कर्तव्यभावनेनं केलेलं आणि प्रेमानं केलेलं काम यात फरक असतो. प्रत्येक कामातून आर्थिक मोबदल्याच्या पलीकडेही आपण कितीतरी गोष्टी कमवत असतो. कामाचं खरं समाधान मिळावं यासाठी ‘इतनेमे इतनाही’ ही मानसिकता दूर करायला हवी…
प्रसंग- चित्रमालिकेतलं भव्य लग्न. शूटिंग लोकेशन – मढ आयलंड. वेळ – दुपारची. प्रचंड ऊन, घाम, आणि लग्नाचं शूटिंग, त्यामुळे अंगावर टोचणाऱ्या चकचकीत साड्या, चेहऱ्यावर मेकअपचे थर आणि थकवा होताच. अजिबात आनंददायी नसलेलं शूटिंग होतं ते, पण हा सोहळा ‘कव्हर’ करायला आलेले वेगवेगळ्या माध्यमातले लोक आजूबाजूला फिरत असल्यामुळे ‘कित्ती गं बाई आम्हाला मजा येत्येय,’ असा आविर्भाव सर्व कलाकारांनी चेहऱ्यावर चिकटवलेला होता. बरं, हे सगळं कशासाठी करायचं, तर मालिकेत जी घडामोड घडते आहे त्यात आपला जो काही वाटा आहे तो आपण समर्थपणे उचलावा, आपलं काम लोकांना आवडावं, आपल्याला त्यातून यश, समाधान, पैसा,पुढच्या कामाची थोडीशी शाश्वती आणि आनंद मिळावा म्हणून. अभिनय हा व्यवसाय जरी असला तरी रोज तेच काम करताना कंटाळा येतोच. तरी सगळे जीव तोडून काम करत होते. दिग्दर्शक सूचना देत होता. नवरी पुन:पुन्हा डोळ्यात ग्लिसरीन घालून ‘विदाई’साठी रडत होती. आणि अशात एक बऱ्यापैकी ‘सीनियर’ अभिनेत्री पुन:पुन्हा चुकत होती. कधी ‘क्यू’चं वाक्य चूक, कधी उभं राहाण्याचा ‘मार्क’ चूक. यावर ती हसतच होती, बाकीचे वैतागत होते, पण बोलणार कोण! शेवटी बिचारा दिग्दर्शक वैतागला आणि काहीशा नाराजीनं म्हणाला, ‘‘मॅडम प्लीज कॉन्संट्रेट करा नं…’’ झालं. बाईचा इगो दुखावला. ती ताडकन म्हणाली, ‘ एक मिनिट हं, सिरियल करतोय आपण, हॉलीवुडची फिल्म नाही. इतने बजेट मे इतनाही होगा’. सगळेच गप्प झाले. दिग्दर्शक निरुत्तर झाला. पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी अधिक गडद झाली. बिचारा घराचे हप्ते भरायला, मुलांच्या शाळांच्या फी भरायला मिळालेलं काम मन लावून करत होता. त्यामुळे स्वत:च्या कामाचा झालेला पाणउतारा त्याच्या मनाला लागला होता आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्वच्छ दिसत होतं, मात्र रडतखडत का होईना शूटिंग पार पडलं, पण तो प्रसंग आणि ते ‘इतनेमें इतनाही होगा’ हे वाक्य माझ्या मनात मात्र त्यानंतर कित्येक वर्षं राहिलं. काचेवर सेफ्टीपिननं चरा ओढावा तसा माझ्या मनातल्या अनेक श्रद्धांवर चरा ओढला गेला. एक तर त्या बाई माझ्या मनातून उतरल्या. दुसरं म्हणजे माझा ‘काम किंवा कर्तव्य’ या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कर्तव्यभावनेनं केलेलं काम आणि त्याहून थोडं अधिक प्रेमाने केलेलं काम यात फरक असतो हे मला कळलं.
‘माणसानं कसं हिशोबी असावं’ हे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. ‘जेवढ्यास तेवढं’, हा गुणच आहे आणि तो अंगी बाणवायला हवा. जी गोष्ट ‘कमी’त होऊ शकते तिथे ‘अधिक’ कशाला काही करायचं? प्रत्येक गोष्टीचा एक जीव असतो, त्याचं एक स्थान असतं, महत्त्व असतं. त्यात गरजेपेक्षा जास्त स्वत:ची मानसिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक गुंतवणूक कशाला करायची? असं जर आपण करत बसलो तर मग त्याला काही अंतच नाही. जिथे पाच रुपये द्यायला हवेत तिथे पाचच दिले पाहिजेत, पाचशे नाही. मराठी माणूस भावनिक जास्त आणि हिशोबी कमी असतो असं म्हणतात, पण या कलियुगात जगताना हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. बडेबुजुर्ग अनुभवातून आलेलं शहाणपण देत राहिले आणि आपण कमी कमी भावनिक आणि जास्त जास्त व्यवहारचतुर होत राहिलो. पण कधी कधी त्या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन माणसांचा विचार करावा लागतो किंवा करावा. केवळ सेवाभावी वृत्तीनं काम करणारे काही विशिष्ट व्यवसाय, संस्था, कार्यक्षेत्रं एवढ्यापुरतं हे न राहता सगळ्यांनाच हा मनाचा मोकळेपणा थोडा ठेवावा लागतो.
ही ‘दिलेल्या बजेटमध्ये जेवढं ठरलं आहे तेवढंच करून मोकळं होण्याची वृत्ती’ सार्वत्रिक दिसते. नाट्यगृहांच्या मेकअपरूममध्ये आरसा असतो, पण कपडे टांगायला काही सोय असतेच असं नाही, ‘मेकअप रूम’ आहे न ती… मेक अप करा, कपडे बदलताना तारांबळ उडाली तर तो तुमचा प्रश्न आहे! प्रवासी थांब्यांवरच्या स्वच्छतागृहांमध्ये बाकी सगळी स्वच्छता असेल, पण पर्स अडकवायला किंवा ठेवायला हुक म्हणा किंवा वयस्कर, आजारी स्त्रियांना आधार म्हणून रॉडसारखी एखादी सोय असेलच असं अजिबात नाही. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दाराजवळच्या काऊंटरवर वेगवेगळ्या रंगांच्या सुपाऱ्यांनी सजवलेलं ताट असतं, पण त्या घ्यायला चमचे असतातच असं नाही. आलागेला प्रत्येकजण हात घालून बडीशेप घेतो, त्याऐवजी एखादा चमचा ठेवायला रेस्टॉरंटवाल्यांना परवडत नसेल? रस्ता रुंद करायचं कॉण्ट्रॅक्ट मिळालं आहे, आम्ही तो केला, पण त्यामुळे पलीकडच्या बिल्डिंगसमोर जो मातीचा ढिगारा जमला आहे, तो उचलणं आमचं काम नाही, ‘चौकाला थोर व्यक्तीचं नाव द्या’ असा वरून आदेश आला, आम्ही नाव दिलं. ती व्यक्ती कोण हे कुणा अज्ञानी माणसाला कळावं ही जबाबदारी आमची नाही. आमच्या कामाच्या चौकटीत जेवढं येतं तेवढंच आम्ही करतो, चौकट जराही सैल करायची वेळ आली की आम्ही आम्हाला मिळणाऱ्या मोबदल्याकडे बोट दाखवतो आणि मग मोबदल्याचा विषय निघाला की सगळे गप्प होतो कारण तो कितीही मिळाला तरी कमीच वाटतो!
व्यवहारी असणं यात चूक नाही. प्रश्न आहे तो कुठे असावं, हा. आर्थिक बाबतीत हे योग्यच आहे. पण ‘व्यवहार’ म्हणजे हिंदी भाषेत ‘वागणं’सुद्धा. नोटा आणि नाण्यांच्या पलीकडे जे जग असतं त्यात ही भाषा चालत नाही. रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबर असंख्य बाबतीत आपली देवघेव सुरू असते. त्यात प्रेम असतं, माया असते, काळजी असते, मैत्री असते. रात्री झोपायला कितीही वाजले तरी आई सकाळी उठून मुलांचे शाळेचे डबे करते, बाप स्वत:च्या चार इच्छा मागे ठेवून मुलांच्या आवडीची गोष्ट विकत आणतो, मित्र मित्रांसाठी अडीअडचणीला धावून जातात, आजी-आजोबा त्रास होत असला तरी नातवंडांना बागेत घेऊन जातात, चांगले शिक्षक जे शिकवतात ते विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतं. सुरात अनेक जण गातात, पण त्या गाण्यात प्राण ओतणारी एखादीच असते, आणि म्हणून ती मनात घर करून राहते. अभिनेते अनेक असतात, पण मनाला चटका लावणारा एखादाच असतो. जनतेच्या मनात कायमस्वरूपी विश्वास निर्माण करणारा नेता एखादाच असतो. पुस्तक संपल्यावरही विचार करायला लावणारा लेखक एखादाच असतो. चांगलं काम हे नेहमीच बजेट, मूल्य आणि कुठलीही देवाणघेवाण या पलीकडचं असतं. शारीरिक किंवा बौद्धिक कामाला मनाची आणि आत्म्याची जोड मिळाली तरच त्या कामाला तेज प्राप्त होतं. फक्त व्यवहार बघून केलेल्या कामाला ती झळाळी येत नाही. त्या कामाची प्रत ‘सामान्य’च्या पलीकडे जाऊ शकत नाही. ते वरवरचं राहतं. खरं तर कौतुक ही माणसाची अत्यंत मूलभूत गरज आहे. पैसा मिळाला की माणसाचे हप्ते भरले जातात, पण त्याच कामाबद्दल कौतुक मिळालं की त्याची कामाबद्दलची ओढ आणि जगण्याबद्दलची आसक्ती वाढते. सुरुवातीला खूप उत्साहाने काम केलं जातं. हळूहळू आळस, भ्रमनिरास, एकूण व्यवस्थेबद्दल आलेली उदासीनता यामुळे माणसं त्या टोकाला जाणं बंद करतात. आपण कितीही चांगलं काम केलं, तरी कुणीही त्याची फारशी दखल घेणार नाहीये, किंवा जी घेतील, ती आपल्या कुवतीच्या मानानं कमीच आहे. इलाज नाही म्हणून मी तुम्ही देताय त्या तुटपुंज्या पैशांत काम करते किंवा करतो आहे, तेव्हा जे मिळतंय ते चालवून घ्या. याहून जास्त कुणासाठी आम्ही काहीही करणार नाही. एवढं सगळं असतं त्या ‘इतनेमें इतनाही’ मध्ये.
मुद्दा नेहमी पैशांचा नसतोच. मुद्दा असतो इच्छेचा. त्या ‘किंचित अधिक प्रयत्न करणं’ याचा. ‘जरी मला या कामाचे एवढेच पैसे मिळत असले तरीही मला हे करताना आनंद होतो आहे, मला यातून फक्त पैसा नाही तर अत्यंत अमूल्य असं समाधानही मिळवायचं आहे, म्हणून मी थोडा अधिकचा प्रयत्न करतो किंवा करते आहे’ असं म्हणणारे खरंच कमी असतात. पण जे म्हणतात त्यांचं काम फार सुंदर असतं.
पाट्या टाकणं, सरपटी बॉल टाकणं, डाव्या हाताने सरकवणं, जाता जाता उडत उडत काम करणं, यात एक मात्र नक्की होतं, तुम्हीच तुमच्या कामाचा अनादर आणि अवमान करायला लागलेले असता. मग दुसरे कसे तुमचा सन्मान करणार?
जाता जाता एकच… आपली
पर्यावरणाबद्दलची एकूण उदासीनता पाहून, निसर्गही आपल्याला ‘इतनेमें इतनाही…’ असं म्हणायला लागला तर? हा व्यवहार आपल्याला फार फार महागात पडेल हे निश्चित.
godbolemugdha2@gmail.com