८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘स्त्री चळवळीतील स्त्री’ या सदरात वंदना बोकील कुलकर्णी यांचा ‘स्त्री चळवळीसाठी पोषक अवकाश!’ हा लेख ताराबाईंच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ निबंधाचा नव्याने अर्थ निर्णय करणारा लेख वाटला. ताराबाईंच्या मताचे आजच्या स्त्रीवादी विचार चळवळीशी असलेले नाते सांगणारा तरीही ताराबाईंचे विचार व त्याची काळापलीकडे झेप घेण्याची ताकद अगदी वस्तुनिष्ठ पद्धतीने लेखातून मांडली आहे. यामुळे एकाच वेळी ताराबाईंचे महत्त्व सांगून त्यांच्या विचाराची सुयोग्य दखल घेतल्याचे समाधान लेख वाचून प्राप्त झाले. १८८२ मधलं हे पुस्तक स. ग. मालशे यांनी १९७५मध्ये संपादित करून प्रकाशित करेपर्यंत कोणालाच याविषयी माहिती नव्हती…’ हे वाचून भारतीय पितृसत्ताक कालगणना कशी कार्य करते याचेही वैषम्य वाटले. महात्मा फुलेंनी ताराबाईंच्या या विचाराचा ‘सत्सार’मधून केलेला गौरव त्यांचे कालातीत असणे सुचवणारा ठरला व उत्तरोत्तर ठरत राहील, याविषयी तिळमात्र शंका नाही.- प्रा. डॉ. सखाराम कदम, परभणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदरांतून दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न

‘ऊब आणि उमेद’ हे आनंद नाडकर्णी यांचे सदर आवडण्याचे कारण म्हणजे आनंद नाडकर्णी अध्यात्म, आधुनिक मानसशास्त्र आणि मेंदूशास्त्र या तिघांवर उत्तम प्रकारे विचार मांडतात. ‘ध्वनी सौंदर्य’ हा विषय निवडून मला चकित आणि आनंदित केले. ‘मी काय ऐकतो आणि काय ऐकायला हवे’, याबद्दल विचार करायला भाग पाडले. पुढील लेखाविषयीही उत्सुकता आहे.

‘ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती’ या विषयावर याआधी अंकात स्वतंत्र लेख बऱ्याचदा लिहिले गेले आहेत, तरीही या विषयाबाबत अजून वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न या सदरातून होताना दिसत आहे. या विषयाला वाहिलेल्या आणि थोड्या तात्त्विक, गंभीर चर्चात्मक सदरांमध्ये असे एखादे स्वैर सदर हवेच!- सौरभ, मुक्ताई

नादयोगाची उपयुक्त माहिती

८ फेब्रुवारीच्या अंकातील ‘ध्वनिसौंदर्य’ या सदरातील ‘नादयोग’ या तृप्ती चावरे तिजारे यांच्या लेखात नादयोगासंदर्भात फारच उपयोगी माहिती आहे. अलीकडच्या काळात तर ध्वनिप्रदूषण इतके वाढले आहे की, ध्वनीतसुद्धा काही नाद, काही मानसिक शांती व परमार्थासंदर्भात खूप काही आहे याची जाणीव होत नाही. योग्य प्रकारे प्राणायाम व साधना केली तर याबाबत चांगले अनुभव येऊ शकतील.- प्र. मु. काळे, नाशिक

नवी उमेद देणारा लेख

१ फेब्रुवारीच्या अंकातील वंदना अत्रे यांचा लेख कर्करोगाशी दिलेल्या लढ्यासंदर्भात होता. हा लेख अनेकींना उमेद देऊन नवी प्रेरणा देईल. र्स्रिायांना रुग्णालयात दाखल झाल्यावर आपले काही चुकले का असे वाटत राहते. तसेच कुटुंबीयांना होणारे त्रास पाहून मन बेचैन होते. मलाही दोन महिन्यांपूर्वी घरात पाय मुडपल्याने पायाला फ्रॅक्चर व पायाचे ऑपरेशन करावे लागले. नंतरही वॉकर घेऊन घरात चालावे लागले. पण या काळात घरच्यांनी मला पूर्ण आराम घेऊ दिला. स्त्रीला आजारपण आले तर संपूर्ण घरावर परिणाम होतो हे दिसून येते.- अर्चना काळे, नाशिक

आनंद देणाऱ्या आळशीपणाचा अनुभव

‘रिकामटेकडी’ हा पूनम सिंग बिष्ट यांचा (४ जाने.) लेख वाचला. लेखाची मांडणी आवडली पण ‘रिकामटेकाडे’पणाची संकल्पना म्हणजे आपल्या राहून गेलेल्या छंदाची/ गोष्टीची जोपासना करणे असे अजिबात नाही. डोल्से फार नियांते (dolce far niente) म्हणजे अगदी शांत, काहीही न करता निवांत बसून राहाणे. जे लेखिका नमूद तर करते पण पुढे स्त्रियांचे बाबतीत ही संकल्पना स्पष्ट करताना ती स्त्रियांच्या अधुऱ्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता म्हणजे रिकामटेकडेपणा असे म्हणते. खरं तर आनंद देणाऱ्या आळशीपणाचा अनुभव तुमचे मन ताजेतवाने, उत्साहित आणि प्रचंड ऊर्जावान बनवते. मला ही दिक्षा एका व्यक्तीने एका बगिच्यामध्ये दिली. निवृत्त वरिष्ठ नागरिक संध्याकाळी बागेत येऊन राजकारण किंवा एखाद्या तत्सम विषयावर तावातावाने चर्चा करत असताना, ही व्यक्ती बागेच्या एका बाकावर थंडपणे, हाताची घडी घालून डोळे उघडे ठेवून बसून असायची. कसलीही हालचाल नाही, कसलाही जप पुटपुटणारी ओठांची हालचाल नाही. काही नाही. नि:शब्द सभोवताल निरखत, पण त्याबाबतचा कोणताही विचार मनात येऊ न देता तासनतास फक्त हाताची घडी घालून बसून राहाणे म्हणजे ‘रिकामटेकडेपणा’. मी या आळशीपणातून मिळणारा असिम आनंद गेली कित्येक वर्षे नियमितपणे अनुभवतो आहे. तुम्हीही हा अनुभव घेऊन पहा.- अॅड. एम. आर. सबनीस, अंधेरी

संकटाला निमंत्रण देऊ नका

२५ जानेवारीच्या अंकातील ‘अफवा : एक खेळ’ हा मुग्धा गोडबोले यांचा लेख वाचला. या लेखात त्यांनी योग्य त्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकला आहे. अफवा पसरवणे हा बिनडोक आणि आगाऊपणे खेळला जाणारा खेळ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यातून अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींना आपण इतर व्यक्तींना कसे मूर्ख बनवले, यात कसला आसुरी आनंद मिळतो तेच समजत नाही. मध्यंतरी शहरामध्ये मुले पळवणारी टोळी आली आहे, अशी अफवा पसरवली गेली. परंतु त्या टोळीने खरोखरच याआधी मुले पळवली आहेत का? तसेच सीसी टीव्ही कॅमेऱ्यात ती घटना कैद झाली असती, किंवा प्रत्यक्षदर्शींनी ही घटना पाहिली असती तर गोष्ट निराळी परंतु तसे काहीही नसताना, केवळ संशयाचे भूत एकदा माणसाच्या मानगुटीवर बसले की, त्याला उतरवणे फार कठीण असते. मग अशा परिस्थितीत निरपराध व्यक्तींना, कायदा हातात घेऊन बेदम मारणे चुकीचेच आहे. दुसरी घटना नुकताच जळगाव येथे भीषण रेल्वे अपघात झाला. तो केवळ अफवेमुळेच. गाडीच्या डब्याखाली आग लागली आहे, अशी अफवा पसरवली गेली. लगेच त्यावर प्रवाशांनी आंधळा विश्वास ठेवला. आपला जीव वाचवण्यासाठी, डोळे झाकून, रेल्वेमार्गावर उड्या मारल्या. यात समोरून येणाऱ्या दुसऱ्या गाडीने अनेक माणसांना चिरडले. त्यात १२ निरपराध माणसांचा जीव गेला. याचेच राहून राहून वाईट वाटते. थोडक्यात सांगायचे तात्पर्य हेच की, अफवा पसरवणे हा गुन्हा आहे. हे माहीत असून देखील समाजकंटक अफवा पसरवतच राहतात. जनतेने मात्र या अफवांची योग्य ती शहानिशा न करता, त्यावर आंधळा विश्वास ठेवणे, म्हणजे, एकप्रकारे स्वत:हून संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे.- गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली

‘संयम’ हाच उपाय!

२५ जानेवारीच्या अंकातील ‘अफवा – एक खेळ’ हा मुग्धा गोडबोले यांचा मनोरंजक हटके लेख वाचला. जळगाव जिल्ह्यात नुकत्याच पुष्पक एक्सप्रेसमध्येे आग लागल्याच्या अफवेमुळे १२ माणसे ठार झाली. या घटनेमुळे अफवेचे गांभीर्य लक्षात येते. मोबाइलमुळे अफवेचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षा अधिक झाला आहे. बायकांचा भिशी कार्यक्रम किंवा पुरुषांचा कट्टा, आड्डा हे गॅसिपचे अनधिकृत ठिकाणच असते. यावर एकच उपाय म्हणजे धीर धरणे, संयम बाळगणे व बातमीची शहानिशा होईपर्यंत तोंडावर बोट ठेवणे.- श्रीनिवास स. डोंगरे, दादर

आयुष्य आनंदी करणारा उद्बोधक लेख

१८ जानेवारीच्या अंकात ‘आयुष्याचा तोल साधताना…’ या मेधा ताडपत्रीकर यांचा लेख प्रत्येकाने आचरणात आणावा असा आहे. आपली तब्येत सा़ंभाळण्यासाठी आणि आयुष्य आनंदी करण्यासाठी तो खूपच उद्बोधक आहे. मी लहानपणापासून सूर्यनमस्कार वगैरे व्यायाम करीत असे. नोकरीला लागल्यानंतरही ते चालू होते. पण पुढे नोकरीत बढती मिळाल्यावर त्यात खंड पडला होता. आमच्या कंपनीने उच्च अधिकाऱ्यांसाठी एक दिवसाचे आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की, प्रत्येकाला दिवसात चोवीस तास मिळतात त्यांचा विनियोग करणे आपल्या हातात असते.- रमेश नारायण वेदक, टिळक नगर

शंकांचे निरसन करणारा लेख

१५ फेब्रुवारीच्या पुरवणीतील डॉ. निखिल दातार यांनी लिहिलेला ‘पूर्णविरामाचं इच्छापत्र’ हा लेख खूपच माहितीपूर्ण व अनेक शंकांचे निरसन करणारा आहे. तरीही काही महत्त्वाच्या शंकांचे निवारण होणे आवश्यक वाटते. माझ्या मते, इच्छापत्राच्या अटींप्रमाणे जर उपचार थांबवायचे असतील तर ते वैद्याकीय तसेच कृत्रिम यंत्रणा या दोन्ही प्रकारचे असायला हवेत. परंतु नुकत्याच एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालानुसार, रुग्णाला जर नळीतून नाकाद्वारे अन्नपुरवठा केला जात असेल, तर त्याला कृत्रिम न समजता तो बंद करता येणार नाही. या निकालामुळे एका ११ वर्षे कोमातील मुलाच्या पालकांनी त्याला इच्छामरण देण्याची केलेली विनंती फेटाळून लावली.- शरद फडणवीस, पुणे</p>

संकल्पना प्रत्यक्षात आणणे ही काळाची गरज

१५ फेब्रुवारीच्या पुरवणीतील डॉ. निखिल दातार यांनी लिहिलेला ‘पूर्णविरामाचं इच्छापत्र’ हा लेख आणि चित्रकार नीलेश जाधव यांनी काढलेलं मथळ्याला चपखल लागू होणारं चित्र मनोमन पटलं. ‘उरले जगणे मरणासाठी…’ हा लवाटे आजोबांच्या इच्छामरणाच्या तगाद्यावरचा लेख यानिमित्तानं आठवला. अरुणा शानबागसारख्या जवळपास ४० वर्षे अंथरुणाला खिळून असणाऱ्या व्यक्तीचा सांभाळ रुग्णालयाच्या परिचारिकांनी केला. त्यानिमित्तानं ऐरणीवर आलेला मरणासन्न व्यक्तींच्या बाबतीतील दयामरणाचा सुस्पष्ट कायदा केला जाईल का? या प्रश्नावर बरीच चर्चाही झाली. वयस्कर झालेल्या, पण औषधपाण्यावर बराचसा खर्च करत जीवनाची इतिकर्तव्यता, ध्येय वगैरेचं अप्रूप न राहिलेल्या व्यक्तींच्या मानसिकतेला शब्दरूप देणारा आणि उपचारांवर वारेमाप खर्च न करता नैसर्गिक मृत्यू येऊ देण्याच्या ठाम निर्धाराला सनदशीर मार्गानं अनुसरण्याला पाठबळ देणारा असा हा लेख आहे. इतकंच नव्हे तर त्याचा मसुदाही उपलब्ध करून दिला आहे.- श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे