फुलांप्रमाणे बहरणाऱ्या आणि दरवळणाऱ्या निसर्गसंगीतात ध्वनिसौंदर्याची खाण असते. यातील शब्द, संगीत जरी आपल्या ओळखीचं नसलं तरी त्याच्याशी आपलं मन जोडलं जातं. निसर्गातूनच निर्माण झालेल्या अशा अनेक सुंदर ध्वनींची सांगड घालून निर्माण झालेल्या चर्मवाद्या आणि तंतुवाद्यांचं प्रेरणास्थान निसर्गातच आहे. त्यामुळे नैसर्गिक ध्वनिसौंदर्याच्या जवळ असणाऱ्या प्राचीन वाद्यांतील नादसौंदर्याचा आनंद घ्यायला हवा.
खरं सौंदर्य निसर्गात आहे हे कळत असूनही हल्ली आपलं दैनंदिन जीवन हे नैसर्गिक जगापासून तुटत चाललं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. याचा अर्थ आपले सौंदर्यविषयक अनुभव हेदेखील निसर्गापासून दूर जात आहेत की काय, हे तपासून पाहण्याची वेळ आली आहे. म्हणून ध्वनिसौंदर्याचा आस्वाद आपण कसा घेतो, तो किती नैसर्गिक आहे, अथवा किती कृत्रिम आहे याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे.
नेहमीच्या ताणतणावयुक्त विचारांच्या कोलाहलातून काही काळ विश्रांती घेण्यासाठी दऱ्याखोऱ्यांत, वनराईत आणि डोंगरमाथ्यावर गेलं आणि तिथल्या वृक्षांच्या सळसळीचा, खाली पडलेल्या पानापाचोळ्याचा, खळखळणाऱ्या झऱ्यांचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, दूरवर प्राण्यांच्या चीत्काराचा आवाज ऐकला की, विचारांच्या गर्दीनं काऊन गेलेलं मन शांत होऊ लागतं. निसर्गाच्या या सगळ्या मोहक ध्वनी आणि आवाजांमध्ये एक प्रकारची ‘नि:शब्द शांतता’ दडलेली असते आणि जोडीला मोकळ्या वाऱ्याचं संगीत कानात वाजत असतं. कोणत्याही वाद्याशिवाय, केवळ वाऱ्याच्या कमी-जास्त झोतातून निर्माण होणारं हे आरोही-अवरोही वाऱ्याचं संगीत ऐकून आपण स्तिमित होतो, कारण अशा प्रकारे कोणत्याही माध्यमाशिवाय वाजणाऱ्या संगीताची आपण कल्पनाच केलेली नसते. रानमाथ्यावर कुणी मुद्दाम फुलं लावायला जातं का? पण तरीही तिथली रानफुलं ऐटीत बहरतात आणि सहजच दरवळतातच ना! फुलांप्रमाणे अशा बहरणाऱ्या आणि दरवळणाऱ्या निसर्गसंगीताला नैसर्गिक ध्वनिसौंदर्याची खाण म्हणता येईल. यातूनच पुढे निर्माण झालं निसर्गाधारित मानवनिर्मित संगीत आणि त्यातलं ध्वनिसौंदर्य. वाऱ्याचं हे मुक्त संगीत असंच एखाद्या बांबूच्या वनातून गुंजन करीत हिंडत असताना कुणा संगीतवेड्या कलाकारानं ऐकलं, त्याची कल्पनाशक्ती पणाला लावली आणि बासरीचा शोध लागला असावा. यातूनच भारतीय संगीताला ‘सुषिर वाद्या’ हा एक सखोल आयाम मिळाला.
‘निसर्ग’ आणि ‘ध्वनी’ यांचं नातं अनोखं आहे, किंबहुना तर्कसुसंगत विचार केला असता लक्षात येतं की, अनेक सुंदर ध्वनी हे निसर्गातील अनुभवातूनच उदयाला आले असावेत. अनेक नैसर्गिक साधनांची सांगड घालून निर्माण झालेल्या वाद्यांच्या निर्मितीमागे मानवी बुद्धीचा कल्पनाविलास असला, तरी त्याचं प्रेरणास्थान हे कुठे तरी निसर्गातच आहे असं दिसून येतं. जसे, तंतुवाद्यांच्या ध्वनीची कल्पना धनुष्य आणि त्याला लावलेल्या दोरीच्या कमी अधिक टणत्काराच्या आवाजातून आली. एकतारीसारख्या वाद्यांची कल्पना मातीच्या एखाद्या भांड्याला दोरी बांधून आलेल्या घुमारदार आवाजातून आली. ढोल, नगारा, पखवाज आदी वाद्यांची कल्पना झाडाच्या पोकळ खोडापासून आली; वीणा, सतारीची कल्पना पोकळ भोपळ्यापासून तर चर्मवाद्यांची कल्पना प्राण्यांच्या चामड्यापासून.
अशाच वाद्यांपैकी एक बासरी. नैसर्गिक ध्वनिसौंदर्याच्या जवळ असणारं हे एक प्राचीन, प्रमुख सुषिर वाद्या. ज्या वाद्यांमधून वायू विशिष्ट गतीने कंपन पावल्यामुळे नाद निर्माण होतो अशा वाद्यांना सुषिर वाद्या असं म्हणतात. बासरी हे वाद्या धातू किंवा लाकूड यापासूनही बनवितात परंतु बांबूपासून तयार केलेल्या बासरीमधून सुमधुर आणि आल्हाददायक ध्वनिनिर्मिती होत असते. उभी आणि आडवी असे बासरीचे दोन प्रकार असले तरी आडवी धरून वाजविली जाणारी बासरी अधिक परिणामकारक असते कारण भारतीय रागसंगीतातील श्रुती, झाले, बेहलावे, मिंड आणि गमक ही सौंदर्यवैशिष्ट्ये तिच्यातून अधिक स्पष्टपणे दाखवली जाऊ शकतात. बासरीच्या एका बंद भागाजवळ एक आडवं छिद्र असतं, ज्यातून ओठांद्वारे हवा फुंकता येते. या वाद्याच्या नळीवर असलेल्या सहा छिद्रांमुळे संगीतातील वेगवेगळे शुद्ध आणि विकृत स्वर निर्माण करता येतात. बासरी धरण्याची पकड, तिच्यातून फुंकल्या जाणाऱ्या हवेचा दाब, तिच्या छिद्रांवरून फिरणारी बोटं, श्वासोच्छ्वास, ओठांचं नियंत्रण ही कौशल्यं आत्मसात असणाऱ्या कलाकारांकडून बासरीवादनाची एक वेगळीच जादू अनुभवायला मिळते. पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वादनातील ध्वनिसौंदर्य जगासमोर आणून या वाद्यास विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. बासरी हे भारतीय उपखंडातील एक सर्वात प्राचीन वाद्या असून त्याला ‘वेणू’ किंवा ‘पावा’ असंही म्हणतात. या वाद्याला अनेक आख्यायिका आणि दैवी संदर्भ आहेत. विशेषत: श्रीकृष्णाशी जोडलेल्या कथांमधून बासरी हे निर्गुण भक्तीचं प्रतीक मानलं जातं कारण ती आतून संपूर्णपणे पोकळ असते. ‘भक्तानंही असं आतून रिक्त होऊन, अहंकार विसरून संपूर्णपणे ईश्वराच्या भक्तीत लीन झालं पाहिजे.’ या तत्त्वज्ञानानुसार, जणू ईश्वराच्या इच्छेप्रमाणं या वाद्यातून संगीत निर्माण होत असतं. या श्रद्धेतून अनेक साधक बासरी वादनाची साधना करीत असतात. बासरीतील नादसौंदर्य हे राधाकृष्णाच्या दिव्य आणि उत्कट प्रेमाचं प्रतीकात्मक संगीत मानलं जातं. म्हणूनच प्रेम, विरह, उत्कंठा आदी भावभावना दाखविण्यासाठी चित्रपट संगीतानेही बासरीचा सुंदर उपयोग करून घेतला आहे. चित्रपटात नायक किंवा नायिकेला शब्दातून व्यक्त करता न येणाऱ्या भावभावना बासरीच्या नादसौंदर्यातून सहजच व्यक्त होतात. निसर्गाच्या सान्निध्यात माळरानावर हिंडत असताना कुठलीशी बासरीची लोकधून कानावर पडली की, आपण एका वेगळ्याच विश्वात जातो. त्यातील शब्द ओळखीचे नसतात, संगीत ओळखीचं नसतं परंतु तरीही आपलं मन कशाशी तरी जोडलं जात असतं. हेच ते, त्या वाद्यातील ध्वनिसौंदर्य.
ज्याप्रमाणे ‘सुषिर’वाद्यामध्ये हवेच्या साहाय्याने तसेच ‘तंतुं’वाद्यामध्ये तारेच्या साहाय्याने ध्वनिनिर्मिती होते त्याचप्रमाणे ताणलेल्या चामड्याच्या तुकड्यावर आघात केल्यावरही सुंदर ध्वनी निर्माण होतो या कल्पनेतून चर्मवाद्यांचा शोध लागला असावा. विशिष्ट ताण देऊन बांधलेल्या चामड्यातून विशिष्ट उंचीचा आवाज निर्माण होतो, त्यातून संगीताच्या तालाची कल्पना येते, या शोधातून सुरुवातीला साधी चर्मवाद्यां तयार झाली. परंतु अशा आवाजाला दीर्घत्व आणि गोडवा नसतो हे लक्षात आल्यानंतर त्या चामड्यावर शाई लावण्याची कल्पना पुढे आली. नर्मदेच्या वाळवंटातील काळ्या दगडांची बारीक पूड करून ती चर्मवाद्यांवर विशिष्ट पद्धतीने लावल्यामुळे इतर वाद्यांप्रमाणेच त्यात सांगीतिक स्वर निर्माण होतो हे लक्षात आलं आणि पखवाज, मृदंग, तबला आदी वाद्यांचा गोडवा लोकप्रिय होऊ लागला. या वाद्यांमधून पाश्चात्त्य तालवाद्यांप्रमाणे एकसुरी तालवादन न होता त्यातून विशिष्ट प्रकारचे बोल बाहेर पडतात, त्याची विशिष्ट भाषा तयार होते व त्या वाद्याचे म्हणून एक स्वतंत्र संगीतही निर्माण होतं. अर्थात वाद्या कितीही चांगले असले पण वादकाचा हात तयार नसेल तर त्यातील नादसौंदर्य खुलू शकत नाही. चर्मवाद्यातून ध्वनिनिर्मिती करीत असताना करंगळी, अनामिका, हाताची इतर बोटे, हाताचा पंजा, त्यातील पोकळी इत्यादी ध्वनि-निर्मितीकारक शारीरिक घटक वापरण्याचं कौशल्य कलाकाराला साध्य झालं नसेल तर उत्तम परिणाम साधला जात नाही. ज्याप्रमाणे निसर्गातील अनुभवाच्या कल्पनेला विज्ञानाची जोड मिळून वाद्यानिर्मिती प्रगत झाली त्याचप्रमाणे वादकाची बैठक, वाद्या हाताळण्याची पद्धत आणि हाताची शिस्तबद्धता यातही अनुभवांती अनेक चांगले प्रागतिक बदल होत गेले. ज्यामुळे आज चर्मवाद्यातून ध्वनिसौंदर्याचा आनंद अधिक परिणामकारकपणे घेता येतो. मैफिलीत काही वेळानंतर ज्याप्रमाणे तंतुवाद्या सुराला कमी-जास्त होत असतात व ते पुन्हा जुळवावे लागतात त्याचप्रमाणे चर्मवाद्यादेखील सुरात जुळवावं लागतं. तापमानाचा चामड्यावर होणारा परिणाम लक्षात घेता अशा वाद्यांना गठ्ठे, दोरी, वाद्या आदी कमी-अधिक ताण हाताळण्याची सोयही दिलेली असते.
युद्धप्रसंग, वीररस, भक्तिरस अशा प्रकारच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी पखवाज व मृदंग यासारखी धीरगंभीर व ठाव घेणाऱ्या नादाची चर्मवाद्यो अधिक परिणामकारक होतात. ‘शिवतांडव’ स्तोत्राच्या सादरीकरणात, गायनसौंदर्याने जितकी उत्कंठा वाढते तितकेच त्यातील पखवाजच्या साथीने नृत्य प्रदर्शनही उत्कटपणे अनुभवता येतं. भारतीय ख्याल गायनात तबला या वाद्याचे स्थान सौंदर्य खुलवणारे, तसेच अढळ व मानाचे आहे. श्रृंगारादी भावना व्यक्त करण्यासाठी लोकगायन शैलीमध्ये ढोलक, ढोलकी या वाद्यांनीही आपलं स्थान निर्माण केलेलं दिसून येतं. तमाशातील ‘सवाल-जवाब’च्या भाषेत ढोलकीची जुगलबंदीची भाषा सहजच मिसळून जाते. दिमडीसारख्या छोट्या वाद्यानेही लोकगीतं, पोवाडे फड, लावण्या यांतून लोकवादन शैलीच्या सौंदर्याची एक वेगळीच छाप पाडली आहे.
चर्मवाद्या प्रकारातील अनेक वाद्यो स्वत:च्या एकल वाद्या भाषेच्या अंगभूत सौंदर्यामुळे वर्षानुवर्षे रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत, त्याचबरोबर साथसंगतीची वाद्यो म्हणूनही त्यांनी मैफिलीत आपलं मानाचं स्थान मिळवलं आहे. संगीतातील गायन आणि नृत्य प्रकाराला केली जाणारी साथसंगत चर्मवाद्यातील नादसौंदर्यानं अधिकच बहरत असते. या प्रकारातून सामान्यपणे सादर केल्या जाणाऱ्या स्वराकृती आणि तालवाद्यातून साकार होणाऱ्या तालांच्या आकृती यातून जुगलबंदीसारख्या संवादात्मक संगीत प्रकाराचाही सौंदर्यास्वाद घेता येतो. थोडक्यात, निसर्गापासून प्रेरित झालेल्या वाद्यांची स्वत:ची अशी वेगळी परिभाषा त्यातील ध्वनींच्या विविधतेतूनच तयार होत असते. कदाचित ही भाषा सामान्य रसिकांसाठी परिचयाची नसते, परंतु ती साकारणारे कलाकार ही भाषा ज्या तयारीने रसिकांसमोर मांडतात त्यात शब्द, अर्थ यापैकी काही नसले तरी मनाला डोलायला लावणारं एक अवर्णनीय नादसौंदर्य मात्र नक्कीच असतं.