जगण्याचा आनंद न घेता आयुष्य फक्त नियोजनात घालवणं आणि त्यासाठी अचूकपणा आणि परिपूर्णतेचा अतिरेकी अट्टहास धरणं हा एक व्यक्तिमत्त्व विकार आहे. याला ‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ म्हणतात. या विकारानं पीडित असलेली व्यक्ती कोणतंही काम पूर्ण तर करत नाहीतच, पण तिच्यावर अवलंबून राहणाऱ्यांनाही आयुष्याचा आनंद घेऊ देत नाही. कोणती आहेत, या विकाराची लक्षणं आणि त्यावरील उपाय…
आपल्या ‘स्वभाव-विभाव’ या सदरातील आजचा हा शेवटचा व्यक्तिमत्त्व विकार. एव्हाना आपल्याला तीन ‘क्लस्टर’मध्ये हे व्यक्तिमत्त्व विकार लक्षणांनुसार विभागले गेल्याचं कळलंच आहे. तर ‘चिंताक्रांत’ आणि ‘घाबरल्याची लक्षणं’ असलेल्या क्लस्टर ‘सी’ मधला हा तिसरा आणि शेवटचा व्यक्तिमत्त्व विकार.
‘ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर (OCPD).’ नाव खूप ऐकल्यासारखं वाटतंय ना? विशेषत: टाळेबंदीच्या काळात करोना होईल या भीतीनं सतत हात धुणाऱ्यांना ‘तुला ओसीडी झालाय की काय?’ असं सर्रास विचारलं जायचं. पण ‘ओसीडी’ (ओब्सेसिव्ह कॉम्पल्सिव्ह डिसऑर्डर) आणि ‘ओसीपीडी’मध्ये फरक आहे. ‘ओसीडी’च्या व्यक्तींना आपण चुकतोय, आपल्याला बदलायची गरज आहे हे कळतं, मात्र ‘ओसीपीडी’च्या व्यक्तींना आपण नाही तर समोरचा चुकतोय, असंच वाटत राहातं. ‘ओसीडी’ हा मानसिक आजार आहे तर ‘ओसीपीडी’ हा व्यक्तिमत्त्व विकार आहे.
आपण फक्त यातील व्यक्तिमत्त्व विकारावर प्रकाश टाकणार आहोत. ‘ओब्सेसिव्ह थॉट्स’ या शब्दाचा अर्थ आहे, पछाडून टाकणारे किंवा वेड लावणारे विचार. आणि ‘कम्पल्सिव्ह बिहेविअर’ म्हणजे सक्तीचं वर्तन. या विकारानं पीडित असलेल्या व्यक्ती एखादा विशिष्ट विचार करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाहीत किंवा एखादी कृती करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. काही व्यक्तींना फक्त ‘ऑब्सेशन’ असू शकतं, काहींना फक्त ‘कंपल्शन’ असू शकतं, काहींना दोन्ही लक्षणं असू शकतात. ‘ओसीपीडी’ या प्रकारात एकूण आठ लक्षणं सांगितली आहेत. त्यातील किमान चार लक्षणं प्रामुख्यानं दिसून येत असतील आणि त्या व्यक्तीनं वयाची १८ वर्षं पूर्ण केली असतील तरच त्याचं या व्यक्तिमत्त्व विकारासाठी निदान केलं जाऊ शकतं.
पहिलं लक्षण सांगताना मला पूर्वी ऐकलेली एक गोष्ट आठवते. एका गावामध्ये एक वैद्या राहात होता. एके दिवशी त्याची बायको त्याला बाजारातून भाजी आणायला सांगते. वैद्या ठरवतो की, तो त्याचं ज्ञान वापरून उत्तम भाजी घेऊन येईल. तो बाजारात जातो. त्याला पहिल्यांदा वांगी दिसतात, ती वातूळ असतात म्हणून तो घेत नाही. पुढे मिरची दिसते, ती पित्तकारक आहे म्हणून घेत नाही. अशा भाज्या दिसत राहतात आणि शरीराला कोणत्याही पद्धतीनं अपाय न करणारी भाजी काही त्याला सापडत नाही आणि सरतेशेवटी तो रिकामी पिशवी घेऊन घरी येतो. ‘अचूकपणा’ किंवा ‘परिपूर्णतेचा अट्टहास’ हे याचं पहिलं लक्षण. या परिपूर्णतेच्या त्यांच्या ज्या काही कल्पना असतात, त्या पूर्ण करण्याच्या नादात त्यांचं काम अपूर्ण राहातं, ते त्यांना चालतं, पण परिपूर्णता (perfectionist) असलीच पाहिजे असा यांचा अट्टहास असतो. मात्र ते तेवढे मेहनती, हुशार असतात म्हणूनही त्यांना परिपूर्ण काय असू शकतं याचा अंदाज असतो.
‘ओसीपीडी’ असलेल्या गणेशच्या आयुष्यात आपण डोकावून बघूया. गणेश तीन भावांमधला सर्वांत मोठा भाऊ. लहानपणापासून प्रचंड शिस्तप्रिय, स्वच्छता आणि टापटिपीची आवड असणारा. दोन भावांबरोबर एका बेडरूममध्ये राहताना नीटनेटकेपणावरून होणारी भांडणं बघून आईनं त्याला स्वतंत्र खोली दिली होती. ती खोली नेहमीच खूप नीटनेटकी आणि स्वच्छ असायची. बाकीची भावंडं खेळायला, वाढदिवसाच्या पार्ट्यांना निघून जायची पण हा मात्र घरात सगळ्या वस्तू जागच्या जागी, एका विशिष्ट पद्धतीनं मांडत बसायचा. त्यामुळं त्याचे लहानपणीही फारसे मित्र नव्हतेच आणि पुढे तरुणपणीही.
त्याच्यातील या लक्षणांमुळे त्याच्या आईला घर आवरायला मदत कमी, उलट मनस्ताप जास्त व्हायचा. कारण तिला पुढच्या कामांची घाई असायची, कधी बाहेर जायचं असायचं, पण हा मात्र आवाराआवरीत बारकावे शोधत बसायचा. उदाहरणार्थ, तो स्वयंपाकघरात येऊन सगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये एका समान पातळीपर्यंत डाळ ठेवायचा. मग जास्त असलेल्या डाळी काढून दुसऱ्या डब्यात भरून ठेवायचा. त्याला ते एकदम शिस्तीत दिसायला हवं असायचं. गणेश बघावं तेव्हा त्याच्या वस्तू, त्याची पुस्तकं, त्याचं कपड्यांचं कपाट या सगळ्यात इतका रमून जायचा की त्याला बाहेर मैदानात जाऊन मित्रांबरोबर खेळण्यात, मजा करण्यात कधी फार रुची वाटली नाही. फार कशाला घरातच दोन भाऊ होते, पण त्यांच्याशीही याचं फार जमायचं नाही. तो स्वभावानं फार गंभीर होता. घरात विनोद, एकमेकांची मस्ती चालली असेल तर हा तिथून निघून जायचा. याचं काहीतरी शिस्तीचं काम राहिलेलं असायचं.
अशा स्वभावामुळेच या व्यक्तिमत्त्व विकाराच्या लोकांचं सामाजिक आयुष्य जवळपास नसल्यात जमा असतं. गणेश आता फक्त ३० वर्षांचा आहे. घरातल्या कोणत्याच जबाबदाऱ्या त्याच्यावर नाहीत, मस्त मजेत आयुष्य जगायला जे जे लागतं, ते सगळं आहे त्याच्याकडं, पण त्याच्या शिस्तशीर आणि तटस्थ स्वभावामुळे तो सामाजिकदृष्ट्या एकटा पडत चालला होता.
इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हे लोक मुद्दामहून असे वागत नाहीत. त्यांच्यातील व्यक्तिमत्त्व विकारामुळेच ते असं वागत असतात. हे जाणून की काय, त्याच्याच कार्यालयातली पूजा त्याच्या प्रेमात पडली, हा चमत्कारच होता. दोघांचं नातं पुढं जाताना तिला त्याच्या स्वभावाचं कोडं वाटावं असे अनेक प्रसंग घडत होते. उदाहरणार्थ, त्या दोघांनी एकदा हॉटेलमध्ये जायचं ठरवलं. पूजा आपल्या प्रियकराबरोबर वेळ घालवायला मिळणार या कल्पनेनं उत्साहात होती, तर गणेश त्याच्या नियोजन करण्यात गुंग होता.
या विकारानं पीडित व्यक्ती खूप वक्तशीर असतात. त्यांना त्यांच्या दिनक्रमात फारसा फरक केलेला आवडत नाही. वेळेवर झोपायचं म्हणजे झोपायचं, हा नियम त्याला मोडायचा नसायचा. गणेश ऑफिस सुटण्याची वेळ आणि त्याच्या झोपेची वेळ याच्या मधल्या काळात पूजाबरोबरचा हॉटेलचा कार्यक्रम आटपेल यासाठी आग्रही असायचा. त्यासाठी कोणतं हॉटेल, प्रवासाला किती वेळ, गर्दी किती, मागवलेले पदार्थ किती वेळात येतील हे सगळंच जुळून येण्यासाठी त्यानं एकदम कडक नियोजन केलेलं असायचं. इथपर्यंत ठीक आहे, पण एकदा असं झालं की, पूजा छान तयार होऊन येण्याच्या नादात पंधरा मिनिटं उशिरा आली. झालं, याचं वेळेचं नियोजन बिघडायला लागलं त्यामुळे याची अस्वस्थता वाढू लागली. त्यात पूजाने आल्यावर यानं ठरवलेला मेनू सोडून वेगळंच काहीतरी खायला मागवलं. खरं तर या सगळ्यामुळं इतरांचं काहीच बिघडलं नाही, फक्त बिघडल्या त्या गणेशच्या वेळा आणि त्याने केलेलं नियोजन. आणि तेच बिघडल्यामुळं त्यानं पूजाशी प्रचंड भांडण केलं. प्रेयसीबरोबर छान संध्याकाळ घालवण्यापेक्षा वक्तशीरपणा आणि नियोजन याला महत्त्व देऊन त्याने सगळा आनंद घालवला होता. त्याच्या अशाच आखीवरेखीव वेळापत्रकाचा कंटाळा येऊन थोड्याच दिवसांत पूजा त्याला सोडून निघून गेली. गणेशला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही, कारण शिस्त, नियोजन या इतक्या चांगल्या सवयींचा पूजाला का त्रास होता तेच त्याला कळत नव्हतं. त्याच्या मते तो बरोबरच होता.
या व्यक्तिमत्त्व विकारामध्ये एक लक्षण प्रामुख्यानं दिसून येतं ते म्हणजे या व्यक्तींना वाटतं की, ‘मी बरोबरच आहे.’(egosyntonic) आणि दुसरे लोक चुकीचं वागतात(alloplastic) या दोन ‘संज्ञानात्मक विकृती’ (cognitive distortion) आहेत. ‘संज्ञानात्मक विकृती’ असणाऱ्यांना असं वाटतं की, जे सत्य नाही ते पटवून देण्यासाठी आपलं मन आपल्याला तयार करतं आणि हे विचार सामान्यत: नकारात्मक असतात. या दोन गोष्टींमुळेच गणेशलाही कळत नव्हतं की त्याची चूक काय होते आहे. वक्तशीरपणा तर चांगला गुण आहे मग लोक त्याला चूक का म्हणतात? त्याच्या दृष्टीनं लोकांना वक्तशीरपणा जमत नाही, त्यांना शिस्त नाही ही त्यांचीच चूक होती.
खरं तर वक्तशीरपणा चांगला गुण आहेच, पण जेव्हा तो रोजच्या जगण्यात अडथळा ठरतो, किंवा इतरांबरोबरच्या आपल्या संबंधांवर परिणाम करतो तेव्हा त्याचं रूपांतर कोणत्या तरी व्यक्तिमत्त्व विकारात किंवा एखाद्या मानसिक आजारात होऊन जातं. आणि याच ‘संज्ञानात्मक विकृती’ या व्यक्तींना उपचारापासूनही लांब ठेवतात. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींना प्रत्यक्ष काम होण्यापेक्षा नियोजनातच जास्त आनंद मिळत असतो. यांचं आणखी एक लक्षण म्हणजे, या व्यक्तींची निर्णयक्षमता खूप कमी असते. गणेश कार्यालयात कमीत कमी सुट्ट्या घेऊन जास्तीत जास्त काम करायचा. त्या कामाचा प्रत्यक्ष फायदा होत नसला तरी तो खूप मेहनत घ्यायचा, हे त्याची बॉस बघत असायची. शिवाय कार्यालयात अगदी सहल किंवा एखादा कार्यक्रम असला तरी हा नियोजनाला सगळ्यात आधी पुढं असायचा. सहलीला जायचं ठरलं की, हा संभाव्य १० जागांची माहिती काढायचा, मग तिथे पोहोचायला वेगवेगळे मार्ग शोधायचा, फोन करून पैशांचे हिशोब काढून ठेवायचा पण कोणतीही एक जागा नक्की ठरवायचा नाही. बरं, हा नियोजन करतोय म्हणून कोणी मध्ये नाही पडायचं. शेवटी ती सहल कागदावरच राहायची. त्याची मेहनत बघता खरं तर त्याला पदोन्नती मिळायला हवी, पण तो स्वत:च्या कामातही खूप चुका काढायचा, परत परत दुरुस्त्या करत राहायचा, ज्यामुळं त्याच्या बॉसच्या मते कामाचा वेग कमी व्हायचा. कामातसुद्धा एक निर्णय घेऊन पुढं जाणं गरजेचं असतं, ते त्याला जमायचं नाही.
या व्यक्तिमत्त्व विकाराच्या गंभीर, ताठर, कठोर आणि किचकट स्वभावामुळं त्यांच्याशी कोणी जवळीक साधायला जात नाहीत. जगण्याचा कोणताही आनंद न घेता हे लोक आपलं उभं आयुष्य नियोजनात घालवतात आणि त्याचं त्यांना काहीही सोयरसुतक नसतं. संज्ञानात्मक विकृतींमुळे हे लोक उपचाराला लवकर तयार होत नाहीत पण यांच्या मदतीसाठी ‘कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी’, ‘समूह थेरपी’, ‘एक्सपोजर थेरपी’ अशा अनेक सायकोथेरपी उपलब्ध आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे कामही करतात.
trupti. kulshreshtha@gmail.com
(तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)