एखाद्या माणसावर विश्वास टाकून फसण्याचा अनुभव प्रत्येक जण कधी ना कधी घेतोच. अशा वेळी त्या व्यक्तीचा जेवढा संताप येतो, तेवढाच राग येतो स्वत:च्या गाफील राहण्याचा. ‘आपल्याला कोणी तरी सहज फसवून गेलं,’ ही भावना खात राहते. स्वत:ला सतत दोष देताना होणारी तडफड संपवण्यासाठी मूळचे प्रश्नच बदलून पाहिले तर?..

‘‘..तर, असं घडत घडत अखेरीस मीच हर्षशी ब्रेकअप केलं.’’ संजना तिच्या सख्ख्या मैत्रिणीला- प्राचीला आपल्या ब्रेकअपची कहाणी सांगत होती. पाणावलेल्या डोळय़ांनी संजना म्हणाली, ‘‘मी त्याला विसरू शकेन का? पुन्हा कुणाशी तेवढंच घट्ट नातं जमेल का? असे प्रश्न पडतात आता. अजूनही त्याची आठवण येते. तरी मी नातं संपवलं ते योग्य केलं हे नक्की. अर्थात एक गोष्ट मात्र सतत छळते, की माझ्याकडून इतका मूर्खपणा घडलाच कसा?’ दोन वर्ष ‘रिलेशनशिप’मध्ये राहिलेच का मी हर्षबरोबर?.. त्याचा खोटेपणा स्वच्छ दिसूनही डोळय़ांवर झापडं ओढली. मला ओळखणारे लोक माझ्या समंजसपणाचं, विचारीपणाचं कौतुक करतात. पण इथे मी इतकी माती कशी खाल्ली?.. हे प्रश्न आलटून पालटून कुरतडत राहतात. कामात लक्ष लागत नाही. गाडी चुकल्याची स्वप्नं पडतात, दचकून जाग येते झोपेतून. काय करू गं मी प्राची?’’

judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

 संजनाला हर्ष भेटला, तेव्हा सुरुवातीला संजनाच्या अख्ख्या ग्रुपच्या मते ते दोघं ‘मेड फॉर इच अदर’ होते. हर्षचं ‘नॉनस्टॉप’ कौतुक करणाऱ्या संजनाचं पुढे पुढे मात्र मधूनच गंभीर होणं, अचानक चिडचिड, अस्वस्थता, दोघांमधल्या वादाचे प्रसंग, हेही प्राचीनं पाहिलेलं होतं. अर्थात अशी छोटीमोठी वादळं जोडप्यांमध्ये उठतात, तशी शांतही होतात. नंतर प्राची एका प्रोजेक्टसाठी दिल्लीला गेली आणि थोडय़ाच दिवसांत तिला संजना-हर्षचं ब्रेकअप झाल्याचं समजलं. तेव्हापासून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सगळे हर्षबद्दल भरपूर गॉसिप करत होते. संजनाची समजूतही घालत होते. दिल्लीतल्या कामाच्या व्यापामुळे प्राची त्यात फार नसली, तरी तिची चॅटवर नजर असायची. गॉसिप आणि सहानुभूती दोन्ही अति व्हायला लागल्यावर संजना एके दिवशी ग्रुपमधून बाहेर पडली. संवाद आणि संपर्क तिनं तात्पुरता थांबवला. मात्र दिल्लीहून परतल्याबरोबर प्राची तिला भेटायला आली. तेव्हा संजनाला तिच्यापाशी मन मोकळं केल्याशिवाय राहावलं नाही.

   हर्ष गोडगोड बोलून अनेक गोष्टी लपवायचा. आपली नोकरी गेल्याचंही त्यानं संजनाला लगेच सांगितलं नव्हतं. ‘वर्क फ्रॉम होम’चा मोठा प्रोजेक्ट मिळाल्याची बतावणी करत तो चार महिने आरामात राहिला होता. ‘प्रोजेक्टचे पैसे रखडलेत’ असं सांगून संजनाचा पगार हक्कानं वापरत होता. नंतर तिला समजलं, की असा काही प्रोजेक्ट नव्हताच. उलट ‘प्रोजेक्ट-मीटिंग’चा बहाणा करून हर्ष एका नव्याच मैत्रिणीला भेटत होता. क्रेडिट कार्डवरचे पैसे उधळून ऐनवेळी ते भरण्यासाठी संजनाला त्यानं ‘इमोशनल ब्लॅकमेल’ केलं होतं. अशा अनेक गोष्टी प्राचीला आज नव्यानंच समजत होत्या.

  संजना सांगत होती, ‘‘मला खूपदा त्याच्या बोलण्याबद्दल शंका यायची गं.. पण मी खरंखोटं करायला गेले, की ‘तुझा माझ्यावर विश्वासच नाही, तुझा संशय घेण्याचा स्वभावच आहे,’ असं म्हणून तो ‘गिल्ट’ द्यायचा. कधी अबोला, कधी ‘इमोशनल ड्रामा’, कधी आरडाओरडा करून मला गप्प बसवायचा. काही तरी चुकतंय असं मला सतत वाटायचं, पण मला खटकलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याकडे काही तरी समर्थन तयार असायचं. मग मी गोंधळायचे आणि गप्प बसायचे. त्यानंतर हा खूप गोड वागायचा, लाडात यायचा. मीही विरघळून गोष्टी सोडून द्यायचे. आता हे एकेक आठवलं, की माझी मलाच लाज वाटते. स्वत:च्या बुद्धीची कीव येते. माणूस ओळखायला मला दोन वर्ष लागली? पुन:पुन्हा ‘रेड फ्लॅग्ज’ दिसत होते. मी इतकं दुर्लक्ष कसं केलं? इतकी कशी चुकले? बिनडोक कशी वागले?’’ संजनाची उद्विग्नता बघून प्राचीला समजलं, की गेले कित्येक दिवस ही फक्त स्वत:ला फटके मारतेय. तिचा आत्मविश्वासच हललाय. प्राची म्हणाली, ‘‘पूर्ण दोष तुझा नाही संजना. माणूस ओळखायला तू एकटीच चुकली नाहीस. आम्हालाही तुम्ही ‘मेड फॉर इच अदर’ वाटला होतातच की!’’

‘‘हो, त्यामुळे सुरुवातीला मीही त्याच्यावर सहज विश्वास ठेवला असेल. पण त्यानंतर हर्षच्या सहवासात मी खूप काळ होते प्राची. त्याची कशाशीच बांधिलकी नाही, तो खोटा आहे, हे मला कळायला हवं होतं. मला तो ऑफिसला दांडी मारायला लावायचा. थापा मारून ‘हाफ डे’ तर कित्येक घेतले मी. पूर्वी कधीच असं केलं नव्हतं. काम सोडून त्याच्याबरोबर भटकण्यात सुरुवातीला रोमॅँटिक थ्रिल वाटत होतं. नंतर अपराधी वाटायला लागल्यावर मात्र मी ते थांबवलं. याला ना स्वत:च्या कामाची जबाबदारी, ना माझ्या करिअरशी, ऑफिसमधल्या इमेजशी देणंघेणं. या गोष्टी गंभीर होत्या. अनेकदा खटकूनही मी दुर्लक्ष कसं केलं? कशी चुकले?’’  

‘‘संजना, ‘मी कशी चुकले?’ हे आणखी किती वेळा म्हणणार आहेस?.. जसं काही तू चुकणं म्हणजे जगातली सगळय़ात भयंकर गोष्ट आहे! एवढय़ा घोर चुकीला क्षमा कशी करणार? त्याही तुझ्या?’’ प्राची म्हणाली.  ‘‘म्हणजे? चुकलेच ना मी? केवढा बिनडोकपणा केला!’’ संजना एकाच मुद्दय़ावर अडकली होती.

  ‘‘हे बघ, तू हुशार, समंजस, विचारी आहेसच, पण माणूसच आहेस ना? आकाशातून पडली आहेस का? एकतर चूक-बरोबर हे सापेक्ष असतं. त्या त्या वेळची परिस्थिती आणि वागण्यामागचा हेतूही बघायचा असतो. समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे बिनडोकपणा झालाही असेल, तरी ‘मी कशी चुकले?’ या एकाच प्रश्नानं स्वत:ला किती महिने छळत राहशील? जरा प्रश्न बदल की!’’

  ‘‘म्हणजे?’’

  ‘‘जे होऊन गेलं ते गेलं. पण आजच्या घडीला तुझ्या हातात आणखी काय आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधू या ना आपण! जरा तर्क वापरून बघू या का? तर, असं शोध, की हर्षच्या वागण्या-बोलण्यातून, काही तरी चुकतंय असं अनेकदा जाणवूनही तुला तर्कशुद्ध निष्कर्ष वेळेवर ‘कशामुळे’ काढता आले नसतील?’’         

‘‘थोडक्यात, ‘रेड फ्लॅग’कडे मी का बरं दुर्लक्ष केलं असेल?.. प्राची, मला वाटतं, की आपलं हर्षवर प्रेम आहे, म्हणजे आपण त्याचे दोषही स्वीकारायला पाहिजेत, असं वाटलं असावं. पण स्वीकारायचं किती आणि काय, हे समजण्यात गोंधळ झाला बहुतेक.’’ संजना विचार करत म्हणाली. 

 ‘‘तसंच असणार! पुस्तकी आदर्शवाद तर तुझ्यात भरलेला आहे. त्यात एखाद्या माणसात इतकं गुंतण्याचा हा पहिलाच अनुभव. शिवाय एखादी गोष्ट पटली की ‘कमिट’ करण्याचा स्वभाव. त्यामुळे हर्षच्या मनातही तशीच ‘कमिटमेंट’ असणार असं गृहीत धरलं असणार तू!’’ प्राचीनं आपलं मत दिलं. 

 ‘‘करेक्ट आहे! आणखी एक घडलं, की मला तोपर्यंत अनेक मुलांनी प्रपोज केलं होतं. पण हर्षएवढं कुणीच आवडलं नव्हतं. मग वाटलं, एवढय़ा जणांमधून, एवढय़ा वर्षांत आपल्याला पहिल्यांदाच कुणी तरी आवडलाय. तर आपली निवड चुकीची कशी असेल?’’

  ‘‘हं! तुझ्यासारख्या समंजस मुलींचं सगळे जण कौतुक करतात आणि ‘अशी गुणी मुलगी चुकेलच कशी?’ असं तिच्यासह सर्वाना वाटतं! होतं कधी कधी असं. चालायचंच!’’ प्राची हसत म्हणाली. 

‘‘खरंच गं.. फसवणाऱ्या माणसांबद्दल ऐकलं होतं, सिनेमात व्हिलन पाहिले होते. पण प्रत्यक्षात असा एक हँडसम हिरो भेटेल, घोळात घेईल आणि आपण इतके हातोहात फसू, असं कधीच वाटलं नव्हतं.’’ संजना म्हणाली.

 ‘‘प्रेमाच्या नादातला बधिरपणा गुन्हा नसतो संजना. प्रेम आंधळं असतं, हे तर जागतिक सत्य आहे. थोडे दिवस का होईना, वेडं प्रेम केलंस ना? तेवढीच कमाई!’’

 ‘‘केवढी सहज बोलतेयस गं.. मला तर आता नात्यांमध्ये विश्वासच उरलेला नाही वाटत! माणूस ओळखायला यापुढेही कशावरून चुकणार नाही?’’ 

‘‘ए, सोड तुझे ‘चूक-बरोबर’वाले प्रश्न! आता माझे प्रश्न ऐक- हर्षचा ‘एपिसोड’ सोडल्यास तुझी हुशारी, कमिटमेंट, प्रामाणिकपणा तुझ्याजवळच आहेत ना? लग्नापर्यंत गोष्टी पोहोचण्यापूर्वी हे घडलं ते बरंच झालं ना? या अनुभवानंतर तुझी प्रगल्भता वाढलीय की नाही? आपल्याला कसा जोडीदार हवाय आणि कसा नक्की नकोय, हे आता जास्त स्पष्ट आहे ना? आता ‘रेड फ्लॅग’ वेळेवर दिसतील की नाही?.. अबोला, चिडचिड किंवा ‘इमोशनल ड्रामा’ ही हत्यारं म्हणून कशी वापरली गेली, ते आता तुला कळतंय ना? माणूस किती गोड बोलतो, यापेक्षा तो किती प्रामाणिकपणे वागतो, हे तपासलं जाईल ना आता?.. मग आत्मविश्वास उलट वाढायला हवा ना? सखे, माझ्या या सर्व प्रश्नांचं उत्तर मला फक्त एकाच शब्दात हवंय!’’ 

‘‘बापरे! विक्रम-वेताळमधल्या वेताळासारखंच विचारतेयस. ठीके.. उत्तर आहे, ‘होय’!’’

 ‘‘मग आता ‘मी कशी चुकले?’ची गरगर बंद?’’

 ‘‘हो हो, एकदम बंद! ‘समजा चुकलं तर चुकलं. पण आकाशातून पडल्यासारखं वागायची काय गरज आहे?’ असा प्रश्न तू इतका खडसावून विचारलास ना, की त्यावर माझी काय शामत स्वत:भोवती गरगर फिरण्याची?’’ संजना हसत म्हणाली.

एका चक्रव्यूहातून सुटल्यासारखी ती आता मोकळी झाली होती.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader