मासिक पाळी हा स्त्रीत्वाचा एक भाग आहे, पाळी थांबण्यानं तुमच्या स्त्रीत्वात काहीही उणीव येत नाही, उलट तोपर्यंत आयुष्य अधिक परिपक्व झालेलं असतं. अर्थात पाळी थांबण्याचा किंवा ऋतुसमाप्तीचा कालावधी प्रत्येकीसाठी वेगवेगळा असू शकतो तसंच त्याचे अनुभवही. ऋतुसमाप्तीच्या या संक्रमण काळात शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सामोरं जाताना हा काळ आनंदाने साजराही करायला हवा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘डॉक्टर, मला दोन मुली आहेत आणि माझे वय सदतीस वर्षं आहे. पहिल्यापासून माझी मासिक पाळी नियमित होती. एक दिवससुद्धा मागे-पुढे होत नसे. हल्ली मात्र दोन-दोन महिने पाळीच येत नाही आणि आली तरी खूप कमी रक्तस्राव होतो. म्हणजे माझा मेनोपॉजचा (ऋतुसमाप्ती- रजोनिवृत्ती) काळ सुरू झाला आहे का?’’ मनीषा विचारत होती. तिच्यासोबत तिची मैत्रीण गीता आली होती. तिच्याकडे निर्देश करत ती म्हणाली, ‘‘ही माझी मैत्रीण, पन्नाशी सुरू झालीय पण तिची मासिक पाळी अद्याप सुरूच आहे. मेनोपॉज सुरू होण्याचं वय नेमकं कोणतं असतं? आता माझं वजन वाढायला लागणार का? अशक्तपणा वाढेल का?’’ तिचे प्रश्न सुरू झाले…
मनीषाची काळजी मी समजू शकते. कोणत्याही उपचारापेक्षा प्रथम सगळ्या शंका दूर होणं हे तिच्यासाठी महत्त्वाचं होतं. म्हणून तिला सांगायला सुरुवात केली, ‘‘अगं जसं कोणाची उंची किती असावी, रंग कसा असावा, केस कुरळे असावेत की सरळ असावेत हे आपल्या हातात नसतं, तसंच मासिक पाळी कुणाची कधी थांबेल याचं काही एक निश्चित वय ठरलेलं नसतं. प्रत्येकीची ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्तीदरम्यानची वयोमर्यादा वेगवेगळी असते. मासिक पाळी जर सलग १२ महिने आली नाही, तर ऋतुसमाप्तीचा कार्यकाळ सुरू झाला, असं म्हटलं जातं. साधारणत: ४५ ते ५० वर्षांच्या मागे-पुढे पाळी थांबेल हे गृहीत धरलं जातं. पण तसा काही नियम नाही अलीकडे तर काही जणींची तिशीत, तर काही जणींच्या बाबतीत पन्नाशीच्या पुढेसुद्धा हा कार्यकाल जाऊ शकतो. आणि हे नैसर्गिक आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं, ताण घेण्याचं कारण नाही.’’
ऋतुसमाप्तीचा कार्यकाळ हा स्त्रियांच्या आयुष्यातील संक्रमणाचा काळ आहे. ती काही एका रात्रीत घडणारी प्रक्रिया नसून काही वर्षं सुरू असते. मासिक पाळी कधी थांबेल हे मुलगी आईच्या पोटात असतानाच, गर्भावस्थेतच ठरलेलं असतं. कारण तिच्या शरीरातली स्त्रीबीज संख्या ही त्या वेळीच निश्चित होते. अर्थात पुढच्या काळात काही बाह्य गोष्टींचासुद्धा त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, जसं की सिगरेट ओढण्याचं प्रमाण, काही औषधं, रेडिएशन आणि किमोथेरपी या गोष्टी स्त्रीबीजांची संख्या कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतात.
शरीरातील ‘इस्ट्रोजन’ आणि ‘प्रोजेस्ट्रॉन’ या संप्रेरकाचं प्रमाण कमी होऊ लागल्यामुळे शरीरात काही बदल घडून येतात. ज्यामध्ये हॉट फ्लॅशेस, हाडांचा ठिसूळपणा, योनीमार्गाची शिथिलता आणि त्यामुळे कधी तरी उद्भवणाऱ्या लघवीच्या तक्रारी जाणवू शकतात. कामप्रेरणा कमी होण्याची शक्यता असते. चिडचिड वाढू शकते, विसरभोळेपणा जाणवू शकतो. पण व्यवस्थित आहार, व्यायाम आणि औषधोपचार यामुळे या सर्व गोष्टींवर मात करता येते आणि अगदी व्यवस्थित निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगता येऊ शकतं. हे सांगितल्यावर मनीषा मानसिकदृष्ट्या सैलावल्यासारखी वाटली.
हे सगळ्याच स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं असतं. मासिक पाळी संपत येण्याच्या काळात म्हणजे साधारण चाळिशी-पंचेचाळिशीनंतर आहारामध्ये जाणीवपूर्वक हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्यं, दूध, दही, फलाहार तसेच सोयाबीन, जवस, आळशी अशा पदार्थांचं सेवन करणं महत्त्वाचं असतं. योगासनं, प्राणायाम आणि शारीरिक व्यायाम यामध्ये कितीही व्यग्र असलात तरीही वेळ काढणं महत्त्वाचं असतं. या काळात अनेकदा काही स्त्रियांना माती, खडू किंवा पेन्सिल खावंसं वाटणं किंवा पायाची बोटं वाकडी होणं, पोटऱ्यांमध्ये गोळे येणं ही सर्व शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणं आहेत. त्यासाठी वरील सर्व उपाययोजनांबरोबरच कॅल्शियमच्या गोळ्यांचं सेवन आणि जीवनसत्त्व ‘डी’ घेणं अत्यावश्यक ठरतं. कारण याच वयात ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचा धोका आणि त्यामुळे फ्रॅक्चर होण्याचा धोकादेखील उद्भवतो. ते टाळण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. अर्थात हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानं होणं आवश्यक असतं.
बऱ्याचदा माझ्या मैत्रिणीला काही विशिष्ट गोळ्यांनी बरं वाटलं म्हणून मीसुद्धा त्या गोळ्या घेते आहे, असं काही जणी सांगतात. ते पूर्णत: चुकीचं असून अशा गोळ्यांचे दुष्परिणाम असतात. त्या गोळ्यांची प्रत्येक रुग्णाची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे माहितीजालाच्या- इंटरनेटच्या सल्ल्याने किंवा स्वत:च्या मनाने औषध घेण्याचं टाळायला हवं.
ऋतुसमाप्ती ही जशी नैसर्गिक वा त्या त्या स्त्रीच्या वयानुसार येते तशी ती गर्भाशय काढण्यानेही होऊ शकते. काही समस्यांमुळे स्त्रियांना शस्त्रक्रियेद्वारा ( थेट शस्त्रक्रिया किंवा दुर्बिणीद्वारे) गर्भाशय काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्या वेळी आपसूकच तुमची मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होते. मात्र तो सल्ला डॉक्टर अगदी शेवटचा उपाय म्हणून देतात.
४२ वर्षांच्या सारिकाची तक्रार होती, सलग पंधरा दिवस रक्तस्राव सुरू असल्याची, इतका की दिवसाला सात ते आठ पॅड्स बदलावे लागत होते, गाठीही जात होत्या. आणि तिला प्रचंड थकवाही जणवत होता. तिची सोनोग्राफी केली असता गर्भाशयात ३-४ फायब्राइडच्या गाठी असल्याचं निदर्शनास आलं. त्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय काढून टाकणं हा उपाय होता. जेव्हा सारिकाला हे सांगितलं तेव्हा ती अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. कारण कुणाही व्यक्तीला शस्त्रक्रियेचं भय वाटतंच, विशेषत: आयुष्यात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया होणार असेल तर नक्कीच. थोडं सावरल्यानंतर मात्र तिची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली…
कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया करावी, हे रुग्णाचं वय, त्यांच्या तक्रारी आणि इतर सर्व रिपोर्ट्स बघूनच ठरवावं लागतं. प्रत्येक रुग्ण वेगळा. त्याच्या गरजेप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. पण जेव्हा गर्भाशय काढण्याचा निर्णय होतो, त्या वेळेला त्याला जोडून असणारे दोन बीजांडकोश (ovaries) काढायचे की नाहीत हा महत्त्वाचा निर्णयदेखील त्या त्या वेळेनुसार आणि गरजेनुसार घ्यावा लागतो. त्यासाठी रुग्णाचं समुपदेशन करणंही गरजेचं ठरतं. नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेमुळे आलेला ऋतुसमाप्तीचा कार्यकाळ असो, दोन्ही बाबतीत सारखीच काळजी घ्यावी लागते.
सारिकाचा मला प्रश्न होता, ‘‘डॉक्टर गर्भाशय काढून टाकलं, तर मला अशक्तपणा येईल का? मी असं ऐकलंय, गर्भाशय हे सगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण करत असते. हे खरं आहे का?’’
मी – ‘‘हे कोणी सांगितलं?’’
सारिका – ‘‘मैत्रिणीने.’’
मी – ‘‘ती डॉक्टर किंवा संशोधक आहे?’’
सारिका – ‘‘नाही.’’
मी – ‘‘ मग कशाच्या आधारावर ती सांगते आहे, हे तरी विचारलंस का?’’ आपण सगळ्यांनीच ही सवय लावून घ्यायला हवी. प्रत्येक गोष्ट जी आपण ऐकतो, वाचतो त्याच्या पाठीमागचं सत्य आणि कारणमीमांसा जाणून घ्यायला हवी. अगदी गरज पडली आणि गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागली तरी पूर्णपणे सामान्य आयुष्य आपण जगू शकतो. तसे उपचार आजच्या काळात उपलब्ध आहेत. त्यामुळे नीट काळजी घेतली तर शस्त्रक्रियेमुळे शरीरावर काहीही दुष्परिणाम होणार नाहीत याची खात्री बाळगायला हवी. त्यासंबंधी स्वत:ची कशी काळजी घ्यायची, याविषयीचं समुपदेशन डॉक्टर करतच असतात. पण प्रत्येक स्त्रीने आपल्या सर्व शंकांचं निरसन शस्त्रक्रियेला तयार होण्यापूर्वी करून घ्यायला हवं.
काही गमतीशीर अनुभवही आमच्या वैद्याकीय व्यवसायात सर्रास येतात, अर्थात त्यामागे असतं ते अज्ञान आणि ते जाणकारांकडून दूर करता येतं याचीही जाणीव नसणं. पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या काही गोष्टी तशाच्या तशा अमलात आणल्या जातात. ‘दोन वर्षं झाली डॉक्टर मासिक पाळी येणं बंद झालं होतं, पण मागच्या आठवड्यात बाजरीची भाकरी खाल्ली म्हणून परत रक्तस्राव सुरू झाला. गरम पडते ना ती.’ असं सांगत येणाऱ्या स्त्रियांची संख्या काही कमी नाही. तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेलात तर उत्तमच, स्वत:च त्याचा अर्थ लावून उपाय करणं घातकी ठरू शकतं. कारण बराच काळ थांबलेली पाळी जर अचानक सुरू झाली तर ती अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी, अंगावर काढण्यासारखी नाही. किंबहुना ती एखाद्या कर्करोगासारख्या आजाराची पूर्वसूचनादेखील असू शकते. मासिक पाळी बंद झाल्यानंतर काही कारणाने परत रक्तस्राव सुरू झाला किंवा शारीरिक संबंधांनंतरसुद्धा जर काहीसा लाल स्राव गेलेला दिसला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेणं अत्यावश्यक असतं. तपासणीदरम्यान जर काही काळजी न करण्यासारखं निघालं नाही तर उत्तमच. किरकोळ औषधोपचारानं त्याचा इलाज होऊ शकतो. पण कर्करोगासारख्या आजाराचं निदान झालं तर त्यावर लवकरात लवकर औषधोपचार सुरू करून आजारातून बरं होण्याची शक्यता फार जास्त असते.
चाळिशीनंतर सर्वच स्त्रियांनी आणि विशेषत: कुटुंबात किंवा आधीच्या पिढीतील कुणामध्ये जर स्तनाच्या किंवा गर्भाशयाच्या आजाराची नोंद असेल, तर त्या स्त्रियांनी वर्षातून एकदा मॅमोग्राफी (स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेली एक्स-रे तपासणी), पॅप स्मिअर (गर्भाशयाच्या मुखाची तपासणी) तपासणी करून घेणं गरजेचं असतं. स्वत:कडे दुर्लक्ष न करता लक्षात राहण्याच्या दृष्टीने सोयीचं ठरावं म्हणून दरवर्षी स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी ठरवून (नियम करून) या तपासण्या करून घ्याव्यात. वर्षातून एखाद-दोन साड्या किंवा ड्रेस किंवा घरासाठीची वस्तू घेतली नाही तरी चालेल, पण आरोग्याच्या दृष्टीने अशा तपासण्या करून घेणं हे आजाराचं निदान लवकर होण्यासाठी उपयुक्त असतं.
वर म्हटल्याप्रमाणे, ऋतुसमाप्ती किंवा मेनोपॉजनंतर सगळ्या अडचणी किंवा व्याधी प्रत्येकीला सारख्याच प्रमाणात जाणवतील असं नसतं. काही जणींना हॉटफ्लॅशेससारख्या गोष्टींचा अतोनात त्रास होऊ शकतो, तर काहींना पाळी कधी थांबली याचा पत्तादेखील लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या तक्रारीनुसार त्याची दखल घ्यावी लागते. ‘हॉटफ्लॅशेस’ म्हणजे अचानक चेहरा आणि मानेचा भाग गरम होणे, कानाच्या पाळ्या गरम होणे, छातीत धडधड जाणवणे, घाम येणे. प्रत्येक स्त्रीमध्ये या लक्षणांची वारंवारता आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते. काही महिन्यांपासून ते काही वर्षांपर्यंत या तक्रारी राहू शकतात. यावर अगदी घरगुती ते ‘हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी’पर्यंत उपचार उपलब्ध आहेत. अर्थात या औषधोपचारांचे परिणाम धोकादायक असल्यामुळे ते कायमस्वरूपी आणि बऱ्याच कालावधीपर्यंत चालू ठेवता येत नाहीत हे लक्षात घ्यायला हवं.
मेनोपॉज किंवा ऋतुसमाप्ती किंवा त्यानंतरच्या कार्यकाळाचं आजच्या काळात महत्त्व वाढलेलं जाणवतं, कारण उपलब्ध असलेल्या आधुनिक वैद्याकीय सुविधांमुळे स्त्रियांची वाढलेली आयुमर्यादा. त्यासाठी सर्व सुविधांचा उपयोग करून घेणं महत्त्वाचं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की मासिक पाळी थांबणं म्हणजे काही स्त्रीत्व संपुष्टात येणं नव्हे. पाळी येणं हा स्त्रीत्वाचा फक्त एक भाग आहे. म्हणूनच शरीरातील हे संक्रमण साजरं करायलाही शिकायला हवं, आपल्याच वयातल्या अशा मैत्रिणींबरोबर एकत्र येऊन, धमाल करून…
savitamohiterbk@gmail.com