‘भिशी’ हा सुजाता लेले यांच्या ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेला लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचा भिशी गट तीस वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यातून मैत्रीचे निर्माण होणारे बंध टिकवून ठेवणे फार कठीण आहे. याचे कारण ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने सर्वांचे स्वभाव सारखे नसतात. पण यात कोणी तरी चार पावले मागे घेतल्यास ही पेल्यातील वादळे शांत होण्यास वेळ लागत नाही. असो. भिशीच्या महिलांनी परस्परांना पुस्तके वाचायला दिल्यामुळे ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीचा पुरेपूर अनुभव येत असेल. यातून आणखी एक गोष्ट समजली, ती म्हणजे आपल्या जन्माचा जोडीदार शोधायचा झाला तर मुले वधू-वर सूचक मंडळात, आपल्या वाईट सवयी कशा लपवून ठेवतात ते समजले. परंतु कोणालाही अंधारात ठेवणे हे चुकीचे आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असल्यामुळे, नवरा-बायको, सासू-सून किंवा सासू-सासरे यांच्याशी जमवून घेणे म्हणजे मुलींची एकप्रकारे तारेवरची कसरतच असते. त्यामुळे संसार जर टिकवायचा असेल तर नवरा किंवा बायकोने दोन पावले माघार घेणे हिताचे असते. नाही तर कोणा तरी एकाच्या हेकट स्वभावामुळे, जन्मभरासाठी आणाभाका घेऊन, लग्नबंधनात अडकलेल्या जोडप्यांची नाती क्षणार्धात उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. एकंदरीतच ठरलेल्या कार्यक्रमांतून, तसेच सध्या मोबाइल, नेटच्या माध्यमांमुळे हरवत, धूसर होत तसेच तुटत चाललेली नाती जोडण्याचे काम ही ‘भिशी’ करत आहे, हेही नसे थोडके.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा