डॉ. नंदू मुलमुले
आयुष्याचं एक चक्र असतं, ज्याचं सत्ताकेंद्र सतत बदलत असतं, पण हे फार थोड्यांना उमगतं. ज्यांना उमगत नाही आणि उमगलं तरी पचत नाही ते स्वत:सह इतरांचं आयुष्य कठीण करून टाकतात. पण परिस्थिती काहींना बदलवते. अनुभवाचा ढग समंजसपणाने त्यांच्याही आयुष्यात बरसतो नि सगळं जग छान वाटू लागतं. जग हे बंदिशाळा न वाटता, आनंदशाळा वाटू लागते… लीलाताईंचं तसंच काहीसं झालं…

माणूस मृत्यूला का घाबरतो? आपल्या प्रियजनांपासून दुरावण्याचं दु:ख आणि वेदनेची भीती ही मुख्य कारणं. वेदनेची भीती ही वेदनेच्या प्रतीक्षेत अधिक असते. कसं होईल माझं? आयुष्याच्या संध्याकाळी खरं तर जे अपरिहार्य त्याला सामोरं जाण्याची एक मानसिक तयारी हवी, मन मात्र मानत नाही. ते अस्वीकाराच्या मन:स्थितीत असतं. पाठोपाठ येतो क्रोध, मीच का? राग नियतीवर असतो, पण तो निघतो प्रियजनांवर.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Vaikunth Crematorium
वैकुंठात असुविधा, भटक्या श्वानांचाही त्रास, नक्की काय आहे प्रकार?

लीलाताईंचं तसंच काहीसं झालं होतं.

लीलाताई मुळातच काहीशा तापट स्वभावाच्या, त्यात शाळेच्या मुख्याध्यापिका. शिस्तीची काठी गरगर फिरवण्यात अर्धी हयात गेली, जणू तीच काठी घेऊन त्यांनी संसार केला. नवरा हाडाचा गरीब. मुलगा निखिल, मुलगी रोहिणी दोघेही आईच्या शिस्तीत मोठे झाले. रोहिणी आईसारखीच तापट, तिने प्रेमविवाह करून बंड केलं. जावई ठरवून पाहून निवडला असता तरी सापडला नसता इतका चांगला, पण लेकीने माझं मत न घेता परस्पर लग्न कसं ठरवलं, याचा त्यांना राग अधिक. नवऱ्याने नाक घासून मुलीची रदबदली केल्यावर त्यांचं मन द्रवलं. नवऱ्याचा गबाळा कारभार सांभाळला ही लीलाताईंची जमेची बाजू. पण त्यापायी आलेला हिटलरी स्वभाव सहन केला ही इतरांची तेवढीच महत्त्वाची बाजू.

काळ बदलतो. सत्ताकेंद्र बदलतात. आता आपले अधिकार नव्या पिढीच्या हाती सोपवावेत हे फार थोड्यांना उमगतं. ज्यांना उमगत नाही आणि उमगलं तरी पचत नाही ते आपलं आणि भोवतालच्या लोकांचं आयुष्य खडतर करून टाकतात. सासूला उलटून बोलायचं नाही ही नवीन आलेल्या सुनेला तिच्या आईची शिकवण, मग तिचा मूक विरोध सुरू झाला. तुटक बोलणं, ऐकून न ऐकल्यासारखं करणं आणि आपल्या मनासारखं अमलात आणणं इत्यादी प्रकार तिने सुरू केले. घरात तणावपूर्ण वातावरण असे. मुलाची स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी, त्याची बदलीही शक्य नव्हती. अशा वेळी सासऱ्याने निर्णय घेतला. त्याने मुलाला नोकरीचे ठिकाण जवळ पडते या सबबीखाली वेगळे घर करायला लावले. अधूनमधून येणं-जाणं होतं, पण रोजचे संघर्ष कमी झाले.

आता लीलाताई काहीशा शांत होतील ही अपेक्षा होती, पण फरक एवढाच झाला की आता नेहमीचा राग जोडीदारावर निघणे सुरू राहिले. त्याच्या अंगवळणी पडले होते. रागीट माणसाच्या सान्निध्यात राहणाऱ्याला हळूहळू त्याच्या तापटपणाची इतकी सवय होते की, तोही सदैव एका अपराधी भूमिकेत स्वखुशीने शिरतो. नवऱ्याच्या आजारांना या भूमिकेनं खतपाणी मिळालं आणि तो एके दिवशी इहलोकाची यात्रा संपवता झाला.

आता खरा संघर्ष सुरू झाला. लीलाताईंचा राग शोषून घेणारा ‘ब्लॉटिंग पेपर’ गेला. आता उरलं मुलाचं घर. निखिलने अर्थातच आईला आनंदानं घरी नेलं. नवरा गेल्यापासून त्या वरवर शांत झाल्या होत्या, मात्र आतून स्वभावाचा दंभ तसाच पक्का होता. आता मुलाच्या संसारात खुडबुड सुरू झाली. कुठल्या वयात माणसाला समज यावी याचं काही गणित नाही. काटेरी फणस पक्व होतो तसा मधुर होत जातो, पण काही माणसं वरचेवर पिकत जातात, मात्र अधिक काटेरी होताना दिसतात!

लीलाताई थकत चालल्या. तापट स्वभावाला जी ऊर्जा लागते ती संपत आल्यानं शांत झाल्या असं म्हणता येईल. रागदारीला दमसास हवा. रक्तदाब वाढला, एके दिवशी त्यांना सौम्य पक्षाघाताचा झटका झाला. मुलाने, सुनेने आवश्यक ती सारी काळजी घेतली. तिला नोकरीमुळे सगळं करणं शक्य नव्हतं, मुलाने मदतीला एक काळजीवाहू सेविका ठेवली. बडदास्त म्हणता येईल अशी व्यवस्था लावून दिली. चालत्याफिरत्या असताना स्वत:ला ठेवत नसतील तेवढ्या त्या व्यवस्थित दिसायला लागल्या.

मात्र आता त्यांना अंताची चाहूल लागली. त्यांच्या तापट स्वभावाने उचल खाल्ली. माणूस अशा मन:स्थितीत आधी अस्वीकार आणि पाठोपाठ क्रोधाचं अस्त्र उपसतो. कारण एकच, त्याला हा इहलोक सोडायचा नसतो. समजून घेणारे आयुष्याची अपरिहार्यता समजून घेतात. जे समजून घेण्याच्या अवस्थेत नसतात ते नियतीशी ‘भांडण्याचा’ पवित्रा धारण करतात. तो राग निघतो आसपासच्या लोकांवर. लीलाताई काळजी घेणाऱ्या सेविकेवर डाफरू लागल्या. एकदा तर त्यांनी त्या पोरीवर हात उगारला. पगारदार पोरगी, किती सहन करणार? ‘‘सख्ख्या आईचा कधी मार खाल्ला नाही मी,’’ असे गुरकावून ती तडकाफडकी निघून गेली. आता नवी सेविका शोधणं आलं. वाढत्या वयानं अधिकाधिक अविचारी होत चाललेल्या सासूला कसं आवरावं हे सुनेला समजेना. निखिलला अनेकदा बाहेरगावी जाणं आवश्यक होतं. पण तो जागचा हलू शकत नव्हता.

घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर एक उत्कृष्ट वृद्धाश्रम होता. चालक ओळखीचे, माणसं काळजी घेणारी, व्यवस्था उत्तम. मुलाने आईला सुचवलं, चार दिवस जाणं जरुरी आहे, राहशील का तेथे?

लीलाताईंनी घर डोक्यावर घेतलं. ‘‘तुम्ही संधी शोधत आहात मला हाकलण्याची, मी जाणार नाही. नाही.’’ त्या आता आक्रमक झाल्या. प्रत्येक गोष्ट त्या ‘आपल्याला घरातून हाकलण्याचा कट आहे.’ या भूमिकेतून पाहायला लागल्या. त्यांचा विवेक, सारासार बुद्धी, होता नव्हता समंजसपणा त्यांना सोडून गेला. मुलाची, सुनेची कोंडी झाली.

दरम्यान, लीलाताईंच्या रक्तदाबाने पुन्हा उचल खाल्ली. त्यांना दवाखान्यात भरती व्हायला दोघांनी मुश्किलीनं राजी केलं. चार दिवस सून त्यांच्या उशाशी बसून होती. त्या बऱ्या झाल्या. अतिदक्षता विभागातून सुट्टी झाली. काही दिवस रिकव्हरी रूममध्ये ठेवावं ही डॉक्टरांची सूचना, तिथून वेगळ्या इमारतीत नेण्यात आलं. स्वच्छ, नेटका स्वतंत्र कक्ष. बैठी मऊ शय्या, स्वच्छ चादर, ताज्या फुलांची कुंडी, मोठ्या खिडकीला काचेची तावदानं, एक चटपटीत हसरी सेविका दिमतीला. लीलाताई हिंडूफिरू लागल्या, त्यांना भोवताली वृद्ध दिसू लागले. स्त्री-पुरुष फिरताना, व्यायाम करताना, हसत गप्पा करताना. काही स्त्रियांशी ओळख झाली. खूप आपुलकीने बोलल्या त्या. त्यांनी चौकशी केली. कुठून आलात? घरी कोण कोण आहेत? तब्येतीची काळजी घ्या. नंतर त्यांना कळलं, तो वृद्धाश्रम आहे!

झालं, लीलाताईंचा त्रागा सुरू झाला. मुला-सुनेच्या नावानं बोटं मोडणं सुरू झालं. तिसऱ्या दिवशी त्यांनी सारा वृद्धाश्रम डोक्यावर घेतला. व्यवस्थापक आले, त्यांनी समजावलं, तुमच्या मुलानेच तुम्हाला इथे आणलं आहे, तुम्हाला काय हवं-नको पाहायला सांगितलं आहे. तुमची काही मागणी असेल, तक्रार असेल तर सांगा. तिची पूर्तता करू.

लीलाताई काय सांगणार? सगळी सरबराई, तशी ती घरीही होती. तरी तेथेही त्रागा होताच. येथे म्हणायला आपल्या मनाविरुद्ध आणल्याचा रोष होता, मात्र तो ऐकायला मुलगा-सून नव्हते. गेले मला येथे टाकून, फसवून. संतापाचा कडेलोट झाला, मात्र तो व्यक्त करणार कोणावर? काही क्षण त्यांना असहाय झाल्यासारखं वाटलं. असंख्य मुलांचा शाळेतला पहिला दिवस त्यांना आठवला! ते पालकांनी पोरांना शिक्षकांच्या हवाली करणं, ते मुलांचं हमसाहमशी रडणं, त्याचं हातपाय आपटणं, तीच असहायता. ही शाळा आता कधी सुटेल? घंटा कधी वाजेल? येईल कोणी न्यायला? शाळेत आधी प्रवेश घेतलेली इतर मुलं निमूटपणं वर्गात बसून असतात. हसतात, खेळतात, एकत्र डब्बा खातात, तसे इथले वृद्ध रमलेले दिसतात. ती कशी आनंदी दिसतात? ही तर कायमची शाळा दिसतेय, न सुटणारी! मुलाला दुसऱ्या दिवशी फोन लावण्याचं कबूल करून व्यवस्थापक निघून गेले. कडकडणाऱ्या विजा, धो-धो पाऊस, रात्र तळमळत निघाली.

दुसरा दिवस स्वच्छ उजाडला. लीलाताई उठल्या, सेविकेने दात घासणं, अंघोळ, कपडे बदलणं सारं करवून घेतलं आणि गरम पोह्यांची बशी टेबलावर ठेवली. ‘‘व्यवस्थापकांना फोन लावायला सांगा माझ्या मुलाला,’’ असे लीलाताईंनी फर्मान सोडेपर्यंत समोर मुलगा हजर.

‘‘तुला न्यायला आलोय आई, हिची मावशी वारली त्यासाठी जबलपूरला दोघांना जाणं जरुरी होतं. तुझ्याच वयाची, हिला आईहून जवळची मावशी. फक्त चार दिवसांसाठी. व्यवस्थापकांना सांगून गेलो होतो. बरी सोय झाली ना तुझी? रागावली नाहीस ना तू? खूप आवश्यक झालं म्हणून ठेवावं लागलं आम्हाला. समजून घेशील ना तू?’’

लीलाताईंनी शांतपणे मुलाकडे बघितलं. चार दिवसांच्या विरहानं त्यांनाही काही शिकवलं असावं. ‘‘हो रे, समजून घेईन. घेतलं. इतके दिवस समजत नव्हतं,’’ त्यांनी उसासा टाकला. एक समंजस ढग जणू त्यांना भिजवून गेला. ‘‘सारं जग माझ्याभोवती फिरवत ठेवण्याचा अट्टहास केला, कधी लक्षात घेतलं नाही की एक चक्र असतं आयुष्याचं, ज्याचं केंद्र सतत बदलत असतं. मुख्याध्यापिका पदाचा भार नव्या शिक्षिकेकडे सोपवला, त्या दिवशी वाटलं कसं चालेल या शाळेचं माझ्याशिवाय? माग घेत राहिले शाळेच्या प्रगतीचा, तेव्हा कळलं, उत्तम चाललं आहे. आनंदी व्हायला हवं होतं, पण थोडी खंत वाटली! आपल्याशिवाय जग व्यवस्थित सुरू आहे. मग घरात एक केंद्र निर्माण केलं स्वत:चं. तुम्हाला फिरवत ठेवण्याचा अट्टहास केला. सुटत नाही नं सत्ता,’’ लीलाताईंच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हसू उमटलं.

‘‘नाही आई, तू अजूनही केंद्र आहेस आमची. चल, भर सामान, मी हिशेब करतो,’’ निखिलने टेबलावरचा चष्मा, औषधं उचलायला सुरुवात केली.

‘‘थांब बेटा,’’ लीलाताईंनी पोराला थांबवलं. ‘‘तू न्यायला आलास, मला सगळं भरून पावलं. आता ही शाळा माझी. बंदिशाळा नव्हे, आनंदशाळा. मला इथे मैत्रिणी मिळाल्यात,’’ त्यांनी सेविकेकडे पाहिलं. ‘‘येईन मी घरी, वाटेल तेव्हा. दोन दिवस राहीन, पुन्हा येईन इथे. शाळा मध्येच सोडून जाण्याची सोय नसते, घंटा वाजेल तेव्हाच जायचं. माणूस वास्तव स्वीकारायला तयार नसतो. तो परिस्थितीशी झगडा करतो, त्या अज्ञाताशी मोलभाव करू पाहतो, निराश होतो, अखेर वास्तव स्वीकारतो. ही स्वीकाराची तयारी आधीच केली तर?’’

लीलाताईंनी मुलाचा हात हातात घेतला. ‘‘रस्त्याच्या त्या किनाऱ्याला घर आहे. कधीही येईन. किंवा, या किनाऱ्याला माझा निवास आहे, कधीही या!’’

nmmulmule@gmail.com

Story img Loader