नीलिमा किराणे
माणसाचं मन परिपक्व असलं, आपल्या कृतीच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी बाळगणारं असलं, तरी तिसऱ्या व्यक्तीनं आपल्या निर्णयक्षमतेवर दाखवलेला अविश्वास त्याला अस्वस्थ करतो. ‘खरंच समोरचा म्हणतोय तसं झालं तर?’ पासून ‘आपला निर्णय चुकल्यावर लोक काय म्हणतील?’ इथपर्यंतचे प्रश्न त्यातून उभे राहतात. अशा वेळी तर्कशुद्ध पद्धतीनं विचार केला, तर प्रश्नांतलाच फोलपणा जाणवेल. कधी आपल्याला, कधी आपल्या जिवलग व्यक्तीला.
अनन्याचे हात रविवारची कामं करत होते. मात्र मनात राही-प्रतीक- बरोबरचं कालचं बोलणं फिरत होतं. कॉलेजपासून घट्ट मैत्री असणारे हे तिघं आता वेगवेगळय़ा क्षेत्रांत होते. अनन्या सिस्टीम्स अॅनालिस्ट, प्रतीक फिल्म लाइनमध्ये उभरता फोटोग्राफर आणि राही शासकीय सेवेत. मात्र भेटल्याशिवाय करमायचंच नाही. राही-प्रतीकची मैत्री कालांतरानं रिलेशनशिपमध्ये बदलली. अनन्या त्यांना ‘मॅच्युअर्ड लव्ह बर्डस’ म्हणायची. न बोलताही दोघांना एकमेकांचं मन समजायचं. इतर जोडय़ांसारखी अपेक्षा, संशय, गैरसमज, यांमुळे त्यांच्यात भांडणं नसायची.
प्रतीकचं घर पुढारलेल्या विचारांचं. त्यांना राही आवडायचीच. प्रतीक म्हणेल तेव्हा तिच्या घरच्यांशी बोलून शुभमंगल करण्याची त्यांची तयारी होती. याउलट राहीच्या घरचे गावाकडचे आणि बऱ्यापैकी पारंपरिक. त्यांच्याकडे ‘परजातीतला’, ‘फिल्मवाला’ यावर नाराजी होती, मात्र कट्टर विरोध नव्हता.
काल तिघं कट्टय़ावर भेटले तेव्हा मात्र राही-प्रतीकच्या बोलण्यात, देहबोलीत अनन्याला खूपच बदल जाणवला होता. राही कशावरूनही प्रतीकवर चिडत होती. वाद घालत होती. प्रतीक थोडा वाद घालून, थोडं समजावून हताशपणे गप्प बसत होता. शेवटी न राहवून अनन्यानं विचारलंच.
‘‘तुमच्या दोघांत अशी निरर्थक चिडचिड मी प्रथमच बघतेय. काय घडलंय?’’
‘‘हल्ली राहीचं काही तरी गंडलंय! मध्यंतरी लग्न ठरवण्यासाठी आमच्याकडे दोघांच्या घरच्यांची बैठक झाली ना, तेव्हापासून ही माझ्यावर सारखी भडकते. पण नीट काही सांगत नाहीये.’’ प्रतीक म्हणाला.
‘‘काय झालंय? सांगच आता.’’ अनन्यानं हट्ट धरला, तेव्हा राहीनं बोलायला सुरुवात केली. ‘‘माझा ‘खास मित्र’ अशी आई-बाबांशी प्रतीकची मागे ओळख करून दिली, तेव्हा त्यांना देखणा, उमद्या स्वभावाचा भावी जावई आवडला होता. जातीवर अडखळले ते, पण नकार नव्हता. याच्या घरच्यांना भेटायला ‘लग्नाची बैठक’ म्हणून आई-बाबा माझ्या थोरल्या काकांनाही घेऊन आले, तिथून सर्व बिनसलं.’’ राही म्हणाली.
‘‘हो! हिच्या काकांनी माझ्या अस्थिर उत्पन्नाबद्दल चिंता व्यक्त केली, मी शूटिंग, प्रोजेक्ट, दिवसांप्रमाणे मिळकत, वगैरे समजावून सांगितलं. मला मिळणारे एवढे मोठे आकडे त्यांना अपेक्षित नसावेत. मग त्यांनी माझ्या बाबांना ‘अपेक्षा’ विचारल्या. राही आणि नारळ एवढीच आमची अपेक्षा आहे, वैदिक किंवा नोंदणी पद्धतीनं लग्न, जवळची पन्नासेक माणसं, वाटलं तर एक छोटं रिसेप्शन. देणीघेणी नाहीत आणि खर्च निम्मा-निम्मा, असं साधारण माझ्या बाबांनी सांगितलं. तर हिच्या काकांचं तिसरंच! त्यांचं गावातलं स्थान, हजारेक माणसं, साधं लग्न जमणारच नाही, वगैरे वगैरे.. शेवटी काहीच न ठरवता, ‘नंतर बघू’ म्हणत त्यांनी आटोपतं घेतलं.’’ प्रतीक म्हणाला.
‘‘खरी गोष्ट घरी आल्यावर सुरू झाली! काकांना काहीच पटलं नव्हतं. ‘प्रतीक खोटं सांगतोय. दिवसाला एवढे पैसे कोण देतं का? तशीही कमाई बेभरवशीच. शिवाय अशा देखण्या आणि फिल्म लाइनमधल्या मुलाच्या मागे सुंदर मुली असणारच. आपली राही दिसायला बेतास बात! तरीही हे काही मागत नाहीयेत. लग्नही पन्नास माणसांत. म्हणजे मुलात काही तरी खोट असणार. व्यसनं असणारच.’ असं काहीही बोलत सुटले ते. आई-बाबांची बोलती काकांपुढे बंद!’’ राहीनं सारं सांगून टाकलं.
‘‘काका असं म्हणाले? मला सांगितलं नाहीस तू. आणि आता माझ्यावरच चिडते आहेस.’’ प्रतीक भडकलाच राहीवर.
‘‘आता तू भांडायला लागलास तर फाटे फुटून मुद्दा बाजूला पडेल ना प्रतीक? तू भडकशील याचाच ताण आला असणार तिला.’’ अनन्यानं प्रतीकला थांबवलं.
‘‘राही, काकांनी गुणांपेक्षा रूपाला किंमत दिली, वर प्रतीकबद्दल खोटारडा, लफडेबाज, व्यसनी, असल्या बिनबुडाच्या ठाम समजुती आईबाबांच्या डोक्यात भरवल्या. तुझ्यावर त्यांचा विश्वास नाही, तुझ्या इच्छेचा सन्मान नाही. त्यामुळे तुला काकांचा राग येणारच. पण उलट प्रतीकशीच का भांडतेयस?’’
‘‘मला कसली तरी खूप भीती वाटतेय अना! ताण झेपत नाहीये.’’
‘‘काकांच्या शंका खऱ्या ठरण्याची भीती?’’ ताण उतरवण्यासाठी अनन्यानं मस्करी केली.
‘‘काकांच्या दोन्ही मुली देखण्या आहेत. पण एक कायमची माहेरी आलीय आणि दुसरीच्या सासरच्यांच्या मागण्या संपत नाहीत. अशा परिस्थितीत काकांनी मोठय़ा लग्न सोहळय़ाच्या बाता केल्या, कारण बोलणी भरकटावीत. प्रतीकबद्दलच्या त्यांच्या कुशंकांमुळे मला थोडी भीती वाटली. पण त्या दिवशी घरी मी ठाम राहिल्यावर काका चिडून म्हणाले, ‘‘याच्याशी लग्न करशील, तर वर्षांच्या आत रस्त्यावर येशील. लिहून देतो!’’ मग आई-बाबांना घेऊन न जेवता ते गावी निघून गेले. तेव्हापासून मला सारखं रडायला येतंय आणि..’’
‘‘आणि काय?’’
‘‘प्रतीकचा प्रोजेक्ट संपून दीड महिना झालाय, पण अजून तो निवांत आहे. मग काकांचं बोलणं आठवून भीती वाटते आणि प्रतीकचा राग येतो.’’
‘‘अगं, फिल्म लाइन अशीच असते. असे ब्रेक आधीही आलेत, तुलाही माहितीय. आणि छोटे प्रोजेक्ट चालूच आहेत की नाही? घरच्यांचा आधार डळमळीत झाल्यामुळे तुला सगळय़ाची भीती वाटतेय ना राही?.. आपण एकेक भीती तपासू या का?’’ अनन्यानं असं विचारल्यावर राही ‘हो’ म्हणाली.
‘‘तुझ्या काकांच्या कल्पनेप्रमाणे प्रतीकला मैत्रिणी असणं, काम नसणं, वगैरे भीती खऱ्या ठरण्याची शक्याशक्यता- ‘प्रॉबेबिलिटी’ दोन-चार टक्के धरू. पण प्रतीक असो किंवा दुसरा कुणी, १०० टक्के गॅरंटी कोण देणार?.. तसं तुलाही लग्नानंतर दुसरं कुणी तरी आवडण्याची शक्यताही तत्त्वत: असतेच. तर मग तीन पर्याय दिसतात.’’ अनन्या अॅनालिस्टच्या भूमिकेत शिरली.
‘‘१. भिऊन कधीच लग्न न करणं,
२. काकांच्या पसंतीच्या मुलाशी करून परिणामांची जबाबदारी त्यांच्यावर टाकणं आणि ३. प्रतीकशी लग्न करून बऱ्यावाईट सर्व परिणामांची जबाबदारी स्वत: घेणं.’’
‘‘फक्त तिसरा पर्याय मान्य.’’ दोघं एकदमच म्हणाले.
‘‘तर मग कोणी काहीही म्हटलं आणि भीतीनं तुझाच स्वत:वरचा विश्वास हलला, तर इतर लोक तरी ठेवतील का?’’ यावर राही काही बोलणार, तेवढय़ात अनन्याला एक तातडीचा फोन आला. ‘‘सॉरी, मला निघावं लागणार,’’ म्हणत अनन्या उठली. तशी
राही म्हणाली,
‘‘जरा थांब अना. ‘वर्षभरात रस्त्यावर येशील’ या शापवाणीच्या भीतीचं काय करू?’’
‘‘शापाच्या भीतीतून लॉजिकली बाहेर येणं सोपं आहे गं! प्रतीकच्या प्रोजेक्टचं कधी मागे-पुढे झालंही, तरी तुला नोकरी आहेच ना. त्यातूनही समजा आलीच मोठी अडचण..’’
‘‘तरी रस्त्यावर नक्की येणार नाही! दोघांचीही सेव्हिंग्ज आहेत, मित्र-मैत्रिणी, आईबाबा आहेत, काकांच्या दारात नक्कीच जाणार नाही!’’ प्रतीक ताड्कन म्हणाला.
‘‘हे माहितीय ना राही तुलाही?.. मग
भीती कशाची?’’
‘‘घरच्यांना दुखवून आपण सुखी होणार नाही, अशी भीती असावी बहुतेक. मला प्रतीक हवाच आहे, पण असा ताण नकोय.’’
‘‘काकांनी स्वत:ला किती दुखवून घेऊन कसं वागायचं, तो त्यांचा प्रश्न आहे. कारण तुमचा हेतू त्यांना दुखवण्याचा नाहीये. तुमच्या दोघांच्या मध्ये कुणाला तरी येऊ देऊन चिडचिड करायची की नाही, हे मात्र तुमच्याच हातात आहे. काकांनी जाता-जाता हवेत सोडलेल्या फक्त एका वाक्यामुळे जर तू असहाय होऊन प्रतीकशी भांडणार असशील, तर उद्या लग्नानंतरही कसलाही ताण आल्यावर तुला तुझ्या भावना हाताळणं जडच जाणार. कारण भांडणं होणारच ना!’’
या वाक्यानं अवाक् झालेल्या राहीला, ‘फोनवर बोलू’ म्हणून अनन्या बाहेर पडली.
रात्री घरी आल्यावर कामं करता-करता अनन्याचं लॉजिकल विचारचक्र चालू झालं होतं. काका आणि राही दोघांच्याही वागण्यामागच्या भावनिक आणि व्यावहारिक ‘गरजा’ काय आहेत, ते स्पष्ट दिसल्याशिवाय डोक्यातली चक्रं थांबणार नव्हती. काकांच्या विरोधामागे, जातीबाहेरच्या लग्नात असलेली समाजाची भीती आणि त्यांच्या मुलींप्रमाणे राहीसुद्धा फसली तर? अशी प्रामाणिक भीतीही असू शकते. राहीनं स्वत:चं स्वत: ठरवल्याचा राग किंवा त्यांच्या जावयांपेक्षा प्रतीक वरचढ असल्याचं वैषम्यही असू शकतं. काहीही कारण असो, अशा भयंकर शापवाणीमुळे काकांचं प्रेम सिद्ध होतं की अधिकार?.. मग अशा वेळी राहीचा विवेकी विचार कोणत्या दिशेनं हवा?
आपल्या घरच्या माणसांना दुखवायचा त्रास राहीला होणारच. एवढी वर्ष काकांनीही राहीवर प्रेम, काळजी, लाड केले असतील. पण मोठय़ा निर्णयाची वेळ आल्यावर, ‘नव्या पोरांना काय कळतंय?’ हे काकांचं पारंपरिक गृहीतक. त्यात आई-बाबा बोलू न शकल्यामुळे राहीची ‘संस्कारी भीती’ उफाळून आली. काका आई-बाबांवरही कायमचा राग धरतील, म्हणून असहाय वाटलं असणार. भरीला काकांनी भलत्या गोष्टी काढल्यानं नाही नाही त्या विचारांत गुरफटून भीतीचं भयंकरीकरण झालं. पण राहीनं काकांच्या भीतीला ‘दत्तक’ घ्यायची काहीच गरज नाही! काकांच्या शापवाणीच्या पार्श्वभूमीकडे तिनं त्रयस्थपणे पाहावं. मागच्या पन्नास वर्षांच्या अनुभवांपेक्षा राहीचं पुढचं जग वेगळं असणार आहे, हे तिनं ठामपणे बुद्धीनं समजून घ्यायला हवं. प्रेम, वयाचा आदर, अपमान, दुखावणं अशा ‘संस्कारी’ भावनिक गोंधळात अडकून ‘भित्रं कोकरू’ व्हायचं? की खंबीर होऊन स्वत:च्या निर्णयाच्या बऱ्या-वाईट सर्व परिणामांची जबाबदारी शांतपणे आणि समजूतदारपणे घ्यायची?.. या प्रश्नाचं उत्तर राहीच्या मनातली भीती आणि अपराधीभावाची चक्रं थांबवेल. कालांतरानं प्रतीकचा अनुभव आल्यावर काकाही कदाचित राग विसरतील.
अनन्याच्या समोर सगळा ‘फ्लो चार्ट’ स्पष्टच झाला आणि तिनं राहीला फोन लावला.
neelima.kirane1@gmail.com