आयुष्यात अवघड वळणं आल्यानंतरच पतीपत्नीला एकमेकांच्या खऱ्या स्वभावाचं दर्शन होणं अनेक जोडप्यांत घडतं. मात्र काही जणांना हे कसोटीचे प्रसंग नात्याच्या कमकुवतपणाची जाणीव करून देतात. त्यात्या प्रसंगीचं आपलं वागणं, आपली निवड आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम, यांबद्दल मनात अनेक प्रश्न गरगरत राहतात. अशा वेळी केवळ झालेल्या गोष्टींचा विचार करत स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा प्रश्नच थोडे बदलून पाहावेत. कदाचित भविष्यासाठीची आशा यातूनच मिळेल…

‘‘तुला काय वाटतं जुई? माझं चुकलं का गं?’’ बोलणं संपवत अस्मितानं कातरपणे विचारलं.

religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…

अस्मिता आणि जुई कॉलेजमधल्या मैत्रिणी. अभ्यास एकत्र करायच्या. हुशार असल्या तरी परिस्थिती बेताची होती, त्यामुळे पदवीनंतर घरच्यांवर भार न टाकता नोकरी करत पुढे शिकण्याचं दोघींनीही ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यांना नोकऱ्याही मिळाल्या. अधूनमधून संपर्क असायचा. दरम्यान अनपेक्षितपणे एका मध्यस्थाकडून अस्मितासाठी ‘परम’चं स्थळ आलं. सुप्रसिद्ध व्यावसायिक घराण्यातला परम हा धाकटा, हुशार मुलगा. कॅम्पसमधूनच त्याला ‘आयटी’ कंपनीत उत्तम पॅकेज मिळालेलं होतं. आता कंपनीच्या प्रोजेक्टसाठी लंडनला जाणार होता. त्याला अस्मिता आवडलीच होती. देण्याघेण्याच्या अपेक्षाही नव्हत्या. तिलाही परम आवडला. त्यामुळे ‘चट मंगनी पट ब्याह’ होऊन दोघं लंडनला गेले. त्यानंतर बऱ्याच काळानं आज मॉलमध्ये अचानक दोघी मैत्रिणी भेटल्या होत्या.

जुईनं पुढे एमबीए केलं आणि ती चांगल्या हुद्द्यावर पोहोचली होती. अस्मितानं लंडनमधली तीन वर्षं आनंदानं संसार सांभाळला होता. बैठ्या कामामुळे परमची जाडी वाढली आणि त्याला आणखीही काही आरोग्याचे त्रास सुरू झाले. तेव्हा अस्मिता त्याच्यासह जिम करू लागली. शिवाय आपणहून अनेकदा जेवणाच्या सुट्टीत त्याच्या ऑफिसमध्ये घरचा डबा घेऊन जाऊ लागली. तिच्या हातचे अनेक पदार्थ त्याच्या सहकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले. मित्रांच्या पार्ट्यांना ऑर्डर्स येऊ लागल्या. दुसरीकडे तिनं फायनान्सशी संबंधित एक कोर्स करून ओळखीमधून छोटे छोटे प्रोजेक्ट्स केले आणि स्वत:चे थोडे पौंड साठवले.

नंतर ते भारतात परतले. परमनं एखादं वर्ष नोकरी केली असेल, पण नंतर तो त्यात रमेना. कुटुंबातल्या इतर पुरुषांप्रमाणे बिझनेस सुरू करायचं त्यानं ठरवलं. ‘‘तुला इथे कंटाळा आला असेल तर दुसरी नोकरी बघ. पण तुझी वृत्ती बिझनेसवाल्याची नाही,’’ असं त्याला त्याच्या दादानं सुचवलं. ‘‘तुझी स्किल्स सॉफ्टवेअरमध्येच आहेत. वाटल्यास तू ब्रेक घे, पण बिझनेस नको.’’ असं अस्मिताही त्याला पुन:पुन्हा सांगत होती. तिच्या वडिलांना व्यवसाय न जमल्यामुळे काय घडलं हे तिनं अनुभवलं होतं.

परमनं मात्र ‘बिझनेस करूनच दाखवीन’ अशी खुन्नस घेतली. कोणाचंही न ऐकता त्यानं नोकरी सोडली. जन्मापासून तो श्रीमंतीत वाढलेला, लाडाचा धाकटा राजकुमार. घर, ऑफिस, सगळं त्यानं त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसं, भलंमोठं घेतलेलं होतं. त्याच्या बेहिशेबी उदार स्वभावाचे तोटे हळूहळू दिसायला लागले. मोठेपणानं मित्र-नातलगांना दिलेले पैसे क्वचितच परत आले. नोकरीत असताना कामाची शिस्त आपोआप होती. स्वत:च्या नवीन बिझनेसमध्ये ती शिस्त आणि कामाचा बहुआयामी झपाटा त्याला जमला नाही.

अस्मिता जुईला सांगत होती, ‘‘भारतात आल्यावर ‘वारस पाहिजे’ म्हणून घरच्यांनी जीव काढला. ‘बिझनेसचा थोडा जम बसेपर्यंत थांबू’ हे माझं म्हणणं परमनं ऐकलं नाही. त्या नाजूक अवस्थेत मला परमची सोबत, त्याच्याशी संवाद हवा होता. पण तो अखंड नव्या बिझनेसच्या तारेत असायचा. फक्त त्याबद्दलच, तेच तेच बोलायचा. आमच्यातला आपलेपणाचा संवाद हळूहळू संपत गेला. बाळंतपणाच्या निमित्तानं सहा-आठ महिने घरचं कुणी तरी सोबत होतं, पण त्यानंतर मी पूर्ण एकटी पडले. हा कधीही जाणार, कधीही येणार. उत्पन्न बेभरवशी. कर्जाचे हप्ते, जागांची भाडी, लोकांचे पगार अंगावर यायला लागले. ताणामुळे आमची भांडणं वाढली…’’

ती बोलतच राहिली- ‘‘आपल्याला बिझनेस जमत नाहीये, आपण हरतोय हे एका टप्प्यावर परमला दिसायला लागलं. पण नकार घ्यायची त्याला सवयच नव्हती. त्यामुळे काहीही बिनसलं की संताप अनावर. आरडाओरडा करत तो स्वत:च्याच फाड-फाड थोबाडीत मारून घ्यायचा. बाळ रडायला लागायचा. त्याच्या या अनोळखी अवतारानं मी घाबरलेच. ‘अजूनही बाहेर आयटीत जॉब बघ… आपण खड्डा भरून काढू. पण बाळासमोर असा ताण नको.’ या माझ्या विनवण्या त्यानं कधीच ऐकल्या नाहीत.

एकीकडे आर्थिक चणचण, परमचं लहान मुलासारखं बेजबाबदार, विचित्र वागणं, दिवसभर घरात फक्त मी आणि बाळ. मी विटले. त्याच्या घरचं गडगंज आहे, त्यामुळे ‘लाडक्या छोटूला ताण नको’ म्हणून परमची आई परस्पर पैशांची व्यवस्था करायची. तरी ती काही काढून दिलेली वाटणी नव्हती, मदतच होती. माझी जाऊ आली की ‘छोटूच्या लाडांबद्दल’ टोमणे मारायची. मला तो अपमान वाटायचा. बाहेर पडून नोकरी धरावीशी वाटायची, पण ती वेळ नव्हती. परमला हट्टानं बाळ हवं होतं, पण जबाबदारी नको होती. स्वाभिमान नव्हता. असा आत्ममग्न, बेहिशेबी, चिडका, लाडावलेला लहान मुलगा मला ओळखीचाच वाटेना…’’

‘‘त्याचा हा स्वभाव तुला त्याआधी कधीच जाणवला नव्हता?’’ जुईनं विचारलं.

‘‘आधी कधी प्रश्नच आला नाही गं! सॉफ्टवेअरमध्ये असताना तर तो राजाच होता. लंडनमध्ये आम्ही दोघंच होतो, प्रेमात होतो. परिस्थिती इथे आल्यावर बिझनेसच्या अवाढव्य गरजांमुळे बदलली. हं, पूर्वीही कधी कधी त्याचं माझ्यावरचं प्रेम ‘पारंपरिक’ नवऱ्यासारखं वाटायचं. कारण तिथल्या मित्र-मैत्रिणींमध्ये छोट्या गोष्टींतून जोडीदाराचा सन्मान ठेवणं पदोपदी दिसायचं. आम्ही मात्र ग्रुपबरोबर हॉटेलमध्ये गेलो की माझी ऑर्डर मला न विचारता हाच द्यायचा. खरेदीला गेलो तर ड्रेस तोच निवडायचा. ते माझ्या मैत्रिणींना खटकायचं. त्यावर ‘माझ्या बायकोची आवड मला माहितीय,’ असं त्याचं चेष्टेत उत्तर असायचं. ‘हे प्रेम आहे की अधिकार?… सन्मानाचं काय?’ असं कधी मी म्हटलं, तरी त्याला मुद्दा कळायचाच नाही. त्याच्या अशा छोट्या-मोठ्या गृहीत धरण्याकडे मी प्रेमाच्या भरात दुर्लक्ष करायचे.’’

‘‘हं…’’ जुईचा ‘हं’ बराच दीर्घ होता.

‘‘आता मात्र त्याचं बिझनेस-बिझनेस खेळणं, माझी घुसमट, मग भांडणं, हे वाढलं. घरच्यांपासूनही ते लपलं नाही. त्याच्या आई-वडिलांची ठाम खात्री की त्याची कमाई थांबल्यामुळेच मी भांडतेय. एकदा सासऱ्यांनी नोटांच्या गड्ड्या माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाले, ‘एवढ्याचसाठी भांडतेस ना त्याच्याशी? दर महिन्याला देत जाईन… पण त्याच्या डोक्याला शांती दे!’

त्या दिवशी मला प्रचंड लाज वाटली. परम खाली मान घालून गप्प उभा होता. त्याच्याबद्दलचा माझा उरलासुरला आदर त्या दिवशी संपला. मला त्याच्या घरच्यांच्या तुकड्यांवर राहायचं नव्हतं, पण मुलामुळे अडकले होते. एकदा भांडणाच्या ओघात ‘मला परमबरोबर राहावंसं वाटत नाही’ असं मी बोलले. सासरच्यांनी कल्ला केला, माहेरच्यांनी वेड्यात काढलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की मला मुलगी असती तर वेगळं राहणंच कशाला, त्यांनी चटकन घटस्फोटही दिला असता. पण ‘मुलगा’ असल्यामुळे ते अशक्य होतं. कोर्टकचेरी आणि मुलाला सोडणं दोन्ही नकोसं होतं. मग वस्तुस्थिती स्वीकारून मी नव्यानं विचार केला. एक ऑनलाइन नोकरी करत पार्टटाइम ‘एम.बी.ए.’ केलं. नंतर त्याच कंपनीत वरच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. आता माझी मी स्वावलंबी आहे.’’

‘‘आणि परम?…’’

‘‘घरच्यांच्या मदतीनं त्यानं कर्ज संपवून कंपनी बंद केली. पण नोकरीला त्याचा आजही नकारच आहे. छोटे-मोठे प्रोजेक्ट घेतो, स्वत: डिझाईन करतो, करून घेतो. काही तरी होत राहतं.’’

‘‘तुझ्या वेगळं होण्याच्या मागणीनं तो खचला असेल…’’ जुईनं विचारलं.

‘‘हो. त्याला धक्का बसला. सुरुवातीला त्यानंही ते पैशांशीच जोडलं. एकत्र कुटुंबात जे असतं ते सगळं ‘आमचं’ असतं. त्यामुळे ‘आम्ही तुला काही कमी पडू देतोय का? की तुला दुसरं कुणी आवडलंय?’ एवढेच त्याचे प्रश्न होते. माझ्यासाठी गोष्ट आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची, आत्मनिर्भर होण्याच्या इच्छेची होती, भरपूर कमाईची नव्हती. मी काटकसरी आहे आणि माझ्या गरजाही कमी आहेत. परमला हे समजेना म्हटल्यावर मीही हरले. नात्याबाबत कोरडी झाले, ‘इंटिमसी’ संपली. तो तसा सज्जन. त्यानं माझ्यावर जबरदस्ती केली नाही. फक्त ‘मला सोडून जाऊ नको’ म्हणत राहिला. ते समाजासाठी होतं की माझ्यासाठी, हे सांगता नाही येणार. पण मलाही त्याला खचवण्याची इच्छा नव्हती. दोघांच्याही आयुष्यात तिसरी व्यक्ती नव्हती. मुलाला- आयुषला त्याचा लळा आहे. सासरच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी आयुषला महागड्या शाळेत घातलं. त्यांच्याकडून पैसे येत राहतात. पण माझा खर्च मी करते. परमची नबाबी थोडी कमी झालीय. कदाचित आता माझं म्हणणं त्याला कळत असावं. पण बाकी सर्व तसंच आहे. बाहेरून सगळं सुरळीत दिसतं. पण मुलगा सोडल्यास आमच्यात संवादाला विषय नाही! अजूनही काही प्रश्न डोक्यात गरगरत असतातच- माझा स्वाभिमान अतिरेकी झाला का?… परम माझ्यामुळे जास्त खचला का?… प्रेम म्हणजे काय होतं?… माझं चुकलं का गं जुई?’’ अस्मितानं कातरपणे विचारलं.

क्षणभर थांबून जुई म्हणाली,

‘‘चूक किंवा बरोबर असं एका शब्दात उत्तर नसतं गं कधी! तुमच्या पार्श्वभूमी वेगळ्या. तू धडपडी होतीसच आणि परदेशात गेल्यानंतर प्रगल्भ झालीस. परमला ‘कम्फर्ट झोन’ तोडून परिस्थितीशी सामना करणं जमलं नाही. दुर्दैवानं दोघांच्याही स्वभावातला अपरिचित भाग परिस्थिती बदलल्यावरच वर आला. शिवाय त्याच्यासारख्या गर्भश्रीमंतीचा तुला अनुभव नाही आणि तुझ्या वडिलांसारखं दिवाळं निघालेलं त्यानं पाहिलेलं नाही. त्यामुळे चूक की बरोबर? यापेक्षा योग्य प्रश्न असा, की ‘प्रेमाच्या नावाखाली स्वाभिमान सोडून जन्मभर टोमणे खात परावलंबी जगणं तुला जमलं असतं का? मग तुझ्या ‘चूक-बरोबर’चा निवाडा केवळ दागिने-साड्यांमध्ये खूश असणाऱ्या तुझ्या नणंदा-जावांनी करायचा, की पारंपरिक सासर-माहेरच्यांनी?…

त्यामुळे तू स्वत:पुरता शोधलेला मध्यममार्ग मला योग्य वाटतो. तरी पुढच्या आयुष्यासाठी तू स्वत:ला वेगळे प्रश्न विचारावेस असं वाटतं. म्हणजे ‘परमबद्दलचा आदर संपलाय, नात्याबद्दल मी कोरडी झालेय,’ असं पुन्हा पुन्हा मनात गिरवत आणखी कोरडी होणार? की ‘वेळ लागेल, पण परमचाही आत्मसन्मान जागा होईल,’ अशा अपेक्षेत मनाचा दरवाजा उघडा ठेवणार?… तो बुद्धिमान आहेच. उद्या एखादा प्रोजेक्ट क्लिक होईलही. पती-पत्नीची इंटिमसी संपली असेल तरी तुम्हाला ‘रूम-पार्टनर’सारखं हसतखेळत राहता येईल का?… मुलाला तुमच्याबरोबर असताना ताण/ तक्रार जाणवते की मोकळी, समंजस मैत्री?…’’ जुईनं विचारलं.

‘‘खरंय. याबद्दल नक्की नव्यानं विचार करते मी!’’

निरोप घेता घेता अस्मिताला नवे प्रश्न मिळाले होते आणि हताश मनाला थोडा आधारही!

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader