‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेलं हे भाषण. प्रत्येकालाच मनामध्ये डोकावून पाहायला लावणारं, विचार करायला लावणारं म्हणूनच ते संपूर्ण प्रसिद्ध करीत आहोत.

सन्माननीय लोकसत्ता परिवार… याच्या इतकं सुटसुटीत संबोधन मला दिसत नाहीए आत्ता, कारण आपण इथे जमलो आहोत ते ‘लोकसत्ता’शी कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने जोडलेले आहोत म्हणून. वाचक तर आहोतच सगळे. गिरीश कुबेरांना मी आवर्जून सांगते की, ‘लोकसत्ता’शिवाय माझा दिवस जात नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक. सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह, तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक म्हणून मला एका गाठोड्यात बांधलेलं असलं तरी माझी सुरुवात नाटकापासून झालेली आहे. किंबहुना या लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी मी हिंडले, नाटकाच्या अभ्यासासाठी मी हिंडले. मग ते तंजावर असू देत, बंगालची रंगभूमी असू दे, दक्षिणेकडची कथकली असू देत, कोकण असू दे, गोवा असू दे, कर्नाटक असू दे, कुठेही असू दे त्यामुळे भटक्या आणि विमुक्त जमातीसारखी मी भटकत आले. आणि त्या भटकण्यातून मला जे काही सापडलं त्यातून मी आनंद घेत आले. कुणाला काही शहाणपण शिकवण्यासाठी नाही. इथे मी यावं म्हणून माझा पिच्छा पुरवणारी आमची मैत्रीण आरती कदम आणि गिरीश कुबेर, त्यांच्याशिवाय हे ‘लोकसत्ते’चं पानच हललं नसतं. या सगळ्या पुरस्कार विजेत्या आहेत, त्या माझ्या बहिणी. भगिनी…वगैरे संस्कृतप्रचुर शब्द टाळते. कारण अभिजात मराठी नावाचा दर्जा नुकताच आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे नेमकं काय झालं? हे मला खरं म्हणजे अजून कळलेलं नाहीये. पण त्याच्या पाठोपाठ ९८व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी अपघाताने माझ्या गळ्यामध्ये पडलेली आहे. पण त्याचंही समाधान आहे. आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर अशा काही काही जबाबदाऱ्या मित्र-मैत्रिणी गळ्यात मारताहेत. आणि त्याच्यासाठी उभं राहण्याचं बळ आपल्यासारखी मराठीप्रेमी मंडळी देत आहेत. त्यामुळे हा जर काही मानसन्मान असेल, तर तो आपल्या सर्वांचा आहे. सगळ्या कलावंतांचा आहे. ज्या माझ्या या बहिणी निरनिराळ्या क्षेत्रात काम करत आहेत त्या एकेकीच्याबद्दल बोलायचं झालं, तर एक एक सप्ताह बोलावं लागेल. यापैकी काही माझ्या पूर्वपरिचित आहेत. काही नव्याने परिचित झाल्यात. काहींची कामं मला माहिती होती, पण व्यक्ती म्हणून त्या आज दिसलेल्या आहेत. त्या प्रत्येकीबद्दल पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे.

Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?

ज्या लोककलावंतांनी आज या कला सादर केल्या त्यातले बरेचसे आमच्या सांगली, सातारा भागामधील आहेत. ते शाहीर लोक मला येऊन भेटलेसुद्धा, देवानंदसारखे. आणि या मुलींनी जे काही सादर केलेलं आहे मग तो पोवाडा असेल, भारूड असेल, वाद्यो वाजवलेली असतील, इथे मुंबई विद्यापीठाच्या विद्यामाने जी लोककला अकादमी स्थापन झाली त्यांच्या संस्थापकांच्यापैकी मी एक आहे. हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. त्यामुळे त्या लोककला अकादमीच्या सुरुवातीच्या ज्या अध्यापिका आहेत त्या आता नावलौकिकाला आल्या आहेत. त्याचा मला आनंद होतो आणि अभिमान वाटतो. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशिवे ही सगळी माझ्या सुरुवातीच्या परिवारामधली मुलं आहेत. आता ते थोर झालेत सगळे. कारण मी म्हातारी झाले. तर हा इथला नाट्य परिवार लोककलांचा. शिवाय रंगमंचावर मी १४ वर्षे अभिनेत्री म्हणून कामं केलं. त्याचा कुठे उल्लेख नाही झालेला. राज्य पातळीवर पुरस्कार वगैरे मिळाले. आणि ज्यावर्षी मला सर्वोत्कृष्ट स्त्री भूमिकेचं रौप्यपदक मिळालं त्यावर्षी मी रंगमंच सोडून दिला आणि संशोधनामध्ये जास्त गुरफटत गेले. ते आजपर्यंत गुरफटलेलीच आहे. त्यामुळे नाट्यामुळे खरं म्हणजे मी इकडे वळले. मघापासून एक उल्लेख होतोय, माफ करा मला तो खटकतोय, तो म्हणजे लोकसंस्कृती, लोककला हे फक्त ग्रामीणतेशी बांधलेलं आहे, तर तसं नाहीये. लोकसंस्कृतीची एक अभ्यासक म्हणून मी तुम्हाला एकाच वाक्यात सांगेन की, ‘लोकसंस्कृती’ हा एक प्रवाह आहे अखंड. आणि तो आदिम ते अद्यातन असा चालत आलेला आहे. तुमच्या-माझ्या प्रत्येकामध्ये त्या आदिमतेचे अंश आहेत. मधल्या काळातले अंश आहेत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र याची जी वाटचाल आहे त्या वाटचालीनुसार आपण बदलत असतो. पण आपल्या आदिमतेचे अंश पूर्णपणे गळून पडत नाहीत. आमची मैत्रीण मोनिका गजेंद्रगडकरने मध्ये माझ्याकडून एक टिपण घेतलं आणि तिला थोडक्यात लिहून देण्यासाठी मी म्हटलं होतं, हा लोकसंस्कृतीचा प्रवाह आदिम ते अद्यातन कसा आहे त्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं होतं की, जीव जन्माला आला सृष्टीच्या पाठीवर कुठेतरी. मग तो जंगली अवस्थेमध्ये गेला. शिकार करून जगायला लागला. नंतर शेती केली. या प्रत्येक टप्प्यातले अंश तुमच्या-माझ्या जगण्यामध्ये आजतागायत शिल्लक आहेत. ज्या नवदुर्गांचा दुर्गा म्हणून आपण सत्कार करत आहात. ती दुर्गा ही आदिम देवता आहे. ती आत्मसंरक्षक आणि सृष्टीसंरक्षक अशी देवता आहे. फार खोलात शिरून विद्वत्ता पाजळत नाही. परंतु आदिमतेचा अंश तुमच्या चालीरीती, भाषा, रुढी, तुमचा धर्म, तुमच्या जाणिवा, तुमच्या समजुती याच्यामध्ये आजतागायत चालत आलेला आहे. त्यातलं एक उदाहरण शिकारी अवस्थेतलं. त्यातून अजून आपण बाहेर आलेलो नाही. फक्त शिकारीच्या पद्धती बदलल्या. याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. हिंदीमध्ये हजारीप्रसाद द्विवेदी हे एक मोठे सामाजिक अभ्यासक आणि ललित लेखकही होते. त्यांचा एक सुंदर वैचारिक निबंध आहे. त्याचं उदाहरण मी मोनिकाला दिलं होतं. ‘नाखून क्यू बढते है?’, ‘माणसाची नखं का वाढतात?’ हजारीप्रसादजींनी सांगितलं, ‘‘ये इस बात की निशानी है के आदमी में जानवर है। वो अब तक जिंदा है।’’ माणसामधला जनावर अजून जिवंत आहे, कारण जनावर अवस्थेमध्ये तो नखाने ओरबडून आणि दाताने ओरबडून शिकार खात असे. आता नखं वाढतायत आपली, तो शिल्लक राहिलेला शारीरिक अवशेष आहे, जैविक अवशेष. मानसिक अवशेषही वाढतोय की काय असा प्रश्न निर्माण होतो कधी कधी.

हेही वाचा – विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर

u

लोककलावंतांनी जी कला सादर केली. दोष काढायचा म्हणून सांगत नाही. एक उदाहरण देते बारीकसं. आमच्या गावामध्ये म्हणजे सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. मधल्या काळात ती थोडी बंद पडली. आणि मग त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. हे आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं, पण ते कलेच्या माध्यमातून ऐकलं. माझं डोकं हे पहिल्यापासून तिरकं चालणारं आहे आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये प्रश्न आला आणि मी त्या सद्गृहस्थांना त्या मासिकामध्ये लिहून विचारलं की, जर स्त्रियांचं मानसिक संतुलन नीट राहावं म्हणून कुंकवाची बिंदी वगैरे लावत असतील तिथे दाबबिंदूवर, तर सगळ्या पुरुषांचं मानसिक संतुलन बरोबर असतं का? आणि दुसरी गोष्ट जर स्त्रीचं मानसिक संतुलन नीट राहावं असं वाटत असेल तर मग विधवांचं काय? कारण त्यांना तर मानसिक संतुलनाची जास्त गरज आहे, सामाजिक आणि कौटुंबिकरित्या. तर अशा प्रकारचे जे काही युक्तिवाद केले जातात विज्ञानाच्या नावावर ते कसे असतात ते आपण समजू शकता. लोककलांनी बौद्धिक जागर करावा, ज्ञानाचा जागर करावा, अशी अपेक्षा असते. पण कधी कधी त्याच्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टी वैज्ञानिक म्हणून घुसडल्या जातात. ज्याला ‘स्यूडो सायन्स’ असं म्हणतात. छद्मा वा व्याज विज्ञान.

बऱ्याच वेळेला शिक्षित म्हणवणाऱ्या लोकांकडून… मी सुशिक्षित म्हणत नाही. मी मास्तर आहे. शब्द जपून वापरते. कारण सुशिक्षित म्हटलं की अपेक्षा अशी असते की त्यांच्यात शहाणपण असावं. आपला आणखी एक समज आहे की, बायकांना लिहिता-वाचता येत नव्हतं त्यावेळेला त्या सगळ्या महामूर्ख होत्या. आपल्या सगळ्या पुरुषांसुद्धा लिहिता वाचता केव्हा यायला लागलं? साहेब आल्यानंतर आपल्याकडे शाळा निघाल्या, सगळ्या पुरुषांसाठीसुद्धा. बायकांची तर गोष्टच वेगळी आहे आणि लिहिता वाचता आल्यानंतर माणूस शहाणा होतो असं नाही. साक्षर होतो. साक्षरता, शहाणपण आणि शिक्षण याच्यामध्ये फरक असतो. तो आपण समजून घ्या. साक्षर झाल्यानंतर माणसाने शहाणं व्हावं अशी अपेक्षा असते. होतोच असं नाही. याची आपण अनेक उदाहरणं आसपास पाहात असतो आणि मी ज्या लोकसंस्कृतीमधनं दळण दळणाऱ्या बायकांच्या पासून ते गोंधळ, जागरण घालणाऱ्या, पण आता अनेक उदाहरणं देता येतील. एक बारीकसं उदाहरण देते. आमची बहिणाबाई चौधरी म्हणाली होती, तिला लिहिता-वाचता येत नव्हतं. आमच्याकडची सगळी मंडळी म्हणतात, बघा त्या बायका अडाणी असूनसुद्धा… हे ‘अडाणी असूनसुद्धा’ म्हणणारे ‘महाअडाणी’ आहेत, असं माझं मत आहे. बहिणाबाई अनक्षर होत्या. अक्षर ओळख नव्हती. साहेब आमच्या देशात आल्यानंतर आमचा एक असा समज झालेला आहे की, लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण. लिहिता-वाचता ज्या वेळेला माणसाला येत नव्हतं तेव्हा ती माणसं शेती करत नव्हती का? घरं बांधत नव्हती का? विहिरी खणत नव्हती का? घराचं वायुविजन राखत नव्हती का? वस्त्र विणत नव्हती का? स्वयंपाक करत नव्हती का? बाळंतपणं करत नव्हत्या का बाया? याला शिक्षण म्हणायचं की नाही? की फक्त लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण. मग माझी बहिणाबाई चौधरी म्हणते, ‘‘अरे, मानसापरी मानूस राहतो रे येडाजाना आनि छापीसनी होतो कोरा कागज शहाना.’’ छापल्यानंतर कोरा कागदसुद्धा शहाणा होतो, पण छापलेले अनेक कागद वाचल्यानंतर माणसासारखा माणूस येडा जाना राहातो. लिहिता वाचता आलं म्हणजे सर्व शिक्षण येतंच असं नाही, ते केव्हा येतं शहाणपण असलं त्याच्या जोडीला तर येतं. शिक्षणाने माणूस शहाणा व्हावा अशी अपेक्षा असते. होतोच असं नाही. असं ४५ वर्षं सर्व स्तरावर शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर मी सांगते. म्हणजे अनुभवसंपन्न वगैरे काय म्हणतात ते सगळं. तर हे जे आपले अपसमज आहेत. त्या अपसमजातनं आपण नागर मंडळी जितक्या लवकर बाहेर येऊ तितकं बरं. आणि आम्हाला असं वाटत असतं आम्ही नगरी म्हणजे नागर, महानगरी मंडळी हे अतिजास्त सुबुद्ध आहोत, ते आहोत की नाही याचं जरा आत्मपरीक्षण करावं. एवढंच मी अत्यंत नम्रपणाने सांगू शकेन. कारण या मुंबईचं वर्णन करत असताना अगदी जुन्या काळातल्या पठ्ठे बापूरावांच्यापासून वर्णन करत आले, ‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका,वाजतो डंका, चहु मुलकी’ असा डंका वाजवणारी ही नगरी आहे. या नगरीमध्ये कोणी अज्ञानाचं भरण पोषण करू नये. असं मला नम्रपणाने सांगावंसं वाटतं आणि कुठल्याच पातळीवर ते होऊ नये. बऱ्याच गोष्टी सांगता येतील मला.
जात्यावर दळण दळण्यापासून शेता-रानात काम करण्यापासून लोकसंस्कृतीमधल्या सर्व ज्याला ‘विधा’ म्हणता येतील त्या विधांना स्पर्श करत राहणारी मी एक सामान्य बाई आहे. ते साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे दिलं याचं कारण आपण सगळेजण आहात. म्हणजे मराठी माणसं आहात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही चांगली गोष्ट आहे. समाधान आहे. कारण शासकीय पातळीवर कुठलं शिक्कामोर्तब होणं ही आनंदाची गोष्ट असते. तेवढा आनंद मलाही झाला. आपल्यालाही झाला. प्रश्न असा आहे ती मराठी भाषा टिकवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काम करत असलेली एक डोळस नागरिक म्हणून मी फक्त सांगते. मराठी भाषा शिक्षणामध्ये किती टिकते काय? मराठी शाळा किती बंद पडतायत? शिक्षकांना वेळेत अनुदान मिळतंय की नाही? पूर्ण वेळ शिक्षकांच्या नोकऱ्या मिळतायत की नाही? आपल्या मुलांना आपण मराठी माध्यमातून शिकवतो का? किती मंडळी पूर्णपणे घरामध्ये मराठी बोलतात? की पोरगं दुपट्यातनं बाहेर पडल्यापासनं तुला यलो कलर आवडतो का रेड कलर आवडतो? म्हणून विचारतात. लाल आणि पिवळा काही कळत नाही, तर अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. मराठी टिकवायची असेल तर आपण मराठी किती वापरतो? कारण कुठलीही गोष्ट चलनात असते तोपर्यंत ती टिकत असते. चलनातनं गेलं की नाणं बाद होतं.

‘भाषा’ ही एक सजीव संस्था आहे. आणि ती सजीव संस्था जर सजीव राहायची असेल तर सजीवांनी तिचा जागरूकपणे वापर केला पाहिजे. असं एक मराठी भाषिक नागरिक म्हणून मी नम्रपणाने सांगू इच्छिते.

आपण आज सन्मान केला या सर्वांचा. हा कृतिशीलतेचा सन्मान आहे. हा विधायक कार्याचा सन्मान आहे. आणि दुर्गा होणं ही काही साधी गोष्ट नाहीये. तिला एकाच वेळेला निर्मातीही व्हायचं असतं, संरक्षकही व्हायचं असतं आणि पोषकही व्हायचं असतं. आणि स्त्रीच्या जवळ ही मूलभूत सगळी साधनं आहेत. ती निर्माती आहे, ती संरक्षक आहे आणि ती पोषक आहे. कारण बाळ जन्माला आल्यापासून काही काळ त्याचं पोषण करण्याची जबाबदारी निसर्गानेच तिच्यावर टाकलेली आहे. मग मला परत लोकगीतं आठवतात. ‘कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती? वाढवी श्रीपती सवे दोन्ही…’ तर त्यामुळे त्या स्त्रीजवळ ही सगळी सामर्थ्य आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना फक्त लग्नकार्याच्या वेळी पत्रिका लिहिताना आपली कुलदेवता आठवते तसं करू नका. मग आमची अंबाबाई प्रसन्न, अमुक प्रसन्न, तमुक प्रसन्न असं लिहिलं जातं. तर ती पहिली एक कुलदेवता असते म्हणजे आई असते. लक्ष्मी आई, अंबाबाई, रेणुका आई. दक्षिणेकडे गेलं की अम्मा, पोचम्मा, मायम्मा, यलम्मा. अम्मा प्रत्येक स्त्री आई. ‘आई’ याचा अर्थ निर्माती. दुसरं काही नाही. एकीकडे आम्ही आईला महन्मंगल, पवित्र वगैरे वगैरे वगैरे सगळं मानतो. आणि पहिली शिवी तोंडात येते ती आईवरून आणि बहिणीवरून. याच्यामधले जे विरोधाभास आहेत आमच्या जगण्यामधले. हे आमच्या कधी लक्षात येतात की नाही असा प्रश्न आहे. आई होणं हे जर महन्मंगल पवित्र असेल. तर मग आमचे बंधू, आमचे बाप असं कधी म्हणतात का? की, मला बाईच्या जन्माला घाल म्हणजे आई होता येईल चांगलं. मग माझी जात्यावर दळण दळणारी बाई जास्त शहाणी आहे हो. ‘देवा नारायणा माझी विनंती फार फार, जन्म बायकांचा नको घालूस वारंवार.’ जर बायकांचा जन्म एवढा पवित्र, उदात्त असता तर मला बायकांचा जन्म वारंवार घालू नको असं तिनं का म्हटलं असतं? आणि कुठल्याही पुरुषाने मग असे नवस का केले नसते मला बायकांचा जन्म घाल म्हणून. असले विरोधाभास आमच्या लक्षातच येत नाहीत पुष्कळदा की आमची कृती आणि उक्ती याच्यात फरक आहे. हे गौरवांकित करत असताना मोठी मोठी विशेषणं वापरायची आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये तिसरंच काही तरी होत असायचं. या सगळ्याजणी जी कामं करतायत ते आपल्या जगण्याचा खऱ्या अर्थाने विकास करत आहेत. जे जीवन भकास होतंय त्या भकासाचा विकास करण्याचं काम हे मातृशक्ती करते आहे. निर्माण शक्ती करते आहे आणि निरनिराळ्या क्षेत्रात त्या निर्माण करताहेत. माणसाचं दु:खाचं जगणं त्या सुखाचं करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्या अपंग असतील, विधवा असतील किंवा बेवारस असतील, या सगळ्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं अत्यंत विधायक काम करणाऱ्या या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. या काय शिकवतात? मग पुन्हा मी शेवटाकडे येते… त्याच्या आधी मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. ज्या ‘लोकसत्ता’ने सगळ्यांचा सन्मान केला मी सगळ्यांच्या वतीनं या उपक्रमाबद्दल आणि संचालकांबद्दल, आमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींबद्दल आणि दोन नावं प्रातिनिधिक घेते. संपादक गिरीश कुबेर आणि आरती कदम आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद देते. आपल्या सर्वांच्या वतीनं मी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि एकच सांगायचं झालं, तर माझ्या जात्यावरच्या बाईने मला जास्त शहाणं केलं. पुस्तकांनी डिग्य्रा दिल्या. पदव्या दिल्या. पोटापाण्याचा उद्याोग दिला बऱ्यापैकी. प्राध्यापकी वगैरे… त्यामुळे मी अजून इथे उभी आहे. पण खरं शिक्षण आणि शहाणपण कोणी दिलं असेल, तर मला लोकसंस्कृतीने आणि संतांनी दिलं. संत साहित्यांनी आणि विशेषत: संत स्त्रियांनी. तुम्ही मला सांगा, अंत्यज समाजातली एक स्त्री, सोयराबाई. जी स्वत:ला ‘चोख्याची महारी’ म्हणवून घेते. आमच्या शहरातली शिकलेली मंडळीसुद्धा बायकांनी अमुक मंदिरात जाऊ नये. तमुक मंदिरात जाऊ नये, कारण म्हणून त्यांच्या महिन्यावर ठपका ठेवतात. त्यांना उत्तर देणारी चौदाव्या-पंधराव्या शतकातली ‘चोख्याची महारी’ म्हणवणारी ही सोयराबाई. जिला लिहिता-वाचता येतं की नाही माहीत नाही. कुठल्या संतांना लिहिता-वाचता येत होतं की नाही? माहीत नाही. ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज सोडले तर. पण ही मंडळी जी आम्हाला शहाणपण शिकवून गेली. ते कोणालाही बाकीच्यांना कळतंय की नाही अजून. म्हणजे आम्ही तशा तथाकथित स्त्री मुक्तीवाल्या बाया. ही शिवी आहे अनेकांच्या दृष्टीने, तर त्यांनाही ते कळतं की नाही.

हेही वाचा – दीपज्योतिर्नमोऽस्तुते।

एकाच अभंगाचे दोन चरण सांगते फक्त. तो अमक्याचा विटाळ तमक्याचा विटाळ. विटाळ दोन प्रकारचे असतात. एक बाईचा अंगभूत आणि दुसरा जातीपातींमुळे होणारा विटाळ. आणि बायकांना तर तो चिकटलेलाच आहे. आमच्या शहाण्यासुरत्या बायका म्हणतात, नाही हो ते सगळं पाळायला पाहिजे अजून. तर ती चोख्याची महारी म्हणते, ‘‘देहाचा विटाळ देहीच जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी, उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी.’’ असा कोण माणूस आहे? एखादा माणूस म्हणतो माझा जन्म जैविक नाही वगैरे. याचं कारणंही असं की, त्याच्या मनामध्ये कुठेतरी न्यूनगंड असतो आणि मग आमच्या सगळ्या परंपरेमध्ये आणखी एक संकल्पना आहे ‘अयोनीज जन्म.’ म्हणजे बाकी सगळ्या वेळेला योनीचं कौतुक करायचं. अयोनीज जन्म झाला म्हणजे काहीतरी महान घटना घडलेली आहे, चमत्कृती. अशा प्रकारच्या काही विपरीत कल्पना या मनामध्ये दडलेल्या असतात. या संत स्त्रिया ज्या अनक्षर होत्या. मी अडाणी म्हणत नाही. ही सगळी माझी लोकपरंपरा जी आहे ती अनक्षरांची आहे. पण शहाणपणाची आहे.

Story img Loader