घरातील अधू मुलांची आईवडिलांना काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करताना पालकांनाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. उपचारादरम्यान घरात होणारी चिडचिड, निराशा, दोषारोप असे सर्व नकारात्मक वातावरण असतानाही शांतपणे स्वत:साठी, कुटुंबासाठी काय करायला हवे?
सौम्या हातामध्ये एक मोठीशी फाइल घेऊन कोचावर बसली होती. तिचा आज ऑफिसमधला शेवटचा दिवस होता. जाण्यापूर्वी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी नीलिमा मॅडमकडे सोपवाव्यात म्हणून त्यांच्या येण्याची वाट पाहात होती. त्या आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे मृदू भाव आणि हास्य सौम्याला खूप आश्वासक वाटलं.
‘‘कशी आहेस सौम्या? आज तुझा शेवटचा दिवस ना? सगळे जण मला सांगतात की तू ही कंपनी सोडू नये. मला तर इथे येऊन जेमतेम एक महिना झाला पण तू गेली पाच वर्षं इथे आहेस आणि तुझ्याबद्दल सगळे जण आपुलकीनं बोलतात म्हणजे तू खूपच छान काम केलं असणार.’’
सौम्या काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखीनच खुललं. ‘‘मॅडम हा माझा पहिलाच जॉब. त्यामुळे शक्य ते मी सगळं केलं आणि माझ्या सगळ्या वरिष्ठांनी भरपूर मदत केली.’’
नीलिमा मॅडमनी तिथल्या एका खुर्चीकडे हात दाखवून तिला बसायची खूण केली आणि स्वत:ही तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसल्या. दरम्यान, त्यांनी चहाची ऑर्डर दिली आणि सौम्याची फाइल उघडली. ‘‘आधीच्या प्रत्येक मॅनेजरने तुझ्याबद्दल खूप चांगला रिपोर्ट लिहिलेला आहे. तू हुशार आहेस. नवीन गोष्टी अंगावर घेऊन काम करते आणि पटकन शिकते. इतरांच्या चुका तुला सापडल्या तर तू त्या योग्य शब्दांत सांगतेस आणि सगळ्यांना मदत करायला कायम तयार असतेस. शिवाय हे करत असताना तुझं स्वत:चं काम नेहमी बिनचूक असतं. दरवर्षी तुला जास्तीत जास्त इन्क्रिमेंट दिली जावी, अशी सगळ्यांनी शिफारस केलीय. दोन वर्षांपूर्वी तर ‘एम्प्लॉई ऑफ द इयर’ म्हणून तुला विशेष बक्षीससुद्धा मिळालं आहे. हे सगळं असताना तू अशी तडकाफडकी नोकरी सोडून का जाते आहेस? काय झालं याच्याबद्दल मला कुतूहल आहे म्हणून मी तुला प्रत्यक्ष या राजीनाम्याच्या मुलाखतीसाठी बोलावलं. कंपनी म्हणून आम्हाला अजून काय करता येईल आणि तुझ्यासारख्या उत्तम माणसांना इथंच राहता यावं म्हणून काय करता येईल याची मला माहिती हवी आहे.’’
सौम्या म्हणाली, ‘‘ मी आधीच्या एच.आर. हेडशी खूप सविस्तर बोलले होते, पण तेवढ्यात त्यांनीही नोकरी सोडली आणि तुम्ही आलात. मी तुम्हाला सगळं सांगते, पण आधी ही फाइल ताब्यात घ्या. काही ‘कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स’ यामध्ये आहेत. काही चालू असलेल्या मॅटर्सबद्दल मी लिहिलेल्या नोंदीसुद्धा यामध्ये आहेत. माझ्या जागी येणाऱ्या नवीन व्यक्तीला याचा उपयोग होईल.’’
‘‘म्हटलं ना की, तू अत्यंत मनापासून काम करणारी व्यक्ती आहेस हे सगळ्यांना माहिती आहे. ते तू नोकरी सोडतानासुद्धा सिद्ध केलंस. बरं आता मला सांग की, तू इतक्या तडकाफडकीने नोकरी का सोडून जाते आहेस? आणि तुझा नोटीस पीरियड बेदखल करून तुला लगेच जाऊ द्यावं, असं मुद्दाम मला सांगून ठेवलेलं आहे. पण मला जरा तुझ्याशी बोलल्याशिवाय तुला जाऊ देणं योग्य वाटलं नाही म्हणून मी तुला आज बोलावलं.’’
‘‘मॅडम, माझं लग्न झाल्या झाल्याच मला या कंपनीमध्ये नोकरी लागली. ही माझी पहिलीच नोकरी. तीन वर्षांपूर्वी मला मुलगा झाला. त्याचा जन्म गुंतागुंतीचा होता. त्याला तीन आठवडे अतिदक्षता विभागामध्ये ठेवावं लागलं. त्यातून तो व्यवस्थित बाहेर आला, पण डॉक्टरांनी आम्हाला याची खूप काळजी घ्यावी लागेल असं सांगितलं. तेव्हा मला जवळजवळ आठ महिने सुट्टी घ्यावी लागली. नोकरी सोडावी लागेल की काय असं वाटत होतं पण माझ्या सासूबाई माझ्याकडे राहायला आल्या आणि त्या म्हणाल्या, ‘‘मी मुलाला सांभाळेन तू कामाला परत जा.’’ त्यांचा खूप मोठा आधार होता. गेली तीन वर्षं मुलाच्या सगळ्या थेरपी त्यांनीच सांभाळल्या. मी दिवसभर येथे असते आणि त्या लेकाला, मंदारला रिक्षामधून सर्व डॉक्टर, थेरपिस्टकडे घेऊन जातात. मंदारच्या हातापायांमध्ये ताकद कमी आहे आणि बोलणं अगदीच थोडंसं आहे. आम्ही बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं. बहुतेकांचं म्हणणं असं आहे की, त्याचा मेंदू अधू आहे आणि सर्व थेरपी सुरू ठेवणं हाच सध्याचा उपाय आहे.’’
हे सांगताना सौम्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने ओढणीनं डोळे टिपले आणि सांगायला सुरुवात केली, ‘‘महिन्यापूर्वी सासूबाई आणि मंदार रिक्षातून जात होते. त्या रिक्षाला एका टँकरने सिग्नल तोडून धडक दिली. त्या अपघातात सासूबाईंच्या कमरेचं हाड मोडलं. सुदैवानं मंदारला काही लागलं नाही. तेव्हा परत माझी तीन आठवड्यांची सुट्टी झाली. तुम्ही जॉइन झालात तेव्हा मी त्याच सुट्टीवर होते. आता सासूबाईंना हॉस्पिटलमधून घरी आणलं आहे आणि त्यांचीसुद्धा फिजिओथेरपी रोज घरी चालू असते. सुदैवानं माझ्या नवऱ्याच्या कंपनीचा उत्तम मेडिकल विमा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आम्हाला परवडतात. नाही तर फक्त आमच्या पगारावर हे जरा अवघड गेलं असतं. आता सासूबाई परत कधी चालायला लागतील, कितपत चालतील हे माहिती नाही. निदान सहा ते आठ महिने तरी लागतील, असं डॉक्टर म्हणाले. त्या खूप घाबरलेल्या आहेत. परत त्या रिक्षात बसतील का? हे मला माहीत नाही. पण मंदारची थेरपी थांबवता येत नाही. आम्ही गेली दोन वर्षं त्याच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे. तो थोडा थोडा सुधारण्याची लक्षणं दाखवतो आहे. जर थेरपी बंद केली तर ही सगळी गाडी परत उलट्या दिशेला जाईल असं मला वाटतं. सासूबाईंना एकट्याला हे करणं शक्यच नाही.’’
हे सगळं सांगत असताना सौम्याचा गळा दाटून आला. नीलिमालासुद्धा हे सगळं अनपेक्षित होतं. सौम्याच्या घरामध्ये इतकं मोठं वादळ आलेलं आहे याची तिला कल्पना नव्हती. ‘कितीही शिकल्या आणि कमावत्या झाल्या तरीही बायकांचं नशीब काही बदलत नाही.’ असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
तेवढ्यात सौम्याने बोलायला सुरुवात केली, ‘‘हे सगळं चालू असतानाच मंदारच्या बाबांना त्यांच्या कंपनीने परदेशात पाठवायचं ठरवलं. त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. ही संधी सोडली तर त्यांच्या करिअरला मोठा फटका बसेल. आमचं आर्थिक गणित बिघडेल. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की, मी, सासुबाई आणि मंदार इथेच राहू. मी घर सांभाळेन आणि ते एक वर्षासाठी जर्मनीला जातील. मला नोकरी करणं मुळीच शक्य नाही मॅडम.’’ परत एकदा तिच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.
‘‘सौम्या, तुझा राजीनामा मी स्वीकारते आहे आणि तुला जबाबदारीतून आजच मोकळं करते आहे. त्याची जी काही कागदपत्रं पूर्ण करायची असतील ती आपण दोघी मिळून पुढच्या आठवड्याभरामध्ये संपवू या.’’
‘‘अधूपण असलेल्या मुलाची आई म्हणून मी तुला काही गोष्टी सांगू इच्छिते. माझाही थोडा-फार अनुभव आहे. तर ते मी आता बोलले तर तुला चालेल का? नाही तर बाहेर कुठेतरी भेटून आपण हे बोलू शकतो.’’
सौम्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं, ‘‘मॅडम, तुमचा मुलगासुद्धा अधू आहे हे मला माहीत नव्हतं. तुम्ही जी काय माहिती द्याल किंवा जो काही सल्ला द्याल तो मला निश्चित हवा आहे, कारण मी आता खूप गोंधळलेली आहे. मला सगळे जण वेगळेवेगळे सल्ले देत आहेत. त्यामुळे जी व्यक्ती आधीच त्या परिस्थितीतून गेलेली आहे अशा व्यक्तीचा सल्ला माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.’’
नीलिमाने खोल श्वास घेऊन हातातला चहाचा कप खाली ठेवला आणि बोलायला सुरुवात केली, ‘‘माझा मुलगा निखिल तीन वर्षांचा होता. तेव्हा डॉक्टरांनी संशय व्यक्त केला की त्याला ‘स्वमग्नता’(Autism) असण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व तपासण्या, उपचार या सगळ्याचा प्रचंड मोठा सलग कार्यक्रम चालू झाला. आज जशी तू नोकरी सोडते आहेस तशीच मलाही सोडावी लागली. मला परत नोकरी करण्यासाठी १५ वर्षं वाट बघावी लागली. आता निखिल मोठा झालेला आहे आणि दिवसभर तो स्वत: घरी राहू शकतो, त्यामुळे मी पुन्हा एकदा कामासाठी बाहेर पडलेले आहे. या १५ वर्षांमध्ये आमच्या घरामध्ये प्रचंड उलथापालथ झाली. माझे केस अक्षरश: पाच वर्षांत पांढरे झाले आणि निखिलच्या वडिलांना रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास सुरू झाला. मुलाचं टेन्शन हे त्याचं एकुलतं एक कारण आहे असं मला वाटत नाही. मूल अधू आहे म्हटल्यावर आई-वडिलांना काळजी वाटत राहणं साहजिकच आहे. पण आम्ही दोघांनीही खूप वेगळी अतिरेकी प्रतिक्रिया दिली बहुतेक. आम्ही रात्रंदिवस खूप चर्चा करायचो आणि जो कोणी जे काही सांगेल ती ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करायचो. आम्ही सुशिक्षित असूनसुद्धा अगदी देवदेवस्कीसुद्धा केली. वाटेल ती औषधं कुठल्याही प्रकारचं वैद्याकीय शिक्षण नसलेल्या लोकांकडूनसुद्धा घेतली. पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण काही उपयोग झाला नाही. आपला मुलगा पूर्ण बरा होणार नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणे नॉर्मल होणार नाही. हे स्वत:च्या मनाला पटवायला आम्हाला अनेक वर्षं लागली. त्या सर्व गोंधळामध्ये मोठ्या मुलाला भरपूर त्रास सहन करावा लागला. आमचं लग्नसुद्धा मोडता मोडता वाचलं. एकमेकांसाठी काही वेळ शिल्लक राहिला नाही. सर्व वेळ हा फक्त निखिलची काळजी, त्याच्यासाठी नवीन ट्रीटमेंट शोधणं आणि ती ट्रीटमेंट पूर्ण करणं यामध्येच जात होता. वारंवार निराशा, एकमेकांवर चिडचिड, आणि दोषारोप याची आम्ही खूप मोठी किंमत दिली. आम्हाला ही जाणीव होण्यासाठी आणि शांतपणे पुन्हा घर सावरण्यासाठी खूप वर्षं जावी लागली.’’
तुला म्हणून सांगते, ‘‘अजूनही सगळी नाती परत ठिकाणावर आली आहेत याची मला खात्री नाही. तू तुझ्या मुलाच्या आजारपणामुळे ही नोकरी सोडते आहेस, एवढंच जुजबी कळलं होतं म्हणून तुझ्याशी बोलायचं ठरवलं. पुढची काही वर्षं तू प्रवास करणार आहेस, तो रस्ता अवघड आहे. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे तुम्हाला दोघांना शांतपणे विचार करून ठरवावं लागेल. फक्त भाबड्या आशेमुळे वाटेल त्या गोष्टी करणे यापासून तुला स्वत:ला आणि तुझ्या कुटुंबाला वाचवावं लागेल. आणि कुटुंबातील सर्व नाती टिकून राहतील याचीही तुम्हाला दोघांना काळजी घ्यावी लागेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वत:ची काळजी घे. रोजचा काही तरी वेळ स्वत:च्या तब्येतीसाठी, छंदांसाठी आणि मैत्रिणींना भेटण्यासाठी शिल्लक ठेव. मुलाची थोडी-फार जबाबदारी दुसऱ्या कोणावर सोपवता आली पाहिजे. माझ्या मुलाचं सगळं काही मीच करणार, कारण माझ्या इतकं चांगलं दुसरं कोणीच करणार नाही अशा भ्रमात राहू नको. त्याची खूप मोठी किंमत द्यावी लागते.’’
नीलिमा थोडी शांत झाली आणि सौम्याच्या डोळ्याला डोळा भिडवून निग्रहाच्या स्वरात म्हणाली, ‘‘आपली मुलं फक्त आपली नसतात. इतर लोकांबरोबर योग्य वयात योग्य प्रकारे नातं निर्माण करणं हे त्यांच्या वाढीसाठी गरजेचं असतं. पालक म्हणून जर आपण हे होऊ दिलं नाही, तर आपण त्यांचं आणि स्वत:चं नुकसान करून घेतो. मी खूप मोठी किंमत देऊन हे शिकले आहे. इतरांनीसुद्धा ती चूक करू नये असं मला वाटतं. म्हणून तुला इतक्या वैयक्तिक गोष्टी आपली नुकतीच ओळख झालेली असतानासुद्धा सांगते आहे.’’
काय बोलावं कळेना म्हणून सौम्याने वाकून नीलिमाला नमस्कार केला. ‘‘तुम्ही आत्ता जे मला सांगितलं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघं तुम्हाला निश्चित भेटायला येऊ. आता आपण घरीच भेटूया.’’
सौम्या बाहेर पडली. तिच्या पाठमोऱ्या छबीकडे नीलिमा बराच वेळ बघत राहिली…