नीलिमा किराणे
‘डोन्ट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो’ हे अनेकदा आपण वाचलेलं, ऐकलेलं असतं. परंतु घट्ट नात्यात तसं म्हणणं ही खरी कसरत असते. अशा प्रसंगी आपणच आपल्याभोवती ‘असं झालं तर काय?’च्या काल्पनिक प्रश्नांचं कोंडाळं तयार करतो नि मानसिक शांती हरवून बसतो. मात्र आपल्याला नेमकं काय हवंय आणि त्यासाठी काय करायला हवं, याचं उत्तर एकदा का मिळालं की ‘भावनिक परिपूर्ती’ होणारच. कसं पोहोचायचं त्या इतिश्रीच्या प्रश्नाकडे?
काल नीताचा फोन आल्यापासून अनुष्का अस्वस्थ होती. मधूनच विचारात गढलेली, मधूनच चिडचिड, मधूनच पुटपुट ही तिची नेहमीची लक्षणं पाहून योहाननं, तिच्या नवऱ्यानं विचारलं,
‘‘नीताचा फोन होता का काल?’’
‘‘हो. का रे?’’
‘‘असंच विचारलं. काय म्हणतेय?’’
‘‘भाच्याच्या लग्नाला जायचंय, तुझ्या आईचा नेकलेस घालायला दे, उद्या सकाळी घ्यायला येते, असं म्हणाली.’’
‘‘मला वाटलंच होतं. नीता तुझी काही तरी वस्तू मागणार, मग तुझी चिडचिड होणार, ‘ही अशी कशी वागू शकते?’ म्हणून तू माझ्यामागे कटकट करणार आणि शेवटी तू ती वस्तू तिला देणार, हे गेली कित्येक वर्ष ठरलेलं आहे! शेवटी लहानपणापासूनची सख्खी मैत्रीण ना?’’ असं म्हणून योहान हसला तशी अनुष्काचं डोकं सटकलं.
‘‘हो, मग आहेच ती माझी सख्खी मैत्रीण, पण तरी मला तिची ही ‘मागामागी’ अजिबात आवडत नाही. ही तिची लहानपणापासूनची सवय आहे. दोघी एकमेकींच्या गोष्टी वापरायचो. पण आता लहान आहोत का? आता नाही मला ते आवडत. ही बया कधी मोठी होणार? मला गृहीत धरणं कधी थांबवणार?’’
‘‘अच्छा, म्हणजे ती गृहीत धरतेय म्हणून तुझी चिडचिड होतेय का?’’
‘‘तसं पण नाही रे.. मला नाही तर कुणाला गृहीत धरणार ती? पण मला दुसऱ्याचं काही घेणं आवडत नाही. मी कधीच मागत नाही कुणाकडे.’’
‘‘पण तीही तुझ्याशिवाय कुणाकडे मागत नसेल. मागते का?’’
अनुष्का विचारात पडली. ‘‘इतर कुणाकडे नाही मागत बहुतेक.. पण माझ्यावर किती हक्क दाखवते. ‘नेकलेस देतेस का?’ असं विचारलंसुद्धा नाही! डायरेक्ट ‘घ्यायलाच येते’ म्हणाली. सरळ आज्ञाच! मी का बरं सहन करू? चार-पाच दिवस मी आजारी होते, तिला माहीत होतं. साधी चौकशीही नाही. फक्त स्वत:ची सोय!’’
‘‘तुझी सोयही पाहते ना ती एरवी? मग हक्क दाखवते म्हणून एवढी चिडलीस?’’
‘‘अरे, दिवसेंदिवस हे गृहीत धरणं वाढतच चाललंय हिचं. मैत्रीचा हक्क मीही दाखवते कधी कधी, पण ही काहीही घेऊन जाते ना, त्याचा त्रास होतो. मागच्या वेळी नाही का, दोन दिवसांसाठी आपली कार घेऊन गेली आणि ठोकून आणली. एवढं नुकसान होऊनही हसून साजरं करावं लागलं. ती दुरुस्तीचे पैसे देते म्हणाली होती खरं, पण असे कसे घेणार तिच्याकडून?’’
‘‘ओके! म्हणजे तिच्याकडून त्या वेळी पैसे घेतले नाहीत याचा तुला राग येतोय का? पण अपघात कुणाचाही होऊ शकतो.’’
‘‘नाही, तसंही नाही.. पण.. तू असा दोन्ही बाजूंनी का बोलतोयस?’’
‘‘एवढया घट्ट मैत्रिणीबद्दल एवढी चिडचिड का होतेय तुझी? मला कळतच नाहीये. नेकलेस दिला नाही तर ती दुखावेल, मैत्री तुटेल अशी भीती वाटतेय का?’’
‘‘म्हणजे आता समज, मी नेकलेस दिला आणि तिच्याकडून हरवला तर?’’
‘‘समजा हरवलाच, तर या वेळी घे पैसे तिच्याकडून! सोन्याच्या वजनाची चिठ्ठी त्या बॉक्समध्येच ठेवली होती मी.’’
‘‘तू डोक्यावर पडलायस का रे? काहीही काय बोलतोयस! हा आईचा नेकलेस. तिची आठवण आहे ही. याची किंमत पैशांत नाही. रिप्लेसमेंट होऊ शकत नाही याची.. आणि हे तुला चांगलंच माहितीये!’’
‘‘हां! म्हणजे तुला नीताला हा नेकलेस द्यायची इच्छा नाही.. पण ‘नाही’ म्हणता येत नाहीये याचा राग येतोय. हो ना?’’
‘‘किती प्रश्न विचारतोस रे?’’ अनुष्कानं वैतागून त्याला तोडलं आणि ती एकदम गप्प झाली. पण विचार करत म्हणाली, ‘‘हो, करेक्ट! नीताला ‘नाही’ म्हणणं मला कधीच जमत नाही याचाच राग येतोय आणि ते कधी जमणारही नाही याची खात्री आहे, म्हणून हेल्पलेस वाटतंय.. स्वत:चा खूप राग येतोय.’’
‘‘सापडलं आता तुझ्या त्रासाचं नेमकं कारण? नीतानं काही मागितलं की तुझी होणारी चिडचिड दिवसेंदिवस वाढत चाललीय अनुष्का. तू खूप वर्ष ते दडपलं आहेस. तुला नीताला नाही म्हणता येत नाही हे त्रासाचं मूळ कारण आहे. तू तिथपर्यंत पोहोचावीस म्हणून मी मुद्दाम तुला एकेक प्रश्न विचारत होतो. तू हजार कारणं देत गोल गोल फिरत होतीस तुझ्या रागाभोवती, पण सरळ सामोरं जात नव्हतीस त्याला. हक्क, आज्ञा, सोय, आजारपणाची चौकशी, कारचे पैसे, नेकलेस हरवेल.. कुठेही फिरत होतीस! तुझं हे नेहमीचं आहे. पण तुझी कालपासूनची बेचैनी पाहून मला वाटलं, की आता हे गरगर फिरणं खूप होतंय. ते तुला दिसलं पाहिजे आणि ते थांबलंच पाहिजे!’’
‘‘कसं थांबवणार?’’
‘‘ नेकलेस नक्की द्यायचा नाहीये का?’’
‘‘हो, नक्की नाही द्यायचा. पण असं नाही म्हणणं शोभत नाही रे! शिवाय ती दुखावेल हे तर आहेच.’’
‘‘पण तिला दुखवायचं नाही म्हणून तू स्वत: दर वेळी किती दुखावून घेते आहेस? हे थांबलं नाही तर रोज वाढती चिडचिड झेपणार आहे का? की हे आयुष्यभर असंच चालणार म्हणून स्वीकारून टाकता येणार आहे? मग यापुढे या विषयावर माझ्यापाशी कटकट करायची नाही! मी नाही तुझ्यासारखा ‘राग-समजूत-मैत्री’वाला खेळ वर्षांनुवर्ष खेळत बसणार!’’ योहाननं हात झटकून टाकले.
‘‘तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस?’’ अनुष्का सोडायला तयार नव्हती.
‘‘माझे मैत्रीचे फंडे स्पष्ट आहेत अनू. खऱ्या मैत्रीत मैत्रिणीचा आहे तसा स्वीकार हवा आणि आपल्याला न पटणारी गोष्ट सांगण्याचा मोकळेपणा आणि विश्वास हवा.’’
‘‘पण मग मला ‘नाही’ का नाही म्हणता येत?’’
‘‘फिरून फिरून भोपळे चौकात, असं चाललंय तुझं! पण तरीही सांगतो. मला वाटतं, ती दुखावेल या भीतीनं पन्नास कारणं शोधून गोल गोल फिरत बसतेस ना, तिथे प्रॉब्लेम आहे. मग त्यात अडकल्याची भावना येऊन चिडचिड होते. पण आता त्या जंजाळातून बाहेर पडलीयस आणि तुला नेमकं माहीत आहे, की नीताला शक्यतो न दुखावता, ‘आईचा नेकलेस देऊ शकत नाही’ एवढंच फक्त सांगायचंय, तर मग तेवढाच विचार कर ना! की ते कसं सांगायचं. आजूबाजूची पन्नास कारणं आणि परिणामांना बाजूला ठेव. वापर ना तुझी ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स’.’’
योहान आज अनुष्काला ‘चॅलेंजवर चॅलेंज’ देत होता! ‘डोन्ट से येस व्हेन यू वॉन्ट टू से नो’ वगैरे वाचलेली अनेक पुस्तकं तिला आठवली. एवढं वाचूनही, प्रत्यक्ष वेळ आल्यावर ते अवघड जात होतं. योहानचं म्हणणं पटूनही धाडस होत नव्हतं. ते ओळखून योहान म्हणाला,
‘‘अनुष्का, तुमची मैत्री एवढी लेचीपेची आहे का? इतक्या वर्षांच्या सवयीमुळे असं घडतंय ना? तुला हे आता आवडत नसू शकेल हे तिला कसं कळेल? तूच मोकळेपणाने सांगायला पाहिजे ना? नीताला ‘नाही’ म्हणावं अशा गोष्टी खूप थोडया आहेत. पण ‘आपण कधीच ‘नाही’ का म्हणू शकत नाही?’ या प्रश्नामुळे आणखी घुसमट होतेय तुझी. तुला फक्त एकदा ‘नाही’ म्हणता आलं ना, तरी तो ‘बॅरियर’ वा कुंपण तुटेल. हा दरवेळचा ताण, चिडचिड थांबेल. मुद्दा नेकलेसचा नाहीच, तुझ्या मनातल्या बॅरियरचा आहे, हे समजून घे.’’
‘‘पण तरी नीता रुसली किंवा माझं मनावरच न घेता पूर्वीसारखीच वागत राहिली तर?’’
‘‘तिनं कसं वागायचं तो तिचा प्रश्न आहे. ती दुखावेलही किंवा नव्यानं विचारही करेल. तू, तुला कसं वागायचंय ते ठरव. माझ्याकडे ज्या शब्दांत तिच्याबद्दल कटकट करतेस, तसं थोडंच बोलायचंय तिच्याशी? एकाच वाक्यात सांगशील ना तिला? तरीही नसेलच जमणार तुला तर नेकलेस काढून ठेव! ती येईलच एवढयात. मात्र आता तुमच्या घोळात मी नाही येणार! मला इतर महत्त्वाच्या खूप गोष्टी आहेत करण्यासाठी.’’
अनुष्काचं तिथल्या तिथं फिरत राहणं योहाननं खटकन तोडून टाकलं, त्याबरोबर तिला रस्ता सापडला. शब्द सापडले. आपल्याजवळचे इतर चांगले नेकलेस नीताच्या समोर ठेवून, ‘यातला तुला हवा तो घे. मात्र आईच्या नेकलेसबद्दल मी पझेसिव्ह आहे, तो नको मागूस,’ हे सांगून टाकायचं. खरा छळणारा मुद्दा ‘बॅरियर’ तोडता न येणं एवढाच होता. बाकीच्या पन्नास मुद्दयांत थोडं तथ्य असलं, तरी ते महत्त्वाचे नव्हतेच हे मनापासून पटल्यावर तिचं मन हलकं झालं होतं. आता ती नीताची वाट पाहत होती ..
neelima.kirane1@gmail.com