‘शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!’ हा ऋतुजा जेवे यांचा लेख (२० एप्रिल) वाचला आणि बीड जिल्ह्यातील एक प्रसंग आठवला. १९९१ ते ९४ या काळात माझी एका बँकेच्या बीड शाखेत बदली झाली. एकदा अनवाणी पायांनी एक पालक मुलीच्या मेडिकल शिक्षणासाठी कर्ज मागायला आले. त्यांच्या मुलीला मुंबईतील के. ई. एम. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. मी त्यांचे अभिनंदन करताच ते गृहस्थ रडायला लागले. म्हणाले, तिला कमी गुण मिळाले असते तर इथल्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता आणि माझा हॉस्टेलचा खर्च वाचला असता. अठराविश्व दारिद्र्य असूनही इथली मुले मेहनत घेऊन शिक्षणात प्रगती करू इच्छितात, पण त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. आजही घरातील एखाद्या कोपऱ्यात असलेल्या मिणमिणत्या दिव्यावर अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना आजची डिजिटल महागडी अॅप्स हजारो मैल दूर आहेत. दूरसंचार जाळे हवे तसे प्रसारित नसल्यामुळे स्मार्टफोन असूनही ही मुले आधुनिक तंत्रज्ञानाचा उपभोग घेऊ शकत नाहीत. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे तो सर्वत्र उघडा राहावा म्हणून सरकारने अशा ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेकडे जातीने लक्ष दिले तर जात्याच हुशार असलेली ही पिढी भारताचे नाव जगभरात अधिक उज्ज्वल करतील.- सूर्यकांत भोसले, मुलुंड
डोळे उघडवणारा लेख
संकेत पै यांचा लेख (२३ मार्च) ‘मी परिपूर्ण…?’ हा लेख म्हणजे अवास्तवतेच्या (परिपूर्णतेच्या) मागे धावणाऱ्यांचे डोळे उघडणारा आहे. प्रत्येक मनुष्याला यश मिळवायचे असते. फरक एवढाच असतो, की प्रत्येकाच्या यशाच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. सर्व क्षेत्रांतील वाढणाऱ्या आत्महत्या, या आपल्या जीवनापेक्षा परिपूर्णतेला महत्त्व दिल्यामुळेच होतात. आजच्यापेक्षा उद्याचे काम चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि सरावाने काम उत्कृष्टच होते. पण आपणच इतरांपेक्षा सर्वोच्च स्थानी, परिपूर्ण असावे, हा अट्टहास मानसिक संतुलन बिघडवणारा आहे. यशापयश आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. या जगामध्ये कोणीही परिपूर्ण अशी व्यक्ती नाही, हेच खरे वास्तव आहे. हे स्वीकारून पुढे चालणारा उत्कृष्ट राहील.- भाग्यश्री रोडे-रानवळकर
नात्यात दुरावा आलाय हे नक्की!
डॉ. भूषण शुक्ल यांचा ‘शिक्षण’ (२३ मार्च) हा लेख वाचला. माझा जन्म १९३७ मधला. यादरम्यान जग किती बदलले आहे! आचारविचार खूप बदलले आहेत. पूर्वी मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षण पुरेसे झाले, की मिळेल ती नोकरी करायला लागायची, ती कौटुंबिक खर्च भागवण्यासाठी. शालेय शिक्षण आता किती बदललेले आहे याची कल्पना नाही, पण एक गोष्ट जाणवते, की नातेसंबंधांत जवळीक कमी झाली आहे. असो, कालाय तस्मै नम:!- सुरेश पेंडसे
स्त्रयांचे प्राबल्य वाढणारच!
‘शेतमजूर ते शेतकरी’ हा सुवर्णा दामले यांचा लेख (२३ मार्च) वाचला. लेखातील ‘प्रकृती’ या संस्थेने जी आकडेवारी दिली आहे त्यात म्हटल्याप्रमाणे ६५ टक्के स्त्रिया शेतीसंबंधीची कामे करत असतात. खरं तर कोणत्या कामात किती मजुरी मिळते हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण शेतीची असोत किंवा गोठ्यातील कामे, यात घरच्याच स्त्रिया राबत असतात. स्त्रिया एकल असोत किंवा जोडप्यानं, पण त्या प्रामाणिकपणे शेती करत आहेत. त्याचमुळे या क्षेत्रातदेखील स्त्रियांचा सहभाग वाढत आहे.- सुनील समडोळीकर