डॉ. नंदू मुलमुले

अनेक प्रथा-परंपरा का मागे पडतात? कारण त्या कालसुसंगत नसतात. माणसांचंही तसंच. वयोवृद्धांची एक पिढी सर्वार्थानं अभावात जगली. त्याच्या मुलांची- आताची मध्यमवयीन पिढी मात्र उच्च महत्त्वाकांक्षा ठेवून जगली. अशा माणसांत वादाच्या ठिणग्या पडणारच. विस्तवाच्या दोन्ही बाजूंस स्त्रिया असतील, तर घरातल्या पुरुषांनी वाईटपणा न घेता दूर जाऊन बसणं, हे चित्रही नेहमीचंच! रोहित, त्याची आई आणि पत्नी सीमा, यांची गोष्ट अशीच. वादाचा विस्तव शांत करण्यात सीमाला यश आलं.. पण कधी आणि कसं?.. 

lucky zodiac signs
Lucky Zodiac : तीन राशी जन्मजात असतात नशीबवान, ‘या’ लोकांना पैसा, प्रेम, सर्वकाही मिळते
Lakshmi Narayan Yoga
Lakshmi Narayan Yoga : पाच दिवसानंतर निर्माण होणार लक्ष्मी नारायण योग, ‘या’ राशींचे नशीब चमकणार, मिळेल छप्परफाड पैसा
The grace of Goddess Lakshmi will be on the persons of these three zodiac signs
सूर्य करणार कमाल, तुम्ही होणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
sour sweet guava pickle recipe
नुसतं नाव ऐकून तोंडाला सुटेल पाणी, सोप्या पद्धतीने असं बनवा आंबट गोड पेरुचं लोणचं; नोट करा साहित्य आणि कृती
Moon Astrology chandrama in kundali
Moon Astrology: मूड स्विंग्समुळे तुम्ही वैतागला आहात का? चंद्राच्या प्रभावामुळे बिघडते- सुधारते व्यक्तीचे वर्तन
Gram Panchayat sarpanch to MLA and now MP Nilesh Lanke is newly elected MP of NCP Sharad Pawar group
ओळख नवीन खासदारांची : नीलेश लंके (नगर-राष्ट्रवादी शरद पवार गट) – अंगी नाना कळा!
election
कलाकारण: जनमताचा कौल म्हणजे ‘कलाकृती’च!
Loksatta kutuhal Artificial intelligence and early diagnosis
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्राथमिक रोगनिदान

दोन पिढयांमधले संघर्ष हे वरवर पाहता व्यक्तींमधले दिसत असले, तरी नीट पाहिलं तर ते दोन वृत्तींमधले असतात. माणूस समाजानं दिलेला एक साचा स्वीकारतो आणि त्यात स्वत:ला बसवून घेतो. माणसं साच्यातून बाहेर पडत नाहीत. उलट त्यांच्या वृत्तीची प्रवृत्ती होत जाते.

सत्तरी ओलांडलेल्या सुमित्राबाई या सासू, तर पन्नाशी गाठलेली, वैद्यकीय व्यवसाय करणारी सीमा- त्यांची सून. मुलगा रोहितसुद्धा डॉक्टर. त्याच्या निवडीनुसार सून डॉक्टर! खरं तर सुमित्राबाईंना फार शिकलेली सून नको होती; कारण ती आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल ही भीती. मात्र रोहितची लग्नाच्या वेळची ही अट पक्की होती. लग्न करणाऱ्यानंच एकदा ‘डॉक्टर मुलगी हवी’ – तीही ‘स्त्रीरोगतज्ज्ञ’, हा निकष ठरवला, की सौंदर्य, खानदान, पैसा इत्यादी निवडीच्या मर्यादा ठरून जातात.

रोहितचा डोळा अर्थात सीमाच्या डिग्रीवर जास्त होता. स्त्रीरोगतज्ज्ञ बायको मिळवून त्यानं आपल्या सहध्यायींमध्ये कॉलर ताठ केली. पोरगा खूश, म्हणून आई जेमतेम खूश. अशा वातावरणात सीमानं प्रवेश केला. पहिली गोष्ट तिच्या लक्षात आली होती, ती म्हणजे वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून तिला कौटुंबिक कामांमध्ये कुठलीही सवलत नव्हती. सासू जुन्या रूढींची. खाली दवाखाना, वर घर. सीमा एखादी अवघड प्रसूती करून थकून वर आली, तरी तिनं आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा, काय हवं-नको ते बघावं, ताजा कुकर लावावा, भाजी टाकावी, नातवाचं खाणंपिणं पाहावं, अशी सासूची इच्छा. व्यवसायाच्या सुरुवातीला महिन्यातून दोन-तीन वेळा प्रसूतीचे प्रसंग येत, त्या वेळी ठीक. मात्र पुढे रुग्ण वाढल्यावर प्रत्येक वेळी आंघोळ म्हणजे म्हशीसारखं पाण्यातच डुंबून राहण्याचं काम! अखेर सीमानं या गोष्टीला ठाम विरोध केला. रोहित मध्ये पडला, तेव्हा सासूबाई धुसफुसत तयार झाल्या. मात्र छोटया-छोटया मुद्दयांवरून खटके उडत राहिले. स्वयंपाकाला बाई आणली, की ती स्वच्छच नाही, कपबशा सीमानंच विसळून टाकाव्यात- नाही तर भांडी घासणारी त्या फोडते! फरशी पुसताना मोलकरणीला आपणच टोपणभर द्रावण काढून द्यावं, पेपरवाल्याचे खाडे कॅलेंडरवर नोंदवून ठेवावेत.. एक ना दोन! आपण कमावते आहोत, तेव्हा सासूनं एवढया बारक्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये, अशी सुनेची अपेक्षा. मात्र सारं आयुष्य काटकसरीनं संसार करण्यात गेलेल्या सुमित्राबाईंना पै-पैचा हिशेब ठेवण्याचा सोस आणि त्याचा अभिमान. ‘पैसे झाडाला लागतात का?’ इथपासून ‘प्रश्न पैशाचा नाही, नोकरमाणसं सोकावू नयेत,’ इथपर्यंत सारे संवाद सीमाला ऐकावे लागायचे.

नवऱ्याजवळ तक्रार करून काही फायदा नाही, हे सीमाच्या लगेच लक्षात आलं. ‘‘वडिलांच्या माघारी आईनं आम्हाला सांभाळलं, मोठं केलं. आता या वयात तिला दुखवावं अशी माझी इच्छा नाही. तू दुर्लक्ष कर. जमेल, पटेल तेवढं करायचं. बाकी हो-हो करायचं. हळूहळू तीच आग्रह सोडून देईल,’’ असं म्हणून रोहितनं प्रश्न निकालात काढला. त्याची बायकोला पूर्ण साथ होती, मात्र आईला थेट बोलणं त्याला योग्य वाटत नव्हतं. एक तर तो आईला पूर्ण ओळखून होता. गरिबीतून संसार वर आणण्यासाठी तिनं अपार कष्ट घेतलेत हे खरं. मात्र कर्मठ मतं, आपण जे करतो, समजतो तेच योग्य आणि नव्या पिढीला काय, कुणालाच आपल्यासारखा व्यवहार जमत नाही, ही ठाम समजूत, या त्रयीवर तिचं व्यक्तिमत्त्व उभं होतं. जिथे नवऱ्यालाच ती मोजत नव्हती, तिथे सुनेला काय सोडणार?

सासू-सुनेचा संघर्ष वाढत चालला. रोहितनं ‘दुर्लक्ष कर, हो ला हो कर,’ म्हणणं सोपं होतं. प्रत्यक्षात ते अमलात आणणं कठीण होतं. कधी कधी दवाखान्यात उद्भवलेल्या समस्यांनी सीमाचं मन अस्वस्थ झालेलं असे. घरी आल्यावर तिला पूर्ण मानसिक शांतता हवी असे. अशा वेळी सासूच्या बोलण्याचा स्वर, रोख, एखादा सुस्कारा, अगदी एखादा हेटाळणीवजा कटाक्षही तिच्या सहनशक्तीचा कडेलोट करणारा होऊन जाई. अशा वेळी रोहितचा सारा उपदेश नाल्यात जाई. तिची मन:स्थिती समजण्याची सासूची इच्छाही नव्हती आणि क्षमताही. मग वादविवादाचा भडका उडे.

अखेर रोहितनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ‘दवाखाना शहराच्या व्यावसायिक इलाख्यात हवा,’ असा मनसुबा जाहीर करून त्यानं प्रथम सीमाचा तपासणी कक्ष हलवला. मग तिथेच जवळ जागा घेऊन प्रशस्त घर बांधलं. सीमाचा व्यवसाय हळूहळू नव्या जागेत स्थिरावला. रोहितचा एक भाऊ बांधकाम व्यवसायानिमित्त वेगळा झालाच होता. आता एकाच गावात तीन घरं झाली. सासू आता आलटून पालटून दोन्ही मुलांच्या घरी जाऊन राहू लागली, नातवंडं सांभाळू लागली. सीमाच्या वाटयाला वर्षांचे दोन-तीन महिने आले. आधीपेक्षा हे वाईट नव्हतं, मात्र आता एकदा स्वतंत्र राहायची सवय लागली, की त्या स्वातंत्र्यावर थोडीशीही गदा नको वाटते. शिवाय वयानुसार सहन करण्याची शक्ती संपुष्टात आलेली असते.

वेगळं घर केल्यापासून सीमानं आपली दैनंदिनी बऱ्यापैकी मनासारखी करून घेतली होती. व्यवसायाची दहा-बारा वर्ष उलटल्यानं तिनं झेपतील तेवढेच रुग्ण पाहण्याची शिस्त लावून घेतली होती. स्वत:साठी वेळ जपला होता. सकाळी ट्रॅकसूट घालून ती मैत्रिणींबरोबर जॉगिंगला निघे. एक दिवसआड दोघंही जिमला जात. कधी मित्रांबरोबर चहा. स्वयंपाक आणि झाडझुडीला स्वतंत्र बायका, दवाखान्यात साफसफाईला वेगळी बाई, स्वागतिका, मदतनीस डॉक्टर, असा कर्मचारी वर्ग. सासूनं आल्या आल्या तिच्या ‘उधळेपणा’वर तोंडसुख घेतलं. ‘नुसत्या बिनकामाच्या बसल्या राहतात बाया! त्यांना फुकटचा पगार.’ सीमाला ऐकू जाईल अशा आवाजात ती भावजयीशी फोनवर बोले. मग कधी पार्टीला जायचं, तर ‘कुठे चाललात?’, ‘कधी येणार?’, ‘इतका उशीर का?’, ‘तुला फोन आला तो कुणाचा होता?’ अशा चौकशा चालायच्या. दवाखान्यात उगाच डोकावून जाणं, दवाखान्याच्या माणसांना परस्पर आपल्या कामाला जुंपणं, देवळात जाण्यासाठी मोटार, ड्रायव्हर असा जामानिमा वापरणं, अशा गोष्टी चालत. त्याबद्दल सीमाचा आक्षेप नव्हता, पण किमान तिच्या कानावर घालावं ही अपेक्षा काही चूक नव्हती. ते व्यवस्थित शब्दांत रोहितनं आईला सांगावं अशी तिची इच्छा. त्यावर रोहितचं उत्तर ठरलेलं- ‘‘सोडून दे. इतकी वर्ष ती बदलली नाही. आता काय बदलेल? आणि सांगणार कोण तिला? आता वर्षांतून दोन-तीन महिन्यांचा प्रश्न आहे.’’

दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या नवऱ्याला ‘दुर्लक्ष कर’ सांगणं सोपं, पण येता-जाता रस्ता अडवून बसलेल्या सासूकडे लक्ष जाऊ न देणं सीमाला अशक्य होतं. अशा वेळी पूर्वग्रह निर्माण झालेल्या माणसाचं मन अधिकच संवेदनशील होऊन जातं. छोटीशी गोष्टही मनाला क्लेश देऊन जाते. एके दिवशी अशीच एक छोटी घटना घडली. पण रोहितनं जे आयुष्यभर टाळलं, ते करण्याची वेळ येऊन ठेपलीय हे सीमानं ओळखलं.

गॅसवर दूध ठेवून सीमा बैठकीत आली, तेव्हा टीव्हीवर विम्बल्डनची अंतिम फेरीची मॅच सुरू होती. टेनिस तिचा आवडता खेळ. समोर फेडरर आणि नदाल. सीमाची तंद्री लागली. सासू डोळयांच्या कोपऱ्यातून पाहात होती. सकाळची कामं सोडून टीव्ही पाहात बसलेली सून तिला अर्थातच खटकत होती. तेवढयात स्वयंपाकघरातून फर्र-फर्र आवाज आला. सारं दूध उतू गेलं. सीमा धावली, तोवर गॅस विझला होता, सासू मात्र पेटली! ‘‘कुठे लक्ष असतं तुझं? सकाळची घाईची वेळ काय टीव्ही पाहायची वेळ आहे का? एवढं लिटरभर दूध वाया गेलं!’’

सीमाने ओटयाकडे पाहिलं. सांडलेलं दूध व्यवस्थित एका स्टीलच्या भांडयात गोळा केलं. मांजरीच्या ठरलेल्या कोपऱ्यात नेऊन ठेवलं. ओटा आणि गॅस स्वच्छ केला. फोनवर नोकराला लिटरभर ताजं दूध आणायला सांगितलं. सासू धुमसतच होती, तिच्या पुढयात येऊन बसली. ‘‘हे बघा सासूबाई, तुमचं वय अठ्ठयाहत्तर, माझं वय सत्तावन्न. माझी पाळी जाऊन आठ वर्ष झाली. मला सून आली आहे, जावई आहे आणि नातवंडही आहे. हे घर जेवढं तुमच्या मुलाचं आहे, तेवढं माझंही आहे. तुम्हाला लक्षात येत नसली, तरी माझी कमाई तुमच्या मुलाइतकीच आहे. अनेक स्त्रियांना मी अवघड बाळंतपणातून सोडवलंय. अनेकांच्या व्याधी बऱ्या केल्यात. माझं क्षेत्र अतिशय तणावयुक्त आहे. त्यात धडधाकट रुग्णाला अचानक काय गुंतागुंत होऊ शकेल याचं निदान करणं कठीण. अशा स्थितीत माझ्याही मनाला विरंगुळा हवा. मी जे कमावते, त्यात अशा किरकोळ चुका आणि नुकसान अतिशय क्षम्य, नगण्य आहे हे समजून घ्या. पैसा वाया जायला नको, याची तुमच्यापेक्षा जी घामाचा कमावते तिला अधिक जाणीव असते हे लक्षात घ्या. सासूच्या भूमिकेतून बाहेर या. मला स्त्री म्हणून पाहा. मुलगी असती तर पाहिलंच असतं ना? तुमच्या पिढीनं जाच सोसला, म्हणून पुढच्या पिढीला त्याची चुणूक मिळालीच पाहिजे, हा विचार सोडा. माझा व्यवसाय मी बराचसा माझ्या सहाय्यकाकडे सोपवलाय, तसा हा संसारही माझा मला करू द्या,’’ सीमा थांबली.

रूढी वाईट का ठरतात? कारण त्या कालसुसंगत राहात नाहीत. पिढया वाईट का ठरतात? कारण त्या कालसुसंगत वागत नाहीत. मात्र माणूस म्हणून कालातीत असे काही मुद्दे आहेत. जग कितीही बदललं, तरी स्त्रीचं शरीर त्याच स्थित्यंतरातून जात असतं, हे जीवशास्त्रीय सत्य. मग केवळ पिढया बदलल्या म्हणून दोन स्त्रिया एकमेकींना समजून का घेत नाहीत? की स्त्री असणं हेच स्पर्धेचं, शत्रुत्वाचं कारण? त्यापुढेही वयाचा एक टप्पा यावा ना, जेव्हा सारी सांसारिक वादळं शमून स्त्री-पुरुष हे द्वैतही संपावं.. फक्त माणुसकीचं नातं उरावं?

अशा विचारसरणीला जी मनोभूमी असावी लागते, ती सीमाच्या सासूच्या ठायी नव्हती हे उघडच होतं. मात्र ती काही बोलली नाही. उतू गेलेल्या दुधाबरोबर आपली सद्दी उतू गेलीय, याची तिला जाणीव झाली असावी. तिच्या स्त्रीत्वाला जाग आली असावी आणि वयानं यावं अशा शहाणपणालाही!

nmmulmule@gmail.com