(महिला दिन स्त्रियांच्या हक्कांशी, समानतेच्या मूल्यांशी, शांतीशी जोडलेला आहे. १९७५नंतर देशातील स्त्रियांच्या संघटना ८ मार्च हा स्त्रियांच्या संघर्षाचा दिन म्हणून साजरा करू लागल्या, ‘आमचा संघर्ष जग सुंदर करण्यासाठी आहे. भाकरी आणि गुलाबासाठी आहे.’ असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘महिला दिना’ची व्याप्ती वाढली आहे. त्याला येत असलेले उत्सवी स्वरूप पाहता ‘स्त्रीमुक्ती दिना’मागची वैचारिक पार्श्वभूमी आणि संघर्षशीलता हरवली जात आहे का? हा प्रश्न पडायला हवा.)
समाजवादी जन परिषदेच्या २०१४ च्या ‘स्त्रीमुक्ती दिन’ मोर्चासमोर बोलताना, ‘समता महिला पतसंस्थे’च्या संचालिका फरिदा खान म्हणाल्या, ‘‘दिन तो बडे मुश्किल आये है। आठ मार्च हमारे संघर्ष का, औरतोंके एकजूट का दिन है। ये हमारा त्योहार है। सभी बहनोंने ऐसे मोर्चामे आना चाहिए। हमे शांती, अमनके लिये काम करना है।’’
फरिदा खानच्या शब्दांची नाळ १८२०मध्ये इंग्लंड, अमेरिकेतील कापड उद्याोगातील कामगार यांनी केलेल्या संघर्षाशी तसेच क्लारा झेटकिन यांच्याशीही जुळलेली आहे. ‘महिला दिन’, ‘स्त्रीमुक्ती दिन’ साजरे करणारे सगळेच स्त्री-पुरुष या लढ्याशी जोडलेले आहेत. औद्याोगिक क्रांतीमुळे उत्पादन तंत्रात आमूलाग्र बदल झाला. कारखान्यात काम करून पैसे कमावण्यासाठी स्त्रिया घराबाहेर पडल्या. या कामगार स्त्रियांचे शोषणही होत होते. कोंदट, अंधाऱ्या जागेत १६ तास काम करावे लागत होते. मोबदला कमी मिळत होता. मात्र एकत्र आल्यामुळे शोषणाविरुद्ध लढण्याची जाणीव तीव्र झाली. १८२०मध्ये इंग्लंड-अमेरिकेतील कापड उद्याोगातील कामगार स्त्रिया दहा तासांचा कामाचा दिवस व्हावा म्हणून संपावर गेल्या. तेव्हाच्या अमेरिकेतील ‘फेडरेशन ऑफ लेबर’ या संघटनेत स्त्रियांना प्रवेश नव्हता. १८८०मध्ये स्त्रियांनी ‘द वुमेन्स ट्रेड युनियन लीग’ची स्थापना केली. आठ तासांचा कामाचा दिवस, पाळणाघर, कामगारांसाठी घर इत्यादी मागण्या केल्या.
त्यानंतर न्यू यॉर्क आणि लॉरेन्समध्ये स्त्रियांच्या पुढाकारानं संप झाले. प्रजननावरील स्त्रियांच्या नियंत्रणाच्या हक्कांची मागणी पुढे आली. या लढ्यातील एका गीतातील शब्द अक्षय झाले. ते शब्द होते, ‘‘आमचा संघर्ष जग सुंदर करण्यासाठी आहे. भाकरी आणि गुलाबासाठी आहे.’’ ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कच्या रुटगर्स चौकात हजारो कामगार स्त्रिया जमल्या. तेव्हा अन्य मागण्यांबरोबरच स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराची मागणीही पुढे आली. त्यामुळे स्त्रियांच्या दुय्यम नागरिकत्वाविरुद्धच्या संघर्षाला दिशा मिळाली. १९०७मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी स्त्रियांची परिषद झाली. परिषदेत बोलताना जर्मनीतील ‘सोशल डेमोक्रॅटिक पक्षा’च्या नेत्या क्लारा झेटकिन म्हणाल्या, ‘‘सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करणं समाजवादी स्त्रियांचं कर्तव्य आहे.’’ कोपनहेगन येथे १९१०मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी स्त्रियांच्या परिषदेत क्लारा झेटकिन यांनीच, आठ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ व्हावा, असा ठराव मांडला. १७ देशांतील शंभराहून अधिक स्त्री नेत्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
१९७५ला ‘आंतरराष्ट्रीय स्त्री वर्ष’ जाहीर झालं. त्या वेळी संयुक्त राष्ट्र संघाने प्रथम ८ मार्च ‘महिला दिन’ म्हणून साजरा केला. डिसेंबर १९७७मध्ये ‘संयुक्त राष्ट्र संघा’च्या महासभेने ठराव करून स्त्रियांचे अधिकार आणि शांततेसाठी ८ मार्चला ‘जागतिक महिला दिन’ म्हणून मान्यता दिली. १९१०मध्ये स्त्रीवादी चळवळीने पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात आलं.
स्त्रियांचा संघर्ष हा अन्याय, शोषण, हिंसा आणि युद्धाच्या विरोधात होता. एकोणिसाव्या शतकात स्त्रिया जगभर या चळवळीशी जोडल्या जात होत्या. पहिल्या महायुद्धात रशियातील दोन लाखांहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला. युद्धाच्या झळांनी त्रस्त झालेल्या रशियन स्त्रियांनी ‘ब्रेड अँड पीस’… ‘भाकरी आणि शांती’ असे फलक हातात घेऊन १९१७च्या फेब्रुवारी महिन्यात मोर्चा काढला होता. ग्रेगोरियन कॅलेंडर( Gregorian) प्रमाणे ती तारीख होती ८ मार्च!
८ मार्च १९३६ला हजारो स्पॅनिश स्त्रियांनी फ्रँकोच्या हुकूमशाहीविरोधात निदर्शनं केली. ८ मार्च १९४३ला इटालीच्या हजारो स्त्रिया मुसोलिनीविरोधात रस्त्यावर आल्या. तसेच ८ मार्च १९८१ रोजी इराणच्या फॅसिस्ट, मूलतत्त्ववादी राजवटीविरोधात तेहरान शहरात सुमारे ५० हजार स्त्रियांनी एकत्र येऊन आवाज उठवला. स्त्रियांच्या चळवळींची तीव्रता वाढत चालली होती. युद्धाच्या दुष्परिणामांची झळ स्त्रियांना आणि बालकांना सर्वाधिक बसत होती. विस्थापन, अत्याचार आणि कुटुंबातील पुरुषांचे मृत्यू सहन करावे लागत होते. सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात आणि गाझा पट्टीतील हिंसाचारात आपण हे अनुभवलेच. अमेरिकेने व्हिएतनामवर केलेल्या आक्रमणाविरुद्ध १९७४च्या ८ मार्चला व्हिएतनामी स्त्रियांनी बुलंद आवाज उठवला. १९८८मध्ये फिलिपिन्सच्या स्त्रियांनी ‘वुमेन से नो टू टोटल वॉर’ असे फलक हातात घेऊन मशाल मोर्चा काढला.
‘आमच्या शरीरावर आमचा अधिकार’, या घोषणेचा जन्म याच काळात झाला. किती मुले होऊ द्यायची याचा निर्णय आम्ही घेऊ, असे म्हणत कॅनडा आणि युरोपमधील स्त्रियांनी १९८०मध्ये याच दिवशी सुरक्षित गर्भपाताचा हक्क आणि मोफत कायदा सेवा या मागण्यांसाठी मोर्चा काढला. ८ मार्च स्त्रियांच्या संघर्षाशी जोडलेला आहे. स्त्रियांच्या चळवळींचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. भारतात स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात १९४३ला पाहिला महिला दिन साजरा झाला. १९७५नंतर देशातील स्त्रियांच्या संघटना ८ मार्च हा स्त्रियांच्या संघर्षाचा दिन म्हणून साजरा करू लागल्या. १९७२मध्ये मथुरा या आदिवासी मुलीवर पोलीस ठाण्यात झालेल्या बलात्काराविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. ८ मार्च १९८०ला पोलीस आणि न्याय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी देशभर मोर्चे निघाले. गेल्या काही वर्षांपासून ‘महिला दिना’ची स्वीकारार्हता आणि व्याप्ती वाढली आहे. शासकीय पातळीवर तसेच विविध स्तरांवर ८ मार्चचा स्वीकार झाला आहे. महाराष्ट्रातील स्त्रीसंघटना आणि कार्यकर्त्यांनी १९८३मध्ये ‘स्त्रीमुक्ती आंदोलन संपर्क समिती’ स्थापन केली. दरवर्षी ८ मार्चच्या मागण्या निश्चित करून कार्यक्रम ठरवण्यासाठी संपर्क समिती पुढाकार घेते. त्यातून कार्यक्रमाची दिशा ठरते.
१९९६पासून संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्चसाठी विशिष्ट अशी संकल्पना द्यायला सुरुवात केली. गेल्या वर्षी, ‘समानता, विविधता आणि समावेशकता’याच्या समर्थनार्थ स्त्रिया, अशी संकल्पना होती. २०२५ची ,‘सर्व स्त्रिया आणि मुलींसाठी हक्क, समानता, सक्षमीकरण’अशी संकल्पना आहे. महिला दिन हा स्त्रियांच्या हक्कांशी, समानतेच्या मूल्यांशी, शांतीशी जोडलेला आहे. चळवळींमुळे स्त्रियांच्या पोशाखावरील निर्बंध बऱ्याच प्रमाणात कमी झाले. पोशाखातील आधुनिकता स्वीकारली गेली. स्त्रियांच्या पोशाखाचे स्वातंत्र्य प्रत्यक्षात आले. सांप्रतकाळी राहणीमानात आधुनिकता आणि विचारात परंपरावादी पितृसत्ताकता अशी विसंगतीही अनेकदा दिसते. त्यातून फेटे बांधणं, ढोल वाजवणं, दागिन्यांचा हव्यास, जुन्या परंपरांचे पुनर्जीवन अशा उत्सवी कार्यक्रमांची वाढती संख्या अनुभवायला येत आहे. आज सर्वच क्षेत्रात बाजारवादाने अतिक्रमण केले आहे. ‘महिला दिना’च्या निमित्ताने साड्या, कपडे, सौंदर्यप्रसाधने, भांडी, दागिने इत्यादी वस्तूंचे ‘सेल’ सुरू केले जातात. रेस्टॉरन्टमध्ये स्त्री ग्राहकांसाठी सवलती जाहीर होतात. या सर्व ठिकाणी स्त्रिया गर्दीही करतात. बाजार आणि कार्यक्रमांचे उत्सवी स्वरूप यात ‘स्त्रीमुक्ती दिना’मागची वैचारिक पार्श्वभूमी आणि संघर्षशीलता हरवली जात असल्याचे जाणवायला लागले आहे. स्त्रियांचा संघर्ष विषमता आणि पितृसत्ताक व्यवस्थेतील स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याविरुद्ध आहे. समतेच्या प्रस्थापनेसाठी आहे. याचे भान महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये राखले जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे.
कामगार स्त्रियांनी केलेल्या संघर्षातून हा दिन निर्माण झाला. बाजारवाद आणि उत्सवीकरणात कष्टकरी स्त्रियांकडे दुर्लक्ष होते आहे. विविध ‘सेल’मध्ये खरेदी करण्यासाठी जमलेल्या स्त्रियांना बारा ते चौदा तास उभे राहून काम करणाऱ्या स्त्रियांच्या कष्टांची जाणीव नाही. उच्चवर्गीयांमध्ये कष्टकरी वर्गांविषयी तुच्छता वाढलेली दिसते. स्त्रीवादी चळवळीच्या भगिनीभावाला रोज धक्के बसतात. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणात कामगार स्त्रियांचे हक्क हिरावले गेले आहेत. असंख्य कामगार स्त्रिया असंघटित आणि असुरक्षित क्षेत्रात ढकलल्या गेल्या आहेत. कामगार चळवळीतून निर्माण झालेले, कायद्याने दिलेले अनेक अधिकार आता हिरावले जात आहेत. हा प्रश्न केवळ कष्टकरी स्त्रियांचा नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या ‘पॅकेज’वर नोकरी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या संपन्न स्त्रियांचाही आहे. आठवड्यात ७० तास काम केले पाहिजे, रविवारच्या सुट्टीची काय गरज? घरी राहून काय बायकोचे तोंड बघणार? असे प्रश्न विचारण्याचे साहस उद्याोगपती करत आहेत. कष्टकरी समूहांविषयी आस्था बाळगत, जोडून घेत पुन्हा दिवसाला आठ तासांच्या कामाची आणि पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करण्याची वेळ आली आहे.
जगभर शांतता, सहिष्णुता नांदावी म्हणून स्त्रियांच्या चळवळी प्रयत्नशील आहेत. धर्मांधतेमुळे सहिष्णुतेचे वातावरण नष्ट होते आहे. जगभर नियोजनपूर्वक अशांतता, हिंसाचार, द्वेष पसरवला जात आहे. अनेक ठिकाणी स्त्रियांना पुन्हा घरात डांबण्यासाठी पितृसत्तेचे गौरवीकरण सुरू आहे. स्त्रियांच्या चळवळी पुढील आव्हानं वाढली आहेत.
येत्या आठ मार्चला स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण करू, जगातील युद्धखोरी संपवण्याचा, जगात शांतता, परस्पर सद्भाव, परमत सहिष्णुता निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध राहण्याचा संकल्प करू. तरच ही दुनिया सुंदर होईल. शांती असेल तरच समृद्धी येईल. भाकरीही मिळेल आणि गुलाबही फुलतील. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा.
advnishashiurkar@gmail.com