गायत्री लेले
स्थूल असणं हे स्त्रीच्या- विशेषत: तरुण स्त्रियांच्या बाबतीतला नेहमीच वादग्रस्त ठरलेला विषय. स्त्री शरीरानं बांधेसूद असायला हवी, हे गृहीतक जसं पुरुषप्रधान मानसिकतेतून येतं, तसं भांडवलशाही पुरुषसत्ताक व्यवस्थांनाही स्त्री एकाच विशिष्ट पद्धतीनं ‘कमनीय’ दिसायला हवी असते. त्यांच्या मते त्यामुळे अनेक उत्पादनांची विक्री होते. या सगळय़ांतून पुढे ‘फॅट शेमिंग’, ‘बॉडी शेमिंग’ आणि आता तर ‘फॅट फोबिया’ आदी संकल्पना चर्चिल्या जाऊ लागल्या. जर स्त्रीच्या स्थूलतेवरून तिच्या पात्रतेविषयीच प्रश्न निर्माण होत असतील, तर मात्र हा विषय ‘स्त्रीवादी’च म्हणायला हवा.
भारतासहित आज जगात सगळीकडे ‘डाएट’ हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची चर्चा वेगवेगळय़ा स्तरांवर आणि वेगवेगळय़ा पद्धतींनी होताना दिसते. ‘डाएट का करायचं?’ या प्रश्नाला एक उत्तर नाही. उत्तम आरोग्य राखणं हा त्यामागचा मूळ उद्देश असू शकतो, परंतु त्याचबरोबर ‘बारीक व्हायचंय’ हेही एक महत्त्वाचं ध्येय असतं.
बारीक असणं म्हणजे आरोग्यपूर्ण असणं, असं नेहमीच म्हणता येणार नाही. परंतु ‘जाड असणं म्हणजे आरोग्याची हेळसांड’ हा समज मात्र मनात पक्का झालेला असतो. मग आपण कसं ‘दिसायला’ हवं, याबाबतची एक आदर्श प्रतिमा आपल्या मनात नकळत तयार होते. शरीरातले दोष अधोरेखित होतात. अतिरिक्त फॅट (चरबी) खुपायला लागते. हे चांगलं की वाईट, याची स्वतंत्र चर्चा होऊ शकते. परंतु आपण सगळे नकळत या डाएट तंत्रांमध्ये कमीअधिक प्रमाणात अडकत जातो, हे खरं. यात अर्थातच स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांच्या शरीरविषयक प्रतिमांबाबतचे (बॉडी इमेज) मुद्दे अधिक ऐरणीवर येतात. या सगळय़ाबाबत पाश्चात्त्य देशांत कशा प्रकारचं चर्चाविश्व आकारास येत आहे, याचा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न.
स्त्रियांच्या सौंदर्याची खरंतर कुठलीही ठोस म्हणता येतील अशी परिमाणं नाहीत. ‘बारीक म्हणजे सुंदर’ अशी व्याख्या त्यामुळेच अपूर्ण आणि स्त्रियांना अतिरिक्त ताण देणारी आहे. अनेकजणींनी या गृहीतकाला सातत्यानं आव्हान दिलेलं आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आजच्या काळात ‘खास स्त्रियांसाठीच्या’ अशा विविध गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उदाहरणार्थ, वॅक्सिंग, थ्रेडिंग, मेकअप, अंतर्वस्त्रं आदी गोष्टींच्या प्रासंगिकतेवर चर्चा होताना दिसते. तशाच पद्धतीची चर्चा डाएटवर आणि डाएटभोवती तयार झालेल्या बाजारपेठेवरसुद्धा होत असते. १९६० आणि १९७० च्या सुमारास डाएट आणि सौंदर्यप्रसाधनांची बाजारपेठ वाढू लागली, तसे त्याला आव्हान देणारे आवाजही बुलंद झाले. आजच्या काळात ‘फॅट शेमिंग’, ‘बॉडी शेमिंग’, ‘फॅट फोबिया’ आदी संकल्पनांवर अधिकाधिक बोललं जात आहे. त्याची सुरुवात मात्र तेव्हापासूनच झालेली दिसते.
यासंदर्भात १९७८ मध्ये प्रकाशित झालेलं सुझी ओर्बाक या ब्रिटिश स्त्रीवादी लेखिकेचं ‘फॅट इज अ फेमिनिस्ट इश्यू’ हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. यात त्यांनी काही कळीचे मुद्दे उपस्थित केले. मुळात स्त्रिया लठ्ठ का असतात? या लठ्ठपणाची काही कारणं आहेत का? ‘परिपूर्ण’ स्त्री होण्यासाठी झगडताना त्यांना काय अडचणी येतात? काही वेळेस या ‘आदर्श’ प्रतिमेला आव्हान द्यायचं, म्हणून स्त्रिया बारीक होणं नाकारत असतील का? इत्यादी. ओर्बाक यांचं हे पुस्तक वादग्रस्त ठरलं, कारण त्यांनी डाएटची बाजारपेठ स्त्रियांच्या शरीरावर कशा प्रकारे राज्य करू शकते हे सोदाहरण सांगितलं. जेव्हा जेव्हा स्त्रियांच्या जाड-बारीक असण्यावर उलटसुलट चर्चा घडतात, तेव्हा या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला जातो.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ओर्बाक म्हणतात, की आजही जगात सगळीकडे स्त्रियांनी कसं राहावं, काय कपडे घालावेत, पुरुषांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यांच्या शरीराचा आकार कसा असावा, याबाबत असंख्य सल्ले दिले जातात. समाजमाध्यमांवरही केवळ डाएटबाबतच नव्हे, तर तुमचा देह कसा ‘आदर्श’ दिसू शकतो, याबाबतच्या क्लृप्त्या फिरवल्या जातात. शेवटी भांडवलशाही पुरुषसत्ताक व्यवस्थांना स्त्री एकाच विशिष्ट पद्धतीनं ‘कमनीय’ दिसायला हवी असते. त्यामुळे डाएटच्या उत्पादनांची विक्री होते. या सगळय़ात स्त्रिया त्यांच्या शरीराकडे कसं पाहतात किंवा कसं पाहू इच्छितात, हा प्रश्न कोणीच विचारत नाही. त्यामुळे सुझी ओर्बाक आजही ‘फॅट’ला स्त्रीवादी मुद्दाच मानतात. नव्हे, तर तो आजच्या जगात आणखीनच जटिल झाल्याचा आवर्जून उल्लेख करतात.
सद्य:स्थितीत ‘फॅट फोबिया’ हा शब्द पाश्चात्त्य जगात रूढ होतो आहे. फोबिया म्हणजे भीती, त्यामुळे फॅट फोबिया म्हणजे ‘लठ्ठपणाची भीती’ असा अर्थ होतो. समाजात एकूणच स्थूल व्यक्ती ही आरोग्याकडे दुर्लक्ष करणारी, बेपर्वा आणि आळशी असेल असं गृहीत धरलं जातं, आणि त्यामुळे ती व्यक्ती जीवनातील वेगवेगळय़ा आनंदांपासून वंचित राहते. मग ते सामाजिक- सांस्कृतिक आयुष्य असेल, डेटिंग- लग्न- कुटुंबाचा परीघ असेल अथवा रोजगार क्षेत्र असेल, एकूणच स्थूल शरीरांना कुठेही प्राधान्य न दिलं गेल्याने, शरीरावरच्या अधिकच्या चरबीचा ‘फोबिया’ हा त्या व्यक्तीच्याच नव्हे, तर सगळय़ांच्याच मनात घर करतो. थोडक्यात, लठ्ठपणामुळे वगळलं जायची भीती म्हणजेच ‘फॅट फोबिया’.
या विषयावरच्या आणखी काही अकादमिक कामांची नोंद घ्यायला हवी. २०१९ मध्ये सबरीना स्ट्रिंग्ज या कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकवणाऱ्या समाजशास्त्राच्या प्राध्यापिकेचं ‘फिअिरग द ब्लॅक बॉडी’ हे पुस्तक बरंच गाजलं. यात त्यांनी ‘फॅट फोबिया’चा विचार करताना कृष्णवर्णीय स्त्रियांच्या स्थूलपणाच्या इतिहासाचं विवेचन केलं आहे. त्यांच्या मते अमेरिकेत स्थूल असणं हे अजूनही कृष्णवर्णीयांशी अधिक जोडलं जातं. हे फक्त शरीराच्या जाडीपुरतं मर्यादित राहत नाही, तर त्यावरून एकूणच व्यक्तीची अर्हता ठरवली जाते. कृष्णवर्णीय स्थूल व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप नाही. विशेषत: ती स्त्री असेल, तर तिला बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागतात. स्ट्रिंग्ज म्हणतात, की अमेरिकी तरुणींमध्ये जे बारीक होण्याचं वेड आहे, त्याला कृष्णवर्णीयांबद्दल त्यांच्या मनात पूर्वापारपासून रुजलेला भेदभाव कारणीभूत आहे. ‘जे काळं, ते वाईट’ अथवा ‘कमी दर्जाचं’ असं सरधोपट समीकरण अनेक लोकांच्या मनात घट्ट बसलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या मते हा केवळ ‘फॅट फोबिया’ नव्हे, तर त्याला वंशवादाची किनार आहे. त्यांना लोक प्रश्न विचारतात, की श्वेतवर्णीय व्यक्तीही फॅट फोबियाचा बळी असू शकतात की! त्यावर स्ट्रिंग्ज उत्तरतात, की त्यालाही वंशवादाची किनार आहेच. कारण श्वेतवर्णीय स्त्रियांना कृष्णवर्णीय स्त्रियांसारखं ‘जाड’ व्हायचं नसतं. त्यांचं वर्णवर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी बारीक असणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. स्ट्रिंग्ज म्हणतात, की हा वंशवाद आहे, हे कदाचित लोकांच्या लक्षातही येणार नाही, इतका तो खोलवर रुजलेला आहे. त्यामुळे स्थूल असणाऱ्या ‘ब्लॅक’ शरीरांना समाज कसा पाहतो, हा आजच्या काळातही यक्षप्रश्न आहे.
याच वर्षी केट मेन या ऑस्ट्रेलियातील तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिकेचं ‘अनिश्रकिंग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्यात त्यांनी एका प्रयोगाचा उल्लेख केला आहे. समान शिक्षण आणि पात्रता असणाऱ्या वेगवगेळय़ा आकारांच्या व्यक्तींचा रोजगार क्षेत्रात काय प्राधान्यक्रम आहे, हे पाहिलं गेलं. प्रयोगाअंती असं लक्षात आलं, की बारीक पुरुषाला सगळय़ात जास्त रोजगारक्षम मानलं गेलं, तर स्थूल स्त्रीला मात्र शेवटचं स्थान दिलं गेलं. याचा परिणाम स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर तर होतोच, शिवाय त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावरही अनिष्ट परिणाम झालेला दिसून येतो. असे प्रसंग घडत राहिले, तर ज्या स्त्रियांना सुरुवातीपासूनच स्वत:च्या शरीराबाबत न्यूनगंड असतो, त्यात अधिकाधिक भर पडत जाते. केट मेन सवाल करतात, की स्त्रियांना विशिष्ट प्रकारचं शरीर लाभल्याची लाज का वाटावी? त्यांना आयुष्यातले लहान लहान आनंद मिळवण्याची मुभा का नसावी? एक ‘नॉर्मल’ आणि ‘हेल्दी’ जीवन जगण्यासाठी त्यांना सतत झटावं का लागावं?
स्ट्रिंग्स आणि मेन या दोघींवर आणि ‘फॅट फोबिया’बाबत बोलणाऱ्या सगळय़ांवर बऱ्यापैकी टीका केली जाते. त्यातला महत्त्वाचा आरोप म्हणजे, ही मंडळी लठ्ठपणाचं (ओबेसिटी) समर्थन करतात. त्यावर मेन म्हणतात, की हा लठ्ठपणाला समर्थन द्यायचा प्रश्न नाही. स्थूल असण्यावरून व्यक्तीच्या एकूणच पात्रतेविषयक जे प्रश्न निर्माण होतात, त्याबद्दल बोलण्याची अधिक गरज आहे. शिवाय लठ्ठपणा आणि शारीरिक व्याधी यांच्यातील परस्परसंबंधाबाबत वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये एकमत नाही, याकडेही त्या लक्ष वेधतात. अशा स्त्रियांना आपल्या व्यवस्था सामावून घेतात का? त्यांना आवश्यक असणाऱ्या आरोग्यसुविधा उपलब्ध आहेत का? आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात का?
हे प्रश्न विचारायला हवेत. एखाद्या शरीराकडे बघून आपल्या मनात किळस किंवा पूर्वग्रह निर्माण होत असेल, तर त्याची कारणं काय आहेत याचा खोलात जाऊन विचार व्हायला हवा. ‘डाएट’ आणि ‘वेलनेस’ या संकल्पना शोषणाचं माध्यम होऊ नयेत. एकूणच आपण जर बारीक व्हायचा प्रयत्न करत असू, तर ते खरोखर कशासाठी आणि कोणासाठी करत आहोत, याचा विचार जरूर व्हावा असं या सगळय़ांचं म्हणणं आहे.
या ‘फॅट फोबिया’चा सामना अनेक क्षेत्रांमधील स्त्रियांना सातत्यानं करावा लागतो. २०२१ मध्ये इंग्लंडमधील एका विद्यापीठात स्त्री-खेळाडूंच्या शरीरविषयक धारणांचा अभ्यास केला गेला. त्यात असं दिसून आलं, की बऱ्याच अॅथलीट्सना स्वत:च्या शरीराच्या आकाराबाबत पूर्णत: आत्मविश्वास नाही. जवळजवळ ३६ टक्के खेळाडूंमध्ये त्यापायी खाण्याच्या सवयींच्या समस्या (ईटिंग डिसॉर्डर्स) निर्माण झाल्या आहेत, असं दिसून आलं. सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री किंवा जाहिरातींमधल्या मॉडेल्स या स्वत:च्या अंगावर इंचभरही चरबी येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेताना दिसतात. त्यांच्या व्यवसायासाठी हे आवश्यक मानलं जातं. आपण आज अशा जगात राहतो, की हीच मंडळी ‘बॉडी पॉझिटिव्हिटी’ (शरीराबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन) बद्दलही बोलतात. परंतु या सगळय़ामागच्या पुरुषप्रधान चौकटीबद्दल खोलात जाऊन चर्चा अभावानंच केली जाते. स्त्रियांच्या शरीराबाबतचे निर्णय नेहमी पुरुषी-भांडवलशाही दृष्टिकोनातूनच घेतले जाणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच अंशी अनुत्तरितच राहतं.
अमेरिकेत वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच अनेक मुलींनी डाएट सुरू केलं असल्याची उदाहरणं दिसतात. भारतात हे सगळं इतक्या पराकोटीला पोहोचलेलं अजून तरी दिसत नसलं, तरीही इथली झपाटय़ानं वाढणारी ‘डाएटकेंद्री’ बाजारपेठ पाहता तो टप्पा गाठायला आपल्यालाही वेळ लागणार नाही.
लठ्ठपणा आरोग्याचा शत्रू आहे हे एकवेळ मान्य जरी केलं, तरीही अशा व्यक्तींच्या मनावर कळत नकळत आघात होईल असं वर्तन केलं जात नाहीये ना? त्यांना वगळलं जात नाहीये ना? याची दक्षता प्रत्येकानं घ्यायला हवी. स्वत:च्या आणि इतरांच्याही शरीराकडे सहानुभूतीनं पाहणं शिकायला हवं.
gayatrilele0501 @gmail. com