डॉ. नंदू मुलमुले
नव्या आणि जुन्या पिढीतल्या टोकाच्या वादांचं प्रमुख कारण बहुतेकदा खर्च करण्याची पद्धत हेच असतं. ‘तरुणांना पैशांची किंमत नाही, अंगी पैशाचा माज आहे,’ हा जुन्या पिढीचा समज. तो काही अंशी खराही असू शकेल. पण नव्या पिढीचीही पैशांकडे पाहायची आपली एक दृष्टी आहे. त्यांना जुन्या पिढीचा काटकसरीपणा अनावश्यक वाटतो. परंतु एकमेकांविषयीचा हा पूर्वग्रह मोडेल अशाही घटना घडतात. शुभाताईंच्या बाबतीत नेमकं असंच झालं.

असं म्हणतात, की सगळय़ा नातेसंबंधांच्या तळाशी आर्थिक हितसंबंध असतात. ‘नो इमोशन इज प्युअर, नॉट इव्हन लव्ह,’ असं एक तत्त्वज्ञ म्हणून गेलाय. ‘प्रेमच भाकर प्रेमच चटणी’ म्हणणाऱ्या दोन प्रेमिकांमध्येही सुरुवातीचा कैफ ओसरल्यावर आर्थिक बाबी बटबटीतपणे समोर येताना दिसतात, मग दोन पिढय़ांच्या मधल्या सांदीत वाहणारा एक ठळक प्रवाह आर्थिक असावा यात नवल ते काय?

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
There are signs that Chief Ministers Youth Work Training Scheme is also going to be closed
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?

 मात्र दोन पिढय़ांमधील आर्थिक तफावत ही अनेकदा आर्थिक नसून ‘आर्थिक वर्तनातली तफावत’ असते. पैशांचा व्यवहार करणारी माणसं ही माणसं असतात, त्यांच्या निर्णयांवर त्यांच्या मनातल्या पूर्वग्रहांचा, धारणांचा पगडा असतो, ही वर्तनाच्या अर्थशास्त्राची मांडणी. ज्यांचं बव्हंशी आयुष्य आर्थिक अडचणीतून मार्ग काढत संसार करण्यात गेलं, ते ज्येष्ठ लोक नव्या सढळ पिढीच्या लेखी वेगळय़ाच पूर्वग्रहांवरचे रहिवासी! अशा घरात दोन पिढय़ांमधले संघर्ष जेवढे आर्थिक असतात तेवढेच आर्थिक वर्तनातल्या अंतरामुळे घडून येताना दिसतात. तेच शुभाताई आणि प्रिया या त्यांच्या सुनेत झडणाऱ्या कटकटीचं कारण.

शुभाताईंचा मुलगा रोहन एका मोठय़ा आस्थापनेत चांगल्या पगारावर. त्याचा प्रेमविवाह. सून परप्रांतीय. एका सुखवस्तू ‘खानदानी’ घरातून आलेली. सहारणपूरला तिच्या वडिलांचा दुमजली बंगला, केंद्रीय वातानुकूलित होता, हे पहिल्यांदा पाहून रोहनही चकित झाला होता. प्रिया एकुलती एक, त्यामुळे जन्मापासून कशाचीच ददात नसलेली.  याउलट शुभाताईंचा संसार होता. गरिबी वगैरे नव्हती, नवऱ्याला चांगला पगार होता, कुटुंब सुस्थित होतं, पण लहान भावंडांच्या जबाबदाऱ्या असल्यानं दोघा नवरा-बायकोला काटकसरीनं राहण्याची सवय लागलेली. पैसे पुरत होते, पण उरत नव्हते. गरज आणि हौस यातली सीमारेषा स्पष्ट होती. मुलांची हौसमौज होत होती, मात्र मौजेला पैशांची गरज नसते आणि हौसेला अंत नसतो, हे संस्कार उपजत मिळत होते.

जवळपास सगळय़ाच मध्यमवर्गीय कुटुंबांची ही कहाणी होती. रोहनचा शालेय गणवेश व्यवस्थित असे, मात्र पुस्तकांवर वेष्टन जुन्या वर्तमानपत्राचं. स्वत: शुभाताई वर्षांला एखाददुसरी साडी घेत- तीही नवऱ्यानं आग्रह केल्यावरच. जेवायला सारं उत्तम, सकस. मात्र ताटात अन्न टाकायचं नाही हे बंधन. ‘‘आमची पोरं ताटं चाटूनपुसून इतकी स्वच्छ करतात, की ती घासली आहेत की घासायला टाकायची आहेत, हे कळतदेखील नाही!’’ हा शुभाताईंचा अभिमानाचा विषय.

या पार्श्वभूमीवर प्रियानं अर्धअधिक उष्टं सोडून दिलेली ताटली पहिल्यांदा पाहून शुभाताईंचा जीव जो कळवळला, तो पाहण्याआधी प्रिया हात धुवायला बेसिनकडे निघाली हे बरं, नाही तर पहिल्या भेटीतच ठिणगी उडाली असती. उंबरठय़ाचं माप ओलांडून आल्या आल्या सुनेच्या चुका काढल्यानं तिच्या मनात अढी निर्माण होईल,  याची त्यांच्या नवऱ्याला कल्पना होती. मग शुभाताईंनी मोठय़ा कष्टानं त्या ताटलीवरून नजर हटवली.  मात्र प्रिया ‘उधळय़ा’ वृत्तीची आहे, हे त्यांचे निरीक्षण खरं ठरलं. हे आता जवळपास रोज घडू लागलं. प्रियाला शॉपिंगचं वेड होतं. सिनेमा पाहण्यासाठी किंवा जेवण्यासाठी मॉलमध्ये चक्कर टाकली, की काही ना काही खरेदी करतच ती वरच्या मजल्यावर पोहोचायची. पडद्यावर लावायची कागदी फुलं घ्यायला गेली आणि मॅचिंग मिळाला म्हणून पडदाच घेऊन आली. दोन रुपयांची वस्तू घ्यायला जायची आणि दोन हजारांची खरेदी करून यायची. स्वयंपाकघरात ओळीनं छान दिसतात, म्हणून डझनभर पारदर्शक ‘अनब्रेकेबल’ डबे घेऊन आली. ‘मग या आधीच्या स्टीलच्या डब्यांचं काय करायचं?’ शुभाताईंना लग्नात मिळालेले डबे, त्यावर आहेर करणाऱ्याचं नाव कोरलेलं, साहजिकच आठवणीही गुंतलेल्या. ‘‘बघा ना मम्मी, त्यांची झाकणं लागत नाहीत. काहींना खाली पडून पोचे पडले आहेत, कडांना तडे गेले आहेत.’’ प्रियानं जुन्या डब्यांच्या उणिवा मोजल्या.

‘‘अगं पण तरी टाकून द्यायचे म्हणजे..’’ शुभाताईंना कारण सुचेना. ‘आता नात्यांना तडे जायची वेळ आलीय, मग काय टाकून देणार ही आम्हाला?..’ मन एकदा पूर्वग्रहांच्या कक्षेत गेलं की असे अतिरेकी विचार फेर धरू लागतात.

 ‘‘फेकून नाही, देऊन टाकूया गरजू लोकांना. आपल्याकडे कामाला मावशी येतात ना त्यांना.’’ प्रियानं विषय संपवला.

 जुन्या केनच्या सोफ्याचं तसंच. त्याच्या काही पट्टय़ा सुटलेल्या. हातांवरचा काळसर रंग पक्का झालेला. ‘‘बदलूया का हा?’’ प्रियानं प्रस्ताव ठेवला.  ‘‘इतकी वर्ष गेली, अजून फारसा तुटलेला नाहीय. शिवाय इकडून तिकडे उचलायला सोपा. फार तर नवीन वॉर्निश करून घेऊ.’’ शुभाताईंचा दुबळा प्रतिकार.

 ‘‘ओल्ड व्हिंटेज लुक,’’ शुभाताईंच्या नवऱ्यानं त्यांना अगदीच एकटं पाडल्यासारखं वाटू नये म्हणून साथ दिली. नव्या पिढीला ‘व्हिंटेज’ वगैरे वस्तूंचं असलेलं फॅड ते ऐकून होते. मात्र नवनवीन आकर्षक डिझाइनचे गुबगुबीत सोफे त्यांनाही खुणावत होते. मार्चअखेरचा सेल, त्यामुळे किमतीत

सवलत होती. दोनच दिवसांत प्रिया नवे सोफे घेऊन आली.     

रात्री नवऱ्यानं शुभाताईंची समजूत काढली. ‘‘आपला काळ वेगळा होता. ज्याच्याशिवाय अडत नाही असा कुठलाही खर्च ‘अनावश्यक’ या सदराखाली मोडत होता. भाजीपाला, धान्य आणि औषधं या तीन गोष्टी सोडून सारे खर्च अनावश्यक. मुलांच्या शाळेचा खर्च वर्षांतून एकदा. दिवाळी एकदा, मुलांचे वाढदिवस एकदा. अशी सुंदर झगमगती दुकानं तरी कुठे होती? किराणा घराण्याचे आपण पाईक! दुकानात घुसून पाहिजे ते निवडता येतं, परडीत टाकता येतं, ही कल्पनाही नव्हती. तूप, गूळ, हिंग, हळद वगैरे असंख्य वाणसामानानं गच्च भरलेल्या त्या कळकट दुकानाच्या पायरीवर उभं राहून बायकोनं दिलेली यादी मोठय़ानं वाचायची आणि उगाचच ‘भय्या बराबर तोलना हाँ,’ म्हणून आपल्या ‘वेव्हारीपणाची’ खात्री पटवायची. त्यानं दिलेले नग घरून नेलेल्या खादीच्या खास मळकट पिशवीत कोंबायचे. एवढंच आपल्या हाती होतं. जबाबदाऱ्या होत्या, केवळ आवडली म्हणून एखादी वस्तू घेण्यात काही गैर नाही याची जाणीव नव्हती. इच्छाही होत नव्हती. आताच्या पिढीचा ‘एक्स्चेंज’ हा मंत्र आहे. जे-जे बदलता येतं ते बदला! त्यांच्याजवळ पैसा आहे. ते वर्तमानात जगतात आणि आयुष्याला एक उत्सव समजून ते साजरं करतात. आपली सून तशी मनानं चांगली आहे. आपला तिच्या भाषेत ‘रिस्पेक्ट’ करते. नवरा-बायको एकमेकांवर खूश आहेत. यापेक्षा काय हवं?’’

 ‘‘अहो पण भविष्याची काही तरतूद नको का? पैशांची गरज पडली तर पैशांशिवाय ती कशी भागणार? नाही तिथे, नको तितका, नको त्या गोष्टींवर खर्च माझ्या गळी नाही उतरत. आपला पोरगा किती कष्ट करतो दिसतं ना? आजारपण आहे, एखादा अपघात आहे,’’ शुभाताईंच्यानं बोलवेना. आपली सून उधळी आहे, या पूर्वग्रहावर त्यांनी पक्कं घर बांधून मुक्काम ठोकला होता. ‘त्यांनी आपला घसघशीत विमा काढला आहे, ते नियमित ‘एसआयपी’ भरतात, त्यांच्या तांत्रिक कौशल्यानं त्यांना सदैव प्रगतीची संधी राहणार आहे,’ हे सारे विचार नवऱ्याने मनात ठेवले. विरोधाचंही एक सुख असतं. ते काही काळ तरी बायकोला मिळू द्यावं असा विचार करून तो गप्प बसला.

मात्र एका घटनेत आपल्या सुनेचं एक नवं रूप बघितल्यावर शुभाताईंचा पूर्वग्रहावरचा मुक्काम जवळजवळ संपुष्टात आला. झालं असं, की शुभाताई नियमित गीता प्रवचनाच्या सत्संगाला हजेरी लावायच्या. सासूला ऑफिसच्या ‘ऑन वे’ प्रवचनाला सोडायला प्रियानं आग्रहानं गाडीत घेतलं. ती गर्दीतही सफाईनं मोटार चालवते, याचं शुभाताईंना क्षणभर कौतुक वाटलं. नेहमीच वाटायचं, पण आज ते प्रकर्षांनं जाणवलं. सिग्नलवर मोटार थांबली. प्रियानं पदपथावर मोटारी पुसण्याचं कापड विकत असलेल्या स्त्रीकडे पाहिलं. ती तत्परतेनं हात जोडत पुढे आली.

‘‘सना, कैसी हो? बच्ची कहाँ हैं? स्कूल भेजा ना?’’ तिनं त्या स्त्रीला विचारलं.

 ‘‘हाँ मेडम, वो स्कूल गयी हैं,’’ केस विस्कटलेले, मात्र अंगावर बऱ्यापैकी ड्रेस. हा तर प्रियाचाच.. काही महिन्यांपूर्वी घेतलेला. शुभाताईंनी लगेच ओळखला.  ‘‘अभी स्कूल जाऊंगी. उसको होस्टेल दिलाती हूँ. तूने खाना खाया? महिनेभर के पैसे भरे है कँटीन के. हाँ, और रुमाल के साथ मोगरे का गजरा बेचना, अच्छा लगता ग्राहक को..’’ तेवढय़ात सिग्नल हिरवा झाला. ती बाई कृतज्ञतेनं मान हलवत परत पदपथावर जाऊन उभी राहिली.

 शुभाताईंच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे ‘रिअर व्ह्यू’ आरशात नजर टाकत प्रिया सांगू लागली, ‘‘मम्मी, ही बाई अशीच फूटपाथवर भीक मागताना दिसली. सोबत आठ-दहा वर्षांची मुलगी. सिग्नलला मोटार थांबली की मी अशा बायकांची चौकशी करते. ही माझ्या गावची, सहारणपूरची निघाली. या महानगरात कशी पोचली ही लंबी कहाणी. मी मोटार पुढे काढून थांबवली. तिची विचारपूस केली. तिला कोणीच नाही. घरची गरिबी. कुण्या तरुणाच्या भूलथापांची बळी ठरली आणि दहा वर्षांच्या अमानुष छळानंतर इथे येऊन पडली. मी तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीय. तिला शाळेत दाखला दिला. हिला छोटय़ा-मोठय़ा वस्तू विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला. खर्च आपण करतोच, हाही असाच खर्च. मनी विच यू स्पेंड इज युअर्स! खर्च करता, तेव्हाच तो तुमचा (कामात येणारा) पैसा. रोहन आणि मी ठरवलंय, की अशा पाच मुलींना शिक्षणासाठी दत्तक घ्यायचं. आज या सनाच्या मुलीच्या शाळेत जाणार आहे मी. तिच्या हेडमिस्ट्रेसला भेटणार. तुम्हीही चला की! छान वाटेल तिला.’’ प्रियानं सफाईनं एक वळण घेतलं.

शुभाताईंनी पहिल्यांदा आपल्या ‘उधळय़ा’ सुनेकडे मनभरून पाहिलं. असा आनंद त्यांना कधी पैसे वाचवून मिळाला नव्हता. सासू-सुनेच्या आर्थिक वर्तनातली तफावत नाहीशी झाली होती. किमान पैशानं एवढं होऊ शकतं, यावर शुभाताईंचा विश्वास बसला होता.

nmmulmule@gmail.com

Story img Loader