कधी घरावर दगड यायचे, तर कधी गोठाच पेटायचा. सलग दहा दिवस हे प्रकार होत राहिल्यावर मात्र भीतीचं वातावरण निर्माण होणारच. आशाबाईंच्या घरातही असे भीतिदायक प्रकार घडायला लागले, तेव्हा मात्र त्यांनी मदत मागितली आणि त्यांच्यावरची ‘भानामती’ कायमची मिटली. कोण करत होतं ते आणि का करत होतं?
अचानक घरावर दगड येणं, अंगावर बिबव्याच्या फुल्या उमटणं, डोळ्यातून खडे येणं, अचानक काही पेटणं अशा घटना घडू लागल्यास संपूर्ण भोवताल भयभीत होतो. घटनेमागचं कारण कळत नाही. गूढता, भीती, चिंतेनं मन ग्रासलं जातं. या सर्वांच्या मागे मंत्र-तंत्र, जादूटोणा आहे. अशा गैरसमजातून भगत, मांत्रिकांचा आधार घेतला जातो. कधी कुणी पोलिसात तक्रारही करतं. परंतु या घटना घडतच राहतात. या घटनांना ‘भानामती’ असं संबोधलं जातं. कोण करतं ही ‘भानामती’? ‘भानामती’ करणाऱ्यांचा उद्देश काय?‘भानामती’ घडवणारी व्यक्ती कुटुंबातील किंवा परिसरातीलच असते, असं कोणाला सांगितलं तर ते पटत नाही. परंतु ते सत्य असतं. सत्य आहे.
ऑगस्ट महिन्याची चार तारीख. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान एक महत्त्वाचं काम आटोपून घरी पोहचले. घरी पोहचते तोच एक दूरध्वनी आला. ‘‘मी आशाबाई बोलतेय. ताई, आमचं छप्पर पेटलं, रोज आमच्या घरावर दगड पडतात, आमच्या घराच्या, गोठ्याच्या आजूबाजूला वस्तू अचानक पेट घेतात, आम्ही पोलिसांना कळवलं. पोलीस आले त्यांच्या समक्ष घरावर दगड येऊन पडत होते. दगड कुठून येतात? कोण मारतं? काही कळत नाही. आता भर पावसात आमचं गोठ्याचं छप्पर पेटतंय. तुम्ही ताबडतोब या.’’ दिवसभराच्या कामाचा थकवा अंगात होता. बाहेर पाऊस सुरू होता. आता जावं की सकाळी? मन थोडं द्विधा झालं. परंतु आशाबाईचा केविलवाणा, अस्वस्थ आवाज कानात घुमत होता. माझ्या ‘अंनिस’च्या (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) सहकाऱ्यांना दूरध्वनी केले. तेही तातडीनं येण्यास तयार झाले. घटना घडत असलेली वस्ती तशी आमच्यापासून १०-१२ किमी. अंतरावरच असल्याने दुचाकीवर माझे सहकारी व मी त्वरित निघालो. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलो. वस्तीवर पुरेसा प्रकाश नव्हता. आम्ही पोहोचलो त्यावेळी दगड येणं तात्पुरतं थांबलेलं होतं. परंतु गाईच्या गोठ्यातील छप्पर आतल्या बाजूने पेटल्याच्या खुणा दिसत होत्या. आम्ही आशाबाईंच्या घरी पोहोचताच वस्तीवरील २०-२५ लोक जमा झाले. सर्वच लोक घाबरलेले दिसत होते. भीतीयुक्त स्वरात ते आम्हाला सांगत होते. ‘‘गेले दहा दिवस हा खेळ चाललाय. रोज दगड पडतात. अचानक कुठं तरी जाळ निघतो. आम्ही कामधंदा सोडून घरीच बसलोय. पोलिसांनाही काही उमगत नाहीए. त्यांच्या समक्ष दगड येतात.’’ आम्ही जुजबी पाहाणी केली. त्या लोकांना धीर दिला. ‘‘सकाळी परत येतो. आत्ता अंधारात आम्हाला पाहणी करता येणार नाही.’’ असे सांगून परत निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजण्याच्या आतच वस्तीवरून पुन्हा फोन आला. ‘‘गाईची पाठ आपोआप जळाली.’’
आम्ही तातडीनं वस्तीवर निघालो. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान तिथे पोहोचलो. वस्तीवर पोहोचताच तिथल्या घरांची, वस्तीची, आजूबाजूच्या परिसराची, झाडंझुडुपं, विहीर-नाल्याची पाहाणी केली. लोकांशी चर्चा केली. वस्ती गावापासून दोन कि.मी. अंतरावर होती. आशाबाईंच्या घराच्या आजूबाजूला तिच्या भावकीतली ५-६ घरं होती. घरांच्या आजूबाजूला सर्व शेती व पडीक रान होतं. आशाबाईंच्या घराच्या पूर्वेला १५० ते २०० फुटांवर एक वीटभट्टी होती. आजूबाजूला मोठमोठी पिंपळ, आंबा व अन्य झाडे होती. आशाबाईंच्या नवऱ्याचं दोन वर्षांपूर्वी अपघातात निधन झालं होतं. त्यांना एक मुलगी होती. ती लग्न होऊन सासरी नांदत होती. तिच्या मुलासह, ओंकारसह आशाबाई वस्तीवर राहात होत्या. ओंकार गावातील शाळेत जात होता. आशाबाई मुळातच कष्टाळू व जिद्दी होत्या. त्या स्वत: शेती व दुग्ध व्यवसाय करत होत्या. आशाबाईंच्या घराशेजारीच गोठा होता. त्यात तीन दुभत्या गाई व दोन वासरे होती. घराच्या आजूबाजूला त्यांच्या भावकीच्या घरातही सर्व शेतकरी कुटुंब राहात होते.
आम्ही कार्यकर्ते येऊन गेल्याची गावात चर्चा झाली, वर्तमानपत्रात बातम्या झळकल्या. आम्ही आशाबाईंच्या वस्तीची, आजूबाजूच्या घरांची संपूर्ण पाहाणी केली. तिथे उपस्थित लहान-मोठ्या सर्वच व्यक्तींशी बोललो. विचारपूस केली. घरातल्या व्यक्तींची माहिती घेतली. पेटलेलं छप्पर व इतरत्र लागलेली आग प्रथम पाहिलेल्यांचीही माहिती घेतली. वस्तीवरच्या लोकांनी घरावर येणारे काही दगड जपून ठेवले होते. त्या दगडांची पाहणी करून काही दगड ताब्यात घेतले. दगडांची पाहणी आम्हाला निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी मदत करणारी होती. घरांची रचना, लोकांमधील नातेसंबंध समजावून घेतले. त्यावेळी वस्तीवरील काही लोक नोकरी-व्यवसायानिमित्त तालुक्याच्या गावी गेलेले होते. सर्वच लोक उपस्थित नसल्याने आम्ही सुमारे दीड तास वस्तीवर थांबून परत फिरलो. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा वस्तीवर फेरफटका मारला. आम्ही या प्रकरणात हात घालण्यापूर्वी वस्तीवाल्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मांत्रिक, भगत यांना बोलावून झालं होतं. तरीही दगड येतच होते, जाळ निघतच होता.
आमचं वस्तीवर जाणं-येणं सुरू होताच दगड येण्याचं थांबलं. छप्परही नंतर पेटलं नाही. वस्तीवरच्या सर्वच लोकांना आम्ही, यामागे ‘मानवी हात आहे’ असं समजावून सांगितलं. आम्हाला वस्तीवरच्या सर्वच लोकांच्या मुलाखती घेऊन अन्य काही बाबींचं परीक्षण केल्याशिवाय ‘भानामती’चं कारण आणि हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेता येणार नव्हता. ‘‘रविवारी सकाळी दहा वाजता आम्ही पुन्हा येतो. त्या दिवशी मात्र वस्तीवरच्या सर्वांनीच वस्तीवर थांबावं,’’ असं सांगितलं. शनिवारी रात्री त्या गावात आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने सप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम घेतला. त्यात पाण्याने अग्नी पेटणे व काही हातचलाखीचे प्रयोग दाखवले. आपोआप काही घडत नाही, त्यामागे एक तर विज्ञान किंवा हातचलाखी असते हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सकाळी नऊ वाजताच आम्ही वस्तीवर पोहोचलो. काही गावकरीही आले होते. आमचं काम सुरू झालं. वस्तीवरच्या एका झाडाखाली पारावर बसून वस्तीवरील एकेका व्यक्तीस स्वतंत्रपणे बोलावून त्यांची मुलाखत घेणं सुरू केलं. मुलाखत झालेल्यांना बाजूला बसायला सांगितलं जेणेकरून इतरांना आम्ही काय विचारतोय ते कळू नये. दुपारी दोन वाजता सर्व लोकांच्या मुलाखती संपल्या. मुलाखतीच्या वेळी उत्तर देतांना झालेली गडबड, देहबोली, उत्तर टाळण्याचा प्रयत्न, वस्तीची केलेली पाहणी, वस्तीवर दगड येण्याची दिशा, वेळ आणि वस्तीवर आलेल्या दगडांचा प्रकार या सर्व बाबींचे निरीक्षण व परीक्षण करून आम्ही आमच्या निष्कर्षाप्रत पोहोचलो होतो.
वस्तीवर येणारे दगड हे विटांचे छोटे-छोटे तुकडे होते. ते सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी येत. वस्तीवर दगड पूर्व बाजूने येत होते जिथे वीटभट्टी होती. यावरून ते दगड तिथलेच असल्याचे कळले. वीटभट्टीच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर चढून दगड मारणारी व्यक्ती वस्तीवर दगड फेकत होती. मुख्य प्रश्न होता, तो गाईची पाठ जळण्याचा, छप्पर पेटण्याचा आणि अचानक जाळ निघण्याचा, हे सर्व कोण आणि का करतंय याचा. मुलाखती दरम्यान काढलेला निष्कर्ष असा निघाला की, आशाबाईंना मुलगा नव्हता. त्या नातवासोबत वस्तीवर राहात होत्या. भावकीच्या काही लोकांना त्यांचं वस्तीवर नातवाला घेऊन राहाणं रुचत नव्हतं. शेजारीच राहणाऱ्या दिराला वाटत होतं की, त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा आशाबाईंनी दत्तक घ्यावा. (संपूर्ण शेती, घर आपल्याला मिळेल ही आशा) आशाबाई मात्र मुलगा दत्तक घेण्यास तयार नव्हत्या. येनकेनप्रकारेण त्रास देऊन, मनात भीती निर्माण करून, घाबरवून त्यांना वस्ती सोडून जाणं भाग पाडण्यासाठी त्यांच्या दिराने आखलेला तो डाव होता.
आशाबाईंच्या दिराला राजेंद्र आणि पंकज हे दोन मुलगे होते. राजेंद्र वडिलांना शेतीत मदत करत होता, तर पंकज शिकत होता. आशाबाईंचा दीर मुलाखतीत भांबावल्यासारखा उलट-सुलट बोलत होता. त्यांच्या जावेनेही उत्तर देताना नकळत जास्त माहिती दिली. आशाबाईंचे पुतणे राजेंद्र व पंकज हेसुद्धा जाणीवपूर्वक नको तितक्या आवेशात व अति काळजी दाखवत बोलत होते. मुलाखती संपल्यावर पंकज आणि त्याच्या वडिलांना पुन्हा एकदा बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं की, ‘‘गुन्हा करणाऱ्याचं नाव आम्हाला समजलं आहे. जमा केलेल्या दगडांवरील हाताचे ठसे आम्ही तपासले आहेत. गुन्हा कबूल करा नाही तर आम्ही पोलिसांना तुमची नावं कळवणार आहोत.’’ तेव्हा दोघांनीही घाबरून केलेल्या गुन्ह्याची कबुली तर दिलीच परंतु ‘‘तुम्ही पोलिसांत जाऊ नका. वस्तीवरच्या लोकांनाही आमचं नाव सांगू नका. आम्ही पुन्हा असं करणार नाही.’’ अशी विनवणी करण्यास सुरुवात केली.
पंकज विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता, तो प्रयोगशाळेतून रासायनिक पदार्थ आणून शेणाच्या गोवरीत मिसळून आशाबाईंच्या गाईच्या गोठ्यात आणि घराच्या आजूबाजूला ठेवत होता. रासायनिक पदार्थ विशिष्ट परिस्थिती निर्माण होताच आपोआप पेट घेतात. ‘‘हे सर्व तुम्ही का केलं?’’ असं मी त्यांना विचारलं. ते दोघेही बापलेक काहीही बोलत नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणाले की, ‘‘आशाबाईंना घाबरवण्यासाठी तुम्ही असं केलं? त्या घाबरल्या म्हणजे इथून निघून जातील. असं तुम्हाला वाटलं ना?’’ त्यावर त्यांनी होकारार्थी मान डोलावली. ‘‘आम्ही असा गुन्हा पुन्हा करणार नाही.’’ असं आश्वासन आम्हाला दिलं.
‘भानामती’ थांबलीच होती, ती कोण व का करतं हेही समजलं होतं. वस्तीवरच्या लोकांना एकत्र जमवून आम्ही सांगितलं की, ‘‘हा प्रकार कोण करतं हे आम्हाला समजलं आहे. का करतं हेही माहीत आहे. आता ‘भानामती’ थांबलेली आहे. इथून पुढे हा प्रकार होणार नाही. पुन्हा आमची गरज भासल्यास आम्ही निश्चित येऊ.’’ वस्तीवरचे काही लोक ‘भानामती’ कोणी केली त्याचं नाव आम्हाला विचारत होते. परंतु त्यांना नाव सांगितल्यास तिथे भांडण-मारामाऱ्या होतील, कलह निर्माण होईल. म्हणून आम्ही नाव सांगितलं नाही. वस्तीवरच्या सर्व लोकांना समजावून सांगितलं. नाव न सांगण्यामागची आमची भूमिकाही समजावली. गुन्हा करणारा आता पुन्हा गुन्हा करणार नाही. याची खात्री दिली.
मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, तणावाखालील व्यक्ती, ‘भानामती’ करतात. त्या करण्यामागे दडलेलं कारण शोधणं, त्यावर उपाय करणं आवश्यक असतं. कारणं शोधणं, उपाय करणं व ‘भानामती’ बंद करणं हे सर्वस्वी ‘भानामतीग्रस्त’ कुटुंब, परिसर, व्यक्ती यांच्या सहकार्यावरच अवलंबून असतं. या प्रकरणात गावकरी, वस्तीवरील लोकांच्या सहकार्याने ‘भानामती’चा उलगडा झाला.
अगदी आजही हे प्रकार घडत आहेत, काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. हे समाज म्हणून खेदजनक आहे…
ranjanagawande123@gmail.com
(लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)