निघून जाणं, हे कमी की काय, ‘रीडेव्हलपमेंट’ला जाणारं, आपल्या उण्यापुऱ्या आयुष्याचं साक्षीदार असणारं घरही जेव्हा जमीनदोस्त करण्याचा कुणाचा निर्णय पक्का झाला असेल तर?…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मोडुनी पडली घरटी कोटी,

कशी राहशील इथे एकटी,

इथे न नांदे कोणी जिवलग,

नसे आप्तही कोणी,

चल सोडून हा देश पक्षिणी…’

जुन्या झालेल्या, पण आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या छोट्या ट्रांझिस्टरवर गाणं सुरू होतं. गाण्याचे शब्द सुमनताईंचं मन उसवून टाकत होते. नंदन आल्यापासून घडणाऱ्या घटनांमुळे मन सैरभैर झालं होतं… आज नंदन परदेशी परतणार…

सुमनताईंना आताशा जरा कमी दिसायला लागलं होतं. डाव्या डोळ्यानं धूसरच दिसायचं. त्यामुळे उजव्या डोळ्यावर ताण पडायचा. साहजिकच आवडतं वाचन कमी झालेलं. पस्तीस-छत्तीस वर्षं माध्यमिक शाळेत शिकवण्यात गेली. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्यावर, आधीच्या व्यग्रततेत राहून गेलेलं त्यांचं अवांतर वाचन जोमात सुरू झालं होतं. बरोबर लिहिणंदेखील. ते वृत्तपत्रांतून प्रसिद्ध व्हायचं. अगदी हल्लीहल्लीपर्यंत. एरवी निवृत्तीनंतर लागणारं टीव्हीचं व्यसन त्यांना कधीच लागलं नाही. त्यांच्यासाठी छोटा पडदा दोन वेळच्या बातम्या अन् निवडक, साहित्य- संगीत- काव्यविषयक कार्यक्रमांपुरता. त्याबद्दल विचारलं तर म्हणायच्या, ‘‘नको त्या घराचं कुरुक्षेत्र करणाऱ्या खलनायकी सासू-सुनांच्या सीरियल्स अन् पाचकळ विनोदाचे फुटकळ कार्यक्रम, त्यापेक्षा हा ट्रांझिस्टर बरा… माझ्यासारखाच म्हातारा, पण अजून बिचारा आपलं काम करतोय… अजून माझे कान शाबूत आहेत तोपर्यंत! चांगल्या चर्चा, श्रुतिका, भरपूर जुनी- विस्मृतीत गेलेली गाणीदेखील ऐकता येतात. जुने दिवस आठवतात… भाईंबरोबरचे! एकमेकांना सांभाळत केलेली इतक्या वर्षांची सोबत. दोन व्यक्तींत मतभेद असतात तेवढे आमच्यातही होते. त्यातून वाद व्हायचा ईश्वरावरून! मी कर्मकांडांविरुद्ध असले तरी ईश्वरावर पूर्ण विश्वास. तर भाई पक्के नास्तिक. शास्त्रज्ञ!’’

‘शास्त्रज्ञ’ म्हणत भुवया उंचावताना त्यांचे डोळे पाणावायचे. सारवासारव करत म्हणायच्या, ‘‘डोळे हल्ली फार त्रास देतात. सारखं पाणी येत राहतं. या आठवणींचीही गंमतच असते. आठवतंय तोवर पिच्छा सोडत नाहीत… नंतर कधी तरी आपण आठवणंच विसरतो, ते फार वाईट!’’ म्हणत मनमोकळं हसायच्या, तेव्हा पंगत सोडून गेलेल्या अर्ध्याअधिक दातांविना त्यांचा चेहरा लहान मुलीसारखा खुलायचा. एके काळी भरघोस असलेले केस, कधीचे पूर्ण पांढरे झालेले. त्यांची अजूनही वेणी घालायच्या. त्या वेणीवर माळलेली अबोली वा बकुळफुलांची वेणी त्यांना खुलून दिसायची… भाई असेपर्यंत. ‘चीफ सायंटिस्ट’ म्हणून निवृत्त झाल्यावर भाईंनी दहा वर्षं ‘कन्सल्टन्सी’ केली. सतत काही ना काही उद्योगात व्यग्र राहिले. मुलगा नंदन, सून नेहा अमेरिकेचं नागरिकत्व मिळालेले आणि जन्मानंच अमेरिकी असलेली नातवंडं साक्षात आणि ओजस. त्यांच्याकडे सुरुवातीला दोघं दोनदा राहून आले… पण महिन्याभरात कंटाळायचे. नंतर तेच कधी आले तर प्रत्यक्ष भेटीगाठी व्हायच्या. त्यांचं असं सातासमुद्रापार असणं सवयीचं झाल्यावर, दोघं देशांतर्गत पर्यटन करू लागले. त्यात सुमनताईंचा ओढा धार्मिक पर्यटनाकडे. त्याला नास्तिक भाईंनी नेहमीच साथ दिली. पण देवापेक्षा त्यांचं लक्ष तिथल्या माणसांकडे. त्यांच्या वेशभूषेकडे, भाषा ऐकण्याकडे. गावं-शहरं, इमारती पाहण्याकडे. विशाल निसर्गाची, दशदिशांची अद्भूत निर्मिती पाहण्याकडे, ती कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याकडे.

भाईंच्या या वेडाविषयी सुमनताई भरभरून बोलत. ‘‘निसर्गचित्रांचा खजिनाच होता त्यांचा. मी खिजवण्यासाठी विचारायचे, ‘हा निसर्ग कसा निर्माण झाला हो?’ तर म्हणायचे… ‘ही सृष्टीची नैसर्गिक निर्मिती!’‘पण कुणी निर्माता असेलच ना?’ मी चिडवत विचारायचे. त्यावर… ‘जो ईश्वराचा निर्माता, तोच या निसर्गाचा निर्माता!’ असं काही तरी कोड्यात टाकणारं बोलायचे. मात्र माझ्याबरोबर देवळा-मंदिरात यायला नाही कधीच म्हटलं नाही त्यांनी. मंदिरात यायचे, देवाच्या मूर्तीकडे सस्मित चेहऱ्यानं पाहायचे. सुंदर, रेखीव मूर्ती घडवणाऱ्याचं कौतुक करायचे. कधी हात जोडणं नाही, प्रार्थना नाही, मागणं नाही. नक्कीच देवाला सांगत असणार, तू तुझ्या घरी बरा, मी माझ्या घरी! एकदा म्हटलं, ‘काय मागता देवाकडे?’ म्हणाले, ‘मागणारा मी कोण? न मागता इतकं मिळालंय. आणखी काय मागायचं? ईश्वर असला तर माझ्यातही असेलच ना? माझ्यात तर भक्ताचेही गुण नाहीत, कारण मी नेहमी प्रश्न विचारतो. तुला प्रश्नच पडत नाहीत अन् नाती तर सहज जोडता येतात. आपल्या शेजारच्या ईशानशी वा थेट ईश्वराशीसुद्धा… मला नाही जमत ते!’

यावर मी म्हणायचे, ‘मग तुमचं कठीण आहे माझ्यानंतर, कारण मीच आधी जाणार!’ त्यावर ते हळवे होत हात हातात घेत म्हणायचे, ‘अशी कशी जाशील? घट्ट धरून ठेवीन!’ देवाला हात जोडण्यापेक्षा ते कमी नव्हतंच!’’ असं काही आठवताना सुमनताईंचे डोळे पाणावायचे.

करोनाच्या सुरुवातीच्या दिवसांत ते निमित्त होऊन, सारे प्रश्न अनुत्तरित ठेवत, भाईंनी एक दिवस हॉस्पिटलमधूनच सुमनताईंचा कायमचा निरोप घेतला! तेव्हा त्यांच्याजवळ कुणीच नव्हतं. सुमनताईदेखील त्यांना अखेरचं भेटू शकल्या नाहीत. नंदन येण्याची शक्यताच नव्हती. नंतर फोनवरच नियमितपणे रोज सकाळी त्याच्याशी संवाद व्हायचा, तो चालूच राहिला. सुमनताईंच्या एकट्या वाटचालीतला दिवसातला तेवढाच विरंगुळा. करोनाची बंधनं शिथिल झाल्यावर नंदन एकटाच आला होता. आल्याआल्या बाळ होऊन आईच्या खांद्यावर डोकं ठेवून भरपूर रडला. सुमनताईंना स्वत:च्या अश्रूंना थोपवत त्याला शांत करावं लागलं!

दरम्यान, जेमतेम पंचवीस वर्षं जुन्या राहत्या घराच्या- त्यांच्या सोसायटीच्या पुनर्विकासाचा, करोनामुळे रखडलेला विषय पुन्हा सुरू झाला. कमिटी मेंबर्स घरी येऊन ‘रीडेव्हलपमेंट’चे फायदे सांगून नंदनशी बोलणी करून गेले. तोवर निर्धास्त असलेल्या सुमनताई आता सैरभैर झाल्या. जाण्यापूर्वी नंदननं पुन्हा तो विषय काढला.

‘‘हे बघ आई, मला कळतंय हे सगळं तुला जड जातंय. पण हे बघ, चांगलं मोठं घर मिळतंय तर काय हरकत आहे? इतकी रीडेव्हलपमेंटची कामं चालू आहेत आजूबाजूला अन् रिअल इस्टेटमध्ये भाव कित्येक पटींनी वाढतायत, यू नो…’’

‘‘येस, आय नो. पण हेच घर सांभाळताना माझी दमछाक होते रे. काय करू मी मोठ्या घराचं? तुम्ही कुणी परत येणार आहात का कधी? उगाच आशा नको लावू रे बाबा!’’

‘‘तिथे काही परिस्थिती बदलली, तर यावंही लागेल. हू नोज.’’

‘‘अच्छा, म्हणजे तिथे परिस्थिती बदलली तरच… असंच ना!’’ सुमनताई म्हणाल्या. नंदननं मग रोख बदलला.

‘‘हे बघ, इतर जवळपास सगळे मेंबर्स तयार आहेत… तू एकटी विरोधात जाऊन काही उपयोग होणार नाही.’’

‘‘बाळा, तशीही एकटीच आहे रे मी इथं! निदान माझ्यासाठी इतक्या वर्षांचे शेजारी तरी मदतीला आहेत. शेजारच्या ईशानच्या वेळी त्याच्या आईचं बाळंतपण मी केलंय रे. आज तो मुलगा माझ्यासाठी धावून येतो मदतीला. आता हीच नातीगोती सांभाळायची ना मी? अजून घरातल्या घरात तरी हिंडती-फिरती आहे. उद्याचं कुणी सांगितलंय? हू नोज? खरं ना? आणि इथला टॉवर होईपर्यंत, हे स्वत:चं घर सोडून कुठं तरी अनोळखी भागात, अनोळखी लोकांच्यात एकटं भाड्यानं राहायचं का रे तीन वर्षं… तेही या वयात?’’

‘‘एकटी आहेस म्हणूनच सांगतोय. अन् तू तर तिकडे यायलाही तयार नाहीस, आता भाई नाहीत तरी!’’

‘‘आता भाई नाहीत तरी… खरं आहे रे. पण तू तिकडे गेल्यानंतरच्या आमच्या दोघांच्या साऱ्या आठवणी आजही या घरात आहेत रे सोबत…’’ त्या हरवल्यासारखं म्हणाल्या.

‘‘यावर मी काय बोलणार? एकच सांगेन, आता तू मनाची तयारी करावीस. नाही तर अजून एकटी पडशील. तशीही ‘रीडेव्हलपमेंट’ होणारच. पर्याय तसाही नाही. निर्णय तुलाच कळवायचा आहे.’’

‘‘खरं आहे रे बाळा. पर्याय तसाही नाही.’’

निघताना वाकून नमस्कार केल्यावर त्यांनी नंदनच्या डोक्यावर हात ठेवला. ‘सुखी राहा!’

त्या बाल्कनीत आल्या. टॅक्सीत बसण्यापूर्वी नंदननंही हात केला.

‘‘काळजी घे बाळा सगळ्यांची!’’ त्या स्वत:शीच पुटपुटल्या.

संध्याछाया पसरत होत्या. रस्त्यापलीकडची इमारत पाडण्याचं दिवसभराचं अजस्रा मशिनचं काम थांबलं होतं. शांतता गडद होत चाललीय. अंगवळणी पडलेलं एकटेपणही आता जास्तच गडद होत चाललंय… त्यांच्या मनात आलं. आत येऊन देवाजवळ दिवा लावला. पणती लावून बाल्कनीतल्या तुळशीपाशी ठेवली… ‘दिवा लावला तुळशीपाशी उजेड पडला विष्णूपाशी, माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी!’

आत येऊन त्यांनी टेबलावरचा ट्रांझिस्टर चालू केला. ‘बळावता बळ पंखामधले पिल्लू उडुनी जाई, कुणी कुणाचे नाही, राजा!’ गाण्याचे शब्द ऐकून मनाचा बांध फुटला. अश्रू आवरण्याचा त्यांनी प्रयत्नदेखील केला नाही. डायनिंग टेबलाशी बसून स्वत:ला मुक्त केलं. वाटलं, आता कशासाठी, कुणासाठी अश्रू ढाळायचे? मनाला समजावलं. बस्स, उद्याच सोसायटीला ‘होकार’ कळवून टाकू! पर्याय तसाही नाही…

नियमितपणे डायरी लिहीत नसल्या तरी, घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची रात्री डायरीत तारीखवार त्या नोंद करायच्या. झोपण्यापूर्वी त्यांनी डायरी उघडली. नंदन आल्या दिवसाची, कुशीत भरपूर रडल्याची नोंद होती. आजच्या दिवसाच्या पानावर त्यांनी लिहायला सुरुवात केली… दोन ओळी लिहून डायरी बंद केली. शांत वाटलं. आडवं होत शांतपणे डोळे मिटले… कायमचे! जुनी झालेली, आतून पोखरलेली ती इमारत पूर्ण ढासळल्यावर मशिन शांत झाली… कायमची.

डायरीच्या त्या पानावर लिहिलं होतं… ‘तू दिलेलं एकटेपणही स्वीकारलं. आता समोर फक्त अंधार आहे. मार्ग दिसत नाहीये… एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे, तुझ्या अंगणात!’

pbbokil@rediffmail.com