अलीकडेच राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, असं सांगितलं आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ‘चतुरंग’ने १६ डिसेंबरच्या अंकामध्ये ‘शाळेची वेळ सकाळची की दुपारची?’ हा मेघना जोशी यांचा लेख प्रसिद्ध केला होता. त्यातील आवाहनानुसार खूपच मोठया प्रमाणावर वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. यात बहुतांशी पत्रं मुलांच्या सकाळच्या शाळांच्या समर्थनार्थ आहेत. मात्र काहींनी आवर्जून वेळेपेक्षा शिस्त आणि नियम यांना महत्त्व देण्यावर भर दिला आहे. यातील एक वेगळा विभाग आदिवासी भागातील आश्रमशाळाच्या वेळेसंबंधीचा आहे. ही मुलं खूप दूरवरून, अक्षरश: डोंगरदऱ्यांतून, बहुतांशी उपाशीपोटीच चालत येतात. या मुलांचा प्रश्न जास्त बिकट वाटला. शासन मुलांच्या शाळेची वेळ ठरवताना त्यांच्या शरीर-मनाचं आरोग्य लक्षात घेऊन सर्वंकष निर्णय घेईल ही अपेक्षा.

आम्ही साधली सकाळची वेळ !

आम्ही आमच्या सहा वर्षांच्या मुलीला पहाटे उठवून शाळेसाठी तयार करतो. शाळा घरापासून तीन किलोमीटरच्या परिघात आणि वेळ सकाळी ७.४५ ची. मुलगी पहिल्या हाकेला उठते आणि तिला शाळा आवडतेही. दुपारी साडेअकरापर्यंत ती घरी येते. नंतर तिला अभ्यासाबरोबर इतर गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ असतो. रात्री दहाला तिचा दिवस संपतो. हे चित्र सगळया लोकांच्या घरी नसेल. याचं कारण आमच्या तिघांची योग्य दिनचर्या, रात्रीची शांत आणि पूर्ण झोप. आम्ही पालक होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर तयारी केली. पालकत्वाची जबाबदारी आम्हा दोघांना नोकऱ्या सांभाळून उचलायची आहे, हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होतं. मुलगी ६ महिन्यांची होती तेव्हापासून आम्ही तिला पाळणाघरात ठेवायचो आणि तिथे तिच्या खेळण्याच्या, खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा निश्चित होत्या. आमचाही दिवस पहाटे लवकर सुरू होऊन रात्री अकरापर्यंत संपायचा. आमच्या घरी टीव्ही नाही. हा स्वखुशीनं घेतलेला निर्णय आम्हाला मुलीसाठी वेळ देताना उपयुक्त ठरला. आम्ही काम करत असताना ती खेळण्यांमध्ये रमायची, क्रेयॉन्सनं भिंतींवर चित्रं काढायची. मनोरंजनाची अॅाप्स तिच्यासमोर आम्ही वापरली नाहीत. त्यामुळे मोबाइल फोनचं तिला तेवढं कुतूहल राहिलं नाही. घरी आम्ही किती तरी नवीन खेळ शोधून काढतो आणि एकत्र खेळतो. यथावकाश तिला टॅब्लेट दिला, पण त्यावर काय आणि किती वेळ पाहायचं याची काळजी आम्ही घेतो. सकाळची वेळ ज्ञानग्रहणासाठी सर्वोत्तम आहे. आई-वडील म्हणून आपण वेळेचं योग्य नियोजन आणि स्वयंशिस्त लावून घेणं महत्त्वाचं आहे. – नीलिमा साळवी

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? संजय शिरसाट यांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?

 लवकर झोपण्याची सवय लावावी

लहान मुलांना शिस्त आणि वळण लावण्याचा काळ बालपण हाच असतो. त्यामुळे मुलांनी लवकर झोपण्याच्या दृष्टीनं काही उपाययोजना पालकांनी करायला हव्यात. ज्या कुटुंबात पालक जागरूक आहेत, तिथे ते मुलांनी योग्य वेळेस झोपण्यासाठी प्रयत्नशील असतात. मुलांची पुरेशी झोप व्हावी या दृष्टीनं असं नियोजन व्हावं आणि पालकांचं उद्बोधनसुद्धा व्हावं. उशिरा झोपण्याची मुभा दिली, तर व्यक्तिमत्त्व तावूनसुलाखून कसं घडेल? मुलं कोणताच व्यायाम, शारीरिक कष्ट करणार नसतील, तर त्यांना चांगली झोप लागणारच नाही. त्यांना घरात समूह संपर्क साधनं खुणावत असताना झोप कशी लागणार?

‘होम स्कूलिंग’ची चळवळ, स्वयंअध्ययन रुजलं, तर या प्रश्नाची तीव्रता कमी होईल. शाळेची वेळ बदलून नव्हे, तर शाळेमध्ये दिला जाणारा विषय विद्यार्थ्यांला इतका सशक्त आणि महत्त्वपूर्ण वाटला पाहिजे, की त्याला तिथे झोप येणार नाही. अभ्यासक्रम जसा कमी केला, तसं शाळेची वेळही कमी करता येईल का हे पाहावं. गृहपाठ व दप्तराच्या ओझ्याबाबत समित्या नेमूनसुद्धा ते कमी झालेलं नाही. विद्यार्थ्यांचं तणावग्रस्त असणंसुद्धा झोप न लागण्याचं कारण आहे. विद्यार्थ्यांच्या झोपेचं नियोजन पालकांनीच करायला हवं.    – डॉ. अनिल कुलकर्णी

शाळा १० ते ४ असावी

मी ७ वर्षांच्या जुळयांचा आजोबा आहे. शाळेत पोहोचण्याची मुलांची वेळ सकाळी ७.४५ वाजता. त्यामुळे बहुधा ती अर्धपोटीच शाळेत जातात. दुपारी २.२० ला शाळा सुटते तेव्हा मुलं अक्षरश: पेंगुळलेली असतात. बहुतेक मुलांची हीच व्यथा. नंतर शिकवणी, घरचा अभ्यास, थोडा वेळ खेळ. आई गृहिणी, तर वडील रात्री ९.३० वाजता घरी येतात. मुलांना वडिलांचा लळा असल्यानं ती ११-११.३०  शिवाय झोपतच नाहीत. शाळा किमान १० ते ४ असावी असं वाटतं, म्हणजे मुलांना झोप व्यवस्थित मिळेल, अल्पोपाहार,  इतर ‘अॅ क्टिव्हिटीज्’ना वेळ मिळेल. सकाळी  ७.३० ला शाळा नकोच.- प्रदीप नाबर

जीवनशैलीत बदल इष्ट

राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, हा विचार मांडला. त्यांच्या मते शाळेची वेळ उशिरा ठेवावी, कारण मुलांची झोप होणं आवश्यक आहे. हे वाचून ‘लवकर नीजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य, धनसंपदा लाभे’ ही जुनी उक्ती आठवली. सकाळी लवकर उठण्याचे अनेकविध फायदे ज्ञात आहेत. मग मुलांची शाळा उशिरा भरवण्याचं कारणच काय? व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ज्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत, पटसंख्या जास्त आहे, अशा शाळा सकाळी ७ ते १२ व दुपारी १२.१५ ते ५.३० या वेळातच भरवणं योग्य आहे. जर शाळा उशिरा भरवण्याचा विचार केला, तर ज्या शाळा दोन सत्रांत भरतात त्या शाळांनी नियोजन कसं करावं? कारण प्रत्येक वर्गाच्या अध्यापनाच्या तासिका, अध्यापनाचे दिवस ठरल्याप्रमाणे होणं गरजेचं असतं. शाळेची वेळ बदलल्यानं तशा तासिका होतील का? अशा सर्व गोष्टींचा सारासार विचार करता मुलांना योग्य वेळी योग्य त्या सवयी लागण्यासाठी आपणच आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं आवश्यक आहे, असं वाटतं.-   रजनी दाते, शीतल देशमुख आणि अनिता दारवटकर

बाऊ नको; शिस्त हवी 

शाळेची वेळ दुपारची असली तर मुलं लवकर उठणार नाहीत आणि त्यांच्यात आळशीपणा भरेल. माझी मुलं सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत जात होती. रात्री मुलांना १० वाजता झोपायची सवय लावली होती, त्यामुळे ती लवकर उठायची. मुलं दूध पिऊन आणि सुकामेवा खाऊन शाळेत जात. १० वाजता भाजी-पोळीचा डबा खात. दुपारी घरी आल्यावर पूर्ण जेवणासह मी त्यांना रोज शेंगदाणा लाडू देत असे. अभ्यास करून, थोडीशी झोप काढून दुपारी मुलं शिकवणीला जात. मुलांची सकाळी शाळा असल्यास झोप होत नाही, असा आपण फक्त बाऊ करतो. परंतु मुलांना शिस्त लागली की सगळंव्यवस्थित होतं. – सीमा लोहगांवकर 

शाळेची वेळ – माझी आणि नातवांची!

माझ्या शाळेची वेळ (१९६७ ते १९७४) या ७ वर्षांत सकाळी ११ ते ५.३० आणि शनिवारी ७.३० ते ११.३० होती. माझ्या मते, आजही तीच वेळ  उत्तम आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला पहाटे ५ वाजता उठायची सवय लावली होती, ती आजही कायम आहे. लवकर उठल्यानं सकाळचे सर्व विधी, व्यायामही व्यवस्थित व्हायचा. सकाळी ७ वाजता आम्ही अभ्यासाला बसायचो आणि १० वाजता जेवण करून पायी शाळेत वेळेवर पोहोचायचो. शाळेच्या वेळापत्रकात एक दहा मिनिटांची आणि दुसरी तीस मिनिटांची (डबा खायला) सुटी असायची. संध्याकाळी ६ वाजता घरी येऊन तासभर खेळणं होत असे आणि संध्याकाळी ७ ते ९ पुन्हा अभ्यासाला वेळ मिळायचा. १० वाजता आम्ही झोपायचो. 

आज माझ्या नातवांची शाळेची वेळ आहे सकाळी ८ ते दुपारी २.१०. म्हणजे सकाळी दिलेला गरम डबा हा नातू दुपारी थंडगार झाल्यावर खातो. घरी येईतो दुपारचे ३ वाजतात. साडेतीन वाजता जेवण, मग ५ वाजेपर्यंत टीव्ही पाहणं आणि नंतर ‘होमवर्क’. (हल्ली होमवर्कही खूपच असतो.) नंतर पुन्हा टीव्ही, मोबाइल आणि रात्रीचं जेवण- जे बहुधा ‘फास्ट फूड’सारखं असतं. म्हणजे मैदानी खेळ, वर्तमानपत्र वाचन, कुटुंबाशी संवाद वगैरेंसाठी या मुलांकडे वेळच राहात नाही. लहानपणापासून त्यांना शिकवण्या लावलेल्या असतात. कित्येक लहान मुलं शाळेतून घरी येताना व्हॅनमध्येच झोपून गेलेली असतात.  मुलांचं वेळेचं व्यवस्थापन शाळेने करणं अपेक्षित आहे आणि तेच नीट होत नाहीये. – संजय जाधव

 मुलांच्या आरोग्याचा विचार करावा

 लहान मुलांना झोपेसाठी अधिक काळ हवा असतो. त्या दृष्टीनं शिशुवर्ग, बालवर्ग आणि प्राथमिक विभागाचे वर्ग सकाळच्या पहिल्या सत्रात न भरवता मधल्या सत्रात- सकाळी १० ते १ च्या कालावधीत भरवणं आवश्यक आहे. बालवर्गातल्या मुलांना साधारण आठ तासांच्या झोपेची गरज असते आणि शाळा सकाळी ७ वा ८ ची असेल, तर काही मुलं वर्गातच झोपतात. पहिली ते चौथीची काही मुलंसुद्धा सकाळच्या सत्रात झोप पूर्ण न झाल्यानं बाकावर डोकं टेकून झोपतात. त्यांचेही वर्ग मधल्या सत्रात किंवा दुपारच्या सत्रात भरवावेत. ही मुलं सकाळच्या सत्रात शाळेत आली तर घरी येऊन दुपारी झोपतात आणि नंतर त्यामुळे रात्री लवकर झोप न येऊन पालकांबरोबर टीव्ही पाहणं, मोबाईल खेळणं यात त्यांचा वेळ वाया जातो. दुसऱ्या दिवशी झोप पूर्ण होत नाही हे वेगळंच. यात मुलांना अपचन, गॅस, शौचाच्या समस्या निर्माण होतात. शिकवण्याकडे लक्ष लागत नाही. पाचवी ते दहावी या इयत्तांतील मुलांची झोप कमी असते. त्यांच्या शाळेची वेळ सकाळी लवकर असेल तर ही मुलं लवकर उठतील, रात्रीसुद्धा लवकर झोपतील आणि पूर्ण झोप झाल्यानं आपल्यातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर करतील.  मुलांच्या शाळेचा विचार हा मुलांच्या आरोग्याला पोषक अशाच पद्धतीनं झाला पाहिजे.- उल्हास विशे

राज्यभर एकच वेळ नको

माझ्या लहानपणी मी सकाळ आणि दुपार अशा दोन्ही प्रकारच्या शाळेत शिकलो. आजचं समाजजीवन लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात शाळेची एकच वेळ निश्चित करणं योग्य होणार नाही. मुंबईसारख्या ‘मेट्रोपोलिटन’ शहरात मुलांच्या शाळा सकाळी भरवल्या गेल्या पाहिजेत. अशा ठिकाणी घराजवळ चांगली शाळा नाही मिळाली तर मुलांना लांबच्या शाळेत घालणं भाग पडतं आणि सर्व पालकांना स्कूलबसचा खर्च परवडत नसल्यानं सकाळी ७.३०-८ पासून वाहतुकीची गर्दी असते. त्यामुळे सकाळी १०.३० वा ११ च्या शाळेत वेळेवर जाणं थकवणारं असलं, तरी मुलं दुपारी तुलनेनं कमी गर्दीच्या वेळी घरी येऊ शकतील. त्याअनुषंगानं शिकवण्या, खेळ या गोष्टी निश्चित करता येतील.

 ग्रामीण भागात दळणवळणाची साधनं म्हणावी तितकी नाहीत. शाळाही लांब असतात.  तिथे दुपारच्या शाळेचा पर्याय विचारात घेणं योग्य राहील. यासाठी सरकारनं प्रत्येक जिल्हाधिकारी वा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या जिल्ह्यातले शिक्षण अधिकारी, शाळांचे प्रतिनिधी, पालकांचे प्रतिनिधी यांच्याशी बैठक घेऊन, प्रत्येक भागातली भौगोलिक, दळणवळणाची परिस्थिती जाणून घेऊन शाळांसाठी योग्य वेळ निश्चित करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. यात सरकारनं शक्यतो हस्तक्षेप करू नये.- अशोक साळवे

झोपेचा विचार व्हायलाच हवा

आमच्या इमारतीत राहणारा पहिलीतला मुलगा सकाळी ७.३० ला शाळेत जायचा, तेव्हा रोज त्याची आई झोपेत असलेल्या त्या लहानग्याला जिन्यावरून अक्षरश: ओढत नेताना दिसायची. बिचाऱ्याला एक पायरीही धड उतरता यायची नाही. ते पाहूनच त्याची दया यायची!  सकाळी ७.३० ते १२ आणि दुपारी १२.३० ते ५ या वेळांची पूर्वीच्या बऱ्याच व्यक्तींना सवय झाली होती. त्या वेळीही काही शाळांची वेळ ११ ते ५ असायची, पण अशा शाळा कमी होत्या. आतासारखे प्रश्न पूर्वी उभे राहात नव्हते कारण तो काळ वेगळा होता. आई-वडील दोघं जरी नोकरी-व्यवसाय करत असले, तरी त्याला बऱ्याच अंशी वेळेचं बंधन होतं, घरात अनेक वर्ष ‘दूरदर्शन’ही नव्हतं. बहुतेक घरांत रात्री साधारण १० च्या सुमारास दिवे बंद व्हायचे. त्यामुळे चांगली ८ तास झोप होऊन आपोआप सकाळी ६ वाजता मुलांना जाग येत असे. संध्याकाळी खेळही व्हायचे. आता वेळेचं चक्र फिरलं आहे. माणसापुढची प्रलोभनं आणि ताणतणाव वाढलेत. शाळा आणि घर यांतलं अंतर, शिक्षणाचा व्याप आता अधिक आहे.  मूल लहान असताना त्यांच्या झोपेचा विचार व्हायलाच हवा. माझ्या मुलीच्या शाळेत ज्युनियर के.जी. ते चौथी वर्गापर्यंतची वेळ होती दुपारी १.३० ते ५ आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सकाळी ७.३० ते १ असत. शनिवार-रविवार सुट्टी. आजच्या परिस्थितीत अशा प्रकारे वेळेचा विचार करता येईल.-  मेधा देव तुळपुळे

नोकरदारांसाठी दुपारची वेळ सोईची

लहानपणी गावी असताना आमच्या शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते पाच होती. जेवूनच आम्ही शाळेला जायचो. शाळा लांब असल्यानं लवकर उठावं लागायचं. पण शाळेत शिवणापाणी, लगोर, झिबल्या, सूरपारंब्या असे खेळ खेळायचो. संध्याकाळी घरी आल्यावर फक्त चहा मिळायचा आणि रात्री आठ वाजता जेवण होत असे. 

आताच्या शाळांची वेळ माझ्या मते, सकाळी ११ ते ५ किंवा दुपारी १२ ते ५.३० अशी असावी. आता जवळपास ८० ते ९० टक्के मुलांचे आई-वडील दोघंही नोकरी-व्यवसाय करतात. त्या निमित्तानं दिवसभर बाहेर असतात. घरी मुलांकडे बघायला कुणी असेल तर चांगलंच, पण ज्यांच्या घरी फक्त आई-वडील आणि मुलंच असतात, त्या आईवडिलांना तारेवरची कसरत करावी लागते. सकाळी लवकर उठून मुलांना दोन डबे द्यावे लागतात. शिवाय घरातलं आवरणं, ऑफिसला वेळेवर पोहोचणं आदी. मूल घरी आल्यावर त्यानं नीट खाल्लंय ना, मूल एकटं राहील ना (मुलगी असेल तर अधिकच काळजी असते.), सतत मोबाईल-टीव्ही बघत बसेल का, ही काळजी आई-वडिलांना लागून राहते. घरी आल्यावर रात्रीचा स्वयंपाक, मुलांचा अभ्यास घेणं, यात पालकांना थकायला होतं. त्यांची चिडचिड होते आणि तो राग निघतो मुलांवर.

माझ्या माहितीतला एक ‘इंटरनॅशनल’ शाळेतला मुलगा कायम पेंगुळलेला असतो. त्याच्या डब्यात नेहमी काही तरी ‘जंक फूड’ दिसतं. एवढंच काय, पण या मुलाचे प्रातर्विधीही शाळेतच होतात. दुपारची शाळा असेल, तर आईवडिलांची काळजी कमी होईल आणि मुलांनाही पुरेसा वेळ मिळेल.- कांचन थोरात

‘लवकर आवरण्याची घाई!’

माझ्या दोन्ही मुली (इयत्ता पहिली आणि पाचवी) एकाच शाळेत जातात. शाळेची वेळ आहे सकाळी ७.३० ते २.३०. बस पकडण्यासाठी घरातून ७.१५ ला बाहेर पडावं लागतं. मुली घरी येतात ३.३० ला. सकाळी ६.१५ ला उठावं लागतं. इयत्ता पहिलीसाठी शाळेसाठीचा हा वेळ खूप जास्त वाटतो. मला एक सुचवावेसे वाटते. या लहान मुलांवर संध्याकाळी ५ वाजता दूध पिण्याची बळजबरी करू नये, जेणेकरून ७ वाजेपर्यंत त्यांना कडकडीत भूक लागेल. रात्री उशिरा न जेवता वेळेत जेवल्यास सकाळी मुले ताजीतवानी असतात. मी मुलींना संध्याकाळी ७.३० वाजता जेवायला वाढते, जेणेकरून रात्री ९.३० ला त्यांनी झोपावं. पण या सगळयात खूप ओढाताण होते. मुलांना खेळ सुरू असतानाच बोलावून घरी आणावं लागतं, जेवल्यानंतरही निवांत वेळ नसतो, कारण दुसऱ्या दिवशीची तयारी करायची असते. त्यामुळे निदान पाचवी-सहावीपर्यंत तरी सकाळची शाळा नको.-  कल्याणी खाडिलकर

चेहऱ्यावर आळस!

मी एका ५ वर्षांच्या, ‘सीनियर-केजी’मधल्या मुलीचा पालक आहे. तिच्या शाळेची वेळ आहे ७.३० ते ११.३०. एवढया सकाळी लहान मुलांना झोपेतून उठवून, तयारी करून पाठवणं हे जिकिरीचं काम आहे. त्यांची झोप होत नाही. तसंच न्याहरी करायला, दूध प्यायलाही वेळ मिळत नाही. एवढया सकाळी सर्व छोटी मुलं नैसर्गिक विधी आटोपू शकत नाहीत. उठवल्यावरही त्यांच्या चेहऱ्यावरचा आळस कमी होत नाही.- पवन सोमाटकर

आश्रमशाळांचाही विचार व्हावा

महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर ही चार अपर आयुक्त कार्यालयं आणि ३० प्रकल्प कार्यालयं आहेत. त्याअंतर्गत ४९९ शासकीय आणि ५४६ अनुदानित आश्रमशाळा असून, यात साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.

काही दिवसांपासून आश्रमशाळांची वेळ ही सकाळी ८.४५ ते दुपारी ४ अशी करण्यात आली आहे. आश्रमशाळांमध्ये सुमारे ६० ते ७० टक्के विद्यार्थी निवासी तर आहेतच, परंतु इतर ३०-३५ टक्के विद्यार्थी जवळपासच्या पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून शाळेत येतात. लहान मुलांचा विचार केला असता त्यांना शाळेत पोहोचण्याकरिता एक-दीड तास आधीच निघावं लागतं. तयारीसाठी सकाळी सहाला उठावं लागतं. यात झोप होत नाही. शिवाय आश्रमशाळेच्या दोन्ही वेळच्या जेवणाच्या वेळेतही बरंचसं अंतर आहे. अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या आश्रमशाळा, तिथली परिस्थिती आणि साधारणत: साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या आश्रमशाळांचा वेळेच्या बाबतीत नक्कीच विचार व्हावा.- शंकर पाटील

ज्यादा तासिकांसाठी वेळ मिळावा

आश्रमशाळांत पूर्वी सकाळच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी- गणितासारख्या कठीण विषयांच्या जादा तासिका घेणं शक्य होत होतं. आता ते शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. बाहेरगावहून पाच ते दहा किलोमीटरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना डोंगराळ भागातून सकाळी पायी चालत येणं कठीण असतं. आदिवासी पाडयांवर बऱ्याच वेळेस रात्रीचा वीजपुरवठा बंद असतो, त्यामुळे रात्रीचा अभ्यास करणं शक्य होत नाही आणि सकाळी उठून लगेच शाळेसाठी पाच-दहा किलोमीटर चालावं लागतं. तेव्हा आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ वा १०.३० ते ४.३० हीच योग्य वाटते.- महेश बावा

भुकेने त्रस्त मुलं!

शाळांची वेळ ११ ते ५ च हवी. विशेषत: आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची झोप होत नाही. पहिली ते सहावीच्या मुलांची गैरसोय अधिक. आश्रमशाळेत निवासी नसलेल्या- ‘अर्धसवलत’ विद्यार्थ्यांना घरातून लवकर निघावं लागतं. खूप मुलं पायी येतात, कारण ‘मानव विकास’च्या बसगाडया जिल्हा परिषदांच्या शाळांच्या वेळेनुसार १०.३० वाजता असतात. त्यामुळे नाश्ता न करता येण्याचं प्रमाण खूप. मुलांना जेवणासाठी १२.३० वा १ वाजण्याची वाट पाहावी लागते. बरीच लहान मुलं भूक लागल्यानं अक्षरश: रडतात. त्यांच्या वेळेचा विचार केल्यास या मुलांचं अभ्यासात नीट लक्ष लागू शकेल. – सुधीर नहाटे

यांनीही पत्रे पाठवली होती-

श्याम ठाणेदार, स्नेहा मोडक, विद्या फाले, सचिन काळपांडे, रसिका जोशी, जयश्री देशमुख, स्वरा लेंडे, प्रगती वाघमारे, सरिता धुमाळे, विलास भुरे, कल्पेश किणी, गिरिजा पागनीस, शशिकला शेळके देशमुख, राधाकिशन जुंजारे, शिरीषकुमार पाठक, भाऊराव हेडाऊ, माधवी टिळवे, देवीदास सारंग, संजय निमकरडे, राजेंद्र देशपांडे,  डॉ. नीरज जाधव, मीनाक्षी सरदेसाई, नीलिमा न्यायाधीश, अनुराधा हरचेकर, अनिकेत आपटे, वासंती सिधये, हरिप्रिया दांडेकर, अरुणा (प्रभा) जोशी, किरण आहिरे, ऋतुजा साळवे, नरेश नाकती, अश्विनी सावळे, भाग्यश्री ताम्हणकर, प्राजक्ता पांगारकर, मंगला देशमुख, महेजबीन बागवान, सूर्यकांत भोसले, सुप्रिया केदार, उषा पेंढारकर, प्रमोदिनी देशमुख.

Story img Loader