डॉ. नंदू मुलमुले
आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, परंतु प्रत्येकाचे स्वभाव एकमेकांना समजून घेणारे नसले की मात्र मनाच्या वाटा वेगळ्या होतात आणि नात्यात अशांती निर्माण होते. यावर उपाय कोणता?
पालकांसाठी आपल्या हयातीत पुढली पिढी अपयशी निघणं यासारखं दुसरं दु:ख नाही. खरं तर निवृत्तीचा काळ पुढल्या पिढीचा उत्कर्ष पाहत सुखावून जाण्याचा. मात्र काही लोकांना इच्छा नसतानाही संसारातून मुक्त होता येत नाही. नोकरीचा कार्यकाळ संपलेला असतो, मात्र सांसारिक कटकटीतून निवृत्ती नसते. दोष कुणाचा? अकार्यक्षम मुलांचा की ती अकार्यक्षम मुलं घडवणाऱ्या जुन्या पिढीचा? अशा वेळी दोषाचे खापर एकमेकांवर न फोडता त्या खापरांचे छत करून मुलांना अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढणं हे पालकांचं कर्तव्य ठरतं.
मात्र पालकांत एकजूट नसेल तर? हीच समस्या घेऊन विवंचनाग्रस्त नमिता मानसतज्ज्ञ डॉ. शेखरकडे आल्या होत्या. पन्नाशी ओलांडलेल्या नमिता स्वत: पेशाने डॉक्टरच, बालरोगतज्ज्ञ. मात्र आपला मुलगा निखिल आणि नवरा प्रभाकर यांच्यातील शीतयुद्धाचा तळ कसा शोधावा, त्यांच्यात मनोमीलन कसं घडवून आणावं हे त्यांना कळत नव्हतं. काहीशी स्थूल, ठेंगणी बांधणी, गोरा वर्ण, पण चेहऱ्यावर चिंतेचा एक पातळ थर लिंपलेला. त्या समोर आल्यावर त्यांच्या व्यक्तित्वाची शेखरच्या मनाने नोंद घेतली.
‘‘डॉक्टर, समस्या मुलात आहे की नवऱ्यात हेच मला कळेनासं झालं आहे. मुलाचं आयुष्य मार्गी लागावं ही प्राथमिक गरज आहे एवढं नक्की. तो आता तिशी ओलांडतो आहे. एव्हाना आयुष्यात स्थिर व्हायला हवा आहे. प्रभाकरला, माझ्या नवऱ्याला याची फारशी चिंता आहे असं वाटत नाही. असेलही, पण सध्या तरी मुलावर डाफरण्याच्या पलीकडे तो काही करत नाहीए. आमचा प्रेमविवाह झालाय. प्रभाकर त्या वेळी अभियांत्रिकीला होता. त्याने अचानक सैन्यात ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ घेण्याचं ठरवलं. त्याच्या घरची परिस्थिती जेमतेम. पाच वर्षं करू, मग नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय करू, सैन्याच्या नोकरीमुळे सवलती मिळतील हा विचार. पुढे मात्र शिस्तीच्या आयुष्याची सवय झाल्यानं त्याने कायम सैन्यात राहण्याचं ठरवलं. त्याचा स्वभावच सैन्याच्या चाकोरीबद्ध, काटेकोर जीवनाला पूरक. आता, हा स्वभाव त्याच्या मानसिकतेला जेवढा पूरक तेवढाच निखिलसाठी घातक ठरला आहे, असं माझं मत आहे.’’ नमिताने आपलं विश्लेषण मांडलं.
ती सांगू लागली, ‘‘मी शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात बालरोगतज्ज्ञाची पदविका घेतली. काही काळ आम्ही सगळे एकत्र होतो, मात्र नवऱ्याची बदली दूर होऊ लागल्यानं मी नाशिकमध्येच व्यवसाय करू लागले. निखिल एकुलता एक मुलगा, त्याच्या शिक्षणाचाही प्रश्न होता. सासू-सासरे जवळच राहायचे, त्यांचीही मदत झाली. निखिलचं शालेय शिक्षण पूर्ण होता होता प्रभाकरची बदली नाशिकमध्ये झाली. तेव्हापासून आमचं कुटुंब एकत्र झालं, मात्र माणसे दुरावत गेली,’’ नमिताताईंच्या स्वरात काहीशी खंत जाणवली.
‘‘म्हणजे?’’
‘‘निखिलचे त्याच्या वडिलांशी खटके उडू लागले. निखिल त्यांच्यासारखाच अबोल. काहीसा आळशी, मनस्वी स्वभावाचा. प्रभाकरचा स्वभाव शिस्तीचा. लेकावर प्रत्येक गोष्टीत डाफरायचा. शिस्त प्रेमानंही लावता येते. कधी कधी आपल्यात आणि मुलात प्रेमाचं नातं टिकवणं, जागतं ठेवणं महत्त्वाचं असतं हे प्रभाकरला कधी कळलं नाही.’’
‘‘निखिलला पाककलाकृतीत फार रुची! मग हॉटेल व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी, होमसायन्स वगैरे क्षेत्राचा विचार झाला. मात्र प्रभाकरने, बायकांची कामं कसली करतोस म्हणून हे सारं उडवून लावलं. निखिलची शैक्षणिक प्रगती फार चांगली म्हणावी अशी नव्हती. त्याने अभियंता व्हावं असं प्रभाकरचं ठाम मत, मात्र त्यातही तुला बीई पदवी घेणं जमणार नाही, तू पदविका अभ्यासक्रम निवड हा त्याचा आग्रह. आणि खरोखरच प्रभाकरने त्याला जबरदस्तीनं पदविका अभ्यासक्रम घ्यायला लावला. पोराच्या मनाविरुद्ध थोपलेला तो अभ्यास तो मन लावून कसा करेल? माझ्या या प्रश्नाला त्याच्याजवळ उत्तर नव्हतं. उत्तर नसलं तरी हार मानायची नाही, ऐकून घ्यायचं नाही हा प्रभाकरचा स्वभाव. दरवेळी मुसंडी मारणं श्रेयस्कर नसतं, कधी कधी पिछाडीला येणं उपकारक हे सैन्यात असूनसुद्धा त्याला कळत नव्हतं याचं वाईट वाटतं.’’
रशियावर स्वारी करू नये हे सहकाऱ्यांचं म्हणणं हिटलरनं कुठे ऐकलं? शेखरच्या मनात विचार चमकून गेला.
नमिताचं सांगून संपलं नव्हतं. ‘‘एकदा मन पूर्वग्रहदूषित झालं की, मग दुसऱ्याची प्रत्येक गोष्ट खटकू लागते. त्याचं नुसतं खाकरणं, खोकणंदेखील बोचू लागतं. निखिलला प्रभाकर हेच सांगायचा, ‘कसला आवाज काढतोस, एकतर नीट गुळण्या करून घे नाहीतर औषध घे खोकल्याचं आणि दुरुस्त करून घे घसा!’ पोरगा नाराज होऊन आतल्या खोलीत जाऊन दार लावून बसून राही. रात्री माझ्याजवळ तक्रार करी, बाबांना माझं खोकणंसुद्धा खटकतं, उद्या श्वास घेताना आवाज करू नको म्हणतील. मी जर प्रभाकरच्या बाजूने काही बोलले तर निखिल माझ्यापासून तुटून जाईल म्हणून मी गप्प बसू लागले. आता उलट्या बाजूने, वडिलांची प्रत्येक सवय मुलाला खटकू लागली! छोट्या छोट्या गोष्टींनी बाप-लेकात दरी वाढत गेलीय.’’
‘‘नमिता, तुम्ही निखिलला वडिलांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला का? शिक्षणाच्या निमित्तानं कुठे पाठवण्याचा प्रयत्न? कारण अशा वेळी मुलांना या नकारात्मक वातावरणातून बाहेर काढणं हेही उपयुक्त ठरतं,’’ शेखरनं सूचना करून पाहिली.
‘‘केलाय प्रयत्न डॉक्टर. निखिलला लंडनला जाऊन पदवी घ्यायची होती. मग प्रभाकरच्या मनाविरुद्ध त्याला मी इंग्लडला प्रवेश मिळवून दिला. शिष्यवृत्ती मिळाली नाही, बराच खर्च झाला. त्यावरून निखिल राहिला बाजूला आणि आम्हा नवरा-बायकोतच खटके उडू लागले. मी मात्र पोराची साथ द्यायचं ठरवलं. त्याला माझ्या पैशानं इंग्लडला पाठवलं. तिथे तो दोन वर्षं राहिला, पण…’’ नमिताच्या डोळ्यात पाणी तरारलं.
शेखरने फक्त समजुतीच्या दृष्टीनं नमिताकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. तिची कहाणी तिच्या गतीनं पूर्ण करू दिली.
‘‘माझं क्रेडिट कार्ड त्याला दिलं होतं, त्यावर दीड लाखाचं कर्ज झालं. ते पैसेही मीच भरले. त्याच्या हातून तिथे खर्च होत होता, मात्र अभ्यासाच्या बाबतीत हातात ठोस काही पडत नव्हतं. इकडेही गेले तीन महिने हीच परिस्थिती आहे. प्रभाकरचं पिणं वाढलंय. त्यालाही निखिलची चिंता वाटतेय, मात्र तो पूर्ण दोष मलाच देतो आहे. ‘पोराला अक्कल नाही, तुला तरी समजायला हवं’ म्हणतो आहे. आधी फक्त मुलाची लायकी काढायचा, आता माझीही काढतो आहे.’’ शेखरने नमितासमोर पाण्याचा प्याला पुढे केला.
‘‘नमिता, तुमच्या मन:स्थितीची मी कल्पनाच करू शकतो. निखिल सध्या ज्या मानसिकतेतून जातो आहे, त्याला आमच्या भाषेत ‘हाय एक्स्प्लोरेशन लो कमिटमेंट’ची अवस्था म्हणतात. ‘लो कमिटमेंट’ याचा अर्थ निष्ठेची कमतरता असा नाही, पण ज्या दिशेवर पूर्ण भिस्त ठेवावी अशी दिशा त्याला अजून सापडलेली नाही एवढंच. त्याचा ‘एक्स्प्लोरेशन’ म्हणजे मुक्त शोध सुरू आहे.
प्रभाकर मिलिटरीवाले, वरिष्ठांची आज्ञा संपूर्ण समर्पण वृत्तीने अमलात आणणं हेच उत्तम सैनिकाचं लक्षण. त्यांना पोराचं हे शोध घेणं वगैरे पटणारं नाही हे आपण समजून घेऊ. त्यात भर म्हणजे निखिलची पौगंडावस्था. ती तशीच बंडखोर असते. ही बंडखोरी दडपशाहीने नव्हे, समजूतदारपणे निभावून न्यायला हवी, म्हणजे साधारण पंचवीस-तिशीत आईवडिलांचं म्हणणं पटू लागतं. त्याला जबाबदारीची जाणीव करून द्या, पण अपयशाची पाठराखण करा. अपयशाचा आत्मविश्वासाशी संबंध नाही, ‘सपोर्ट सिस्टीम’शी आहे. माझं हरणं कुणीतरी समजून घेणारं आहे या कल्पनेनंही मुलांचा आत्मविश्वास कायम होतो. दरम्यान, मेजरसाहेबांची इच्छा असेल तर मला त्यांना भेटायला आवडेल असे सांगा.’’ शेखरच्या बोलण्यानं नमितालाच जणू एक आत्मविश्वास मिळाला. तो जरुरी होता, कारण ती एकाकी पडल्यासारखी झाली होती.
शेखरच्या कल्पनेप्रमाणे प्रभाकर होताच देखणा. सहा फुटांच्या आतबाहेर उंची, प्रमाणबद्ध शरीर, बारीक कापलेले केस. साधे पण स्वच्छ इस्त्रीचे कपडे, पॉलिश केलेले बूट, आणि सगळ्यात महत्त्वाची, करारी नजर. निखिलचा विषय निघाल्याबरोबर मात्र मेजर प्रभाकर तेवढ्याच तन्मयतेनं शेखरचं म्हणणं ऐकू लागले. त्यांचा स्वभाव आग्रही असेल, पण हेकट नव्हता असंच शेखरचं मत झालं.
‘‘मला समजतं तुमचं विश्लेषण. मुलगा आयुष्यात स्थिर व्हावा ही माझी इच्छा आहे. नमितानं त्याचे नको तितके लाड केलेत अशी माझी धारणा आहे. ती म्हणते, होईल एक दिवस सगळं ठीक, येईल त्याला जबाबदारीचं भान. मला सांगा, असं नुसतं म्हणून कसं चालेल? लाइफ डज नॉट गिव्ह यू अनदर चान्स.’’
हे सैन्यातल्या आयुष्याला लागू पडेल असं वाक्य आहे, शेखर मनात म्हणाला. उघडपणे त्याने फक्त मानेनं संमती दर्शवली.
‘‘नमिताला ब्रेक हवाय, मला कल्पना आहे. किती दिवस झाले आम्ही कुठे सहलीला गेलो नाही,’’ प्रभाकर विचारात बुडाले.
‘‘सहल दोघांना नाही, तिघांना गरजेची आहे. एक कुटुंब म्हणून. मेजर, जीवनातल्या लौकिक यशापयशापलीकडे पती-पत्नी, आईबाप-मुलं यांचं एक छान नातं असायला हवं. या स्नेहबंधात साऱ्या समस्यांना तोंड देण्याची, उत्तरं शोधण्याची क्षमता असते. ते स्नेहबंध पुन्हा निर्माण करण्याचे प्रयत्न करा. बाकी काळजी त्याची आई घेईलच. तिचा त्याचा बंध कायम आहे, तो नेईल तारून निखिलची अडखळती वाट.’’ काहीशा विचारमग्न स्थितीत प्रभाकरने निरोप घेतला. तिकडे निखिलच्या आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं. लंडनला राहणाऱ्या एका मुलीशी त्याची ओळख झाली, प्रेम जुळलं. त्याची निरनिराळे खाद्यापदार्थ करण्यातली रुची, जाण आणि कौशल्य पाहून ती प्रभावित झाली. दोघांनी भारतात परत येण्याचं ठरवलं. निखिलने निरनिराळ्या रेसिपी तयार करायच्या आणि तिनं मार्केटिंगची जबाबदारी घ्यायची. नमिताने पूर्ण पाठिंबा दिला. निखिलच्याही बोलण्यात उत्साह जाणवू लागला. त्याचा आत्मविश्वास परतला. त्याच्या आवडीची दिशा आणि सहचारिणी, दोन्ही त्याला गवसली. प्रभाकरला हे सारं एकदम पटलं नाही, पण आता पोराच्या निवडीच्या आड यायचं नाही हे त्यानं मानलं. मेजरने माघार घेतली.
युद्धाचं अंतिम ध्येय शांती असेल आणि संघर्ष आपल्याच लोकांशी असेल तर हरणे म्हणजेच जिंकणं या विचाराचा विजय झाला. संसार शांतीचा झरा हा बोध त्यांनी हृदयी धरला.
nmmulmule@gmail.com