तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ
‘मी अशी/असा.. म्हणून सगळे मला एकटं पाडतात,’ अशी तक्रार अनेक जणांची असते. पण प्रत्येक वेळी त्यांच्यातल्या वेगळेपणामुळे किंवा त्यांच्या मते वैगुण्यामुळे समाजानं त्यांना एकटं पाडलेलं असतं का? की त्यांनीच प्रत्यक्ष घटना घडायच्या आधीच समाजापासून तोडून स्वत:ला एकटं केलेलं असतं?.. पण आता समाज बदललाय, व्यापक विचार करू लागलाय.. ते असे सहज शिक्के मारणं टाळतात, असे अनुभवही अनेकांनी घेतले आहेतच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी निरीक्षणगृहात समुपदेशक म्हणून काम करताना, माझ्याकडे चोरीचा आरोप असणाऱ्या तीन मुलांना समुपदेशनासाठी पाठवलं होतं. तिघेही मध्यम आर्थिक स्तरातून आलेले.  या मुलांची ओळख कुठेही उघड होऊ नये, याची खबरदारी पोलीस आणि न्यायालय घेत असतं. त्यामुळे तिघे जामीन मिळाल्यानंतर शाळेला जायला लागले.

त्यांच्या वडिलांची कार्यालये लांब होती, त्यामुळे या चोरीची बातमी तिथपर्यंत काही पोहोचली नव्हती. घराच्या परिसरात मात्र या गोष्टीची बरीच चर्चा झाली होती. याच दरम्यान, त्या परिसरातल्या कोणाचं तरी लग्न होतं. त्याचं आमंत्रण तिघांच्याही घरी होतं. मात्र तिघांच्या आईंनी ‘लोक काय म्हणतील’ या भीतीनं घराच्या बाहेर पडणंच बंद केलं होतं. माझ्या समुपदेशनाच्या सत्रात या लग्नाची गोष्ट निघाली. मी त्यांना सुचवलं, की तुम्ही तिथे जाऊन तर बघा! त्यावर  तिघींचं म्हणणं होतं, की ‘‘लोक म्हणतील, पालकांनी हेच संस्कार दिले का मुलांना?’’ खूप ऊहापोह झाल्यानंतर त्या लग्नाला जायला तयार झाल्या. पुढच्या सत्रात त्यांनी सांगितलं, ‘‘लोकांनी आम्हाला येऊन सांगितलं, की तुम्ही मुलांना चांगलंच सांभाळलेलं आम्ही पाहिलंय. मुलं अजाणतेपणी काही तरी चूक करतात आणि ती किती महागात पडते बघा बरं!’’. म्हणजे लोकांनी त्यांना समजून घेतलं होतं. त्यांच्यावर कोणतेही चुकीचे शिक्के मारले नव्हते. पण या मुलांच्या आईंनी स्वत:च आपल्यावर असे शिक्के मारले जातील अशी समजूत करून घेतली होती. त्यातूनच त्यांनी समाजापासून स्वत:ला तोडून घरात बंद करून घेतलं होतं. याला स्वत:च स्वत:वर लादून घेतलेला कलंक वा शिक्का (perceived stigma), असं म्हणतात.

या प्रकारात प्रत्यक्ष घटना घडलेली नसते किंवा प्रत्यक्ष उद्दीपकही (stimulus) उपस्थित नसतो, तरीही व्यक्ती आपल्यावर शिक्के मारले जातील अशी स्वत:ची समजूत करून घेते. मागच्या लेखात आपण लोकांनी शिक्के मारल्यावर कसं एकटेपण येतं ते पाहिलं होतं. मात्र इथे प्रत्यक्ष घटना घडायच्या आधीच समाजापासून तोडून स्वत:ला एकटं पाडलं जातं. लोक किंवा समाज काही नेहमीच खलनायकाच्या भूमिकेत नसतो, पण काही वेळा पूर्वानुभव, काही वेळा इतरांचे ऐकलेले अनुभव, यांमुळे आपल्या निश्चित अशा धारणा बनलेल्या असतात. वरचेवर त्या धारणेला पूरक असे प्रसंग आपण विशेष लक्ष देऊन बघतो, ऐकतो आणि मग काय, त्या धारणा अधिक पक्क्या होतात. आपल्यावर वेळ आली की त्या धारणा डोकं वर काढतात. एवढं सगळं करून परिस्थिती जेवढी नसते त्यापेक्षा अधिक गंभीर करून टाकतात. लाल झेंडे, धोक्याच्या घंटा त्यांना समाजाला आणि प्रत्यक्ष प्रसंगाला सामोरंच जाऊ देत नाहीत. फक्त एकटेपणाची जाणीव मात्र पक्की करून जातात.

अक्षताच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती. तिच्या नवऱ्याचं, अमितचं अचानक अपघाती निधन झालं. त्यानंतर आठ महिन्यांनी संक्रांत आली. दर वर्षीचं हळदीकुंकू, वाण, काळी साडी, अमितच्या आठवणी हे सगळं आठवून अक्षताला सकाळपासूनच खूप रडू येत होतं. ऑफिसमध्येसुद्धा सगळय़ाजणी नटून आल्या होत्या. तिला उगीचच ‘या सगळय़ाजणी आपल्याला टाळताहेत,’ असं वाटत होतं. ती स्वत:हून कोणाशीच बोलत नव्हती. कधी एकदा या वातावरणातून बाहेर जाईन असं तिला वाटत होतं. पण इथून बाहेर पडून तरी जाणार कुठे? सगळीकडेच तर संक्रांतीचं उत्साही वातावरण होतं. अमितच्या माघारी ती सासरीच राहात होती. तिच्या सासूबाई तिची तगमग बघत होत्या. प्रत्यक्षात तिच्याशी रोजच्यापेक्षा वेगळं कोणीच वागलं नव्हतं. पण ती स्वत:च ‘विधवा’ हा शिक्का विसरू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमधून घरी आली, तर घरी तिची आईही आलेली होती. ती बेडरूममध्ये गेली, तर तिच्या सासूबाईंनी तिची ठेवणीतली साडी काढून ठेवली होती. सासूबाईंच्या सांगण्यावरून अक्षता तयार होऊन बाहेर आली, तर सोसायटीतल्या सगळय़ा बायका बाहेर आलेल्या होत्या. ती गोंधळूनच गेली. सासूबाईंनी तिच्या पाठीवर हात फिरवून सांगितलं, ‘‘अगं अक्षता, पुढे हो. हळदी-कुंकू दे.’’ शेजारच्या पाटील काकू म्हणाल्या, ‘‘अक्षता, लवकर आटप हं! आपल्याला अजून इतरांकडेही जायचंय हळदी-कुंकवाला.’’ तिची सोसायटीतली प्रिय मैत्रीण हर्षू अक्षताच्या गळय़ात हात घालत म्हणाली, ‘‘आम्ही सगळेजण तुला सोडून संक्रांत करू असं वाटलं तरी कसं तुला वेडाबाई?’’ अक्षताला सगळय़ांचं प्रेम बघून रडू फुटलं. तुम्हीप्रगती करता, तसा समाजही प्रगती करतोच की! अक्षतानं तरी तिच्या एखाद्या मैत्रिणीला केवळ तिचा नवरा या जगात नाही म्हणून संक्रांतीला एकटीला टाकलं असतं का?

या प्रकारच्या शिक्क्यांमागे काही पूर्वानुभव असतात, ते अनुभव धारणा (beliefs beliefs) तयार करतात. पण त्या बहुतेक वेळा अतार्किक असतात आणि अनेकदा तर पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणून अजिबात वेगळा विचार न करता पाळल्या जातात. पोहायला शिकायला गेल्यावर पहिल्या दिवशी जरा नाकातोंडात पाणी गेलं आणि गुदमरलं आणि केवळ तेवढय़ा एका दिवसाच्या अनुभवानं ‘पोहताना नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरतंच,’ असं विधान केल्यास ते तार्किक (rational) असेल का? या धारणेला वास्तवाच्या कसोटीवर पडताळून पहा. सगळय़ांनाच हा अनुभव येतो का? सगळय़ांनाच गुदमरत असतं, तर मग लोक पोहायला जातात तरी कशाला? तुम्हाला तरी सतत पोहायला गेल्यावर हाच अनुभव आलाय का? नाही, तर मग तार्किक धारणा काय असली पाहिजे? ‘पोहायला शिकताना नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरण्याचा अनुभव येऊ शकतो, पण तो सदासर्वकाळ आणि सर्वाना येईलच असं नाही.’ अक्षतानं विधवांना इतर स्त्रिया अशी वागणूक देतात, असा प्रत्यक्ष अनुभव कधी घेतला होता का? तिनं कधी कोणाला अशी वागणूक दिली होती का? गेल्या आठ महिन्यांत तिला विधवा म्हणून कधी एकटं पाडलं गेलं होतं का? या प्रश्नांची उत्तरं जर ‘नाही’ असतील, तर मग हे शिक्के स्वत:वर मारून घेऊन एकटं पडायची तिला काहीच गरज नाही. अर्थात विधवांना भेदभावाची वागणूक देणारा समाजातला एखादा वर्ग असेलही. त्याबाबतची शिक्के मारणाऱ्यांची चर्चा केलीच आहे, पण अक्षताच्या किंवा आधीच्या चोरीच्या उदाहरणातल्या त्या तीन मुलांच्या आईंच्या बाबतीत समाजानं, कुटुंबानं प्रत्यक्षात समजून घ्यायची भूमिका घेतली. इथे आड आला आहे तो केवळ  perceived stigma विवेकनिष्ठ विचारपद्धतीतलं दुसरं एक तत्त्व म्हणजे कोणत्याही माणसाला तुम्ही काळय़ा किंवा पांढऱ्या रंगात बघू शकत नाही. त्याला ‘ग्रे’ शेडमध्ये पाहणं तार्किक असतं. कोणी एक व्यक्ती सदासर्वकाळ खूप चांगलं किंवा खूप वाईट वागू शकत नाही. तसं अनेक व्यक्तींनी बनलेल्या या समाजालासुद्धा ‘ग्रे’ शेडमध्ये बघणं गरजेचं आहे. बहुतेक सगळय़ांना, ‘मी चांगली (वा चांगला) आहे, पण जग तसं नाहीये ना! मी ‘नॉन जजमेंटल’ आहे, पण समाज तर तसा नाहीये ना!’ असं वाटत असतं. समाजात जसा वाईट किंवा नकारात्मक शिक्के मारणारा वर्ग असेल, तसा समजून घेऊन शिक्के न मारणारा वर्गही आहेच की! तुम्ही तुमच्यावर एखादा प्रसंग ओढवल्यावर जेवढं मोकळय़ा मनानं किंवा वास्तववादी विचारानं समाजाला सामोरं जाता, तेवढा तुम्हाला चांगला अनुभव यायची शक्यता वाढेल. मात्र तुम्हीच जर स्वत:ला एका वैचारिक चौकटीत जखडून घेतलं, तर तुम्हाला या अनुभवांपेक्षा एकटेपणाची अनुभूती जास्त येईल.   

    साने कुटुंबातली तीनही मुलं डॉक्टर होती. मोठय़ा दोघांनी डॉक्टर मुलींशीच लग्न केलं, पण धाकटय़ा योगेशनं मात्र माध्यमिक शाळेत शिकवणाऱ्या प्रांजलीशी लग्न केलं. घरात कोणताही कार्यक्रम असला किंवा सण असला, की मोठय़ा दोघी वेळात वेळ काढून मदतीला यायच्याच, पण मुख्य तयारी तर प्रांजली आणि सासूबाईच करायच्या. सगळे एकत्र आले की रुग्ण, त्यांच्या समस्या याभोवती आपसूकच चर्चा फिरायच्या. प्रांजलीला वाटायचं, की ‘यातलं आपल्याला काहीच कळत नाही, म्हणून मुद्दाम हे सगळेजण चर्चा करतात. आपल्याला कमी लेखतात.’ म्हणून सगळे आले की ती निमूटपणे काम करायची आणि काम संपलं की दार लावून झोपण्याचं नाटक करायची. प्रत्यक्षात मोठय़ा दोघी आपल्या मुलांना अभ्यासात काही अडलं, तर ‘‘काकूला विचारा रे.. तीच तुम्हाला सोपं करून सांगू शकेल. तिच्या शाळेतली लाडकी टीचर आहे बरं का ती मुलांची!’’ असं सांगायच्या. योगेशनं हे प्रांजलीला कित्येक वेळा समजावून सांगितलं, पण  असा स्वभाव कोणी सांगितल्यानं जात नाही, त्यासाठी त्या त्या व्यक्तीला स्वत:लाच त्यावर काम करावं लागतं. काम करायचं म्हणजेच वास्तवाच्या कसोटीवर (fact checking) आपल्याला जाणवणारा शिक्का तपासून पाहायचा. आपण जे जाणून घेतोय किंवा समजून घेतोय ते खरं आहे का? हे तपासताना पक्षपाती मात्र व्हायचं नाही.

दुसऱ्या धर्मात वा जातीत किंवा भिन्न भाषा बोलणाऱ्या कुटुंबात लग्न करून जाणाऱ्या मुलींनाही या perceived stigmaची अनुभूती येते. किती वर्ष लोटली, तरी त्यांना आपल्याला कुटुंबानं स्वीकारलं आहे, आपण त्यांच्यातले एक आहोत, असं वाटतच नाही. एखादी छोटी घटना घडली, की हा शिक्का डोकं वर काढतो. पालकांनी कितीही प्रेमानं आणि समानतेनं बहीणभावांना मोठं केलं, तरी थोडं कमी जास्त झालं, तर ‘मी मुलगी आहे, म्हणून मला असं वागवतात!’ असं म्हणून आयुष्यभर स्वत:ला कुटुंबात एकटं समजणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाहीये.

थोडं नीट निरीक्षण केलं, तर आपल्याही कुटुंबात आणि समाजात किती तरी ठिकाणी असे शिक्के हेच वास्तव आहे असं मानून जगणाऱ्या व्यक्ती आढळतील. ‘आपल्यावरूनही जग ओळखावे,’ या उक्तीनुसार तुमच्या मनाची विचारांची प्रगती झाली असेल, तर समाजाचीही झाली असेलच की! हा विचार किंवा ही धारणा तुम्हाला एकटं पडू देणार नाही. आणि वास्तवावर आधारित धारणा तुम्हाला कित्येक सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींशी जोडलं जायला मदतच करतील.

 trupti.kulshreshtha@gmail.com