जवळच्या व्यक्तीच्या जाण्यामुळे होणारा शोक केवळ तात्कालिक नसतो. अनेकांच्या बाबतीत तो दीर्घकाळ रेंगाळतो. त्याचा सामना करता आला नाही, तर येतो एकटेपणा, समाजापासून तुटणं. अशा वेळी व्यक्तीव्यक्तींच्या शोकाची तुलना टाळावी. समुपदेशनातले तीन ‘C’ मात्र सर्वांनी जरूर शिकून घ्यावेत. त्यांच्या सहाय्यानं शोकाकुल व्यक्ती एकटेपणातून बाहेर येऊ शकते.

शाळेत असताना गौतम बुद्धांवर एक धडा होता. राजकुमार सिद्धार्थ जेव्हा राज्याचा फेरफटका मारायला जातो, तेव्हा त्याला जर्जर अवस्थेतला एक वृद्ध दिसतो. थोडं पुढे गेल्यानंतर एक शवयात्रा दिसते. ते शव वाहून नेणाऱ्या नातेवाईकांचं दु:ख पाहून सिद्धार्थला खूप वाईट वाटतं. या प्रसंगांनंतर तो वैभव, सुंदर बायको, मुलगा सगळं सोडून संन्यास घेतो. पुढे तोच सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला…

हा धडा वाचताना, त्या वयात मला राजकुमार सिद्धार्थला एवढं कसलं वाईट वाटलं ते नीटसं कळलं नव्हतं, पण जेव्हा माझ्या आईच्या जाण्यानं माझा प्रथमच मृत्यूशी सामना झाला, तेव्हा पहिल्यांदा त्या गोष्टीचा अर्थ नीट समजला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे माणूस आतून पार तुटून जातो. ही अवस्था ज्याची त्याला समजत असते. त्या अवस्थेत प्रचंड एकटेपणा येत असतो.

आधी या संदर्भातल्या दोन व्याख्या समजावून घेऊ या. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या आणि प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणं म्हणजे वियोग (bereavement) आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूला दिली गेलेली प्रतिक्रिया किंवा त्या मृत्यूमुळे निर्माण झालेली भावना म्हणजे शोक (grief). याचाच अर्थ एकाच घरात झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे वियोग जरी सगळ्यांनाच होत असेल, तरी शोक प्रत्येकाचा वेगवेगळ्या पातळीचा असेल. गेलेल्या व्यक्तीशी आपली कशा प्रकारची बांधिलकी आहे, मृत्यू कशामुळे झालेला आहे, गेलेल्या व्यक्तीवरचं अवलंबित्व कसं होतं, या काही घटकांचा शोकाच्या पातळीवर परिणाम होतो. हे सगळं समजावून घेणं अशासाठी महत्त्वाचं आहे, कारण शोकामुळे जे एकटेपण येतं, त्यात ‘मला कोणीच समजून घेऊ शकत नाही,’ ही भावना खूप प्रबळ असते.

रोहन आणि मनीषा यांची आई कर्करोगामुळे वर्षभरापूर्वी गेली. आई गृहिणी असल्यामुळे रोहन, मनीषाच्या बाबांसहित सगळ्यांचंच तिच्यावर अवलंबित्व होतं. रोहन पाचवीत, तर मनीषा आठवीत होती. बाबांवरची जबाबदारी आता दुप्पट झाली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला घर आणि ऑफिस यांत गुंतवून घेतलं होतं. रोहनला बाबा आणि ताईकडून प्रेम मिळत असल्यामुळे तोही लवकर सावरला. पण ज्या काळात मनीषाला आईची सगळ्यात जास्त गरज लागणार होती, त्याच काळात ती सगळ्यांना सोडून गेली होती. आता मनीषा कोणाशी जास्त बोलायची नाही, कोणामध्ये मिसळायची नाही. नातेवाईक, तिचे शिक्षक, सगळे तिला सांगायचे, ‘‘जे झालं ते आता बदलता येणार नाही. बाबा आणि रोहनलापण दु:ख झालंय, पण ते आपापल्या कामाला लागलेच ना?…’’ हे ऐकलं की तिला अधिकच एकटं वाटायचं. ती पूर्वी तिच्या मैत्रिणींच्या, शाळेच्या सगळ्या गमती आईला सांगायची. मागच्याच महिन्यात तिची मासिक पाळी सुरू झाली होती. आता पोट दुखलं तर ती कोणाला सांगणार होती? तिच्यासाठी सगळं काही आईच होती. आता कोण असेल यापुढे?

कवी ग्रेस यांच्या ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या गाण्यात दोन ओळी आहेत- ‘अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे’. मनीषाला असंच काहीसं वाटत होतं. सगळे लाड, प्रेम, हट्ट आईजवळ होते आणि आता तिला मोठं, समजूतदार होणं भाग होतं. हे विचार मनात आले की तिला वाटायचं, आता माझ्यासाठी कोणीच नाहीये. मनीषाच्या बाबतीत तर तिची आई अवेळी गेली होती. पण माणसानं वयाची साठी जरी गाठली, तरी पालकांचं जाणं म्हणजे त्यांच्यासाठी एक पोकळी तयार होते. ती पोकळी कशानंच भरून निघत नाही. आपल्या ‘आतल्या मुलाला’ (inner child) गोंजारणारं त्यांच्या माघारी कोणीच नसतं. आपलं बालपण आठवून कौतुकानं बोलणारं कोणीच राहात नाही. बायको किंवा नवरा, मुलं, मित्रपरिवारही आपल्या प्रेमानं ही उणीव भरून काढू शकत नाहीत.

वरच्या उदाहरणातल्या मनीषा आणि रोहनचा विचार करता, आईचा वियोग दोघांनाही झाला आहे. पण आईच्या मृत्यूला दिली गेलेली दोघांचीही प्रतिक्रिया वेगवेगळी आहे. तसंच त्यांची परिस्थिती हाताळायची पद्धतही वेगवेगळी आहे. इथे तुलना करणं अजिबात योग्य नाही. जेवढी तुलना वारंवार होत राहील, तेवढी मनीषा आतल्या आत स्वत:ला मिटून घेत राहील. वास्तविक पाहता मनीषा हतबल आहे, पण या तुलनेमुळे तिच्यामध्ये एक अपराधीपणाची भावना वाढीला लागते. जेवढे घळाघळा वाहणारे अश्रू खरे असतात, तेवढंच मौनही खरं असतंच की! अश्रू पुसायला जर आपण धावत जातो, तर मग एखाद्याच्या मौनामध्ये आपण त्याच्याबरोबर का असू शकत नाही? संवेदनशीलतेच्या आणखी एका वरच्या पायरीवर जाऊन मौनामध्येही जर आपण हात पुढे केला, तर ती व्यक्ती एकटेपणाच्या भावनेतून निश्चितच बाहेर येऊ शकते.

भांडण, रुसणं-फुगणं, प्रेम या सगळ्या भावनांसहित आपल्याशी संबंधित असणारी व्यक्ती काही तासांपूर्वी होती आणि आता ती नाहीये, हे खरंच स्वीकारायला खूप जड आहे. काही भावना या वारंवार अनुभवायला मिळतात. त्यामुळे त्यांची तीव्रता कमी-जास्त होते. पण जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, किंबहुना मृत्यू ही घटना काही आपल्या आयुष्यात नियमितपणे येत नाही (काही दुर्दैवी अपवाद सोडता). त्यामुळे ते धक्कादायक असणं, त्यातून बाहेर पडणं, हे अवघड असू शकतं हे आधी मान्य करायला हवं. आपण दुसऱ्यांना किंवा दुसरे आपल्याला काय काय मदत करू शकतात, हे बघण्यापेक्षा एखादी व्यक्ती या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला काय मदत करू शकते, हे बघणं गरजेचं आहे.

३५ वर्षांचा निनाद आपल्या लहान मुलाला बाइकवरून घेऊन येत असताना त्यांचा अपघात झाला. त्यात मुलाच्या मेंदूला मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला. निनादला आधीच आपल्या हातून अपघात झालाय, ही अपराधीपणाची भावना होतीच; शिवाय त्याचं लाडकं लेकरू त्याच्यापासून नेहमीसाठी हिरावून घेतलं गेलं, ही शोकाची भावनाही होती. या शोकामुळे त्यानं सगळ्यांशी बोलणं बंद केलं, ऑफिसला जाणं बंद केलं. तो पूर्णपणे एकटा राहायला लागला. खरं तर आता त्याच्या बायकोनं आणि त्यानंच एकमेकांना समजून, सांभाळून घ्यायला हवं होतं. पण तो तिच्यापासूनही लांब झाला होता. अशा प्रकारचा शोक हा फक्त मन, भावना इथपर्यंतच मर्यादित नसतो. त्याचा मेंदूवर परिणाम होतो. आपल्या मेंदूमध्ये बदामी केंद्र (Amygdala) नावाचा एक भाग असतो. या भागाचं काम प्रेम, राग, भीती या भावनांना सांभाळणं हे असतं. शोकाचा या भागावर परिणाम झाला की काही गोष्टींचं विस्मरण होतं, धोक्याच्या गोष्टींची जाणीव न होण्यासारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे ती व्यक्ती स्वत:तच हरवल्यासारखी भासते. इतरांशी तिचा ‘कनेक्ट’ कमी होतो. अर्थातच बऱ्याच वेळा समोरच्याला वाटतं, की हे असं किती दिवस चालत राहणार? निनादनं सगळ्यांमध्ये मिसळायला हवं, ही जगरीत आहे… सगळं बरोबर आहे. पण त्या मेंदूवर शोकाचा जो परिणाम झाला आहे, तो हे सगळं त्याच्याकडून करून घेतोय. त्या व्यक्तीला जेवढं ‘फोर्स केलं जाईल’, तेवढं त्यांना अपराधी वाटायला सुरू होणार आहे. त्याऐवजी पुरेशी गाढ झोप, मेडिटेशन (ध्यान) या गोष्टींनी अमिग्डलावरील परिणाम कमी होऊ शकतो. परिणामी तो माणूस शोक आणि एकटेपणातून बाहेर येऊ शकतो.

शोकामुळे जो एकटेपणा येतो, त्यातून बाहेर पडण्यासाठी तीन ‘C’ मानसशास्त्रात सांगितले आहेत. Choose, Connect आणि Communicate. ही त्रिसूत्री समजली आणि त्यानुसार आचरण केलं, तर एकटेपणाला दूर सारणं जमू शकेल.

सोनमच्या पतीचं निधन होऊन सहा महिने झाले, तरी ती अजूनही घराबाहेर पडली नव्हती. पालकांच्या सततच्या, ‘तू बाहेर जा, लोकांमध्ये मिसळ’ या धोशाचाही तिला आजकाल फार कंटाळा आला होता. त्यामुळे तिची चिडचिड वाढली होती. शेवटी तिची आई तिला समुपदेशकाकडे घेऊन गेली. समुपदेशनाच्या पहिल्या सत्रात सोनम खूप रडली. समुपदेशकानं तिला विचारलं, की ‘‘सोनम, तुला स्वत:ला या एकटेपणाच्या गर्तेतून बाहेर येण्याची इच्छा आहे का?’’

ती म्हणाली, ‘‘मला यायचंय… आयुष्य असं जाऊ शकत नाही, हे कळतंय मला. पण मला जमत नाहीये.’’ समुपदेशकानं तिला पहिला ‘C’ सांगितला- निवड (Choose). आयुष्यात वाईट प्रसंग येतात, तसे चांगले प्रसंग येतात. समाजातल्या चांगल्या प्रसंगांत तिला बोलावलं जाईल. पण तिला विचारपूर्वक निवड करायची आहे, की तिला या कार्यक्रमाला जायचंय की नाही?… एखाद्या प्रसंगानं तिला तिच्या पतीची तीव्रतेनं आठवण येईल, दु:ख परत उमाळून वर येईल, तर तिनं अशा ठिकाणी जाऊ नये. पण काही ठिकाणं अशी असतील, जिथे जाऊन तिला बरं वाटेल. थोडा वेळ का होईना, पण दु:ख बाजूला राहील. एकदम घरात कोंडून घेण्यापेक्षा तिनं कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही, याची निवड करावी. काही प्रसंगांत तिचा मेंदू तिला मदत करणार नाही. अशा वेळी तिनं तिच्या जवळच्या माणसांशी चर्चा करावी. पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पूर्णपणे तिलाच असेल.

सोनमला जेव्हा अशी निवड करायची सवय लागली, तेव्हा समुपदेशकानं तिला दुसरा ‘C’ शिकवला. जोडलं जाणं (Connect). मुळात आयुष्य एकटं राहण्यासाठी नाहीये. अगदी तुम्ही अंतर्मुखी असलात, तरीही अशा प्रसंगांमध्ये एकटं राहणं पूरक नाही. सोनमला तिच्याजवळच्या व्यक्तींशी जोडलेलं राहण्यास सांगण्यात आलं. काहीही न करता, न बोलता फक्त तिच्या बाजूला जरी कोणी बसून राहत असेल, तिच्या मौनाला मौनानंच साथ देत असेल, तर सोनमनं तशी परवानगी दिली पाहिजे. कदाचित ती व्यक्ती सोनमचं दु:ख पूर्णपणे दूर करू शकणार नाही, पण त्या व्यक्तीची सोबत असल्यामुळे तिला खूप फरक पडेल.

पुढच्या सत्रात समुपदेशकानं तिला तिसरा ‘C’ शिकवला. संवाद (Communicate) तिला सांगितलं, की ‘‘जरी तू खूप अवघड काळातून जात असलीस, तरी तू मोकळपणानं तुला काय हवंय, हे बोलून दाखवल्याशिवाय तुझे पालक, मित्रपरिवार तुला पाठिंबा देऊ शकणार नाहीत. तू जर ‘सगळं काही ठीक आहे,’ असा मुखवटा घालून फिरशील किंवा कोंडून घेशील, तर या दोन्ही परिस्थितींत तुला काय मदत करावी हे त्यांना कळणार नाही. या प्रवासात तू तुझ्या भावना त्यांना सांगितल्यास तर त्यांना तुला हात देणं सोपं जाईल.’’ या त्रिसूत्रीच्या मदतीनं सोनमनं पुष्कळच चांगल्या प्रकारे एकटेपणावर मात केली.

कुटुंबातल्या कोणाचं तरी निधन होतं, काही काळ जातो आणि आपण आपल्या कामाला पूर्ववत जायला लागतो. पण शोकातून बाहेर पडण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतील आणि लागणारा वेळही वेगवेगळा असेल. फक्त त्या व्यक्तीचा प्रवास परत समाजात मिसळण्यामध्ये होत आहे, की उलटा- एकटेपणाकडे होत आहे, हे मात्र काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे.

trupti.kulshreshtha@gmail.com