‘स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे!’ हा खासदार सुप्रिया सुळे यांचा लेख (२२ जून) वाचला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहताना असे दिसून येते, की जेथे एका पक्षाने स्त्री उमेदवार दिला, तेथे दुसऱ्या पक्षाने पुरुष उमेदवार दिला आणि पुरुष उमेदवार विजयी झाला. एक उल्लेखनीय उदाहरण असेही दिसले, की तृणमूल काँग्रेस पक्षाने दिलेल्या १२ स्त्री उमेदवारांपैकी ११ उमेदवार निवडून आल्या. स्त्री उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून याव्यात असे वाटत असेल, तर राजकीय पक्षांनी स्त्री उमेदवाराविरुद्ध स्त्री उमेदवारच द्यावा. त्यामुळे विजयी होणाऱ्या स्त्री उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल. या लेखात स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढण्यासाठी स्त्री सक्षमीकरणाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे, परंतु उमेदवारी देताना अमक्या नेत्याची पत्नी, मुलगी, बहीण किंवा अन्य कोणी नात्यातील व्यक्तीलाच उमेदवारी न देता, परिवाराच्या परिघाच्या बाहेर असलेल्या सक्षम स्त्री उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी. ही मानसिकता राजकीय पक्षांनी दाखवण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात स्त्री-भ्रूणहत्या तसेच बालिका विवाहाचे प्रमाण अधिक आहे, स्त्री शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे आणि त्यामुळे ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन द्यावे लागते. अशा ठिकाणी स्त्रियांना राजकारणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या राजकारणातील सक्रिय स्त्रियांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.- सावळाराम मोरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा