डॉ. नंदू मुलमुले
ज्येष्ठत्व बहुतेकांच्या बाबतीत व्याधींची साथसंगत घेऊनच येतं. व्याधी भीती, चिंता वाढवतात. वेदना देतात. माणसातली एकटेपणाची जाणीव गडद करतात. अशा वेळी आपल्यासारख्या इतरेजनांचा काही काळाचा सहवास, थोड्याशा गप्पाटप्पाही ताणाचा पारा खाली आणतात. एकाच वाटेनं चालणाऱ्या समूहशक्तीचं बळ प्रकर्षानं जाणवतं, ते अशा काळात!

बालपण, तारुण्य, प्रौढत्व, ज्येष्ठत्व… वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीर बदलत असतं. मनही बदलत असतं. जुनी नाती तुटतात, सुटतात, नवी निर्माण होतात. खरं म्हणजे जोडावी लागतात. शाळकरी मित्रमैत्रिणींचा समूह पन्नास वर्षानंतरही भेटतो खरा, पण त्यात फक्त कुतूहलाचा भाग; ‘ती सध्या काय करते’! (खरं म्हणजे ‘कशी दिसते?’. तिच्या विस्तारित देहदर्शनानं मात्र ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,’ यातच मन वेडे गुंतून पडणे अपरिहार्य!) ज्येष्ठतेच्या उंबरठ्यावर व्याधींचा एक नवा संच आपली वाट पाहात उभा असतो; ते एक आव्हान. निवृत्तीबरोबर जुनी नाती सुटतात. आता या वयात नवी नाती जोडण्याचं दुसरं आव्हान. ती जोडायलाच हवीत, कारण त्यांच्यामुळेच आयुष्याची पुढली वाट सुसह्य होते, समृद्ध होते. वंदनानं ते वेळीच ओळखलं.

why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
Retirement, Retirement life, Retirement old human life, Finding Purpose of living, routine life, Sisyphus Story, Sisyphus Story context of life, life philosophy, chaturang article,
सांधा बदलताना : सिसिफस
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
Loksatta chaturang Women World Issues of Menstrual Leave
स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

त्या दिवशी सकाळचे साडेआठ झाले होते. नेहमीप्रमाणे वंदनानं सकाळची कामं आटोपली. खाली उतरून रिक्षाला हात दाखवला. रुग्णालयाचा पत्ता सांगितला आणि रिक्षा धावू लागली, तसे तिचे विचारही. चार वर्षांपूर्वी साधारण हीच वेळ होती आणि याच रुग्णालयाची तिनं पहिल्यांदा चक्कर केली होती. कारण तसंच होतं. आठ दिवसांपासून सकाळी उठल्यावर आरशात पाहताना तिला डोळ्यांखाली सूक्ष्म सूज जाणवली होती. पायावरही सूज होती, पण खूप प्रवास केल्यानं ती आली असेल, अशी तिनं मनाची समजूत घातली होती. पण मग मळमळ होणं, धाप लागणं, थकवा, सतत लघवी लागणं, झोप नीट न होणं, अशी लक्षणं दिसू लागली. त्वचेवर कितीही क्रीम लावलं, तरी त्वचा कोरडी पडू लागली. वंदनानं शेवटी नेहमीच्या डॉक्टरांना प्रकृती दाखवली. त्यांच्याच देखरेखीखाली रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्या होत्या आणि त्यांना तिची सारी प्रकृती माहीत होती. ‘वंदनाताई, किडनी तपासून घ्यावी लागेल,’ दंडावरचा पट्टा सोडवत डॉक्टरांनी या रुग्णालयाचा तिला पत्ता दिला.

आता मात्र पोराला सांगायला हवं, नाही तर त्याला वाईट वाटेल, हे वंदनाच्या लक्षात आलं. नोकरी करणाऱ्या सुनेला- प्रियाला घरकामात सासूचा आधार होता. तिचं घरात कमीच लक्ष असायचं. सासरे असेपर्यंत सासूचं हवं-नको पाहणारी सून ते गेल्यावर काहीशी स्वयंकेंद्रित झाली होती. सकाळी घाईघाईत निघून जायची आणि संध्याकाळी आल्यावर काही तरी खायला घेऊन टीव्हीसमोर बसायची ते जेवायला उठेपर्यंत. वंदनाला घरकामाचा फार बोजा वाटत नव्हता तोवर ठीक होतं. तिनंही विचार केला, एवढ्या कामानं कुठे झिजतो माणूस? सून थकून येते, तिलाही विरंगुळा हवा. आपली मुलगी असती, तर तिला आराम मिळावा असंच वाटलं असतं आपल्याला. तिला शेजारच्या सुमित्राकाकूंनी अभावितपणे केलेला विनोद आठवला. त्यांच्या मुलीचा प्रेमविवाह झाला होता आणि त्याच वर्षी पोरानं सून घरी आणली होती. ‘काय सुमित्राकाकू, कसं चाललंय?’ विचारल्यावर म्हणाल्या होत्या, ‘‘मुलगा ना, बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे! सक्काळी काय उठतो, बायकोला बेड टी काय नेऊन देतो! मुलांना अंघोळ घालण्यापासून डबा भरण्यापर्यंत काय काय सेवा करतो…’’ ‘आणि जावई?’ असं विचारल्यावर लगेच म्हणाल्या, ‘‘अगदी हिऱ्यासारखा नवरा मिळालाय पोरीला! सक्काळी उठतो, हौसेनं बायकोला चहा करून देतो. मुलांना शाळेसाठी तयार करतो. अगदी गुणाचा जावई आहे!’’

मनानं तशा कणखर असलेल्या, समंजस विचार करणाऱ्या वंदनाला डॉक्टरांनी तपासताक्षणी जेव्हा मूत्रपिंड खराब झाल्याची दाट शक्यता असल्याचं सांगितलं, तेव्हा पहिल्यांदा तीही हादरली. ‘वयाची साठी उलटलेली, त्यात मुलाच्या संसारात आपली मदत व्हायची, ते त्याच्या मागे आपल्या डायलिसिसचा खर्च लागणार. आठवड्यातून हॉस्पिटलच्या तीन चकरा, शिवाय वेळीअवेळी तपासण्या, पथ्यं, इंजेक्शनं, हे वेगळं. छे छे, डॉक्टरांचं निदान चुकलं असेल, दुसरा काहीतरी प्रकार असेल. हृदयविकारातही सूज येते म्हणे! आता ती शक्यता काय बरी म्हणायची? हे तर आगीतून फुफाट्यात झालं!’ वंदनाचे विचार सर्व बाजूंनी धावायचे.

आईनं म्हटलं नसतानाही मुलानं सेकंड ओपिनियन घेतलं. वंदनानं ‘अरे कशाला?’ म्हटल्यावर एरवी खूप कमी बोलणारा पोरगा म्हणाला, ‘‘मला, प्रियाला झाला असता हा आजार, तर घेतलं असतंच ना सेकंड ओपिनियन? बाबांच्या मागे आता माझा तुला नाही, तुझा मला आधार आहे.’’ वंदनाला बरं वाटलं. अशा वेळी मन हळवं होतं. कुणी तरी न सांगता काळजी घेणारं असलं, की या वयात आधार वाटतो. ‘आजार त्रासदायक आहे, मात्र मुलाचा आधार आहे. सुनेची कितपत मदत होईल कुणास ठाऊक!’

मग एक-दोन दिवस विवंचनेत गेले. तपासण्यांचे अहवाल हाती आले आणि निदान निश्चित झालं- ‘किडनी फेल्युअर’. दोन्ही मूत्रपिंडं जवळपास अक्षम झालेली. कशामुळे? प्रदीर्घ रक्तदाबामुळे, बहुतेक.

डॉक्टर विरेन शाह तसा तरुण, पण हुशार आणि मनमिळाऊ वाटला वंदनाला. ‘‘काही काळजी करू नका वंदनाताई. काही गोळ्या देतो, मात्र आता सगळा भर डायलिसिस आणि पथ्य पाळण्यावर राहणार. तुमचं सहकार्य निश्चित मिळेलच.’’ असं आश्वासक स्मित करत डॉ. विरेननं फाइल वंदनाच्या हातात दिली. आता ही फाइल आपली पुढल्या आयुष्याची कुंडली. त्यातलं डॉक्टरांचं लिखित विधिलिखित! जणू सटवाईची ललाटी उमटलेली अक्षरं. वंदनानं मनाशी खूणगाठ बांधली. ‘चला, एका व्याधीची साथ मिळाली! आता एकटेपणा वाटणार नाही.’ त्याही परिस्थितीत तिला हसू आलं.

‘‘हसतेयस आई? टेन्शन तर नाही ना काही?’’ मुलाला आश्चर्य वाटलं आणि थोडी काळजीही.

‘‘अरे काही नाही! सहज. डायलिसिस म्हणजे आपली किडनी कष्ट करून करून कंटाळलीय, बाईसारखी! तिलाही मन असेल ना? आता तिची धुणीभांडी, केरवारे आपण करायचे. हेच काम ना किडनीचं? शरीरातला कचरा काढून टाकायचं?…’’ ती मंद हसत म्हणाली.

मुलाला हायसं वाटलं. अभिमानही वाटला, की किती सहजतेनं घेतेय आई सारं! खरं म्हणजे त्याला आईचा कणखरपणा माहीत होता. वडिलांच्या आजाराच्या वेळी तिनं सारं दु:ख धीरानं पचवलं होतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या संकटांना धैर्यानं तोंड दिलं होतं.

डायलिसिस सुरू झालं. हातावरच्या रोहिणी आणि नीला यांचा सेतू (एव्ही फिस्चुला) तयार करणं, रक्तवाढीचं औषध टोचून घेणं, किडनीच्या कार्यक्षमतेची पातळी निश्चित करणं, रक्तातलं क्रिएटिनिन मोजणं, एक ना दोन. सुरुवातीला आठवड्यातून दोनदा, सोमवार-गुरुवार. अशा वेळी रुग्णालयाच्या प्रतीक्षालयात बसलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे वंदनाचं लक्ष जायचं. काही चाळिशीचे, क्वचित तिशीतले, बरेच पन्नास-साठीतले असत. कुणी धास्तावलेले, काही निर्ढावलेले, काही भीती दडवण्यासाठी ओढूनताणून निर्विकार. कुणीही एकमेकांशी फारसं बोलण्याच्या मन:स्थितीत नसलेले. नावाचा पुकारा झाला की आत जायचं, बेडवर पडायचं. डॉक्टर येऊन रिपोर्ट पाहणार, तंत्रज्ञ डायलिसिस सुरू करणार. चार तास आढ्याकडे पाहात पडून राहायचं. ते आटोपलं की निघायचं.

त्या दिवशी थकवा जाणवायचा. त्यात खाण्यापिण्याच्या मर्यादा. मीठ कमी, पाणी कमी आणि इतर अनेक पदार्थ वर्ज्य. मधले दोन दिवस बरे जायचे. पुन्हा डायलिसिसची प्रतीक्षा.

वंदनानं ठरवलं, इथे येणारे सारे लोक एका समस्येनं ग्रस्त, एका प्राक्तनानं बांधलेले. मूत्रपिंड प्रत्यारोपण हे सगळ्यांचं अंतिम सुटकेचं लक्ष्य. मात्र तोवर डायलिसिस हाच जामीन. दोन दिवसांची जामिनावर सुटका, पुन्हा ठाण्यावर हजेरी लावणं क्रमप्राप्त! अशा वेळी एकाच दु:खानं बांधलेल्या सहोदरांनी आपल्या व्यथा वाटून घेणं किती सहज, किती नैसर्गिक कृती. मग वंदनानं हळूहळू प्रतीक्षालयात वाट पाहात बसलेल्या रुग्णांशी संवाद साधायला सुरुवात केली.

‘‘मी भारती, इथे सात वर्षांपासून येतेय. बरोबर मिस्टर असतात, क्वचित सून. ती गृहिणी आहे, पण घरचं बरंच काम पडतं तिच्यावर. माझा रक्तदाब बराच आधी उघडकीला आला होता, पण त्यावेळी क्रिएटिनिन सामान्य होतं. मात्र आतल्या आत किडनी खराब होत होती. लक्षात आलं तेव्हा उशीर झाला होता.’’ ती कसनुसं हसली. अंदाजे पंचावन्न वर्षांच्या भारतीची व्यथा ऐकून वंदनाला धक्का बसला. ‘कमी वयात बीपी वाढलेलं आढळलं, तर किडनीच्या खोलवर तपासण्या करायला हव्यात. क्रिएटिनिन बऱ्याचदा सामान्य असतं,’ डॉ. विरेनचे शब्द तिला आठवू लागले. तिच्या आणि भारतीच्या मग गप्पा सुरू झाल्या. वातावरण सैल झालं. नुसत्या मूक प्रतीक्षेचा ताण कमी झाला. दोघींनी डॉक्टरांना शेजारी-शेजारी खाटा मागितल्या आणि गप्पा सुरू राहिल्या. डायलिसिस कधी संपलं कळलं नाही. एकमेकांना पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन दोघींनी रुग्णालय सोडलं.

आता वंदनाचा हा परिपाठ झाला. तिनं आणि भारतीनं नेहमी भेटणाऱ्या रुग्णांशी पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. दरवेळी एकमेकांना पाहणारे; अनोळखी नव्हतेच ते. एक समूह तयार झाला. मग व्हॉट्सअॅप समूह. विनोदी स्वभावाच्या सोमण काकांनी त्याला ‘किडनी किड्स’ हे नाव दिलं! मग त्यात आणखी आठ-दहा जणांची भर पडली. रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्या, यांवर चर्चा, त्यावर इतरांनी आपल्या अनुभवानं सुचवलेले उपाय, असं सुरू झालं. मग खास स्त्रियांच्या अशा विवंचना… म्हटलं तर खासगी, म्हटलं तर सर्वसामान्य, अशा गोष्टींची चर्चा व्हायला लागली.

सून म्हणे, ‘‘कशाला आटापिटा करता सासूबाई? कुठे ग्रुप तयार करता, कशाला थांबून राहता हॉस्पिटलला इतरांसाठी?’’ मात्र हा समूह तयार झाल्यापासून वंदनाला उत्साही वाटू लागलं होतं. दरवेळी डायलिसिसच्या दिवशी जे दडपण यायचं, ते जाणवेनासं होऊ लागलं. एका रविवारी तिनं सगळ्यांना घरी बोलावलं. आहार-पथ्याचं भान ठेवून उत्तम बेत तयार केला. सुनेनंही साथ दिली. सारे तृप्त झाले. कशाची तरी वाट पाहण्याचं एक नवं कारण आयुष्याला मिळालं. पुढल्या अंगतपंगतीचं यजमानपद दहा वर्षांपासून डायलिसिस करणाऱ्या लीलाताईंनी घेतलं.

वंदनाच्या समूहशक्तीनं डायलिसिसच्या वाटेवरच्या या ज्येष्ठांचं एकटेपणाचं क्रिएटिनिन कमी केलं! वेदना एक मूक संवाद असतो. वेदनेच्या वारीतले विविध जातीपंथाचे वारकरी एकाच विठ्ठलाचे, ‘पीड पराई जाणणारे’ वैष्णव जन होऊन जातात! मग वारीची वाट हेच पंढरपूर!

nmmulmule@gmail.com