मंदार कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी बोलताना इंग्रजी शब्द वापरण्याचं प्रमाण वाढतच चाललंय. बोलण्यासाठी दुसऱ्या भाषेचा आधार घेणं आणि प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्दांची संख्या मराठी शब्दांपेक्षा जास्त असणं यामुळे मराठीतले अनेक शब्द आपण विसरत चाललो आहोत. कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवणं चुकीचं नसलं तरीही काही जणांना आपली मातृभाषा नीट येत नाही, याचं दु:ख न वाटता अभिमान वाटतो, हे कितपत योग्य आहे? येत्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ (२७ फेब्रुवारी) निमित्तानं…

‘‘अहो, खूप जुना प्रॉब्लेम आहे हा, दर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी अशी एखादी चळवळ निघते आणि बंद पडते.’’ शेवडे काका म्हणाले.

‘‘कशावर चर्चा करताय एवढी?’’ साबळे काका येता येता म्हणाले.

पाटील काका, शेवडे काका आणि साबळे काका प्रत्येक रविवारी गप्पा मारायला भेटायचे. ‘‘अहो तेच हो, लोक मराठीत बोलत नाहीत वगैरे…’’ शेवडे काकांनी एका वाक्यात सारांश सांगितला.

‘‘अरे बापरे, आज एकदम एवढ्या ‘कॉम्प्लेक्स’ विषयावर कसे पोचलात.’’ साबळे काका म्हणाले.

‘‘प्रश्न मराठी भाषेचा आहे, त्यातील हरवत चाललेल्या शब्दांचा आहे. मराठीत नुसतं नावाला बोलतात लोक. आता तुम्हीच बघा, गुंतागुंतीचा किंवा गंभीर या शब्दांआधी ‘कॉम्प्लेक्स’ हा शब्द तुम्हाला सुचला. आपण आपले चांगले मराठी शब्द हरवून बसलोत, लोकांच्या लक्षातही येत नाही इतक्या आपसूकपणे आपण इंग्रजी शब्द वापरतो.’’ पाटील काकांनी उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलं.

‘‘तुमचा मुद्दा बरोबरच आहे हो, पण तो तितका काही सीरियस इश्यू नाही,’’ शेवडे काका असं म्हणाले आणि लगेच त्यांनी स्वत:ची जीभ चावली, ‘‘गंभीर समस्या, असं म्हणायला पाहिजे होतं मी.’’

‘‘बरं, शेवटी महत्त्वाचं काय, भावना पोचल्या पाहिजेत.’’ साबळे काका म्हणाले, पण पाटील काकांना ते समजलं नाही, ते फारच गंभीरपणे बोलत होते- ‘‘स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या भाषेचा आधार घ्यावा लागतो हे खरं तर दुर्दैवीच आहे, पण त्याहून जास्त वाईट हे आहे की लोकांना रोजच्या व्यवहाराच्या गोष्टी करतानादेखील शुद्ध मराठीत बोलता येत नाही. बाजारातून भाजी घेताना लोक ‘बीन्स’ घेतात फरसबी नाही. पेपर वाचतात, वर्तमानपत्र नाही. वैद्याकडं गेल्यावरही ‘हेडेक’ आहे म्हणून सांगतात, अशी कितीतरी उदाहरणं आहेत.’’

‘‘बाकी आमची सुरुवात त्या तेलगू चित्रपटाला किती गर्दी झाली, कसे अपघात घडले इथून झाली आणि त्यावरून मग मराठी चित्रपट, त्यातले संवाद, त्यांची इंग्रजी नावं, त्यातली हिंदी-इंग्रजी गाणी वगैरे मुद्द्यांवर आम्ही बोलत होतो,’’, शेवडे काकांनी मूळ प्रश्नाचं उत्तर दिलं.

‘‘ट्रेन मिस झाली म्हणून जरा लेट झाला किंवा आजची एक्झाम खूपच टफ होती, असले संवाद प्रेक्षकांच्या कानावर आदळल्यावर अजून काय होणार? अहो, हे सगळीकडेच आहे. मराठी मालिका, चित्रपट, सगळीकडे नुसता सुळसुळाट आहे दुसऱ्या भाषांचा. मराठी कलाकारांची कोणतीही मुलाखत बघा, फार थोडे लोक शुद्ध मराठी बोलू शकतात, मग प्रेक्षकांवरही तसाच प्रभाव पडतो.’’ पाटील काका म्हणाले.

‘‘बरोबर आहे. अहो मराठी वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्सही आज-काल किती विचित्र असतात.’’ साबळे काकाही मुद्दा पटल्यामुळे हताशपणे बोलले.

‘मथळा’, शेवडे काकांनी मराठी शब्द सांगितला आणि स्वत:च म्हणाले, ‘‘खरंच किती सुंदर, अर्थपूर्ण शब्द आहे मथळा, पण फारच कमी वेळा वापरला जातो.’’

‘‘यामुळे काय होतं ना, असं मराठी आपण बोलायचो तसं आपल्या पुढची पिढी नाही बोलत, आणि त्याच्या पुढची पिढी तर आणखीनच इंग्रजाळलेलं मराठी बोलते, बरोबर आहे की नाही?’’ पाटील काकांनी प्रश्न केला. उत्तरादाखल दोन्ही श्रोत्यांनी फक्त मान हलवली.

‘‘आणि इंग्रजीचं मात्र उलट आहे, पुढच्या पिढ्या अधिकच जास्त चांगलं इंग्रजी बोलतात. ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे वगैरे सगळं मला मान्य आहे, इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यालाही माझा विरोध नाही. पण समाजात एक वर्ग असा आहे की, ज्यांना आपली मातृभाषा नीट येत नाही याचं दु:ख नाहीच, उलट अभिमानच आहे. ते मला खुपतं. मराठी बोलताना प्रत्येक वाक्यात इंग्रजी शब्दांची संख्या मराठी शब्दांपेक्षा जास्त असते. आणि मग या लोकांकडे पाहून ज्यांना इंग्रजी फारसं येत नाही त्यांना उगाच न्यूनगंड वाटू लागतो.’’

‘‘अहो, आजकाल ऑफिसमध्ये सगळीकडे इंग्रजीत बोलतात. दुसऱ्या राज्यातून आलेले लोक असतात ‘कलीग’ म्हणून, त्यामुळे एक सवय होऊन जाते, शेवडे काकांनी योग्य कारणं सांगितली. पण पाटील काका आधीच विचार करून बसल्यासारखे बोलले, ‘‘अहो, ते मला मान्यच आहे, कार्यालयात आणि सहकाऱ्यांबरोबर मी समजू शकतो की भाषांची सरमिसळ होणार, पण म्हणूनच घरी प्रयत्न केला पाहिजे ना! घरी आपल्या मुलांशी शक्य तितकं स्वच्छ मराठीत बोलण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.’’ आपण बोललेल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला पाटील काका प्रमाण मराठी शब्द वापरून उत्तर देत आहेत हे एव्हाना शेवडे काका आणि साबळे काका यांच्या लक्षात आलं होतं. ‘‘आपण जे काही आहोत ते आपल्या मातृभाषेमुळं आहोत. तेवढं देणं लागतोच आपण,’’ पाटील काका उदासपणे स्वत:शीच बोलत होते.

‘‘तुम्ही फारच ‘इमोशनल’ झालात.’’ साबळे काका म्हणाले, ‘‘कालाय तस्मै नम: दुसरं काय? आपण आपल्या परीनं मराठी बोलत राहू, तेवढं आपल्या हातात आहे.

बाकी तुमची युक्ती मात्र चांगली आहे, कोणी इंग्रजी शब्द वापरले की आपण त्याला मराठी प्रतिशब्द वापरून उत्तर द्यायचं.’’ शेवडे काका पाटील काकांना टाळी देत म्हणाले.

पाटील काका हसून म्हणाले, ‘‘मी आजकाल सगळीकडेच असंच करतो, अगदी आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअॅप समूहावरसुद्धा!! ‘लिफ्ट’ला उद्वाहक म्हणा, किंवा ‘टीव्ही’ला दूरचित्रवाणीच म्हणा इतका अट्टहास धरत नाही मी, पण ‘प्लेन’ला विमान म्हणा, ‘बॉल’ला चेंडू म्हणा, ‘सीरियल’ला मालिका म्हणा, एवढं सांगतो. तेवढाच आपला खारीचा वाटा. बघा किती छान शब्द आहे ‘वाटा’, यातच खरी मजा आहे ना! ’’

‘‘मीही माझा शेअर उचलण्याचा ट्राय करतो आता!’’ शेवडे काका हसत हसत म्हणाले आणि तिघेही एकत्र हसू लागले. घराकडे परत जाताना साबळे काका त्यांच्या इमारतीतल्या लिफ्टमधे गेले, तेव्हा तिथे एक अनोळखी मुलगी होती. काकांना बघून तिनं विचारलं, ‘‘कोणता फ्लोअर?’’ साबळे काका पुसटसं हसले, आणि ‘‘चौथा मजला’’ असं उत्तर देऊन शांतपणे उभे राहिले.

mjkool@gmail.com