शारदा साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्याचा किंवा मुक्तीचा विचार करताना कुठला तरी एकच एक पैलू घेऊन काम करता येणार नाही. सर्वच प्रकारच्या विषमतेच्या आणि दुय्यमत्वाच्या प्रश्नांवर एकाच वेळी काम करावे लागेल.

आयुष्य उतरणीला लागल्यानंतर उमेदीच्या वर्षांमधल्या आठवणी जागवणे आणि त्या डोळ्यासमोर चेहरा नसलेल्या लोकांना सांगणे ही एक मोठीच आव्हानात्मक बाब आहे. भूतकाळ कितीही कष्टदायी असला, तरी तो वर्तमानकाळातून मागे डोकावून पाहताना रम्यच वाटतो, पण स्वातंत्र्योत्तर काळात वाढलेल्या आमच्या पिढीने स्वातंत्र्याचा जो विकास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला त्याला केवळ स्त्रीवादी विचारांची मोजपट्टी लावून चालणार नाही. स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरताना म्हणजे १९४७ ते १९५२ या काळात अगदी बालवयात आमच्या पिढीने कधी कुणाची जातपात विचारली नाही की सांपत्तिक श्रेष्ठत्वाचे पलिते मिरवले नाहीत. नवस्वतंत्र राष्ट्राच्या नवोदयाचे ते दिवस होते. भारतीय संविधानाप्रमाणे सर्व प्रकारच्या भेदाभेदांना बाजूला सारून म्हणजे जातपात, धर्म, लिंग आदी भेदाभेद बाजूला ठेवून अंतर्बाह्य समानता सांगणारा व अनुभवणारा, विविधतेने नटलेला आणि तरीही एकात्म समाज घडवण्याची प्रक्रिया आमच्यात कळत-नकळत रुजली होती. माझ्या मनाने तर चळवळ म्हणजे काय हे माहीत नसतानाही दोन-तीन गोष्टी घोळवल्या होत्या.

एक म्हणजे नोकरी करायची नाही. पैसे कमवायचे नाहीत आणि चळवळीत सामील व्हायचे. तेव्हा मॅट्रिक झाल्यावर रीतसर पदवी घेऊन नोकरी केली असती, तर आज मला भरगच्चनिवृत्तिवेतन मिळाले असते, पण गेल्या ६०-६५ वर्षांत हा विचारसुद्धा माझ्या मनाला कधी शिवला नाही आणि आपल्या निर्णयाचा कधी खेदही वाटला नाही. इथे उल्लेख अशासाठी की, आज जो मध्यम वर्ग स्वातंत्र्योत्तर काळात काहीच झाले नाही म्हणून गळे काढतो आहे तो स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गरीबच होता. आणि आज त्याला गाठीशी असलेला पैसा कुठे आणि कसा खर्च करावा, असा प्रश्न पडतो आहे. गरिबीत जे मनाला समाधान मिळायचे ते पैशाच्या चळतीवर लोळूनसुद्धा मिळेनासे झाले आहे, याचा अर्थ असा नव्हे की गरिबी चांगली. (हा या लेखाचा विषय नाही) पण स्त्रीमुक्ती चळवळीकडे मी कशी वळले आणि आताही चळवळीत काम करत असताना कोणत्या मनोभूमिकेने सर्व घटनांचे परिशीलन करण्याच्या प्रयत्नात आहे हे कळावे म्हणून हा प्रपंच. असो.

१९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन, महिना, वर्ष आणि नंतर दशक जाहीर झाल्यावर स्त्रियांच्या परिस्थितीविषयी देशोदेशीच्या सरकारांनी संयुक्त राष्ट्रसंघाला देशातील स्त्रियांची स्थिती काय आहे याचे अहवाल सादर केले. भारताचा पहिला अहवाल इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत सादर झाला. तो अहवाल देशातील विद्वान, चळवळीत योगदान देणाऱ्या स्त्री कार्यकर्त्यांनी तयार केला होता, त्यातून व्यक्त होणारे विचार आणि वस्तुस्थिती याचा विचार करायला प्रवृत्त केले. त्यापूर्वीही आम्ही अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी काम करतच होतो. त्या सर्वाला एक प्रकारे स्त्रीत्वाशी निगडित असे वेगवेगळे आयाम आम्हाला प्रकर्षाने जाणवायला लागले. अधिक खोलात शिरायचा प्रयत्न केला तर असे लक्षात आले की, स्त्रियांना राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक अशा सर्व बाजूंनी पिळवणुकीला सामोरे जावे लागते. पुरुषही पिळवणुकीतून मुक्त होत नाहीत, पण स्त्रियांना पितृसत्ताक समाजरचनेमध्ये स्त्री म्हणून स्त्रीत्वाशी म्हणजेच लिंग आणि लैंगिकतेशी निगडित अशा दुय्यमत्वाशी सामना करावा लागतो. तेव्हा स्वातंत्र्याचा किंवा मुक्तीचा विचार करताना कुठला तरी एकच एक पैलू घेऊन काम करता येणार नाही. सर्वच प्रकारच्या विषमतेच्या आणि दुय्यमत्वाच्या प्रश्नांवर एकाच वेळी काम करावे लागेल.

१९५०च्या संविधानाने राजकीय समानता स्त्रियांना विनासायास मिळाली. त्याला अर्थातच स्त्रियांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कारणीभूत होते. त्या वेळीही स्त्रियांनी महात्मा गांधीजींचेही न ऐकता मिठाच्या सत्याग्रहात भाग घेऊन आणि अंगावरचे दागिने चळवळीला दान करून आपले वैचारिक आणि आत्मिक सामर्थ्य सिद्ध केले होते.

नंतरच्या काळातील स्त्रीमुक्ती चळवळीने स्त्रीत्वाच्या दुखण्यावर नेमके बोट ठेवून पितृसत्ताक समाजव्यवस्था, हिंसाचार, शासनसत्तेचे हिंसक स्वरूप, लोकशाही, राजकारणात व सत्तास्थानांवर स्त्रियांचा अभाव आदी बाबतीत अधिक सजगपणे मांडणी करायला सुरुवात केली. १९९५मध्ये स्त्रियांसाठीची चौथी जागतिक परिषद बीजिंग येथे भरली होती. त्यावेळी तेथे चीनी स्त्रियांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठ तयार करण्यात आली होती, ज्याला शासकीय पाठबळ होते. त्यावेळी ‘स्त्रियांच्या डोळ्यांनी जग पाहा’ अशी घोषणा करण्यातआली. त्यामुळे सर्वच स्त्रीवर्गाला मोकळेपणाचा अनुभव मिळाला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर समाज जीवनात आल्या. मात्र समानतेचे जग निर्माण करायचे असेल तर एवढा व्यवहार पुरेसा नाही. त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील.

पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रीवादी विचारांच्या मध्ये कशी घुसत असते ते आपण पाहतोच आहोत. तरीही स्त्रीवादी विचारात आणि चळवळीत एक अंगभूत वेगळेपण आहे. त्याचा विचार करावाच लागेल. केवळ विचार करून चालत नाही. कृतीही करावी लागते. त्या कृतीचे परिणाम तपासून पाहावे लागतात आणि उद्दिष्टांप्रत पोहोचण्यासाठी हजार मार्ग चोखाळावे लागतात. यालाच मी चळवळ म्हणते. चळवळ म्हणजे केवळ निदर्शने नव्हे, तर ती एक सातत्याने करायची गोष्ट आहे. तुम्ही एक पाऊल उचलले की दुसरे उचलावेच लागते. चळवळ स्थितिशील नसतेच. ती तुम्हाला सतत पुढचे पाऊल टाकायला प्रवृत्त करते. (कालचक्र उलटे फिरवण्याचा सध्याचा जो उद्याोग चालू आहे. त्याचा विचार मी इथे करू इच्छित नाही.) स्त्रियांची चळवळ ही समाजाला फटकारून बाजूला सारण्यासाठी नाही. स्त्रियांची चळवळ ही काही फक्त स्त्रियाच्या फायद्याची बाब नसून संपूर्ण समाजाचे सर्व प्रकारे उत्थापन करण्यासाठी वर्गाधिष्ठित, विषमताधिष्ठित, पितृसत्ताक समाजातून अखिल मानवजातीला मुक्त करण्यासाठी आहे. त्याचा फायदा संपूर्ण समाजालाच होणार आहे, पण हे शतकानुशतके सत्तेचे दूध पिणाऱ्या पुरुषवर्गाला मानवभान यायला वेळ लागतो आहे. त्यात रक्तरंजित लढाया, देवधर्माच्या सुनामी, मागे खेचणारा तथाकथित देदीप्यमान भूतकाळ यांनी रसातळाला नेऊ पाहणारे भोवरे तयार होतच असतात. त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा नव्या दमाने पावले उचलावीच लागतात. केवळ स्त्रियांचीच चळवळ महत्त्वाची आहे असे नव्हे, तर जातिप्रथा निर्मूलन, विषमता निर्मूलन, पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संवर्धन, विज्ञान प्रसार अशा सर्वच चळवळी समाज सुसंस्कृत करण्यासाठी आवश्यक असतात. असे पाहा की, दरवर्षी कित्येक कोटी बालके जन्माला येतात. त्यांनी मागच्या पिढीने दिलेला कोणता झेंडा हातात धरायचा, त्याचे जे बाळकडू पाजले जाईल त्याचा परिणाम त्याच्यावर होतच असतो. जनांचा वाहता प्रवाह जर भूतकाळाकडे वळून त्यातच रमणारा असेल तर नवी पिढी सतत समोर उलगडणाऱ्या वैश्विक सत्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाने कशी पाहू शकेल? जगभरातील उदाहरणे पाहा, आपण आपल्या अस्तित्वाच्या सर्व खुणा विध्वंस करून नष्ट करू शकतो. बामियान बुद्धाची मूर्ती फोडू शकतो, इराक-इराणवर बॉम्बहल्ले करून ऐतिहासिक वारसा नष्ट करू शकतो, अरब जनतेला गाझा पट्टीतून समुद्रात बुडवू शकतो. थोडक्यात सांगायचे, तर होत्याचे नव्हते करू शकतो, पण नष्ट केल्यावर पुनर्निर्माण नाही करू शकत. स्त्रीमुक्ती चळवळ जतन करण्यासाठी आहे, विध्वंसासाठी नाही. म्हणूनच ती आजच नव्हे, नेहमीच आवश्यक आहे, जगभर.

माझ्या वयाच्या सोळा-सतराव्या वर्षापासून माझा चळवळीचा प्रवास सुरू झाला आहे. तेव्हाच्या चळवळीतल्या आठवणी म्हणजे एक प्रकारे स्मृतीत रमणे आहे. इतिहासाचे दस्तावेजीकरण आवश्यक असेल, पण माझ्यासारखी माणसे वर्तमानात अजूनही जगताहेत. स्मृतीत रमण्यासाठी वर्तमानातले जग संपलेले असावे लागते. म्हणून चळवळीच्या न संपणाऱ्या वाटेवर पडाव टाकण्याची वेळ अजून तरी आलेली नाही.

sharadasathe44@gmail.com