डॉ. छाया महाजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भीती न वाटणारा माणूसच सापडणार नाही! पण आपल्याला वाटणाऱ्या भीतीची कारणं प्रत्येकाला नेमकी माहिती असतात का? मुळात प्रत्येक भीतीला ती असतात का? भीती मृत्यूची की वेदनांची? हाती सत्ता न राहण्याची, एकटं पडण्याची, की बहिष्कृत होण्याची?.. प्रकार अनेक तिचे! पण छातीतलं धडधडणं, तोंडून निघणारी किंकाळी बहुतेक वेळा सारखीच!    

पर्यटनाच्या प्रेक्षणीय स्थळांमध्येही अनेक चकित करणाऱ्या गोष्टी असतात हे दर वेळी नव्यानं कळत राहतं.. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. डिस्नेलँडमध्ये एका भागात अनेक ‘मेरी गो राऊंड’ची चक्रं फिरत होती. विलक्षण ओढीनं मी तिकडे गेले. विविध आकारांच्या- कपबशा, फुलं, चौकोन, प्राणी अशा तबकडयांत बसून माणसं त्याचा आनंद घेत होती. तेवढयात प्रचंड मोठया आवाजात चीत्कार ऐकायला आले. अतीव वेगानं सरळ वर चढणारी आणि तितक्याच वेगानं खोल सरळ उतरणारी रेल्वेसदृश गाडी होती ती. तिचे डबे अर्थातच बिनटपाचे. तिचा धडधडणारा आवाज, वेग आणि धावण्याचा मार्ग भयप्रद होता. उतरताना ती गाडी पालथी पडेल असं वाटतं होतं. आत बसलेल्यांचं ओरडणं, रडणं, चीत्कार चालूच होते. बाजूला लिहिलं होतं, ‘रोलर कोस्टर’ आणि एका फलकावर सूचना होती- ‘ब्लड प्रेशर, हृदयविकार किंवा अन्य आजारांनी पीडित व्यक्तींनी यात बसू नये.’

रोलर कोस्टर थांबला. बाहेर पडणारे घाम पुसत होते. भेदरलेल्या चेहऱ्यांवर सुटकेच्या रेघा होत्या. लहान मुलं, तरुण, म्हातारे सगळेच होते त्यात. तरुण पोरांनी ती राइड ‘एन्जॉय’ केली होती. तरीही ‘इतकी भीती वाटत होती!’ हे उद्गार बव्हंशी गर्दीकडून ऐकायला मिळाले. तो प्रकार पाहून मी स्वत:ला ‘कमकुवत’ या गटात सामील करून घेतलं आणि दुसरीकडे जायला वळले, तेव्हा रडण्या-ओरडण्याचे आवाज नव्यानं सुरू झाले होते.

इतकी भीती वाटते तर का बसायचं त्याच्यात?.. भयाचा निचरा व्हायला? काटयानं काटा काढण्याचा प्रकार!

पुढे एकदा ‘बंजी जिम्पग’साठी एका मोठया, उंच पर्वतासारख्या डोंगरावर गेलो. डोंगराच्या कडेनं लोखंडी, बंद जाळीदार पूल होता. सगळे चालले म्हणून मीही पुढे जायला निघाले, तेव्हा दारावरच्या माणसानं थांबवलं. लक्षात आलं, की तो पर्यटकांच्या तब्येतीची चौकशी करतोय. तेवढयात एका तरुणीची जोरदार किंकाळी ऐकू आली. तिला एका पॉइंटवरून झोकून देण्यात आलं होतं. ती हसत होती की रडत होती तेच कळत नव्हतं! तिथला ऑपरेटर म्हणाला, ‘‘बहुतेक लोक भीतीनं डोळे गच्च मिटतात. खरं तर डोळे उघडे ठेवून आनंद घ्यायला पाहिजे.. पण खाली पडू असं त्यांना वाटतं!’’

मनात आलं, असा राक्षसी आनंद न घेतलेला बरा! मृत्यू येऊच नये, असं प्रत्येकाला वाटतं. अगदी देव-दानवांनाही समुद्रमंथनामधून वर येणारं अमृत प्यावंसं वाटलं, तर आपण सामान्य माणसं आहोत. पण मृत्यूविषयी इंग्लिश लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो तसं, ‘कोणाही माणसाला मृत्यूचं भय वाटतं तसं मला वाटत नाही. तो येण्यापूर्वी होणाऱ्या वेदनांची किंवा शारीरिक दुर्बलतेची खरी भीती वाटते.’ 

खरं तर मृत्यू येतो तेव्हा श्वास थांबायला क्षणही लगत नाही. पण जगत असताना ती भीती सतत असतेच. आपलं अस्तित्व संपण्याची भीती असेल का? अस्तित्वहीन होण्याची भावना भयाला जन्माला घालत असावी. म्हणूनच काळाच्या पडद्यावर आपलं नाव कोरण्याची धडपड माणूस करतो. पूर्वी दगडांवर नावं कोरून ठेवायची माणसं! कित्येक जण झाडाच्या बुंध्यावर, अगदी शाळेच्या बाकावरही कोरायचे. एकदा व्हॉटस्अॅापच्या ग्रुपवर ठरवून आम्ही शाळकरी आयुष्यात एकत्र असलेल्यांनी आमच्या शाळेला भेट दिली. वर्गात जाऊन एकानं त्याचं बाकावर कोरलेलं नाव अजून तसंच आहे का पाहिलं आणि ते दिसल्यावर त्याला ब्रह्मानंद झाल्याचं मी पाहिलं! अजरामर झाल्याचा तो आनंद होता. अट्टहासानं नावं कोरण्याचा प्रकार वाळूवर किंवा पाण्यावर नाव कोरण्यासारखा आहे, पण माणूस ते लिहायचं सोडत नाही.

अनेक माणसं आपल्या अस्तित्वासाठी  आपल्या सजातीयांतून बाहेर फेकले जाऊ नये,म्हणून जिवापाड प्रयत्न करताना दिसतात. आजही अनेक खेडयांतून जातपंचायत ठरवेल ते लोक मान्य करतात. कित्येक वेळा ते अन्याय्य आणि अत्याचारी असतं. रोटी-बेटी व्यवहार बंद करणं किंवा जातीबाहेर टाकण्याची धमकी भीतीला खत घालायला पुरेशी होते.

अस्तित्व गमावण्याच्या भीतीपायीच देवाच्या भजनी लागणं झालं असावं का?  वाऱ्याची, पावसाची, उन्हाची, वादळाची भीती! त्यांचे त्यांचे देव आले- इंद्र, वायू, अग्नी.. येणाऱ्या संकटांमुळे, दु:खामुळे, कराव्या लगणाऱ्या सततच्या संघर्षांमुळे माणूस प्रभूशरण झाला असावा. त्याला धर्माचा आधार मिळाला. पण नंतर विज्ञान आलं, विश्लेषणंही ओघानंच आली. कित्येक घटनांची भीती बाळगण्याचं कारण नाही हेही कळत गेलं. तरी संकटकाळी सुटकेचा मार्ग आजही परमशक्तीच आहे. तिची उपासना करताना एक गोष्ट होताना दिसते, ती म्हणजे विधी, रूढ संस्कार किंवा कर्मकांड हे म्हणजेच ईश्वर असं नाही, हे सांगूनही ते करण्याचं लोक थांबवत नाहीत. उलट त्यातही चूक होऊ नये किंवा कमी पडू नये अशी भीती वाटणारे जास्त. त्या शक्तीला परमपिता म्हणताना त्याचीच भीती बसावी, हे गमतीचं आहे. कवी-लेखक केकी दारूवाला म्हणतात तसं, धर्म, विज्ञान आणि वास्तव अशा दुधारी तलवारीवर माणसांची तारांबळ उडते आहे. तरीही श्रद्धेची मानसिक गरज उरतेच. तेच धर्माचं उगमस्थान.

 भय आणि भूक जन्मजात आहे. म्हणून तर अश्मयुगातही दगडी हत्यारं तयार झाली. सतत जाणवणारी असुरक्षितता हा भीतीचाच एक भाग. याशिवाय उताराची भीती, काळोखाची भीती, गर्दीची, स्टेजवर बोलण्याची, नापास होण्याची, मार खाण्याची, बोलणी खाण्याची, नकार मिळण्याची.. किती तरी प्रकार!

सध्या मानसिकतेत रुतून बसलेल्या अनेक ‘कॉम्प्लेक्सेस’वर सिनेमे निघताहेत. नेटवरच्या अनेक वाहिन्यांवर असे शेकडो सिनेमे सापडतात. अंग चोरून घेणारी, कोपऱ्यात बसणारी पात्रं दिसली की त्याचा अंदाज येतो! अपघातात किंवा इतर हिंसाचारात शारीरिक इजा झाली, तर ती माणसं त्यापुढे आपलं शरीर सुरक्षित राखण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ‘पॅरासेलिंग’ किंवा ‘अंडरवॉटर डायव्हिंग’ किंवा कधी साधी फुगडी घालायलाही बिचकतात! पाण्यामध्ये उतरायला घाबरतात. मग पाण्याखालचं जग पाहणं दूर. टीव्हीवर दिसेल तेवढाच अनुभव.

माझा एक मित्र ‘एम.आर.आय.’ करायला सांगूनही करत नव्हता. त्या पाइपसारख्या यंत्रात जाण्याची विलक्षण भीती होती त्याला. दोनदा केलेले प्रयत्न फसले, कारण यंत्राच्या आत त्याची ट्रॉली सरकली की हा ओरडायला सुरुवात करत होता. अर्थातच आम्ही धीर देत होतो, पण व्यर्थ. डॉक्टर शांत होते. ते म्हणाले, ‘‘दुसऱ्या पद्धतीनं टेस्ट करू, त्यांना ‘क्लॉस्ट्रोफोबिया’ आहे. अकारण भीती. ’’ त्यांनी सहज सांगितलं. त्या वेळी त्यांनी ‘फोबिया’चे इतके प्रकार सांगितले, की मलासुद्धा कुठला तरी फोबिया आहेच असं वाटायला लागलं. कारण किती तरी लक्षणं मला माझ्यात दिसत होती. किती किती गोष्टींना मीही भीत होते!

माझा एक स्नेही ‘घाबरट’ या वर्गात मोडावा इतक्या गोष्टींना घाबरतो. पाण्याची भीती म्हणून पोहणं शिकला नाही. गर्दीची भीती म्हणून गाडी चालवताना एक पाय ब्रेकवरून काढत नाही. विमान टेक-ऑफ करतं त्यावेळीही तो प्रचंड घाबरतो. याशिवाय एखादी प्रेतयात्रा समोरून आली तर हा रस्ता बदलतो, कारण प्रेताची भीती! मी त्याला एकदा म्हणाले, ‘‘अरे, प्रेताला काय घाबरतो? त्यात जीव नसतोच, चैतन्य नसते.’’ त्यावर त्याने होकारार्थी मान हलवली आणि माझा उपहासिक स्वराला उत्तर म्हणून भीती ही आरोग्याला कशी चांगली असते, हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. शिवाय भीती अनेक धोक्यापासून, संकटापासून आपल्याला कशी सुरक्षित ठेवते, त्याचं प्रोग्रामिंग कसं निसर्गदत्त आहे, हेही सांगितले.

त्याच्या अनेक भयांच्या गाठोडयाकडे पाहात मी मनात म्हणाले, ‘हे ईश्वरा! याचं प्रोग्रामिंग जरा जास्तच झालं नाही का?’

drchhayamahajan@gmail.com