषयी शास्त्रीय माहिती, या काळात घ्यायची काळजी याविषयी जागरूक करायला हवं तसेच जरा मोठ्या मुलींना लैंगिकतेबद्दल मार्गदर्शन करायला हवं.
पौगंडावस्थेचा हा काळ शारीरिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम गरजेचा असतो. या शारीरिक वाढीच्या काळात कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे व प्रथिनांची जास्त गरज असते. म्हणूनच फळे, भाज्या, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार यांचा आहारात योग्य प्रमाणात वापर हवा. यामुळे स्थूलपणा, कुपोषण, पंडुरोग यांसारखे आजार टाळता येतील.
या वयातील मुलींना काही लसीही द्यायला हव्यात. कांजिण्या, गोवर, रुबेला, गालगुंड याबरोबरच हल्ली गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्यासाठीसुद्धा लस दिली जाते. एच.पी.व्ही. लस (Human Papillomavirus) नवव्या वर्षानंतर देता येते. या लसीकरणाविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
पौगंडावस्थेचा हा काळ व्यक्तिमत्त्व विकासासाठी, स्वत:ची आवडनिवड, क्षमता ओळखून करिअर ठरविण्यासाठीचा महत्त्वाचा काळ. या वयातील मुला-मुलींना मानसिक, बौद्धिक व सामाजिक परिपक्वता येण्यासाठी पालकांचा, कुटुंबीयांचा व समाजाचा आधार हवा. यासाठी पालकांनाही अधिक प्रगल्भ व्हायला हवे. मुला-मुलींशी, त्यांच्या मित्रमैत्रिणींशी मैत्रीचं नातं निर्माण करायला हवं. मुला- मुलींबरोबर मोकळा संवाद साधायला हवा. मुलं लहान असताना त्यांच्याबरोबर असलेले अधिकाराचं, पालकत्वाचं नातं आता विसरायला हवं. मात्र त्याचबरोबर मुलामुलींना मर्यादेची व जबाबदारीची जाणीवही ठामपणे करून द्यायला हवी.
या टप्प्यातून बाहेर पडणाऱ्या मुली भविष्यकाळातील समाजाचा मोठा आधार असणार आहेत. त्यांचा हा काळ सोपा, आनंददायी करण्यासाठी सकारात्मक मदत करायलाच हवी.