पर्ण पेठे

‘४३ वर्षांपूर्वी प्रथम रंगमंचावर आलेल्या, विजय तेंडुलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’मधली मित्रा ‘लेस्बियन’, तर नमा ‘बायसेक्शुअल’. आजच्या काळातही असं काही ऐकल्यावर अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतात! मित्रा काळाच्या खूप पुढची, बेधडक, अतिशय उत्कट… पण म्हणूनच खरी आणि मानवी. आजही Queerness या संकल्पनेबद्दल जगभर उलटसुलट चर्चा सुरू असतात. अशा काळात ठरलेल्या जगण्याला छेद देणाऱ्या ‘मित्रा’नं मला या शब्दाचा नवा अर्थ सांगितला.’

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
रशिया-युक्रेन युद्धात ३२ वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तो केरळ येथील रहिवासी होता. (फोटो सौजन्य @YashBarapatre6)
बिनिल टी.बी कोण होता? तो रशियन सैन्यात कसा भरती झाला होता?
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

‘मित्राची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्तानं काही विचार मनात आले. लेखक-कवी आलोक मेनन यांनी २०२१ मध्ये ‘Even in my loneliness, I am not alone’ हा ब्लॉग लिहिलाय. आलोक हे जेंडर नॉन-कन्फर्मिंग आणि ट्रान्सफेमिनिन आहेत. या ब्लॉगमधल्या काही भागाचा हा अनुवाद- ‘जगातल्या सर्व मौल्यवान गोष्टींप्रमाणेच, अनेकदा मैत्री कथनातून गायब होते. आपण रोमँटिक जोडीदारांबद्दलच्या कथा ऐकतो, परंतु प्रेम जमवून देणाऱ्या, ‘ब्रेकअप’च्या प्रक्रियेत मदत करणाऱ्या मित्रांचं काय? जेव्हा एखाद्या महान लेखकाचं काम वाचनात येतं, तेव्हा मला हे जाणून घ्यायचं असतं, की त्यांना ‘ब्लॉक’ आल्यावर ते कोणाशी बोलतात? कुणाबरोबर ‘हँगआऊट’ करतात? किंवा प्रेमभंग झाल्यावर तत्त्वज्ञानी माणसं कुणाला फोन करतात? माझ्या आयुष्यात असे प्रसंग आले आहेत, की मला हार मानावीशी वाटलीय आणि माझे मित्रच मला आठवण करून देतात, की मी का जगतोय. आम्ही एकत्र आहोत म्हणून मी आहे… आम्ही अशा जगात राहात होतो, ज्या जगानं आम्हाला सांगितलं, की आम्ही असू नये! आम्ही सगळे एकाच वेळी ‘ग्लॅमरस’, जगाच्या दृष्टीनं विरोधाभासी, भोळसट आणि हुशार, असं सगळंच होतो. आम्ही काही एकमेकांना शोधायला म्हणून बाहेर पडलो नव्हतो, पण तरी आम्ही एकमेकांना शोधलं! म्हणजे अशक्य असं काहीच नाहीये. मैत्री म्हणजे चमत्कारच. मी एकटा नाहीये. माझ्या एकटेपणातही मी एकटा नाहीये!’ आता प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या, १९८१ मध्ये प्रथम सादर झालेल्या ‘मित्राची गोष्ट’ या नाटकातल्या ‘बापू’ या पात्राचा सुरुवातीचा संवाद पाहा- ‘एखादी प्रेमकहाणी तिऱ्हाईतपणे सांगता येत नाही. सांगताना ती आपली होते. आपलीच असते. हे का होत असेल? दुसऱ्याचीच प्रेमकहाणी आपण आपली म्हणून का जगत असू? दुसऱ्याची मरणं आपण आपली करून का मरत असू? ही मित्राची प्रेमकहाणी. मित्रा- सुमित्रा. सुमित्रा देव. सुमित्रा माझी कोणी नाही. मित्रा माझी मैत्रीण. मैत्रीण म्हणजे मित्र. एक स्त्री आपला मित्र असू शकते? मित्रा होती…’

समाजानं ठरवून दिलेल्या नियमांपलीकडे तुम्हाला काहीही वाटलं, त्या नियमांपलीकडचं तुम्ही जगायचं ठरवलं, की खूप प्रश्न उद्भवतात. मुलगी एकटी राहिली की प्रश्न तयार होतो, मुलानं मुलाबरोबर/ मुलीनं मुलीबरोबर राहिलं तर प्रश्न उद्भवतो, कुणाला मुलं-मुली दोहोंबद्दल आकर्षण वाटलं, स्त्रीला पुरुषासारखं/ पुरुषाला स्त्रीसारखं व्हावं वाटलं, कोणाला एकमेकांच्या संमतीनं अनेक ‘पार्टनर्स’ असावे वाटलं, एखाद्या स्त्रीला आयुष्यभर लग्न नाही करावं वाटलं, एखाद्या व्यक्तीला आपल्या लिंगाबरोबर ‘मॅच’ न होणारे कपडे घालून बघावेसे वाटले… या आणि यापलीकडचं, संमतीनं केलेलं, काहीही समाजाच्या दृष्टीनं अवघडच असतं. विषमलिंगी (हेट्रोसेक्शुअल) लोकांचं बहुमत असलेल्या समाजात मुलींनी मुलीसारखं असावं- मुलांनी मुलासारखंच! मुलीला मुलंच आवडावी- मुलाला मुलीच! एकाच धर्माचे, जातीचे असलात, तर ‘एक्स्ट्रा ब्राउनी पॉइंट्स!’ नुसते ‘लिव्ह-इन’मध्ये असाल तरी ‘पॉइंट्स कट’. लग्न झालं असेल तर सर्वोत्तम. यापलीकडच्या कुठल्याही असण्याला-जगण्याला खूप लढत राहावं लागतं. या नाटकातल्या ‘मित्रा’ला- लढावं लागलं. आपल्याला मुलं नाही, मुली आवडतात, या आकलनानंतर, त्या प्रवासात कुटुंबीयांची तुटलेली साथ, ‘नमा’बद्दलचं आटोकाट प्रेम, बापूबरोबरची गहिरी मैत्री, ‘लेस्बियन बाई’ म्हणून झेलाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, त्यातून होणारं मानसिक खच्चीकरण. मित्रा तिच्या एकटेपणाबद्दल बोलते, बापू त्याच्या एकटेपणाबद्दल बोलतो, नमा तिच्या एकटेपणाबद्दल बोलते. नाटकातली ही तीनही प्रमुख पात्रं प्रचंड एकटी, एकाकी आहेत. आपल्याला काय वाटतंय हे समजून घेण्याच्या धडपडीत आहेत. आपलं वाटणं समाजमान्य नाही, हे कळूनसुद्धा त्याच्यासाठी झगडणं आणि त्यातून स्वत:बद्दलचे आणि समाजाबद्दलचे पूर्वग्रह तोडून नवं आयुष्य जगणं हे किती किती अवघड आहे! आयुष्य काही वेगळ्या पद्धतीनं जगू पाहणाऱ्यांना एकटेपणा नवीन नाही. ‘मित्राची गोष्ट’ हे नाटक मला एकटेपणाबद्दलचं वाटतं.

हे समलिंगी प्रेमाचं नाटक जरी असलं, तरी मला ते फक्त तितकंच वाटत नाही. गुंतागुंतीच्या मानवी नात्यांबद्दलचं वाटतं. १९८० सालात लिहिलेलं हे नाटक स्त्री-पुरुषत्वाच्या ठरीव प्रतिमांना छेद देतं. या गोष्टीचा नायक बापू हा तथाकथित ‘पुरुषी हीरो’ नाही. त्याला प्रेमापलीकडची मुला-मुलीतली मैत्री समजू शकते. मित्रा त्याला त्याची जिवाभावाची मैत्रीण वाटते. तिच्याबद्दल प्रचंड प्रेम, काळजी वाटते, राग येतो. मित्रा तिच्या भावभावना बापूसमोर मांडते, त्याच्यासमोर रडते, प्रेमाची कबुली देते, आनंदते, वचन देते, मोडते. नमा ही मुलगी ‘टिपिकल’ आहे, पण ती कबूल करते, की तिला एकाच वेळी दळवी- हा तिचा मित्र आवडतो आणि मित्राही आवडते. ती ‘बायसेक्शुअल’ आहे. तथाकथित हीरो-हीरोइनच्या टिपिकल ‘जेंडर रोल’मधले हे तिघंही नाहीत, त्यामुळे मला ही पात्र मानवी आणि खरी वाटतात.

ज्या काळी मराठी रंगभूमी मध्यमवर्गीय, सामाजिक स्वरूपाच्या किंवा ऐतिहासिक विषयांवरच्या नाटकांमध्ये रममाण होती, अशा वेळी विजय तेंडुलकरांनी या नाटकातून त्या वेळी काळाच्या अत्यंत पुढचा ‘समलिंगी आकर्षण’ हा विषय हाताळला. स्त्रीचं असणं असंच असतं, तसंच असायला पाहिजे, अशा सगळ्या पूर्वग्रहांना, स्त्रीच्या व्याख्येला पूर्णपणे आव्हान देणारी मित्रा ही भूमिका. मित्रा स्त्री आहे- हो! दिसायला सुंदर आहे- हो! पुरुष जिच्या प्रेमात घायाळ होतात अशी सुंदर? हो! पण मित्रा रडते, ओरडते, स्वत:च्या वाटण्याला-असण्याला प्राधान्य देते. ती बेधडक आहे आणि पराकोटीची vulnerable आहे. प्रेमात बुडालेली आहे, जीवन उत्कटतेनं जगणारी आहे. ‘स्त्री सोशीक असते, सगळ्यांना सामावून घेणारी, सांभाळणारी असते,’ या नेहमीच्या व्याख्येला ‘चॅलेंज’ करणारी उत्कट मित्रा!

सध्या मी ‘चारचौघी’ या नाटकात काम करतेय. गुंतागुंतीचे नातेसंबंध असणाऱ्या आणि स्वत:चे निर्णय घेणाऱ्या चार सशक्त बायकांची ही गोष्ट. १९९१ मध्ये लिहिलेलं हे नाटक आहे. पण आजच्या काळातही त्यातले अनेक प्रश्न सर्वांना आपलेसे वाटतात, तर अनेकांना न सोसणारे! गंमत अशी, की ‘चारचौघी’ नाटकात माझ्या आईची भूमिका करणाऱ्या रोहिणी हट्टंगडी यांनी १९८१ मध्ये ‘मित्राची गोष्ट’मध्ये मित्राची भूमिका केली होती. ती घटना ४३ वर्षांपूर्वीची! ‘मित्राची गोष्ट’बद्दल उलटसुलट प्रतिक्रिया आल्या होत्या, पण किमान नाटक होऊ शकलं, कुठलीही बंदी न आणता या नाटकाचे प्रयोग झाले, हेदेखील आताच्या काळात आश्चर्यकारक आणि कौतुकास्पदच वाटतं. रोहिणीताईंना मी कित्येकदा विचारते, की ‘मित्राची गोष्ट’ आणि त्यातला विषय अजूनही इतक्या वर्षांनंतर लोकांना काळाच्या पुढचा का वाटतो? आपण खरंच समाज म्हणून प्रगती करतोय ना? की आज अधिकच मागे मागे चाललोय? रोहिणीताई सांगतात, ‘तेव्हा नाटक करताना ‘आम्ही समलिंगी विषयावरचं नाटक करतोय बरं का!’ असा काही आमचा तोरा नव्हता. गुंतागुंतीच्या भावना असणाऱ्या माणसांच्या आयुष्याबद्दलचं नाटक आम्ही करतोय, इतकंच आम्हाला माहीत होतं.’ आम्हा कलाकारांचं काम किती अवघड आणि मजेशीर आहे! एकाच वेळेला मी heterosexual आहे, पण मुली आवडण्याचा अभिनय करायचा आहे. दोन्ही बायकांत साधर्म्य शोधून पात्र समजून घेऊन रंगवायचं आहे. खऱ्या अर्थानं पात्राशी अशा अवस्थेत सह-अनुभूत व्हायचं आहे!

विरह आपण अनुभवलाच आहे की… राग, चिडचिड, असुरक्षितता, हरवलेपण, उचंबळून होणारा आनंद, लाज, उत्सुकता- सगळं काही सारखंच. या पात्रात आणि आपल्यात फरक फक्त प्राधान्य-निवडीचा. या पलीकडची सुखदु:खं सारखीच नाहीत का! मग इतका तिरस्कार का? इतका ‘टॅबू’ का? ‘बाबा रे, मुलगी आण. कुठलीही चालेल. आपण तसं काही पाळत नाही. मुलगीच आण पण! मुलगा आणलास, तर ते काही झेपणार आणि चालणार नाही आपल्याला!’ असं आपल्या मुलाला म्हणणारे लोक २०२४ मध्येही आहेत. ‘तसली फ्यॅडं खूप झालीत हल्ली!’, ‘तो खूप बायल्या आणि हेमल्या आहे’, ‘ती खूप हुशार आहे, पण चेहऱ्यावर खूप केस आहेत’, ‘ती खूप मॅनली आहे’, ‘आमच्या कंपनीत LGBTQIA+ साठी आता २ टक्के रिझर्व्हेशन आहे. त्यामुळे deserving नसतानाही त्यांना आमच्या सीट्स जातात!’, ‘बघा, यांना टॉयलेट्स पण आता वेगळी हवीत!’, ‘तुम्ही गोष्टींकडे खूप empathy नी पाहता. At the end, it’ s all about power and not empathy.’ जगभरात हे सर्व कुठेही ऐकायला मिळतं. ‘असंच जगायचं असतं’, ‘हे म्हणजेच योग्य, पवित्र जगणं असतं’, ‘हा धर्म चांगला- हा वाईट’, ‘ही जात चांगली- ही वाईट’, ‘बायकांनी असे कपडे घालावे- घालू नये’, ‘पुरुषांनी असंच असावं- असंच वागावं- असंच वाटून घ्यावं’ अशा आताच्या ‘Animal’istic’ काळात तेंडुलकरांच्या ‘मित्राची गोष्ट’सारखी नाटकं बळ देतात. १९८१ मध्ये सादर झालेलं हे नाटक हे समलिंगी आकर्षणासंदर्भातलं पहिलं आधुनिक भारतीय नाटक म्हणून पाहता येईल. गेल्या काही वर्षांत LGBTQIA+ वरची विविध नाटकं आली आहेत. चेतन दातार यांचं ‘१ माधवबाग’, सचिन कुंडलकर आणि मोहित टाकळकर यांचं ‘छोट्याशा सुट्टीत’, जमीर कांबळे आणि सुषमा देशपांडे यांचं ‘तो ती ते’, आताच्या काळात सपन सारनचं ‘Beloved’, जमीर कांबळे यांचं ‘हिजडा’ आणि ‘ट्रान्स हाय हाय बदन’ ही नाटकं अशा प्रकारच्या विषयांना गंभीरपणे भिडतायत. महेश एलकुंचवार यांचं ‘वासनाकांड’ आणि सतीश आळेकर यांचं ‘बेगम बर्वे’ ही दोन मराठी नाटकं समाजानं घालून दिलेल्या नियमांपेक्षा वेगळे नातेसंबंध असण्याबद्दल परखडपणानी बोलतात. २०२४ मध्ये LGBTQIA+ चळवळ मी जवळून पाहतेय. ‘मित्राची गोष्ट’ हे नाटक आम्ही इंग्रजीत केलं होतं. त्यात मी नमाची भूमिका केली. आकाश खुराणा यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. ते आम्ही दीर्घांक म्हणून सादर केलं. त्याचा प्रयोग लंडनलादेखील केला होता. त्यानंतर ‘अश्लील उद्याोग मित्र मंडळ’ या चित्रपटात, ‘डॉट्स’ या चित्रपटातसुद्धा मी Queer पात्रं साकारली. अमृता सुभाष यांच्याबरोबर ‘The Booth’ ही गाजलेली शॉर्टफिल्म. तरीही या काळात मला मित्राची भूमिका करून पाहावीशी वाटते. ती माझ्या ‘ड्रीम रोल्स’पैकी एक वाटते. हे नाटक करता यावं यासाठी माझी धडपड चालू आहे. Queerness समजावून घेताना काही गोष्टी जाणवल्या, त्या अशा- Queerness चा शब्दकोशातला अर्थ ‘विचित्र’ असा असला, तरी कुठलीही LGBTQIA+ समुदायातील व्यक्ती ‘विचित्र’ कशी असू शकेल? Queer ही फक्त लैंगिकतेशी निगडित संज्ञा नाही. काहीही वेगळं जगू पाहणारे, ठरलेल्या जगण्याला छेद देणारे लोक हे Queer च म्हणायला हवेत! Sexually Queer आणि Socially Queer असं आपण त्याचं विभाजन करू शकतो. Queer असणं म्हणजे वेगळं असणं, प्रवाहाच्या विरुद्ध असणं, वेगळ्या विचारांनी जगणं, लिहिणं, निर्माण करणं आणि शोधणं आणि त्यामुळे समाजाला वेगळा विचार मिळणं. Queerness फक्त Sexual नसतो- तो कधी वेगवेगळे पैलू दाखवतो, कधी घाबरवतो, कधी परिचित डोलाऱ्याला धक्के देतो. कला, साहित्य, शास्त्र आणि अशा बऱ्याच क्षेत्रांत वेगळा विचार देत Queerness समाजाला पुढे नेतो. Queerness ला आपलं करून घेता येईल का? आताच्या काळात नवीन प्रश्न विचारत… तेंडुलकरांच्या मित्रा-नमा-बापूसारखं, आलोक मेनन किंवा दिशा पिंकी शेख यांच्या कवितांसारखं, तीव्र, खरं, उत्कट, तरल, पण काही नवं घडवू पाहणारं!

parnapethe@gmail.com

Story img Loader