डॉ. स्मिता प्रकाश जोशी
आज घटस्फोट घेणं जोडप्यांसाठी फार कटुतेचं राहिलेलं नसलं तरी त्यांच्या मुलांना मात्र आयुष्यभरासाठी त्याचा भार वाहावा लागतो. वेळेची अवास्तव मागणी करणारं करिअर-नोकरी करणाऱ्या या आई-वडिलांना अनेकदा आपल्या या लहान मुलांची जबाबदारी घेणं शक्य होत नाही त्यातून मुलांच्या पालकत्वाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे, तर कधी आई, बाबा यातील एकाचाच स्वीकार मुलांसाठी कठीण ठरतो आहे. तर कधी या मुलांचा जोडीदारावर सूड उगवण्यासाठी ‘शस्त्र’ म्हणून केला जाणारा उपयोग मुलांवरच मानसिक परिणाम करणारा ठरतोय.
सुरक्षित बालपण न मिळाल्याने पुढे जाऊन या मुलांमध्ये चोरी करणं, खोटं बोलणं, नैराश्य आदी वर्तन समस्याही निर्माण होत आहेत. आई-बाबांच्या भांडणात मुलांचं न भरून येणारं नुकसान टाळता येईल का?
‘‘सोनू, केस विंचरून घेतेस? मी तुझा डबा भरतो.’’ सोनूचं अंग पुसताना महेश तिला, लेकीला सांगत होता.
‘‘बाबा, प्लीज आज तूच केस विंचर ना.. माझ्याकडून केस चांगले बसत नाहीत. मग सगळया मुली मला हसतात.. प्लीज!’’
सोनूच्या या अगतिक बोलण्यानंतर तो म्हणाला, ‘‘बरं! तू विंचरायला तर सुरुवात कर, मी तुझा ब्रेकफास्ट घेऊन येतो. स्कूलबस यायला फक्त दहा मिनिटं राहिलीत आता. आपल्याला लवकर आवरायला हवं.’’ महेशनं ब्रेडचे टोस्ट आणि दूध सोनूला दिलं. तिचे केस नीट बसवून हेअरबँड लावून दिला. तेवढयात स्कूलबस आली. तिला ‘बाय’ करून तो पुन्हा स्वयंपाकघराकडे वळला. स्वत:चं आवरून सोनूची ‘डे केअर’ची बॅग भरून ठेवली. संध्याकाळी ऑफिसमधून येताना आणाव्या लागणाऱ्या सामानाची यादी करून घेतली. सोनूची बॅग ‘डे केअर’मध्ये पोहोचवून त्याला दहाच्या आत ऑफिस गाठायचं होतं. ‘आज बुधवार.. म्हणजे संध्याकाळी सोनूचा स्विमिंगचा क्लास. नंतर नृत्यस्पर्धेची तयारी. म्हणजे रात्री साडेआठ वाजणार..’ दिवसभराचं प्लॅनिंग त्याच्या मनात चालू होतं.
मनीषापासून विभक्त झाल्यानंतर सोनूची सर्व जबाबदारी महेश एकटाच पार पाडत होता. दोघांचा घटस्फोट होऊन एक वर्ष झालं होतं. मनीषा व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करणारी. उच्चशिक्षित आणि आधुनिक विचारांची. तर महेश सरकारी नोकरी करून सरळसोट जीवन जगणारा. ‘पुरुष आणि स्त्री’ यांची पारंपरिक चौकट जपणारा नसला, तरी कौटुंबिक जबाबदारी आणि करिअर हातात हात घालूनच जातात, या विचारांचा तो होता. अशातच मनीषाला परदेशी नोकरीची संधी आली. घर आणि सोनूला सांभाळून तिनं भारतातच करिअर करावं, असं महेशचं म्हणणं होतं. परंतु मनीषाला ही महत्त्वाची संधी दवडायची नव्हती. तिनं परदेशी जाण्याचं ठरवलं. या मतभेदांतच उभयतांचा घटस्फोट झाला. सोनूची जबाबदारी घेणं मनीषाला शक्य नव्हतं, म्हणून महेशनं तिचा ताबा स्वत:कडे घेतला. नोकरी, घर आणि सोनू ही सर्कस तो आज सांभाळत आहे. सोनूची आई आणि बाबा या दोन्ही भूमिका पार पाडत आहे. आई मुलांसाठी जे जे करते, ते सारं कितीही त्रास झाला तरी करायचं, त्यासाठी कोणाची मदत घ्यायची नाही, असं त्यानं ठरवलंय.
बदलत्या काळात बदलती जीवनशैली रुजत असताना आता घटस्फोट हा ‘कलंक’ (टॅबू) राहिला नसून एक पर्याय झाला आहे. एकमेकांचं जमत नसेल, तर एकमेकांवर उगाच चिखलफेक करत बसण्यात अर्थ नाही. अशा प्रकरणांत परस्परांच्या कडवट आठवणींशिवाय आता आपल्यात काही राहिलेलं नाही, हे दोघांच्याही लक्षात यायला लागतं. म्हणून विभक्त होण्याचा ‘समंजस स्वीकार’ करण्याचा मार्ग निवडण्याचं प्रमाण वाढतंय. परंतु मूल असेल तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? हा प्रश्न महत्त्वाचा असतो. आई आणि वडील हे मुलांचे नैसर्गिक पालक असतात, परंतु विभक्त होताना मुलांना आईची गरज अधिक असते. वयाच्या पाच वर्षांपर्यंत तरी मुलांचा ताबा आईकडेच असावा, असं कायद्यात नमूद केलेलं असलं आणि बऱ्याच वेळा मुलांचा ताबा आईकडेच राहात असला, तरी आता यामध्येही काळानुरूप बदल होत आहेत. वेळेची अवास्तव मागणी करणारं करिअर करताना मुलांचा सांभाळ करणं अवघड होईल, हे लक्षात आल्यावर मुलं जोडीदारकडे सुपूर्द करण्याचा समंजसपणा स्त्रियाही दाखवू लागल्या आहेत.
मात्र हे सामंजस्य मुलांना वाढवताना तितकंस दिसत नाही. वरच्या महेश आणि मनीषाच्याच घटनेत मनीषा करिअरसाठी विभक्त झाली असली, तरी तिनं सोनूला आपल्या आयुष्यातून वजा केलं नव्हतं. तिच्या मनात अपराधीपणाची भावना येई, सोनूशी बोलावंसं वाटे. सोनूलाही व्हिडीओ कॉलवर आईशी बोलून बरं वाटायचं. पण बाबाच्या समोर जेव्हा ती आईबद्दल काही बोलायची, तेव्हा मात्र महेश त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायचा नाही. जणू त्याचा आणि मनीषाचा आता काहीही संबंध उरलेला नव्हता. आपला प्रेमळ बाबा असं का वागतो, असा प्रश्न तेव्हा सोनूला पडायचा. आईची आठवण तिला अस्वस्थ करत असे. खरं तर आई-बाबा होण्याचा अनुभव हा अत्यंत विलक्षण आणि कृतार्थ करणारा असतो. स्त्री पुरुषांच्या सहजीवनाचे संदर्भ बदलवून टाकण्याची क्षमता या घटनेत असते. नवी दृष्टी, नवं कारण आणि आई-बाबा म्हणून निर्माण होणारं नवं नातं आयुष्यालाच वेगळं वळण देतं. दोघांच्या नात्यातला दुरावा, तुटकपणा हे बाळ सहज मिटवू शकतं. आपलं बाळ हा आपलाच एक अंश आहे, याची जाणीव खूप सुखावह असते. दोघांनाही त्याच्यावर भरभरून प्रेम करायचं असतं. पण जेव्हा कोणत्याही कारणानं पती आणि पत्नी दोघांमध्ये मतभेद होतात आणि विभक्त होण्याचीच वेळ येते, तेव्हा ते ‘आपलं बाळ’ न राहता दोघंजण त्यावर स्वतंत्र हक्क सांगण्याचा प्रयत्न करू लागतात. माझ्या मुलाला माझीच किती गरज आहे आणि मीच त्याचं भविष्य कसं चांगलं करू शकते किंवा शकतो, हे दोघंही सांगू लागतात. मुलांसाठी न्यायालयात रस्सीखेच चालू होते. मुलांचा ताबा मागणं, मुलांची भेट मागणं, यासाठी दावा दाखल केला जातो. पालक म्हणून मीच कसा योग्य आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातो. जोडीदारावर सूड उगवण्यासाठी मुलांचा ‘शस्त्र’ म्हणूनही उपयोग केला जातो. जोडीदाराचा वीक पॉइंट मूल आहे, हे ओळखून त्याच्या माध्यमातून जोडीदाराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. मुलाचा ताबा न देणं, मुलांची भेट नाकारणं, मुलांना दिलेल्या वस्तू न घेणं इ. घटस्फोटाची केस न्यायालयात चालू असताना पालक स्वत:च असुरक्षित असतात. आपलं सर्वस्व हरवतंय असं त्यांना वाटत असतं. मग जे हातात आहे, ते तरी हरवू नये असा प्रयत्न चालू राहतो.
आई-वडिलांच्या अशा वादात खरं तर मूल खूप गोंधळलेलं असतं. कोणाचं चूक-कोणाचं बरोबर हे त्याला कळत नाही. मुलं अगदी लहान असोत किंवा टीनएजर असोत.. नक्की आपल्याला कुणाकडे राहायचं आहे? किंवा कुणाकडं राहावं लागणार आहे? याबाबत ती अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्याला सतत असुरक्षित वाटत असतं. मूल आईकडे असेल, तर आपण आपल्या बाबांकडे का जायचं नाही? आणि बाबांकडे असेल, तर आईकडे का जायचं नाही? याची समाधानकारक उत्तरं मुलांना कधीच मिळत नाही. आपल्या इतर मित्रांचे आई-बाबा त्यांच्यासोबत असतात, पण आपल्याला मात्र कुणा एकाकडेच राहावं लागतं आहे, हे दु:ख त्यांच्या मनात असतंच. मुलं ही गोष्ट बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या मनात खूप काही चालू असतं.
अनया आणि अभिषेक यांच्यातील वाद अगदी किरकोळ गोष्टींवरून वाढत गेले. दोघांनी विभक्त होण्याचं ठरवलं. अनयानं त्यांच्या मुलीला- गार्गीला स्वत:कडं ठेवून घेतलं आणि अभिषेकला तिची भेट देण्याचंही नाकारलं. कोर्टकचेऱ्यांतून सुटका हवी म्हणून अभिषेकनं स्वत:च्या मनावर दगड ठेवून याला होकार दिला. गार्गीला अनया अतिशय उत्तम पद्धतीनं वाढवत होती. काहीही कमी करत नव्हती. पण गार्गीच्या मनात तिच्या बाबाला भेटण्याची भूक अपुरीच राहिली. तिच्या शाळेत एकदा ‘फादर्स डे’च्या निमित्तानं मुलांना बाबांना शाळेत घेऊन येण्यास सांगितलं होतं. तेव्हा गार्गीनं तिच्या बाबाला लिहिलेलं एक पत्र अनयाच्या हाती लागलं. ‘प्रिय बाबा,
आज माझ्या शाळेत ‘फादर्स डे’ आहे. सगळया मुलांना बाबांना घेऊन शाळेत बोलावलंय. मलाही तुला माझ्या शाळेत बोलवायचं आहे, तुला भेटायचंय. सारं काही तुला सांगायचंय. पण तू कुठे आहेस? मी आईला विचारलं, तर ती म्हणते की तुझा बाबा हरवलाय. कुठे गेलास तू आम्हाला सोडून? मला आठवतंय, तुझी आणि आईची खूप भांडण झाली आणि नंतर तू निघून गेलास. आम्हाला कोर्टातही जावं लागलं होतं. आईबरोबर मीपण येत होते. नंतर आई आणि मी आजीकडे राहू लागलो. माझ्या सगळया मैत्रिणी आई-बाबांबरोबर फिरायला जायच्या, तेव्हा वाटायचं, किती लकी आहेत या! त्यांना आई-बाबा दोघंही मिळावेत. मामा-मामी जेव्हा मला फिरायला घेऊन जातात, तेव्हा खूप मजा येते. पण तुझी आठवण येतेच रे! शेवटी बाबा तो बाबा असतो. आजी-आजोबा, मामा-मामी, आई सगळेजण खूप लाड करतात माझे. मला हवं ते देतात. पण मला हवाय माझा बाबा. तो मला मिळतच नाही. आपण सगळे एकत्र राहात होतो, तेव्हा आई, तू आणि मी आपण मस्त फिरायला जायचो, खूप मज्जा करायचो. तू माझ्याशी खूप खेळायचास. गोष्ट सांगून मला झोपवायचास. लपाछपीसुद्धा खेळायचास. ‘तू माझी परी आहेस,’ असं म्हणायचास. किती वेळा तू माझ्या स्वप्नात आलास, पण प्रत्यक्ष समोर कधीच आला नाहीस. कोर्टातून येताना आईनं सांगितलं, की ‘आता बाबाची आठवण काढायची नाही. आता मीच तुझी आई आणि मी तुझा बाबा.’ आणि खरंच आईनं तुझ्यासारखं सगळं केलं. पण मला तुझी आठवण येतेच. तुझं नाव काढलं की आई म्हणते, ‘तोच तुला सोडून गेला.’ मग मी तुझं नाव काढणं बंद करून टाकलं. पण मनातल्या मनात वाटायचं, तू कसा असशील? कुठे असशील? तू असं का केलंस? आम्हाला सोडून का गेलास? भांडण तुझं आणि आईचं होतं ना? मग मी काय केलं होतं रे? शाळेतल्या मैत्रिणी काहीही बोलतात. म्हणतात, की ‘हिला बाबा नाही.’ मग मी चिडते, त्यांच्याशी भांडते. सांगते, की माझा बाबा परत येणार आहे. खरंच येशील का तू?’ गार्गीनं आपली ओढ व्यक्त करत मन मोकळं केलं होतं.
(मुलांच्या मनात दोन्ही पालकांबद्दलची ओढ ही नैसर्गिक असते. दोघांशिवाय मूल अपूर्णच असतं. ज्या पालकांकडे मूल राहिलेलं आहे, त्यानं दुसऱ्या पालकांबद्दल कितीही वाईट गोष्टी भरवून देण्याचा प्रयत्न केला, तरीही ) मुलांच्या अंतर्मनात ती ओढ कायम असते. म्हणूनच ‘आई’ आणि ‘वडील’ ही मुलांच्या मनातली प्रतिमा डागाळण्याचा कधीही प्रयत्न करू नये.
आई-वडिलांच्या वादाचा परिणाम मुलांच्या वर्तनावर होतो. त्यातून मुलांमध्ये अनेक वर्तन समस्या निर्माण होण्याची उदाहरणं दिसतात. पाच वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या मुलांमध्ये अंगठा चोखणं, अंथरुण ओलं करणं, नखं कुरतडणं, खेळण्यांची-वस्तूंची नासधूस करणं, आदी समस्या असतात. ६ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये भीती वाटणं, हट्टीपणा, खोटं बोलणं, चोरी करणं, गुन्हेगारी प्रवृत्तीची कृत्य करणं, तसंच मोबाईल किंवा व्हिडीओ गेम, टीव्ही आदींचं व्यसन, अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. इतकंच नाही तर, १५ ते १८ वयोगटातल्या मुलांमध्ये बदला किंवा सूड घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. घरातून हवं तसं प्रेम न मिळाल्यामुळे प्रेमाच्या शोधात चुकीचे निर्णय घेणं, प्रवाहाच्या विरुद्ध वागणं, सतत स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणं आदी समस्या निर्माण होऊ शकतात. काही मुलांच्या मनात आत्महत्येसारखे विचारही येतात. मुलांच्या ताब्याबाबत केस चालू असताना आपल्यामुळेच आई-वडिलांमध्ये भांडण होतात, असा समज निर्माण होऊन त्यातून मुलांमध्ये अनेक वर्तन समस्या निर्माण होण्याची उदाहरणं दिसतात. नैराश्य, स्वत:बद्दलचा द्वेष, आदी मानसिक समस्यांनाही ते बळी पडू शकतात. कौटुंबिक न्यायालयातल्या अशाच एका प्रकरणात एका मुलानं आत्महत्या केल्याचं उदाहरण आहे. काही वेळा मात्र मुलं अगदीच शहाण्यासारखी वागतात. आपले पालक एकटेपणानं आपल्याला वाढवत आहेत आणि त्यांना कधीही दुखवायचं नाही, या विचारानं ते झपाटलेले असतात. त्यांचं बालपणच हरवून जातं. अकाली प्रौढत्व येतं. अशा मुलांना लहानपणी नाही, परंतु भविष्यकाळात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
कायदा व न्यायालयाच्या दृष्टीनं आई-वडिलांमधल्या भांडणापेक्षा मुलांचं हित जपणं, त्याला निकोप वाढीची संधी देणं, संरक्षण देणं, याला सर्वोच्च महत्त्व असतं. त्यामुळे मुलांच्या ताब्याबाबत विचार करताना एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी आणि परिस्थितीचा विचार करण्यासाठी समुपदेशकांची मदत घेतली जाते. मुलांसाठी काय योग्य ठरेल याचा विचार केला जातो. काही वेळेस मुलांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाकडून एखाद्या वकिलाची वकील मित्र म्हणून नेमणूक केली जाते. दोघांच्या भांडणात मुलांचं नुकसान होऊ नये, म्हणून काही प्रकरणांत दोघांकडेही मुलांचा ताबा न देता न्यायालय त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारतं. अशा वेळी मुलांसाठीच्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेत अथवा वसतिगृहात मुलांना ठेवलं जातं.
मुलं ही कोणा एकाची संपत्ती नाही. मुलांना आई-वडील आणि त्यांचे सर्व नातेवाईक, यांचा सहवास मिळण्याचा हक्क आहे. म्हणूनच मुलांचा ताबा कुणा एकाकडे राहिला, तरी त्याच्या पालकत्वाची जबाबदारी दोघांनीही घ्यावी. यासाठी ‘संयुक्त पालकत्व’ ही संकल्पना न्यायालयात रुजवली जात आहे. उच्च न्यायालयानं यासाठी काही मार्गदर्शक तत्वं ठरवून दिली आहेत. मूल दोघांकडेही राहू शकतं, फक्त केव्हा कुणाकडे राहणार, हे दोघांनीही ठरवून घ्यावं. त्याची जबाबदारी दोघांनी संयुक्तरित्या घ्यावी. शाळा, करिअर आणि भविष्यातील निर्णय दोघांनी मिळून घ्यावेत, यासाठी दोघांची मानसिक तयारी करून घेतली जाते.
प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र विचारांची असते. त्यामुळे ‘पटलं तर टिकवा, नाहीतर मिटवा’ ही संस्कृती विकसित होत असताना घटस्फोट हा पर्याय सहज स्वीकारला जात आहे. फक्त याचा मुलांवर परिणाम होणार नाही आणि स्वत:च्या स्वार्थासाठी मुलांना पणाला लावलं जाणार नाही, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी. पती-पत्नी म्हणून नातं संपुष्टात आलं, तरी आपण आयुष्यभर मुलांचे आई-वडील असणार आहोत, हे जेव्हा उभयतांच्या पचनी पडेल, तेव्हा मुलांच्या मनातली असुरक्षिततेची भावना नक्कीच विरून जाईल. त्यांना आई आणि बाबा दोघांचंही प्रेम मिळेल.
(लेखातील उदाहरणे वास्तवातील असून ओळख उघड होऊ नये म्हणून नावे दिलेली नाहीत.)
( लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smitajoshi606@gmail.com