स्त्रीचा पालकत्वाचा प्रवास खडतरच. त्यातही विशेष गरजा असणाऱ्या अपत्यांचं पालकत्व निभावताना अनेक अडथळे ओलांडावे लागतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:चं आयुष्य बाजूला ठेवावं लागतं. या आईंची वाटचाल म्हणूनच प्रेरणादायी. अशीच एक आई अर्चना पाटील. कर्णबधिर मुलगी आणि स्वमग्न मुलगा यांचं पालकत्व चोख निभावणारी… त्यांच्याविषयी, उद्याच्या (१२ मे) ‘मदर्स डे’ वा मातृदिनानिमित्तानं…
‘‘२ फेब्रुवारी २००८ हा दिवस मी कधीही विसरणार नाही. त्या दिवशी माझी मुलगी रश्मी आणि इतर सात मुलींचं ‘विष्णुदास भावे सभागृहा’त अरंगेत्रम होतं. तीन तास चाललेल्या त्या रंगतदार कार्यक्रमानंतर या दहा-बारा वर्षांच्या नृत्यांगना एकेक येऊन आपलं मनोगत सांगू लागल्या. रश्मीच्या वतीनं मी बोलल्यावर प्रेक्षकांना कळलं, की रश्मीला ऐकायला व बोलायलाही येत नाही. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर रश्मीला भेटून तिचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची अक्षरश: रीघ लागली…’’ बोलता बोलता त्या आठवणीनं अर्चना भावुक झाल्या.
कर्णबधिर मुलगी ते सुविख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना आणि एक ‘स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलगा ते राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवून गोव्यातल्या ‘बिट्स पिलानी’मध्ये ‘पीएच.डी.’ करणारा तरुण, हा रश्मी आणि जतिन या अर्चना यांच्या दोन मुलांचा प्रवास. पावलोपावली परीक्षा पाहणारी, गेल्या २७-२८ वर्षांची ही वाटचाल ऐकताना तो संघर्ष किती खडतर होता याचा प्रत्यय येतो!
रश्मी हे अर्चना आणि सुरेश पाटील यांचं पहिलं अपत्य. सुरेश हे व्यवसायानं वकील, तर अर्चना यांनी लग्नानंतर पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारलेलं. रश्मीला ऐकू येत नाही, हे तिच्या जन्मानंतर काही महिन्यांतच त्यांच्या लक्षात आलं. वांद्रे येथील ‘अलियावर जंग श्रवण- विकलांग संस्थे’त तिच्या कानांची पूर्ण तपासणी करण्यात आली. तेव्हा ‘अतितीव्र कर्णबधिरता’ या जन्मजात विकारावर शिक्कमोर्तब झालं. त्यानंतर सुरू झाली एक तपश्चर्या. रश्मीला आग्रीपाड्याच्या ‘द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ’ या शाळेत प्राथमिक धडे द्यायचं ठरलं. तेव्हा ती असेल साडेतीन वर्षांची आणि तिच्या पाठीवरचा जतिन एका वर्षाचा. त्याचीही समस्या तोवर लक्षात आली होती. तो एका जागी स्वस्थ बसत नसे. नजरेला नजर मिळवणं त्याला जमत नसे. बऱ्याचदा तो ‘हायपर’ होई. तपासणीअंती तो ऑटिस्टिक- स्वमग्न आहे हे समजून चुकलं. आईनं आता हिम्मत बांधली. दोन मुलांची वेगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती.अर्चना यांनी ताडदेवमध्ये एक उपचार केंद्र शोधलं. दोन्ही मुलांना घेऊन त्या सकाळी साडेसातला घर सोडत. त्याआधी सगळ्यांचे डबे करायला लागायचे. ट्रेनचा प्रवासही सरळ नव्हता. आधी हार्बर मार्गानं पनवेलहून सँडहर्स्ट रोड गाठायचं. नंतर पूल चढत-उतरत मध्य रेल्वेच्या फलाटावर यायचं. तिथून भायखळ्याला जाण्यासाठी दुसरी लोकल पकडायची. ही कसरत करताना या लेकुरवाळीच्या कडेवर जतिन, हाताशी रश्मी आणि पाठीवर सामानांची भली मोठी पिशवी. मात्र या अवघड दिवसांतला दिलासा म्हणजे त्यांना झालेलं माणुसकीचं दर्शन! प्रवाशांच्या गर्दीतून दोन मुलांना घेऊन जिना उतरणारी ही आई दिसताच, लोकलचा गार्ड हा कुटुंबकबिला गाडीत चढेपर्यंत हॉर्न देत नसे. तसेच घरून निघायला जर थोडा उशीर झाला, तर पनवेलला रेल्वे गाडीतल्या स्त्रिया त्यांची नेहमीची जागा राखून ठेवत. कारण या आईला रश्मीचा अभ्यास घेण्यासाठी तेवढाच वेळ मिळे. रश्मीला शिक्षकांकडे सुपूर्द केलं की मग ताडदेवला एक तासभर जतिनचं ट्रेनिंग. ते संपलं की परत आग्रीपाड्याला रश्मीच्या शाळेत! अर्चनांनी तिथेच, खास पालकांसाठी तयार केलेला मार्गदर्शन कोर्स पूर्ण केला. दिवसभराचं रूटीन संपवून त्याच क्रमानं घरी यायला साडेसहा वाजत. आईपणाचा कस जोखणारी ही कसरत त्यांनी काही वर्षं केली.
रश्मीचं बारावीपर्यंतचं शिक्षण पनवेलमध्येच ‘नॉर्मल’ मुलांच्या शाळेत झालं. शाळा जवळ होती, पण तिला तीव्र अर्धशिशी (मायग्रेन) आणि कमी रक्तदाब या आजारांचीही साथ होती. त्यामुळे ही आई तिला कधी एकटं सोडत नसे. कर्णबधिरतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे श्रवणयंत्राचा तिला फारसा उपयोग होत नसे. त्यामुळे ती ‘लिप रीडिंग’नं संवाद साधायला शिकली. असं असतानाही सहाव्या वर्षीच या आईनं तिला भरतनाट्यमच्या क्लासला घातलं. आईपणाचा कस इथेही लागलाच. आपल्या मुलीमधली ही कला वाढवायची याचा ध्यासच या माउलीनं घेतला. ती लेकीबरोबर क्लासला बसे. बाईंच्या भावमुद्रा, ओठांच्या हालचाली रेकॉर्ड करून घेत असे. घरी आल्यावर तो व्हिडीओ दाखवून आईची पुन्हा शिकवणी सुरू होई! या मेहनतीचं फळ म्हणजे रश्मीनं भरतनाट्यमच्या सहा परीक्षा डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण केल्या. ‘नृत्ययोग सूत्र’मध्ये डिप्लोमा केला आणि योग पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला. आज २७ वर्षांची रश्मी नृत्याचे कार्यक्रम तर करतेच, शिवाय हँडमेड ज्वेलरी आणि चॉकलेटस् तयार करत ती स्वत:च्या पायावर उभी आहे. या सगळ्या प्रवासात आई तिच्यामागे पहाडासारखी उभी आहे.
या मुलांना जिद्दीनं मोठं करत असताना संकटांनी मात्र या कुटुंबाची पाठ सोडलेली नव्हती. ती चालूच होती. स्वमग्न असणाऱ्या जतिनला लहान असताना खोलीची (depth) भीती वाटे. वाटेत एखादा छोटा खड्डा आला तरी तो ओलांडण्यासाठी त्याला आधार लागे. त्यामुळे थोडा मोठा झाला तरी टॉयलेटमध्ये बसवताना दारआड करून बाहेरून त्याच्याशी सतत बोलत राहावे लागे. आता कमोड असलं तरी बोलत राहायची त्याची सवय अद्याप गेलेली नाही. फक्त आता तो स्वत:शी बोलत राहतो. मात्र याच जतिननं भीतीवर मात करत २०१९ मध्ये हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करून दाखवलं.
जतिनचा शाळेत पहिला नंबर येई, त्यामुळे उनाड मुलांना घरी याचं उदाहरण देऊन दम मिळे, तो राग ती मुलं त्याच्यावर काढत. त्यांचे चेहरे मात्र जतिनच्या लक्षात राहत नसत. त्यामुळे वर्गात मुलांनी त्याला मारलं, तरी कोणी मारलं हे तो सांगू शकत नसे. यावर मात करण्यासाठी तो चेहरा कुठल्या तरी माहितीच्या गोष्टीशी जोडायची सवय त्याला लावली. शाळेत जायला लागल्यावरही कुकरची शिट्टी किंवा मिक्सरचा आवाज कानांवर आल्यावर घाबरून मोठ्यानं रडणारा जतिन आता मात्र बिट्स युनिव्हर्सिटीत डी.जे.च्या कार्यक्रमांना आवडीने हजेरी लावतो. हे सारे बदल आता झाले असले, तरी त्यामागे आहेत एका आईचे अथक परिश्रम आणि चिकाटी. त्यातच सात वर्षांचा असताना त्याला Celiac disease (ज्यात आहारात ‘ग्लुटेन’ चालत नाही असा आजार. ज्याचं पर्यवसान आतड्याच्या कर्करोगामध्येही होऊ शकतं.) या आजाराचं निदान झालं. त्यावर मात करत आईच्या मदतीनं त्यानं गणित प्रज्ञा परीक्षेत आणि वैदिक गणितात १०० पैकी १०० गुण मिळवले. सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत तो महाराष्ट्रात दहावा आला. ‘नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड’मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. २०१२ मध्ये त्यांच्या शाळेत सोय नव्हती तरीही आईनं माहिती काढून त्याला ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती’ (N.T.S.) परीक्षेला बसवलं. या परीक्षेच्या तयारीसाठी अहमदनगरमध्ये शिबीर घेतलं जातं. पण ऑटिझममुळे तो नित्यकर्मही एकटा करू शकत नसे. यासाठी हे शिबीर त्यानं दिवाळीच्या सुट्टीत आईसह पूर्ण केलं व राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवली. ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’त (२०१२-१३) त्यानं सुवर्णपदक मिळवलं. दहावीला ९१ टक्के गुण संपादन केले. अशा अनेक स्पर्धा जिंकण्याबरोबर त्यानं आता स्वावलंबनही साध्य केलं आहे. अकरावीपर्यंत सतत कोणाच्या तरी सोबतीची गरज भासणारा जतिन आता गोव्याला वसतिगृहात एकटा राहतो. बस, ट्रेन, विमान, असा कुठलाही प्रवास एकट्यानं करतो. आठवड्यातून एक तास अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या मुलांना शिकवतो. अर्थात अजूनही नवीन माणसांशी जुळवून घेताना त्याला त्रास होतो, लोकांमध्ये पटकन मिसळता येत नाही. मात्र आईच्या दक्षतेमुळे त्याची ऑटिझमची तीव्रता ९२ वरून ५० टक्क्यांवर आली आहे.
मुलांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना पैलू पाडणाऱ्या या मातेला ‘हिरकणी सन्मान’, ‘वंडर वूमन अॅवॉर्ड’, ‘सुपर मॉम’ गौरव, ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’चा राष्ट्रीय स्तरावरील ‘यशस्वी माता आणि अपत्य’ पुरस्कार, आदी पुरस्कार मिळाले आहेत. आतापर्यंतच्या या संपूर्ण प्रवासात लाभलेल्या पतीच्या कणखर साथीचा अर्चना आदरपूर्वक उल्लेख करतात.
एवढं मोठं शिवधनुष्य उचलण्यासाठी कोणती साधना करता? असं विचारल्यावर त्यांचं उत्तर असतं, ‘‘दुसरं काही करायला वेळच कुठे आहे?… अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. मुलांना अनुरूप जोडीदार मिळवून द्यायचे आहेत! त्यांचा सुखाचा संसार डोळे भरून पाहायचा आहे!’’ त्या सांगतात, ‘‘आज माझ्या शरीरात अस्थमा, स्पाँडिलिसिस, व्हर्टिगो, उच्च रक्तदाब, मधुमेह, व्हेरीकोज व्हेनस् असे अनेक आजार ठाण मांडून आहेत. पण मुलांची सर्वांगीण प्रगती हा एकच विषय मनाला व्यापून उरल्यामुळे मी या दुखण्यांना डोकं वर काढूच दिलं नाही!’’
या माउलीचं ‘आव्हानांना पुरून उरणं’ समजून घेताना बहिणाबाईंच्या कवितेतली ओळ सारखी आठवत होती, ‘तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला’.
waglesampada@gmail.com