अ‍ॅड.रंजना पगार-गवांदे

आपल्या समाजात स्त्रीचे समाज वास्तव टोकाचे आहे. उच्च शिक्षण, उच्च अधिकारीपद, श्रीमंती उपभोगणाऱ्या स्त्रिया एकीकडे, तर दुसरीकडे अन्यायाच्या, अज्ञानाच्या दारिद्र्यात पिचत पडलेल्या अनेक स्त्रिया. कुणी मुलगा नाही म्हणून मार खाते, तर कुणी थेट चेटकीण ठरवली जाते. अॅड. रंजना पगार-गवांदे आपल्या सहकाऱ्यांसह गेली ३५ वर्षं स्त्रियांना या शोषणाच्या अंधकारातून बाहेर काढत आहेत. त्यासाठी त्यांनाही आत्तापर्यंत खूप संघर्ष करावा लागला होता. धमक्यांना तोंड देण्यापासून थेट चिडलेल्या जमावाच्या रोषाला सामोरं जावं लागण्यापर्यंत. हे सदर त्यांनी आत्तापर्यंत लढवलेल्या अशाच प्रकरणांचे. दर पंधरा दिवसांनी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी-सुरगाणा तालुक्यातील पांगारणे हे माझे जन्मगाव. माझ्या जन्मानंतर माझे आई-वडील कुकुडणे (पांगारण्यापासून ३ कि.मी. अंतरावर) या गावी राहाण्यास आले. कुकुडण्यातील चिंचपाड्यावर राहाणाऱ्या दोन स्त्रिया, झिमण व जत्री यांची आमच्या घरी सतत ये-जा असायची. मला त्यांचा व त्यांना माझा लळा लागलेला होता. माझे लहानपण त्यांच्या कडे-खांद्यावरच गेले. आई सांगायची की, पाड्यावरील अनेक स्त्री-पुरुष तिला सांगत, ‘‘बाई, पोषीला त्यांना पाशी नको देऊ हो. त्यात… डगर ह!’’ (म्हणजे तुमच्या मुलीला झिमण व जत्रीकडे देऊ नका कारण त्या भुताळी (चेटकीण) स्त्रिया आहेत) लोकांच्या या सांगण्याला माझ्या आईने अर्थातच कधी मानलं नाही की जुमानलंही नाही. आईचा या लोकांच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता की, मुळात चेटकीण-भूताळी या कल्पनेवरच तिचा विश्वास नव्हता? हे मात्र कळू शकलं नाही. हा प्रश्न मी आईला अनेकदा विचारला, परंतु तिच्याकडून मला समाधानकारक उत्तर कधी मिळालंच नाही.

समाजानं चेटकीण ठरवलेल्या या माझ्या यशोदा मातांच्या ताटातील घास खाणारी, त्यांच्या अंगा-खांद्यावरची फडकी ओढत कडेवर फिरणारी मी शाळेसाठी निरनिराळ्या ठिकाणी राहिले, फिरले. अगदी थोडा काळ वगळता बहुतांशी शिक्षण घोलवड (ठाणे जिल्हा), कळवण, साकोरे, नायगाव, सटाणा (नाशिक) या ग्रामीण व आदिवासी भागात झाले. या सर्व प्रवासात ग्रामीण जीवन, आदिवासी जीवनपद्धती खूप जवळून पाहता आली. अनुभवता आली. सर्व वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे प्रश्न, त्यांचे स्वरूप, त्यामुळे कुटुंबाची होणारी होरपळ, हालअपेष्टा हेही जवळून पाहता आले. वास्तव जीवनातील विदारकता दिसली.

अनेकांच्या संसाराची व्यसनामुळे झालेली दुर्दशा, अनेक तरुणांची अनिष्टतेकडे होणारी वाटचाल, अनेक स्त्रियांचा घराघरांत होणारा छळ… या बाबी जवळून पाहायला मिळाल्या, नव्हे त्या पाहात पाहातच मोठी झाले. दारू पिऊन आलेल्या नवऱ्याचा मार खाणारी गोजराबाई, भोंदुगिरी करणाऱ्या मांत्रिकाची सेवा करणारी तिची सासू, परस्त्रीच्या नादी लागलेल्या नवऱ्याला परावृत्त करण्यासाठी मांत्रिकाकडे जाऊन उपाय शोधणारी व शेवटी मांत्रिकाच्या लालसेची शिकार झालेली शांता अशा अनेक स्त्रिया या काळात भेटल्या. बाप दारू पिऊन घरी येण्याची वेळ झाली की, खाटेखाली जाऊन लपून बसणारे, उपाशीपोटी झोपणारे आशा, विष्णू, शांताराम ही मुले भेटली. बायकोने गिरणीत दळायला टाकलेले दळण परस्पर विकून त्याची दारू पिणारा दगडू आणि त्याच दगडूचा मार खात परिस्थितीवर मात करत मुलांना वाढवणारी त्याची बायको वत्सलाही भेटली.

ते सारं पाहून खूप राग, चीड, संताप यायचा. पुढे मोठी झाल्यावरही आदिवासी भागात म्हणजे माझ्या जन्मगावी सुट्टीच्या काळात जातच होते. मी ज्या गावात वाढले त्या कुकुडणे गावात किंवा त्याच्या भोवतालच्या पंचक्रोशीत कोठेही वैद्याकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या. कुकुडणे गावात एक आरोग्यसेविका होत्या-अलीजाड ताई. अलीजाड ताईसोबत मी सुटीच्या काळात अनेक वाड्या-वस्त्या-आदिवासी पाड्यांवर फिरायची. या फिरण्यात या आदिवासींच्यात असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा, त्यांचे दारिद्र्य, गैरसमज पाहायला मिळाले. अनेक अनिष्ट रूढी प्रथा-परंपरा समजल्या. अनेक व्याधींनी जर्जर झालेले रुग्ण ताईची चातकाप्रमाणे वाट पाहात असायचे. कधी दोन जिवांची स्त्री, कधी पाठीला पोट चिकटलेली ऐन तारुण्यात म्हातारी झालेली स्त्री, कधी जिवंत हाडामासाचा सापळा असणारा वृद्ध, तर कधी कुपोषित बालक! हे सर्व विदारक चित्र पाहून मी डॉक्टर होऊन याच भागात रुग्णसेवा करण्याचे स्वप्न बाळगलं होतं, परंतु मी डॉक्टर होऊ शकले नाही, वकील मात्र झाले! मग तेच आयुष्याचं ध्येय झालं. लोकांची सेवा करणं हाच उद्देश कायम होता. या सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल हा विचार सतत असायचा.

साहजिकच वकिली व्यवसायासोबतच सामाजिक कामही सुरू झालं. सामाजिक काम करतांना स्त्रियांचे आणखी वेगवेगळे प्रश्न समोर येत गेले. कुणी बालविवाह झालेली स्त्रीसुखाच्या शोधात रस्ता चुकली अन् तिची दुर्दशा झाली. कुणी मूल होण्यासाठी बुवाच्या दरबारात पोहोचली आणि मग त्याच्याच शोषणाला बळी पडली. याही पेक्षा वेगळ्या समस्या घेऊन जगणाऱ्या अनेक जणी भेटल्या. कुणी अज्ञान वयात लग्न होऊन पुढे अंगात संचार झाला म्हणून घुमणारी, तर कुणी जातपंचांनी जातीबाहेर काढल्यावर भानामती सारख्या गूढ रहस्यमय गोष्टींचा आधार घ्यावा लागलेली. लहानपणीच देवाशी लग्न झालेली, भूतबाधा झाली म्हणून अंग काळं-निळं पडेपर्यंत मांत्रिकाचा मार झेलणारी सुशीलासारख्या तर कित्येक.

सामाजिक कामाच्या वाटेवर भेटलेल्या या सख्यांचे प्रश्न खूप आगळे-वेगळे व भयाण होते. क्लेशकारक होते. समाजापासून, कुटुंबापासून, नातेवाईकांपासून दुर्लक्षित असलेल्या या माझ्या सख्यांच्या प्रश्नांना भिड्ताना ते प्रश्न सोडविण्यासाठी, कधी त्यांच्या समवेत, कधी त्यांच्या विरहित असा प्रवास करत संघर्ष केला. त्यातील अनेक प्रसंग काल्पनिक वाटावेत असे आहेत, तर काही घटना अतिरंजितही वाटाव्यात अशा, परंतु त्या वास्तवातल्या आहेत. सामाजिक सत्य उलगडण्याचा, मांडण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

हे काम करताना मला चळवळीतील अनेक सहकाऱ्यांचं, लोकांचं सहकार्य मिळालं, मार्गदर्शन लाभलं, पाठबळही लाभलं. भोंदू बुवा-बाबांचे भांडाफोड करत असताना विरोध करण्यासाठी आलेल्या शेकडोंच्या जनसमुदायाला सामोरे जावं लागलं. जातपंचायतीच्या मनमानी विरोधात काम करत असतानाही अनेकदा धोका पत्करून लढावं लागलं. भूत-भानामती-चेटकीण प्रकरण उकलताना प्रखर विरोध पत्करावा लागला. समाजहिताची, प्रबोधनाची भूमिका घेऊन हे काम करत असताना शासकीय यंत्रणांची उदासीनता, अनास्था (काही अपवाद वगळता)अनुभवायला मिळाली. या संपूर्ण प्रवासात प्रसारमाध्यमांची मिळालेली साथ वाखाणण्याजोगी आहे. प्रसारमाध्यमांमुळे आमचे काम समाजापर्यंत गेले. त्यातून लोकांचा चांगला, सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि काम करण्यास बळ मिळत गेलं.

आदिम अवस्थेतील माणसाला वीज का चमकते? सूर्य का तळपतो? वादळ, वारा, हिमवृष्टी, भूकंप, समुद्रात उसळणाऱ्या लाटा या सर्व बाबी आकलनापलीकडे होत्या. स्वाभाविकच त्याला असं वाटायचं की, हे सर्व घडवून आणणारी अलौकिक शक्ती अस्तित्वात आहे. त्या शक्तीच्या सामर्थ्याने या गोष्टी घडतात. त्यातून जादूटोणासारख्या कल्पना व शब्दप्रयोगही उदयाला आले. ‘जादूटोणा’ याचाच अर्थ ‘गूढ शक्तीचा दावा करून फसवणे.’ आदिम मानवाला घटनांमागचं कारण कळत नव्हतं. त्यांचे बरेच आयुष्य भौतिक शक्तींशी झगडण्यात गेलं. या शतकात परग्रहावर लोकवस्ती असण्याची भाषा करणारं जग एकीकडे तर जादूटोणा, अंगात देवीचा संचार, चेटूक, भूत-भानामती या कल्पना घेऊन मानवी जीवन दु:खमय करणारं जग दुसऱ्या बाजूला, अशी दोन टोकांच्या वस्तुस्थितीला सामोरे जावं लागत आहे. आता विज्ञानाने गरुडझेप घेतली आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींचा कार्यकारणभाव उमगला आहे. ज्या गोष्टी अज्ञात वाटत होत्या त्याची कारणंही विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आधारे समजली, काही यापुढेही कळतील हेही माणसाला समजले आहे. अशा परिस्थितीत भानामती, जादूटोणा यासारखी प्रकरणे व त्यातून होणारा छळ या बाबी खरं तर अपोआप बंद व्हायला हव्यात. पण ते झालेलं नाही हे दारुण वास्तवच माझ्या आत्तापर्यंतच्या कामातून दिसत आलं आहे. त्याविरुद्धच संघर्ष सुरू आहे.

भोंदू बुवा-बाबा. भूत-भानामती, चेटूक, व्यसन, बालविवाह, देवदासी या आणि अशा अनेक माध्यमांतून होणारं स्त्री शोषण… संघर्ष… लढे… झालेला विरोध… यश… अपयश हे सर्व या सदरातून मी लिहिणार आहे. त्यातील अनिष्ट प्रथा, स्त्रियांच्या बाबतीत असलेली अनास्था, अज्ञान, गैरसमज, अंधश्रद्धा, दूर करण्यासाठी तुमच्याशी हितगुज करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

हे फक्त वास्तव मांडणे आहे, प्रत्यक्ष अनुभवलेलं, कारण ते स्वीकारलं तरच पुढचा सुटकेचा मार्ग सापडू शकतो.

वकिली क्षेत्रात गेली ४० वर्षे कार्यरत असणाऱ्या अॅड. रंजना पगारगवांदे गेली ३५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या त्या राज्य सरचिटणीस आहेत. त्या ‘अहिल्यानगर जिल्हा व्यसनमुक्ती संघटने’च्या अध्यक्ष तसेच ‘महाराष्ट्र व्यसनमुक्ती मंचा’च्या संस्थापकसदस्यही आहेत. स्त्री सक्षमीकरणाचे कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून आत्तापर्यंत त्यांनी राज्यभरातील बालविवाहाची ३०० पेक्षा जास्त प्रकरणे हाताळली आहेत. भ्रूणहत्या थांबवण्यासाठीचा गर्भधारणापूर्व आणि प्रीनॅटल डायग्नोस्टिक तंत्र कायदा, १९९४ तसेच कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा, २०१३ च्या अंमलबजावणीसाठी शासकीय पातळीवरून जाणीव जागृतीसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta chaturrang social reality of women social reality amy